स्मृतीबनातून - तोच चंद्रमा -प्रीतनिर्माल्य

तोच चंद्रमा-प्रीतनिर्माल्य



भूतलावरची होलिका दहनाची दाहकता आणि अवघं नभांगण व्यापूनही उरलेली चंद्राची केशरी दुधाळ शीतलता एकाचवेळी अनुभवत असताना धुंद समीराच्या सोबतीनं आलेल्या आर्त, कातर स्वरांनी मनाचा ताबा घेतला...


….तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी,

एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी….


सकृतदर्शनी हे काव्य म्हणजे, भूतकाळातल्या सप्तरंगी लाघव खुणांचा, वर्तमानात धांडोळा घेणाऱ्या सुधीर प्रियकराची कैफियत आहे. परिस्थिती भूतकाळात होती तशीच असतानाही, वर्तमानातल्या वस्तुस्थितीमुळे मनस्थिती मात्र फार वेगळी असल्यामुळे हा धांडोळा व्यर्थ आहे हे समजूनही धीरोदात्तता बाळगून असलेल्या, कुणा त्याची आहे. 


कवयित्री शांताबाई शेळके यांना ह्या नितांत लोभस, अर्थगर्भित, आशयपूर्ण काव्याची प्रेरणा मिळाली ती शिला-भट्टारिका यांच्या एका श्लोका वरून. विदूषी शिला-भट्टारिका या 9 व्या शतकातल्या. प्रचुर लेखन केलेल्या संस्कृत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. बहुतेक प्रमुख संस्कृत काव्यसंग्रहांमध्ये त्यांच्या रचना आढळतात. मध्ययुगीन संस्कृत साहित्य समीक्षकांनी त्यांच्या काव्य कौशल्याची वाखाणणी केली आहे. त्यांचा तो मूळ श्लोक आणि त्याचा भावार्थ जाणून घेऊया.


"यः कौमारहरः स एव हि वरः

ता एव चैत्रक्षपाः

ते चोन्मीलित-मालती-सुरभयः

प्रौढाः कदम्बानिलाः ।

सा चैवास्मि तथापि

सुरत-व्यापारलीलाविधौ रेवा-रेतसि-वेतसी- तरुतले

चेतःसमुत्कण्ठते ।।"


ज्याने माझ कौमारहर केलं तो माझा प्रियकर आहे. माझा पती आहे. चैत्रातली ही आल्हाददायक रात्र आहे. कदंब तरू वरून वाहणाऱ्या वाऱ्यानी तसच प्रफुल्लित जाईच्या गंधानी भवताल अधिकच अद्भुत, काव्यमय आणि रम्य झालं आहे. मन आणि भावना मोहरून गेल्या आहेत. मात्र त्याच वेळी पूर्व शृंगाराच्या प्रेमल स्मृतींनी मन विव्हळत आहे. मी तीच आहे, तेव्हाचीच आहे, पण आत्ता जाणवणारी ही हुरहूर प्रेम लोप पावल्याचे संकेत देते आहे. एकमेकांच नातं आता ‘ते’ तसं राहिलेलं नाही, हा मनीचा विषाद आहे. असा याचा थोडक्यात भावार्थ आहे.



कमी अधिक प्रमाणात प्रत्येकालाच येणारा हा सामान्य अनुभव. सिद्धहस्त, प्रतिभा प्रचुर शांता बाईंना या वरून असामान्य काव्य स्फुरलं आणि काव्य अवकाशात उदयास आलं, 'तोच चंद्रमा नभात' हे आता पर्यंत दोन पिढ्यांना आणि पुढे ही पिढ्यां पिढ्यांना अक्षरशः मंत्रचळ लावू शकेल असं अप्रतिम गीत. संस्कृतातून प्राकृतात येते वेळी प्रेयसीच्या मनीच्या भावना परकाया प्रवेश करून प्रियकराच्या  भावना झाल्या आणि मधुमालती ऐवजी जाईची फुलं दरवळली.


"तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी, एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.


नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे,

छायांनी रेखियले चित्र तेच देखणे,

जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी,

एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.


सारे जरी ते तसेच, धुंदि आज ती कुठे, मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे, ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी. एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.


त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा, वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा, गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी, एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी"


ऐकण्यासाठी क्लिक करा - तोच चंद्रमा नभात


बहुमुखी, बहुपेडी व्यक्तिमत्व लाभलेल्या जश्या काही व्यक्ती असतात तश्याच कलाकृती असतात. तोच चंद्रमा ह्या भावगीता बाबतीत ह्याची प्रचिती येते. अप्रतिम शब्द, आशय, कल्पनाविलासाठी कवयित्री शांताबाईंचा गौरव करावा; की आशय वर्धिष्णू करणाऱ्या सुडौल चाली साठी संगीतकार बाबूजींनी ची वाखाणणी करावी; की शब्दोच्चारात प्राण ओतून आपलीच चाल सुस्वरूप करणाऱ्या गायक सुधीर फडकेंची तारीफ करावी?


चैत्र यामिनीची कामिनीशी घातलेली सांगड, जाईचा कुंज, गंधमोहिनी, मज समीप अश्या सानिया शब्दांची पेरणी करणाऱ्या शांताबाई दुसऱ्या अंतऱ्यात सारे जरी तेच तेच असं न म्हणता  "ते तसेच" अशी शब्द योजना करतात. तेच तेच मधून तोच तोच पणा व्यक्त झाला असता मात्र 'ते तसेच' योजून अन्य कुठलाही र्‍हास झाला नसताना आज ती धुंदी नाहीशी झाल्याचं अधोरेखित होतं. शब्द योजनेतली ही नजाकत समजून घेतली पाहिजे.



संगीताकडे वळून पाहिलं तर, समर्पणाचा भाव प्रकट करणाऱ्या यमनाचा हात संगीतकार फडके यांनी हाती घेतलेला दिसतो. त्यांचा आणि एकूणच संगीतकारांचा हा लाडका राग. ज्याला जसा भावतो तसा हा यमन वळतो. हा सरळ, सुबोध आहे. "Simplicity is the ultimate sophistication" ही उक्ती तो सार्थ करतो. जे सौंदर्य कृत्रिम प्रसाधनांच्या  शिवाय ही खुणावतं, त्यात केवळ आकृष्टता नसते तर उत्कृष्टता ही असते. कवयित्रीच्या भावकाव्याला, सुधीर सुस्वर संगीतकार, गायक म्हणून लाभल्यामुळे आपणा सर्व चोखंदळ श्रोतृ वर्गाचा भाग्योदय झाला असच म्हणावं लागेल. कारण भावगीत गाण्यासाठी केवळ शास्त्रीयता हाच मापदंड होऊ शकत नाही. भावसंगीत आणि शास्त्रीय संगीतातला फरक नीट समजून अदाकारी झाली तरच खुमारी येते. भावगीतासाठी कमावलेल्या गळ्यापेक्षा गमावलेलं, हरवलेलं हृदय अधिक पूरक ठरतं. रागाच्या व्याकरणापेक्षाही आचरणानी श्रोत्यांच्या कानामनाचा ठाव घ्यायचा असतो असं आपलं माझं तरी मत आहे. भावगीत गाताना राग दाखवण्यासाठी वेगळा अवधी मिळत नाही. बहुतेकदा पहिल्या सूरा पासूनच शब्दाशयाचं  बोट धरून रागाच्या चालींन वाटचाल केली, तरच श्रोत्यांशी अनुराग जुळतो. रागदारीच्या ज्ञाना प्रमाणे शब्दकारीचं उत्तम भान राखणं हे ही नितांत गरजेचं असतं. बाबूजींच्या गायनात, कमावलेला गळा आणि हरवलेल्या हृदयाच्या भावना यांचा समासमा संयोग होत असे. चित्रपट गीत असो किंवा भावगीत, त्यात ते असा काही प्राण ओतत की ते गीत त्या नायकाचं किंवा कवी/कवयित्रीन कल्पलेल्या भावना व्यक्त करणारं न राहता त्यांच्या स्वत:च्या खऱ्याखुऱ्या भावना असाव्यात इतक्या प्रांजळपणे गळ्यातून येत असे.


या गीतातही प्रियकराला 'ती'च्याशी झालेल्या पहिल्या भेटीच्या वेळी भासलेली, वातावरणातील निरावता, चांदण धुंदी, जाईचा सुवास आणि त्या सुगंधाची मोहिनी  ही सर्व भौतिक सुखासीन स्थिती तशीच असली, ती दोघंही तीच असली, तरी आज त्यांच्यातली प्रितीची भावना लोप पावल्याची खंत आहे. भेटीत ती आर्तता नाही की त्यावेळीच्या त्या स्वप्नील 'परी'कल्पनाही नाहीत. जवळ असूनही एकमेकांच्या नात्यातली ऊब जाणवत नाही. पहिल्या भेटीच्या वेळी असलेली प्रीत भावनेतली कोवळीक संपून जूनपण आलं आहे. आता निर्माल्य झालेल्या फुलांत सुवासाचा पुन्हा शोध घेण्याचा व्यर्थ प्रयत्न तो करतो आहे. मात्र भंगलेल्या सूरातून गीत कसं जुळून येणार?



एकूणच तोच चंद्रमा नभात ह्या गाण्यात अप्रतिम काव्य,भावस्पर्शी मधुर संगीत आणि उत्कट गायन असा त्रिवेणी संगम झाला आहे. 

मराठी सारस्वतात मुख्यत्वे काव्यविश्वात प्रतिभेच्या ओसरणाऱ्या बहराची जाणिव काही कवींनी आपल्या रचनांमधून व्यक्त केलेली आहे. कविवर्य भा. रा. तांबे यांनी ती "मधु मागसी माझ्या सख्या, परी मधुघटचि रिकामे पडती घरी आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पाजिला तुला भरोनी, सेवा ही पुर्विची स्मरोनी, करी न रोष सख्या, दया करी"  अशा शब्दात मांडली आहे. आरतीप्रभुंनी काहीशी हीच भावना "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे;माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने" अशी व्यक्त केली आहे. "त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा, वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा, गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी"  या पंक्तींतून शांता शेळके यांना अश्या आशयाचं तर काही सुचवायचं नाही ना? असा ही एक विचार मनात चमकून जातो.


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com


(93232335)



टिप्पण्या

  1. अप्रतिम लेख! तुमचा अभ्यास व आवड, दोन्ही चे मिश्रण आहे. खुप नवीन व चांगली माहिती मिळते.

    उत्तर द्याहटवा
  2. चौफेर बल्लेबाजी!सोबत चौकार षटकारही!

    उत्तर द्याहटवा
  3. नितीनजी ,
    इतकं सुंदर इतक भावपूर्ण विश्लेषण शांताबाईंच्या या गीताचं आपण केलं की ते गीत प्रत्येकाने कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनुभवलेलं असतं .साऱ्याच कळ्यांची फुलं होत नसतात तसं सगळ्याच प्रेम कहाण्या काही सफल होत नसतात .प्रियकराच खरं दुःख शांताबाई -च्या लेखणीतून असं झरझर खाली उतरले ते नेमकेपणाने उलगडून दाखवण्याचं कसब आपल्यामध्ये आहे हे आपला प्रत्येक ब्लॉग पोस्ट वाचताना मला जाणवतं,।आपली आपली नोकरी सांभाळून हे तुम्ही सगळं कधी करता याचे एक मला आश्चर्य वाटतं ईश्वर तुम्हाला असेच चांगले ब्लॉक लिहिण्याची शक्ती देवो ही प्रार्थना या ब्लॉग साठी खूप खूप धन्यवाद कारण हे माझं खूप आवडतं गाणं आहे. असो

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक