स्मृतीबनातून-रहस्य(पद्य)
सकाळी उठता उठता कैफी आझमी यांची जगजीत सिंह यांनी गायलेली 'अर्थ'पूर्ण गझल, 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो' मनात सुरू झाली. पूर्वी पाहिलेला एक फोटो ही मनात घर करून होता. एखाद्याच जीवन वरकरणी कितीही सुरळीत वाटलं तरी त्याच्या अंतरंगीच रहस्य काही वेगळंच असतं. अनेकदा जवळचे म्हणवून घेणाऱ्यांनाही त्याचा गंधही नसतो. जर ते जाणता आलं तर, ते असं तर नसेल?...
रहस्य
धडाडली चिता माझ्या या जीवनाची
लाभली निरव शांतता होता मृत्युगामी
जळलो असा जीवनी लाख वेळा
चितेवरी त्या निमाल्या उष्णतेच्या झळा
फिरलो जगी अपेक्षांची घेऊन झोळी
देखिली त्यांची जाहलेली फक्त होळी
भिऊनी ज्यास कंठीले आयुष्य सारे
समजले अखेरीस, मृत्यू मुक्तीद्वार न्यारे
हाय शेवटी कळले रहस्य जीवनाचे
उशिरा तरी कळले समाधान त्याचे
नितीन सप्रे
नवी दिल्ली
(2006230756)
खूप छान ! अर्थपूर्ण कविता ! मनापासून आवडली.
उत्तर द्याहटवा