सुरेशाचा गझलोत्सव - कलंदर 'भट'कंती
सुरेशाचा गझलोत्सव - कलंदर 'भट'कंती
प्रास्ताविक
ओळख! एक दिवस अचानक हा शब्द गुंजारव करत मनात आला आणि म्हणता म्हणता त्यानं मनात विचारांची वावटळ उठवली. अमुक एक व्यक्ती ओळखीची आहे असं म्हणतो तेव्हा आपण खरंच त्या व्यक्तीला ओळखत असतो का? काहीवेळा पाहिलेल्या व्यक्तीला, दोन चारदा भेटलेल्या व्यक्तीलाही, आपण ती व्यक्ती ओळखीची आहे असं म्हणणं बरोबर असतं का? ही सर्व प्रस्तावना ह्या साठी की प्रचलित बोलचाली प्रमाणे वैदर्भीय बाण्याचे लोकप्रिय कवी, गझलकार सुरेश भट यांना मी ओळखू लागलो साधारण आठवी, नववीत असताना पासून. त्यांचा मुलगा आणि मी काही काळ एकाच शाळेत होतो. आम्हा दोघांची स्वभाव, प्रकृती जरी एकदम भिन्न असली, तरी का कुणास ठाऊक, आमच्यात थोडी मैत्री जुळली. बहुदा ती त्याच्या मुक्त छंदी वागण्यामुळे. शालेय जीवनात एकमात्र वेळा झालेली शिक्षा ही त्याच्या बरोबर शाळे लगतच्या वनात, मधली सुटी संपून गेल्यावरही, चिंचा, बोरं तोडत भटकत राहिल्यामुळे झाली होती. अशा प्रकारात अर्थातच तो माझ्यापेक्षा भलताच सरस होता. त्यामुळे आमच्या मुख्याध्यापकांवर भट साहेबांना शाळेत बोलावण्याची वेळ वारंवार येत असे. त्यावेळी बरेचदा माझीही भट साहेबांशी भेट व्हायची. पण ती सह पाठकाचे वडील अशी मर्यादित होती. तो पर्यंत गद्य वाचन बरच केलं असलं तरी पद्य वाचनाशी फारशी सलगी नव्हती. सुरेश भट मराठीतले एक कवी आहेत इतपतच माझं सामान्य ज्ञान होत. मात्र त्यांच्या कविता फारशा वाचल्या नव्हत्या. अश्या तुटपुंज्या भांडवलावर त्यांना ओळखण्याचा दावा निरर्थकच नाही का?
तेव्हा एखाद्याला आपण ओळखतो असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा त्या व्यक्तीची, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं, कलागुण, क्षमता, आवड निवड यापैकी निदान काही बाबी तरी आपण नीट जाणतो. याअर्थी भट साहेबांना मी ओळखू लागलो ते त्यांच्या कविता, गझला वाचू, ऐकू लागलो, सिंहासन चित्रपट आणि त्यातल्या राजकीय पत्रकार दिगु टिपणीस (निळू फुले) वर चित्रित झालेलं 'उषःकाल होता होता' आणि विशेषतः दूरदर्शनच्या कार्यक्रमात देवकी पंडित यांनी गायलेली त्यांची आशय प्रचुर 'सिग्नेचर ट्यून' म्हणता येईल अशी 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' ही गझल ऐकल्या नंतर. आता ती ओळख त्यांच्या पश्च्यात दिवसागणिक नित्यनेमाने दृढ होत आहे.
जडण घडण
सुरेश भट यांचा जन्म अमरावतीचा. निधर्मी, पुरोगामी विचारांचं बाळकडू त्यांना आईकडून मिळालं, तर बेदरकारपणाचा वारसा डॉक्टर वडीलांकडून. शैशवातच पोलियोनं ग्रासलं. औपचारिक शिक्षण थोड्या गटांगळ्या खात झालं. मात्र बिनभिंतीची उघडी शाळा अधिक जिव्हाळ्याची. अजोड काव्य प्रीती आणि कलंदर मनोवृत्ती मुळे अनेक उद्योग केले तरी कुठेच फार काळ स्थिरता लाभली नाही.
मात्र काव्य म्हणजे त्यांचा श्वासोच्छ्श्वास होता. कविताच त्यांची जीवन संगिनी होती. याचा पुरावा म्हणून मी ऐकलेला एक किस्सा सांगतो. एकदा भटांचा कुणी नातलग त्यांना मारायला अंगावर धावून आला. त्यांनी त्याची गचांडी धरली, एक मुस्कटात लगावली आणि म्हणाले शेर ऐक.."सोयरा एक एक माझा थोर होता हा लफंगा तो दरोडेखोर होता" असं म्हणून आणखी एक लगावून दिली. जगण्याचे कितीतरी छान बेत होते आणि दैव त्यांना बरोबर कविते कडेच घेऊन गेलं.
विविधांगी जीवनानुभावांनी त्यांची कविता संपृक्त होत गेली.
"असे दिले शब्द शृंखलांनी...असा दिला त्वेष दुःखितांनी
दुभंग मी राहिलो तरीही अभंग माझे इमान होते".
त्यांनी आयुष्यभर काव्याशी अभंग इमान राखलं.
'भट'कंती
साधारण 1946 पासून काव्य लेखनाला सुरवात झाली असली तरी आपण गझल लिहितो, याची जाणीव भट साहेबांना बरीच नंतर झाली. ती ही मित्र मंडळींनी तसं सांगितल्यावर. गझल लिहायची असं ठरवून त्यांनी ती जाणीव पूर्वक लिहिली नाही. त्यांची गझल जाणिवेतून नाही तर नेणीवेतून, वेदनेच्या गर्भातून आली आणि म्हणूनच ती रसिकांच्या थेट काळजाला भिडली. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर
"अन कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा" सोसलेली प्रत्येक वेदना त्यांच्या काव्यातून, गझलेतून प्रकट होत राहिली. सोसलेल्या कळांच्या गझल, कविता रुपी कळ्या झाल्या. जीवन संघर्षा दरम्यान, सावल्या आल्याच नाहीत असं नाही. मात्र नियातीच अशी होती की त्या सावल्यांच्याही झळा लागल्या. काव्याकृती काळीज काबीज करते ती आशयामुळे! निव्वळ शाब्दिक सौंदर्य, अनुप्रास, यमक हे भांडवल त्यासाठी अपुरं ठरतं. कविवर्य भटांच्या काव्यात क्षणोक्षणी ही आशय संपन्नता आढळून येते.
गझल - सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !
गझल अशीच जन्म घेत नाही. आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या आंतरिक सुख दुःखात तिच्या निर्मितीची बीजं असतात. टोकाचा स्वप्नीलपणा आणि हृदयद्रावक स्वप्नभंग यांच्या संकरातून ती प्रसवते. कविवर्य सुरेश भट यांचं व्यक्तिमत्व आणि भवताल अशा सृजनशीलते साठी पोषक ठरलं. गझलेचा पाहिला शेर म्हणजे 'मतला' लिहिल्या नंतर पुढे ती कधीही पूर्ण केली जाऊ शकते. त्यामुळे गझलेचा आकृतीबंध त्यांच्या वृत्तीला भावणारा, मानवणारा आणि परवडणाराही होता. उत्कृष्ट, अप्रतिम तरल काव्य सृजन व्हायला कधी कधी, एक शेर सुचल्या नंतर पुन्हा त्याच गुणवत्तेचा शेर सुचायला सावकाश वाट पहावी लागते.
क्लिक - मालवून टाक दीप
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग !
दूरदूर तारकात बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !
हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग?
काय हा तुझाच श्वास ? दर्वळे इथे सुवास!
बोलरे हळू उठेल चांदण्यावरी तरंग"...
'मालवून टाक दीप'
ही पहिली ओळ सुचल्या नंतर सहा महिन्यांनी भट साहेबांना दुसरी ओळ सुचली 'चेतवून अंग अंग' आणि ती संपूर्ण व्हायला तीन वर्ष लागल्याचं त्यांनीच एका ठिकाणी सांगितलं आहे. काही गझलांनी तर पूर्ततेसाठी 20 वर्ष वाट पाहिली.
आमद बेचाता नही
उंबरठा चित्रपटातल्या एका गझलेचा किस्सा तर अनेकांना ठाऊक असेल. मुळात जयश्री गडकर निर्मिती करत असलेल्या वि. स. खांडेकर यांच्या अमृतवेल कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटासाठी त्यांना गाणी लिहायला सांगितली होती. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर. एका गाण्याचं साधारण दोन हजार रुपये मानधन त्याकाळी मिळत असे. मुंबईतल्या दादर इथे एका हॉटेलमध्ये त्यांची निवास व्यवस्था केलेली होती. गप्पा, चर्चा, खानपान व्यवस्थित सुरू होतं मात्र दहा बारा दिवस लोटले तरी भट साहेबांनी काही एकही शब्द लिहिला नव्हता. बिल वाढत होत. जयश्रीबाईंनी गाण्यासाठी लकडा लावला. हृदयनाथांनी त्यांना गाणं कधी देणार विचारताच ते म्हणाले मला काही सुचत नाही कदाचित सहा महिने लागतील. हॉटेल सोडून दे, मुक्काम आमदार निवासात हलवतो. एव्हाना हॉटेलचं बिल आठ हजारा पर्यंत पोहोचलेलं. भट साहेब टॅक्सीत बसले. सामान ठेवता ठेवता त्यांनी हृदयनाथां कडून बिलाचा कागद मागवला आणि 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या' एकहाती लिहून दिलं आणि निघून गेले. जयश्री बाईंनी खुश होऊन त्यांना दिलेला पंधरा हजारांचा चेक, तसाच परत करत ते म्हणाले, "ये आमद हैं..इसे मैं बेच नही सकता." मूळ चित्रपट काही आला नाही आणि पुढे हे गीत उंबरठा चित्रपटात, कथेला अनुसरून, 'कुणीतरी' आरशात आहे या मूळ ओळीतला, शांता शेळके यांनी कथानकाला शोभेल असा सुचवलेला 'तुझे हसू' आरशात आहे हा एक शब्द बदल करून घेतलं गेलं.
क्लिक- सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
काव्य अभिव्यक्ती
मृदुता, कोमलता असो वा तप्त विखार, संघर्ष, हळुवार प्रीती असो वा धगधगती क्रांती; मनातल्या भावभावनांच्या अभिव्यक्तीसाठी जणू काही शब्द चाल घेऊन त्यांच्या कडे चालत येत आणि आपापल्या आशयानुसार कधी हळुवार कोमल स्वरात तर कधी कुरुक्षेत्रावर फुंकलेल्या पांचजन्याच्या भेदक स्वरात त्यांच्या गळ्यातून बाहेर पडत. ते काही गायक नव्हते. गायन कला, शास्त्र रुढार्थानं त्यांनी अभ्यासलेलं ही नव्हतं पण अवखळ समीर जसा सुगंधाचा हात हातात घेऊन मुक्त संचारतो तशी त्यांची कविता सूरांच्या साथीनं पालखीतून मिरवत यायची. म्हणूनच त्यांच्या कवितेचे गाणे करायची वेगळी आवश्यकता भासत नसे. ती सहजभावाने गेय, नादमयी होती. अंतर्यामीच्या सुख दु:खाची छाया त्यांच्या काव्यात, गझलेवर पडलेली दिसते. कुठलाही आड पडदा न बाळगता त्यांनी आपल्या भावना समाजा पुढे ठेवल्या.
"ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते"
"निमूट माझे जगणे मला सोसता न आले अखेरच्या वागण्यात माझ्या विखार होता"
हारलेला डाव
आयुष्यात जिंकलेल्या डावांचा आनंद तर सर्वसाक्षीनं घेता येतो. मात्र हारलेल्या डावांच्या घावांनी भळभळणाऱ्या जखमांवर, आपली आपणच एकांती मलमपट्टी करावी लागते हे भटांनी फार मार्मिकतेनं मांडलं आहे.
"या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते
कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते
तो कसा बाजार होता, ती कशी होती दुकाने
रक्त होते एक ज्याचे वेगळाले भाव होते
प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला
ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते
ते ना होते , नेहमीच्या त्याच काट्यांचे पहारे
ते फुलांच्या लाजण्यांचे लाघवी घेराव होते
राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला
घेतले जे श्वास ते हि - हारलेले डाव होते"
आयुष्यात हार जीत ही चालायचीच. विजयश्री ही एकाअर्थी कधीच निष्ठावंत नसते. ती मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतानाच तिच्या बाबत स्वामित्व भावना, कधीच बाळगायची नसते. असं जरी असलं तरी आपल्याच गावात, स्वजनांकडून झालेले परिचित घाव, ते ही दगाफटक्यानं, लाघवी घेराव करून, अगदी प्राण जाते वेळी जेव्हा होतात, त्यावर मलमपट्टी करण्याचीही संधी मिळत नाही. तेव्हा ही हार जीवघेणी ठरते. अशावेळी सारं आयुष्यच हारलेला डाव ठरतं. हा आशय या गझलेत किती मार्मिकपणे उतरला आहे.
भटांच्या काव्यातून खंत, निराशा देखील दुबळे पांगळे पणानं नाही तर नटून, सुंदर सजून समोर येते.
"म्हणू नका आसवात माझे बुडून केव्हाच स्वप्न गेले
उदास पाण्यात सोडलेले प्रसन्न ते दीपदान होते"
"अताच कोणी फकीर माझ्या घरापुढे ओरडून गेला
शिकस्त झालास तू न बेटा, तुझे इरादे महान होते!"
'याचेच रडू आले की, जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते"
'नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते"
'एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा !'
काय मागून काही मिळे ?
का तुला गीत माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा वसा !
जीवना तू तसा मी असा"
त्यांच्या काव्य कल्पनेची भरारी अगाध आहे. अचंबित करणारी आहे. परिघ देखील अचाट करणारा आहे. 'चल उठ रे मुकुंदा,' 'आज गोकुळात रंग खेळतो हरी', 'मी मज हरपून,' 'मेंदीच्या पानावर,' 'चांदण्यात फिरताना माझा धरलास हात,' 'सजण दारी उभा काय आता करू', 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,' भोगले जे दुःख ज्याला सुख म्हणावे लागले,' 'गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, 'भीमराय घे तुला,' 'त्या पैलतीरावर मिळेल मजला' इत्यादी वानगी दाखल सांगता येतील. सामाजिक बांधिलकीशी त्यांच घट्ट नातं होतं. आपण जिथे जन्म घेतला, आयुष्य जगलो त्या जगाच आपण देणं लागतो ही भावना त्यांच्या ठायी होती. त्यांच्या काव्यात, गझलेत, अंतर्यामीच्या सुख दु:खाची छाया पडली आहे. जीवन विषयक काव्यातून ते विलक्षण चटका लावणाऱ्या शब्दांतून व्यक्त होतात.
'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'
'आता राहिलो मी जरासा जरासा उरावा जसा मंद अंती उसासा'
'आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले'
'होता न साध्य एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले'
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले'
'मी तळमळताही निर्विकार जन सारे
पण तिथे वाहतो प्रसन्न शीतल वारा !'
'सारखी विफलता व्यथा माझिया भाली
पलीकडे हासतो जीवन-श्रेय-फुलोरा !'
ते नास्तीक होते असं म्हटलं जात. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता. मात्र ते श्रद्धावान होते. त्यांच्या कवितेतून राधा, कृष्ण, श्रीरंग, देवकीनंदन, तथागत, गौतम, भीमराया अशा अनेक प्रतिमांच दर्शन घडतं.
'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा'
सावल्यांचा झळा लागणाऱ्या, दुःखाला लळा लागणाऱ्या या संवेदनशील कवीला, आयुष्यानं कधी गळा कापला हे कळलंच नाही. एकूणच माणसांच्या मध्यरात्री हिंडणाऱ्या या सूर्याचे तात्पर्य त्याच्याच शब्दात….
क्लिक- रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा
'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा
चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझिया साठी न माझा पेटण्याचा सोहळा !'
भटकंती करता करता भरकटून जायला होईल इतकी सौंदर्य स्थळं, प्रणय, आशय, विचार सुरेश भट यांच्या काव्य विश्वात आढळतात. त्या सर्वांचा धावता आढावाही एकाच लेखात साधणं अशक्यप्राय आहे.
भट साहेबांच्या शब्दात सांगायचं तर
"मी न दुबळी कुडी अजुन शृंगारली
मी न सगळीच ही आसवे माळिली"
लेख लिहितांना माझी स्थिती कशी झाली आहे त्याचे वर्णन भट साहेबांच्या अंदाजात व्यक्त करायची म्हटलं तर लिहायचे अजून कितीतरी राहिले, पुरतेपणी सुरेशाला आळवायचे राहिले अशीच झाली आहे. तूर्तास हीच लेखन सीमा ठरवुया.
क्लिक- सजण दारी उभा
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.Com
8851540881
भटांच्या गझल, गाण्यांची ताकद जबरदस्त आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी अनेक गाण्यांना अद्वितीय संगीत दिले आहे. प्रत्येक काव्य अंतर्मुख करणारे आहे. "मना प्रमाणे जगावयाचे" ही माझी खुप आवडती गझल. आपण त्यांच्या सहवासात होता हे आपले भाग्यच.
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवामला भावलेला पहिला मराठी गझलकार,सुंदर लेख
उत्तर द्याहटवानितीनजी,
उत्तर द्याहटवासुरेश भट यांच्यावर लिहिलेला लेख अप्रतिम असाच आहे. खाणीतनं एकेक रत्न बाहेर काढावे तशा त्यांच्या गजला आहेत .मालवून टाक दीप माझं अत्यंत आवडतं गीत आहे.रंगुनी रंगात हेही तसेच मनाला भारावून टाकत .तुमची लेखन शैली अतिशय मनाला .भावून जावी अशी असते तुम्ही त्यांचं सारं व्यक्तित्व वाचकांच्या समोर उभं केलेत।
धन्यवाद।
अत्ताच लेख वाचून झाला।पुनर वाचनानेही किती आनंद मिळतो त्याचा प्रत्यय आला ,तो केवळ तुमचं लेखन सुरेख शब्दात गुंफलेलं असतं म्हणून।भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागते ऐकताना आपण भोगलेल्या दु:खाची तीव्रतेनं जाणीव होते. खूप छान।.
उत्तर द्याहटवातूर्त तुमच्यासाठी शुभेच्छा.💐💐
खूप सुंदर लेख! भटांच्या काव्यातील खंत, नैराश्य,दु:ख,उदासी ..सारं काही नटून येतं... सुंदर सजून येतं..व्वा नितीन जी,हे मनापासून आवडलं.. भटांच्या काव्यातील किती सौंदर्य स्थळं दाखवली तुम्ही.. तुमच्या बरोबर केलेली 'भट'कंती खूप आवडली.खूप खूप धन्यवाद आणि भट साहेबांना विनम्र अभिवादन!!🙏🏻🙏🏻🌷🌷
उत्तर द्याहटवाKharech sundar. Ashya thor vyaktichya kavitanvar bhashya karne he ek thor manushyach karu shakto v tuzhyamadhe ti sphurti ahe he mazhe bhagya ki mi tumchya rbi quarter madhe 1983 madhe alo astanna mala janavile hote. Keep the excellent work goes on and on....
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवा