स्मृतीबनातून-पाहातों वाटुली पांडुरंगे
पाहातों वाटुली पांडुरंगे
तू माझी माऊली हा अभंग अगदी लहानपणापासून माझ्या कानात झिरपत आला आहे. गोड गळ्याच्या छोटा गंधर्व(सौदागर नागनाथ गोरे)या महान गायकानी गायलेल्या तुकोबारायांच्या या अभंगानी, कुठल्याही संस्कार वर्गाची झूल न पांघरताच लयीच्या झुल्यावर झुलवित मनावर अगदी बेमालूमपणे संस्कार केले. याच बरचसं श्रेय अर्थातच आकाशवाणीला आहे. आकाशवाणीनं मनोरंजना बरोबरच मनोविकास आणि ज्ञानरंजनाच्या हातात हात देत वैचारिक विकास साधण्याचं आकाशा एवढं मोठं काम केलं आहे.
लहानपणी शाळेची तयारी करत असताना किंवा काहीवेळा तर अंथरुणातून बाहेरही पडलो नसताना आकाशवाणी वरच्या पहिल्या सभेत भक्ती संगीताचं जो कार्यक्रम सुरू असायचा त्यामुळे अनेक उत्तमोत्तम गायकांची गाणी आपसूक कानावर पडत. वास्तविक आज गाण्यातलं, कवितेतलं जे काही थोडं बहुत कळतं असं वाटतं, ते ही त्यावेळी काही कळत नसे. कानाला गोड लागत आणि पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत म्हणून आज पन्नाशी उलटली तरी त्यांची मोहिनी अगदी तशीच आहे किंबहुना ती अधिकच वाढली आहे. त्यावेळी लक्षात न आलेली या गीतांची अनेक वैशिष्ट्य आता थोडी फार उमजायला लागली आहेत.
मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो एकटा जीवन व्यतित करू शकत नाही. साहाजिकच अवती भवती तो सखे, सोयऱ्यांचा गोतावळा निर्माण करतो. त्यातच तो रमु पहातो. आयुष्यभर विविध नाते संबंधातून मिळू पहाणाऱ्या वात्सल्य, मैत्री, प्रेम यांच्या तो सतत शोधात असतो. या सर्व नाते संबंधीयांकडून अपेक्षा बाळगू लागतो. वास्तवात मात्र अनेकदा संपूर्ण आयुष्य खर्ची घालूनही अखेरीस अपेक्षांचं ओझं वाहणारं खेचर झाल्याचा साक्षात्कार त्याला होतो. हा सारा भार फुकाचा हे आकळून येतं. या अंतिम सत्याला त्याला सामोरं जावंच लागतं. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी असं ज्यांना संबोधलं गेलं त्या ग. दि. माडगूळकर म्हणजेच गदिमा यांनी हे सत्य एका गीतात सुस्पष्ट करून सांगितलं आहे…
"लळा जिव्हाळा शब्दच खोटे। मासा मासा खाई। कुणी कुणाचे नाहि, राजा कुणी कुणाचे नाहि।
रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया।
कोण कुणाची बहिण भाऊ, पती पुत्र वा जाया। सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही। कुणी कुणाचे नाहि, राजा कुणी कुणाचे नाहि।"
हे प्रखर सत्य आपल्या सर्वांना कधी ना कधी कमी अधिक प्रमाणात अनुभवायला येतं. मात्र हा सार्वत्रिक अनुभव प्रत्येकाच्या गाठी असला तरी मायेच्या या गोतावळ्याचं चक्रव्यूह यशस्वी पणे भेदण्याच कसब साधता न आल्यानं अभिमन्यू होणेच सामान्य जनांच्या नशिबी येतं. संत मंडळींना मात्र या सत्याच आकलन थोडं आधी होतं. म्हणूनच ते आई, वडील, बहीण, भाऊ, पुत्र, पुत्री, भार्या या सर्व दैहीक नात्यांच्या गोतावळ्यात न अडकता आत्मिक पातळीवर त्या पांडुरंगात ती पाहतात. संत तुकाराम महाराज म्हणतात…
"तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥१॥
तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥३॥"
हे पांडुरंगा तू माझी आई आहेस, तूच माझी सावली आहेस. मी अन्य कोणाची नाही, तुझीच वाट पाहतो आहे. पांडुरंगा तूच माझा वडील, धाकटा, जिवलग, सोयरा, सज्जन सर्वकाही आहेस. देवा माझा जीव तुझ्या पायापाशी आहे आणि तुझ्या वाचून मला सर्व दिशा ओस वाटतात.
अवघ्या सहा ओळीत, सोयरिक कुणाशी असावी याचं त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. दैहिक नाते संबंध कितीही जपले तरी त्यात 'स्व' ला प्राधान्य असल्यानं अखेरीस निरर्थकताच अनुभवास येते. पण पांडुरंगाशीच सोयरिक जोडली तर ती अपरिहार्यपणे सार्थक होते हे सत्य कथन केलं आहे. हे अलौकिक मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी माउली, साउली, वाटुली, येकुला, धाकुला अशी किती सानुली शब्दकळा योजिली आहे! भैरवाशी सोयरिक सांगणारी संगीत रचना करून छोटा गंधर्व यांनी आपल्या अवीट गोड गायकीनं महाराजांच्या गोड शब्दांशी, शब्दाशयाशीही आपलं नातं घट्ट केलं आहे. ही संगीत रचना नुसती अर्थवाहीच नाही तर छोटा गंधर्व यांची गायकीही तितकीच मधुर आणि आकर्षक आहे. तुकाराम महाराजांचं हे अलौकिक तत्वज्ञान अवघ्या साडे तीन मिनिटात त्यांनी आपल्या सुजाण गायकीतून मोठ्या ताकदीनं मांडलं आहे. मुख्य म्हणजे तानकाम, संगीत अलंकरण हे इतकं यथायोग्य आहे की कुठेही जराही भावविलोप होऊ न देता ते आपल्या पर्यंत पोहोचवतात. बालपणा पासून काना वाटे अंतर्मनात झिरपलेल्या या गीताचा भावार्थ आचरणात ही झिरपू दे हीच महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना.
नितीन सप्रे
नवी दिल्ली
8851540881
(180620231015)
रंगात रंग तो एक पांडुरंग
उत्तर द्याहटवाजिथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी मार्गदर्शन संतांनीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे .तो सोबती असताना इतर कशाची गरज नाही हे सामान्य जनांना लवकर आकळत नाही त्यामुळे तो गुंत्यामध्ये पाय गुंतवत राहतो आणि हे तत्त्वज्ञान त्याला शेवटी शेवटी जेव्हा समजायला लागतं तेव्हा कशाची साथ लाभत नाही तेव्हा आपण सांगितलेले मार्ग अनुसरण अधिक श्रेयस्कर आहे असं मला वाटतं कारण शेवटी मासा मासा खाई कुणी कुणाचे नाही राजा हे अधिक महत्वाचं. उद्धरेतआत्मानाम आत्मा हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे इतकेच .लेख छान वाटला लिहित रहा आनंद देत रहा
उत्तर द्याहटवाफार सुंदर लेख...आपलीही सानुली शब्दकळा आवडली.
उत्तर द्याहटवा