स्मृतीबनातून-घर,बंदूक,बिरयानी' राजधानी दिल्लीत

'घर, बंदूक, बिरयानी' राजधानी दिल्लीत…


मराठी माणूस एकत्र येतं नाही, खेकड्या सारखा असतो, एकमेकांचे पाय ओढण्यातच धन्यता मानतो, असे बरेच प्रवाद प्रचलित आहेत. त्यात थोडंफार तथ्य असेलही. पण हे सर्व समज थोड्या प्रमाणात तरी गैरलागू ठरतील असे काही उपक्रम दिल्लीतला मराठी टक्का सातत्यानं योजित असतो. त्यात दिल्ली मराठी अधिकारी यांचा ग्रुप, दिल्ली मराठी प्रतिष्ठान, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, पुढचं पाऊल आणि अशा आणखी काही संस्था कार्यरत आहेत. आयोजनात नाही होता आलं तरी अश्या समारंभात मी आवर्जून उपस्थिती लावली आहे. नुकत्याच (शनिवार 22.4.23) झालेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर काही उत्साही मराठी अधिकाऱ्यांनी, अधिकारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'घर, बंदूक आणि बिरयानी' या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित केला होता. विशेष यासाठी की चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकारही थिएटर मध्ये उपस्थित होते.



अलिकडच्या काही वर्षात मराठी चित्रसृष्टिनं कात टाकली आहे. वैविध्यपूर्ण कथावस्तू मार्मिकपणे हाताळल्या जात आहेत. मराठी चित्रपटांची कक्षा रुंदावल्याचं सुखद चित्र दिसतं आहे. मराठी लोक बऱ्याच संख्येनी दिल्लीत असले तरी दिल्लीत मराठी चित्रपट बघायला मिळणं म्हणजे कपिलाषष्ठीचा योगच असायला हवा. बरं सुसंस्कृत मराठी जनांसाठी साहित्य, नाटक, चित्रपट या आणि अन्य कला म्हणजे जणू काही पूरक अन्न आहे. या पार्श्र्वभूमिवर हे आयोजन निश्चितच अभिनंदनीय आहे.चित्रपटानंतर योजलेलं सहभोजन आणि सहज गप्पा म्हणजे तर मिठाई वरचा वर्ख ठरला. 



नक्षलवादा सारख्या गंभीर विषयावरचा 'घर, बंदूक, बिरयानी'  हा चित्रपट दिग्दर्शक हेमंत अवताडे यांच्या आगळ्या वेगळ्या हाताळणी मुळे शेवटा पर्यंत उत्कंठा टिकवून ठेवतो. अभिनय ज्याला नवखा नाही, मात्र लेखन, दिग्दर्शनासाठी अधिक प्रसिद्ध असलेल्या नागराज मंजुळे या चित्रपटात 'राया पाटील' या पोलीस इन्स्पेक्टरच्या मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळतो. अश्या प्रकारची आणि मध्यवर्ती भूमिका साकारण्याची ही त्याची पहिलीच वेळ. सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे ही भूमिका स्वीकारली असं त्यानं सांगितलं. स्वतःला लेखन, दिग्दर्शनातली मुशाफिरी अधिक प्रिय आणि सहज वाटते. भूमिकेचं बेअरिंग सांभाळत अभिनय करणं हे आव्हानात्मक आणि कठीण वाटतं असही त्यांनी सांगितलं. इन्स्पेक्टर 'राया पाटील' च्या भूमिकेत नागराजला पाहताना अपरिहार्यपणे सिंघमची होणारी आठवण हे यश की अपयश हे जो तो आपापल्या विचारानुसार ठरवेल. पण हे मराठी रूपही तकलादू मुळीच वाटलं नाही.



आपल्या काहीश्या हटके संवाद फेकी आणि खलनायकी भूमिकांसाठी साठी प्रसिद्ध सयाजी शिंदेनी नक्षल कमांडर 'पल्लम'ची भूमिका छान वठवली आहे. क्रूरता, रोमान्स, भवानिकता आणि माफक विनोद यांची सर'मिसळ' असलेली 'पल्लम' ही व्यक्तिरेखा साकारताना सयाजी शिंदेनी आपल्या अभिनयानी भूमिकेला न्याय दिला आहे.



आता कदाचित ज्याला नवोदित म्हणता येणार नाही अश्या आकाश ठोसर, खरंतर सैराटचा परश्यानी लग्नाळू तरुणाच्या भूमिकेत, विशेष वाव नसतांनाही, उठावदार कामगिरी केली आहे. त्याला सायली पाटील या नवोदित अभिनेत्रीनं चांगली साथ दिली आहे. खबऱ्या आणि शरणागती पत्करणारा तरी गोळी लागून मृत्युमुखी पडणारा नक्सलवादी हे ही स्मरणात राहतात. 


सिनेमाटोग्राफी ही आणाखी एक ठसठशीत जमेची बाजू. अगदी पहिल्या फ्रेम पासून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडते. पार्श्वसंगीताचा सूरही चांगला लागला आहे. नाही म्हणायला काही गाणी ही अकारण पसरट झाल्या सारखी वाटतात त्यांची लांबी थोडी आखूड ठेवता आली असती तर साचलेपण कमी झालं असतं. अर्थात काही गाणी ही अत्यंत प्रवाही आणि म्हणूनच प्रभावी ठरतात.  नक्षलवाद, सिस्टीम विरोधातल्या संघर्षाला लावलेली राजकारणाची जोडही थोडी उथळ वाटली. या बाबींवर अधिक लक्ष दिलं असतं तर कदाचित व्यावसायिक यशही अधिक मिळालं असतं का? असा प्रश्न मनात डोकावतो.   


महाराष्ट्रातल्या ‘कोलागड’ परिसरातल्या नक्षलवाद्यांचा, 'पल्लम' या कमांडरच्या नेतृत्वात कार्यरत एक गट, कर्तव्यदक्ष, शिंगावर घेण्याची प्रवृत्ती असलेला आणि त्यामुळे पुण्याहून दुर्गम भागात बदली झालेला पोलीस अधिकारी 'राया पाटील', त्याच गावातल्या ढाब्यावरचा बिरयानी फेम स्वप्नदर्शी तरुण 'राजू आचारी', यांच्या व्यक्तीगत आयुष्यातल्या घडामोडी, राजकीय परिस्थिती, घडणाऱ्या चकमकी

या भोवती 'घर, बंदूक, बिरयानी' या चित्रपटाचं कथानक फिरतं. तरुण राजू आचारी घर वसवण्याचं स्वप्न पाहतो आहे. पोलिस अधिकारी राया पाटील याच घर सततच्या अस्थिरतेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि नक्षल कमांडर पल्लमच घर आधीच उध्वस्त झालेलं आहे. कथानक उलगडत असताना वर्ग संघर्ष, जीवन संघर्ष, आहे रे व नाही रे वर्गाच्या परिस्थितीवर भाष्य करण्यात लेखक आणि दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. 



नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, सैराट फेम परश्या (आकाश ठोसर), सायली पाटील या

चित्रपट कलाकारांच्या उपस्थितीत, त्यांच्या बरोबर भोजनानंद घेत, त्यांच्याशी सहज संवाद करण्याची संधी उपलब्ध करून



देणाऱ्या सर्वश्री शुक्राचार्य जाधव, सुशील गायकवाड, संतोष अजमेरा, अमोल केत, राजेंद्र पवार, तुषार कळमकर, सतीश जाधव, विजय पाटील या टीम दिल्ली मराठी ऑफिसर्सच्या यशस्वी संयोजनकर्त्या अधिकारी वर्गाला शतश: धन्यवाद देत असतानाच, या सर्व मंडळींनी





'सिनेमा पाहणे' प्रक्रियेच्या, तो त्या चित्रपटातील कलाकारांसह पाहणे आणि त्याला असलेली स्वरूची भोजनाची जोड, अश्या रुंदावलेल्या कक्षेमुळे आपल्या सवयी कायमच्या बिघडून तर जाणार नाही ना अशी शंका मात्र मनात उगाच तरळून गेली. 


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

8851540881


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक