स्मृतीबनातून - जग(पद्य)
नमस्कार….
साहित्य, कला, संस्कृती या विषयांवर आधारित स्मृतीबनातून हा अनियतकालिक ब्लॉग (गद्य) जून 2019 (२५.६.२०१९) ला मी सुरू केला. तेव्हा पासून, आता साधारण चार वर्ष तो अनियमितपणे मात्र सातत्यानं आपणाला सादर करीत आहे. आतापर्यंत 99 लेख प्रकाशित झाले असून साधारणतः ते सर्व विभिन्न वृत्तपत्रं, मासिकं, दिवाळी अंक आणि वेब पोर्टल वरही प्रसिद्ध झाल्यानं माझा उत्साह वाढला आहे. आपणापैकीही बहुतेकांनी नियमित आणि काहींनी साक्षेपी अभिप्राय देऊन मला नेहमीच प्रोत्साहित केलं आहे. त्याची उतराई करूच शकत नाही. माझा तसा मानस ही नाही.
या काळात हा ब्लॉग वाचलेल्यांची, पाहिलेल्यांची म्हणुया हवंतर, संख्या सुमारे 30 हजारां वर पोहोचते आहे. यात भारता खेरीज 15 हून अधिक देशांतल्या सुमारे अडीच हजार वाचकांचा ही समावेश आहे. जो माझ्या सारख्या सामान्यजनासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
यंदाच्या रामनवमी (३०.०३.२०२३) पासून या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पर्यंत पद्य ही मांडायला सुरुवात केली आहे. त्याचे ही गुणात्मक मूल्यांकन करून अभिप्राय द्याल अशी खात्री आहे.
पुष्प दुसरं
जग
आकळलो नाही जगा की जग मला कळलेच नाही
संभ्रमातच या अखेरी जग सोडण्याची वेळ झाली
दुष्ट ते ते निर्दालण्या शस्त्र हाती घेतले
सुष्ट होते भोवताली ते दगा देवून गेले
नियती मला हरवाया संकटे घेऊन आली
सामना केला असा तीच संकटग्रस्त झाली
पहिले मी कर्कशांचे पारडे जड होत गेले
सौम्य साऱ्या संवेदनांचे निर्घृण शिरकाण झाले.
बदलूनी स्वतःला तथागताचा मार्ग मी अनुसारीला
काय आता मी करावे तोही नाही रुचला
नितीन सप्रे,
दिल्ली,
270323



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा