स्मृतीबनातून - मंगेशाची यशवंत अरूणी सांजवेळ
मंगेशाची यशवंत अरूणी सांजवेळ
संध्याकाळ….दिवस आणि रात्र यांचा संधिकाल. दिवस आहे म्हणावं तर अंधारून यायला सुरुवात झालेली असते आणि म्हणून रात्र झाली म्हणावं तर अजूनही प्रकाश संपूर्णतः लोपलेला नसतो. दिनक्रमा प्रमाणेच जीवन क्रमात ही संध्याकाळ येते. तरुणपणा वर हक्क सांगता येत नाही कारण गात्र, रात्र थकायला सुरुवात झालेली असते. पण अद्यापही उमेद, एखाद्या खोडसाळ मुला-मुली प्रमाणे वृद्धत्वावर संपूर्ण दावा सांगू देत नाही. अशी ही संध्याकाळ मारव्याच्या सूरां सारखी हुरहूर लावणारी, कातर करणारी, आर्ततेला साद घालणारी असते. लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, गायक, कलाकार या साऱ्यांनाच ती नेहमीच खुणावत असते कारण अश्या संधीकाळी; जगण्यात, वागण्यात, बोलण्यात थोडी अधिक प्रगल्भता आलेली असते. निदान तशी ती अपेक्षित असते. तेव्हा अनेक जुन्या गोष्टींचा, घटनांचा, कलाकृतींचा अर्थ नव्यानं उलगडू लागतो.
आकाशवाणी सारख्या माध्यमात सेवेची संधी मिळाल्या बद्दल मला त्या आकाशातल्या परमेशाचे ऋण अखेर पर्यंत मानले पाहिजे. कारण व्यावहारिक बाबींवर वाजवीपेक्षा जास्त भर देऊन स्वभाव धर्माच्या विपरीत केलेल्या किंवा झालेल्या शिक्षणाच्या निवडी नंतरही पोटापाण्याच्या सोई साठीच्या प्रवासात मात्र त्यानेच माझा हात अलगद आकाशवाणीच्या हाती दिला. या सेवेमुळे चाकरी, भाकरीची जशी सोय झाली तशीच कळत नकळत कलाकारी, अदाकारी, शब्दकारीची जाण वाढण्यास ही मदत झाली आणि म्हणूनच अगदी लहानपणा पासून कानावर पडलेल्या आणि चाली मुळे लक्षात राहिलेल्या अनेक गीतांच काव्य, संगीत यांचं सवड मिळताच रसग्रहण करण्याची जी आवड निर्माण झाली त्याचं मूल्य रुपये पैशात मांडणं निव्वळ अशक्य आहे.
एका संध्याकाळी, मंगेश पाडगावकरांच्या अश्याच एका अत्यंत लोकप्रिय गीताचे खरतर गझलेचं सूर, शब्द सौष्ठव, लालित्य अगदी अचानकपणे उलगडलं. कवीनं मुखड्यात केलेल्या विनंतीचा संपूर्ण अनादर अपसुक घडला. कारण शब्द, स्वर, सूर, गान यांच्या एकत्रित परिणामामुळे त्या संध्याकाळी ती गझल पुनः पुन्हा ऐकत असताना डोळे कधी कसे पाणावले हे कळलच नाही.
प्रारंभीच स्वर मंडळ, सतार आणि व्हायलिनच्या आर्त सुरावटी नंतर 'डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी' ही पहिली ओळ ऐकताच हे जाणवतं की संपूर्ण गीतात मांडलेली कवीची भावना, गायकानं किती समर्पकपणे श्रोत्यांच्या काळजात पेरली आहे. डोळ्यात पाणी आणू नको असं तिला सांगत असतांनाच आपल्या पासून दूर व्हावं लागल्यामुळे तिचं काळीज पाणी पाणी झालं झालं असणार हे तो नीट समजून आहे, हृदयानं इतके एकरूप असूनही आपण जरी आयुष्यात एकत्र येऊ शकलो नाही, तू कुणा दुसऱ्याची झालीस तरी आता आपल्या एकमेका विषयी असलेल्या भावना तरी निदान फक्त आपल्याच राहाव्यात म्हणून अश्या सांज समयी(आयुष्याच्या ही) त्या सार्वजनिक करू नकोस. 'त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी' का? कारण आपल्या कहाणीत तिसरा कुणीही हा दूरस्थच आहे. त्याला त्या सांगण्यात काय हाशील? प्रेम कवितेवर अव्याज प्रेम करणाऱ्या पाडगावकरांनी विफल झालेल्या दोघांची हृदयद्रावक कथा, व्यथा या गझलेत मांडली आहे. हे काव्य म्हणजे एक आर्त विरहिणी आहे. अत्यंत साध्या शब्दात मोठा आशय कवी मंगेश पाडगांवकर यांनी या गीतात सांगितला आहे. यशवंत देवांनी स्वर रचनेत मारवा, पूर्व कल्याण रागाच्या सुरांची पेरणी करत तो आत्यंतिक भावस्पर्शी करून नेमकेपणानं फुलवला आहे.
खरं प्रेम स्वार्थी नसतं असं म्हणतात. याचा प्रत्यय पहिल्या अंतऱ्यात मिळतो. वास्तवात ती त्याची झालेली नाही. ती आपल्या संसार व्यापात गुंतली आहे. पण तरीही तिच्या विषयी त्याच्या मनात मृदू भावना आहेत. काळजी आहे. या काळजी पोटी तो तिला म्हणतो,
'कामात गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी' तुझ्या संसारात तू संपूर्णपणे रममाण झाली असशील, गुंतली असशील. अश्या वेळी तू माझ्या आठवणींनी उदास होऊ नकोस(माझी उदास गाणी). या दोन ओळीत पाडगांवकर ‘त्याची’ ‘तिच्यातली’ भावनिक गुंतवणूक काव्यात्मकतेनं मांडतात. 'ती' 'त्याची' होऊ शकली नसली तरी त्याचं प्रेम कायम आहे आणि त्या प्रेमा पोटी तो तिला त्याच्या आठवणींनी उदास होऊ नकोस असं सांगतो आहे. कारण तिच्या वरच्या निर्व्याज प्रेमामुळे ती प्रसन्न वदानाच असावी असंच त्याला वाटतं. समाज कदाचित याकडे अनैतिकतेच्या चष्म्यातून बघेल आणि म्हणूनच डोळ्यात पाणी आणून अन्य लोकांना(दूरचे दिवे)तू आपली कहाणी सांगत बसू नकोस असं त्याचं तिला सांगणं आहे. 'उदासी' दर्शविण्यासाठी संगीतकार देवांनी इथे उदास शब्दावर क्षणभर ठेका थांबवला आहे. कवीची रचना नीट समजून घेतल्या शिवाय संगीतकार चाल बांधू शकत नाही ह्या त्यांच्या विचारांचा जणू प्रत्ययकारी अनुभव त्यांनी इथे दिला आहे. 'तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी' ही शब्द रचना इतकी विलोभनीय तऱ्हेनं शब्दशः स्वर रचनेत रूपांतरित झाली आहे.
'वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी'
तुझा संसार करत असताना आपल्या दोघांच्या भाव विश्वातल्या अनेक रम्य खाणाखुणा तू आता उगाच शोधत बसू नको, त्यात अडकून पडू नकोस कारण या वास्तव दुनियेत (माती)अश्या हळुवार भावनांच्या कोमल भावपुष्पांच निर्माल्य सुद्धा टिकत नाही. ते मातीमोल, कवडीमोल होऊन जातं.
'कळणार हाय नाही दुनिया तुला-मला ही
मी पापण्यात माझ्या ही झाकिली विराणी'
आपलं नातं या दुनियेला कळेल अशी अपेक्षा आपण न केलेलीच बरी. आपल्यासाठी या दुनियेच्या रीती भाती आकलन कक्षेच्या बाहेर आहेत. मात्र इथले रीती रीवाज सर्वांसाठी बंधनकारक असतात. म्हणूनच आपली आर्त कहाणी(विराणी) मी ही आतल्या आतच(पापण्यात) झाकून ठेवली आहे. कहाणी हृदयात, पोटात दडपून टाकली आहे असं ही म्हणता आलं असतं मात्र उत्कटता अधोरेखित करण्यासाठी कवी म्हणतो 'मी पापण्यात माझ्या ही झाकिली विराणी'
म्हणजे त्याच्या भावंनाही इतक्या कालव्या आहेत की त्यांचा देखील कोणत्याही बेसावध क्षणी डोळ्यांवाटे कडेलोट होऊ शकतो. महत प्रयासानं त्या साऱ्या त्यांनी पापण्यात झाकून ठेवल्या आहेत.
एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम जडतं म्हणजे नेमकं काय होतं? तर त्या व्यक्तीच्या सौंदर्यावर, स्वभावावर, गुणांवर, व्यक्तिमत्त्वाकडे आपण आकृष्ट होतो. भाळले जातो. 'डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी' या शब्द, सूर, स्वर ताल अश्या सर्वांग सौंदर्यानं नखशिखांत नटलेल्या आर्त गीताच्या आकंठ प्रेमात पाडण्या वाचून अन्य कुठलाही पर्याय संवेदनशील रसिकाच्या वाट्याला मुळी उरतच नाही. इथे मंगेश पाडगावकरांच्या अतिशय भाव व्याकुळ शब्दांना, गीतातून व्यक्त केलेल्या भाव–भवना नीटपणे आकळून देवांनी त्या स्वरात गुंफल्या आहेत. सांगीतिक अलंकरण करताना वाद्यांचा साधेपणानी पण प्रभावी उपयोग करताना बडेजाव कटाक्षानी टाळला आहे. लयीच्या बाबतीतही हा विचार केल्याचं लक्षात येतं. मुळातच मृदुल साजूक गळ्याच्या अरुण दाते यांनीही गीताचे बोल, भावभावना अत्यंतिक आत्मियतेनी गायल्या आहेत. गीत आणि संगीत रचनेतला विरहिणीचा व्याकुळ आणि आर्जवी भाव उत्तम निभावला आहे. त्यामुळे एकूण परिणामकारता साधल्या गेली आहे.
एखाद्या समुद्र किनारी अनेकदा फेरफटका मारून, निवांत वेळ घालवून सागर संपत्तीचा अंदाज बांधता येत नाही. त्यासाठी सागरात खोलवर सूर मारावा लागतो तेव्हा कुठे थोडी फार संपत्ती हाती लागते. गीताचं, कवितेचं ही तसच आहे. निव्वळ अनेकदा ऐकून तीचं लावण्य उमजून येत नाही. त्यासाठी तिची मनधरणी करून तिच्यात खोलवर शिरकाव करावा लागतो तेव्हाच हळूहळू आशय, ऐवज सापडू लागतो. आजवर ही गीत कित्येकदा ऐकूनही कवितेच्या सौंदर्याशी वरवरचा परिचय झाला होता. आज मात्र मनोभावे डोळ्यात प्राण आणून, कान प्रतिष्ठापना करून, हे गीत ऐकल्या नंतर त्याच्या आर्त आशयाशी जवळीक साधली गेली. ही कहाणी फक्त 'त्या'ची आणि 'ती'ची राहिली नाही, आपलीशी होऊन गेली आणि सांजवेळी डोळ्यात अपसुक पाणी तरळलं.
क्लिक करा - डोळ्यात सांजवेळी
नितीन सप्रे
नवी दिल्ली
061020231727

नितीनजी ,
उत्तर द्याहटवाएका सुंदर गाण्याचं आपण केलेलं विश्लेषण खूप छान आहे त्यामुळे ही कविता अधिक चांगल्या रीतीने समजून घेता आली मंगेश पाडगावकरांचे शब्द आणि यशवंत देव यांचे संगीत त्यामुळे ते सदाबहार या सदरात मोडणारी अर्थात त्याला खूप विरहाची दुःखाची किनार आहे तरीपण गाण्याचे शब्द आणि संगीत यामुळे अजरामर ठरले तुम्ही ते खूप छान रीतीने आमच्यासमोर मांडलं त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद
खुप सहज व सोप्या भाषेत अर्थ समजावून सांगितला आहे.
उत्तर द्याहटवाअतिशय उत्तम रसग्रहण आहे. गीताच्या मागची एक छान कथा उलगडून सांगितली आहे. धन्यवाद नितीन
उत्तर द्याहटवा