स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती
देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती
कवी कोणाला म्हणायचं? जो कविता करतो तो कवी असं रूढार्थाने मानलं जातं. मात्र जो कविता करतो, तो कवी नसतो असं मराठी सारस्वतातील चोखंदळ रसिक खेळिया म्हणजेच पु.ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. ते वास्तवही असावं. खऱ्या कवीच्या अंतरंगात काव्य बीज मुळातच असतं आणि शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या उक्ती नुसार सरस्वतीच्या कृपेनं ते बीज कधीतरी अंकुरतं. काही सुदैवी संवेदनशील सुजाणांच्या बाबतीत त्यातूनच आशय लोभस काव्य वेल बहरते. गोव्याच्या कुडचडे इथे जन्मलेले बोरी गावाचे बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजेच बा.भ. बोरकर उपाख्य बाकीबाब हे शारदेच्या कृपा प्रसादाला पात्र ठरलेले असेच एक सुदैवी, सुजाण आणि काव्यासक्त कवी होते.
बोरकरांच्या कविता वाचताना त्या त्यांनी केल्या असं न वाटता त्या प्रगटल्या असंच प्रकर्षानं जाणवतं. दूरदर्शनवर झालेल्या एका कार्यक्रमात स्वतः बोरकरांनी काव्य स्फुर्तीचा किस्सा सांगितला होता. अगदी लहानपणा पासून त्यांच्या कानावर विविध प्रकारे कवितेचे संस्कार आपसूक घडतं होते. त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या असलेली भजन परंपराही त्यांना पोषक ठरली. बोरकरांच्या घरी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि पाठ असलेली भजनं, पदं संध्याकाळी आळीपाळीने म्हणण्याचा परिपाठ होता. एक दिवस त्यांना विस्मरण झालं. पुस्तकंही कपाटात बंद होती म्हणून मग वेळ निभावून नेण्यासाठी त्यांनी स्वतःच रचना करायची असं ठरवलं. शेवटच्या चरणात ‘बाकी’ म्हणे असं ऐकल्यानंतर संतांच्या रचनेत असा खोडसाळपणा न करण्याचा सल्ला त्यांच्या काकांनी दिला. बोरकरांनी त्यांना ते काव्य आपण स्वतःच लिहिल्याचे सांगितलं आणि विश्वास बसावा म्हणून आणखी एक पद रचून दाखवलं. काका त्यांना आजी कडे घेऊन गेले मात्र आजीनं कौतुक करण्या ऐवजी आधी संत हो मग अभंग लिहण्याच बघ आणि कुटुंबातील मोठा मुलगा असल्यानं संत होण्याचा तुला अधिकार नाही अश्या शब्दात बोळवण केली. त्यामुळे बोरकर सांगतात, त्यांनी लिखाणाची उर्मी आतल्या आत दाबून टाकली. पण निसर्गतः कविवृत्ती लाभलेल्या या कवीच्या अंतरंगातून एक दिवस मुसमुसलेली कविता उसळून बाहेर आलीच आणि साहित्य विश्वात बा. भ. बोरकर नावाचा कवी अवतरीत झाला. ‘अनंता तुला कोण पाहू शके’, ‘नाही पुण्याची मोजणी’,‘पांडुरंग त्राता’ या सारख्या त्यांनी लिहिलेल्या अभंग सदृश कवितांचं बीज कसं प्रस्फुटित झालं असेल ते या घटनेवरून लक्षात येतं. अर्थात सुरवातीला काव्य प्रतिमांच्या मोहजाळ्यात गुरफटलेल्या, भरकटलेल्या बोरकरांना संपूर्ण काव्य भान आलं ते समुद्रमार्गे मुंबईच्या प्रवासात रचलेल्या ‘माझी आगबोट चालली दरियात ग!’ या कवितेनं असं त्यांनी स्वतःच म्हटलं आहे.
बाकीबाब यांच्या कवितेतून गोमंतकीय चित्तवृत्ती आणि सौंदर्य यांचं सहज दर्शन घडतं. बोरकरांच्या नादपूर्ण शब्दकळेवर भाळला नाही असा, मराठी/ कोंकणी सारस्वताची, अगदी अत्यल्प का होईना, जाणकारी असलेला रसिक शोधूनही सापडणार नाही. स्वतः राजकवी भा. रा. तांबे हे ही बोरकर यांच्या काव्य सौष्ठवानं सुखावून गेले होते. बोरकरांनी तर त्यांना गुरुस्थानी मानलेलं. कविवर्य तांबे यांनी १९३२ सालीच “Here is a new star on horisen” असं त्यांचं सार्थ कौतुकही केलं होतं. माझ्या वाचनात आलं की “माझे हात आता थकले आहेत आणि कान तुमच्याकडे आहेत” असं तांबे बोरकरांना म्हणाले होते. १९२९ च्या सुमारास तांबे यांना आपला प्रतिभेचा झरा आटत चालल्याची जाणीव झाली होती आणि त्यांची मधुघट रिकामे पडती घरी ही कविता ही त्याच कालखंडात लिहिली गेली.(सुमारे १९३३) बडोदा, म्हणजेच आताच्या वडोदरा इथे १९३४ साली झालेल्या वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात केलेल्या 'तेथे कर माझे जुळती' आणि अन्य काव्य प्रस्तुती नंतर साहित्य विश्वाला त्यांच्यातल्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि बाकीबाब यांच्या प्रतिभेला साहित्य रसिकांनी कर जोडून वंदन केलं. त्याआधी १९३० साली त्यांचा "प्रतिभा" हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध ही झालेला होता. वयाच्या ऐन विशीत त्यांना काव्यस्फुर्ती बहाल करून साहित्य शारदेनं त्यांना जणूकाही आपल्या कुशीत सामावून घेतलं.
कविवर्य बोरकर यांनी कवितेला ‘लययोगाची हृदयंगम कला’ असं संबोधलं आहे. बोरकर त्यांच्या लिखाणात सौंदर्य, नाद, निसर्ग अगदी नैसर्गिकपणे प्रकट होताना दिसतात. त्यांच्या कविता या आशयानं परिपक्व आणि नादमयी आहेत आणि म्हणूनच त्या रसिकांच्या काळजात घर करून जातात. लौकिक, अलौकिक, नैसर्गिक, मानवी, शाब्दिक, गेय अश्या कुठल्याही सौंदर्यावर त्यांची श्रद्धा, भक्ती सहज दिसून येते. अजर काव्य प्रतिभा लाभलेला एक सौंदर्यलब्ध कवी असं त्यांचं यथार्थ वर्णन करता येईल. त्यांच्या कविमनाला ऐहिकाची आसक्ती होती पण त्याच वेळी तिला आध्यात्मिकतेच्या महिरपीच कोंदण लाभलं होतं. त्यांच्या विविधांगी कविता वाचत असताना हे प्रकर्षानं जाणवतं.
बोरकरांच्या कविता आणि एकूणच साहित्यात निसर्ग सातत्यानं डोकावताना दिसतो. सृष्टीचे विभ्रम त्यांना भुरळ पाडायचे आणि ते लालित्य सहज भावाने त्यांच्या काव्यात, साहित्यात झिरपायचं.
क्षितिजी आले भरते गं
घनात कुंकुम खिरते गं
झाले अंबर झुलते झुंबर हवेत अत्तर तरते गं !
लाजण झाली धरती गं साजण काठावरती गं उन्हात पान मनात गान
ओलावून थरथरते गं !
बोरकरांच्या बऱ्याच ललना केंद्रित कवितेतून मनाला गुंगवणारा असा लाडिक ‘ग’ सातत्यानं डोकवायचा. अमर्याद निरीक्षण शक्ती लाभलेले पु.ल. देशपांडे यांनी यावरून बोरकरांना ‘ग ची बाधा झाली’ अशी मिष्किली साधली होती आणि बोरकर त्यावर सुनीता बाईंना म्हणाले होते “चावट गं तुझा नवरा”.
कवी असण्याचा आणि गोव्याच्या भूमीचा त्यांना सार्थ अभिमान होता. जन्मभूच्या गौरवार्थ ते लिहितात...
‘माझ्या गोव्याच्या भूमीत, येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी, भेटे आकाश सागरा
माझ्या गोव्याच्या भूमीत, सागरात खेळे चांदी, आथित्याची, अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी!’
बोरकरांच्या अंतरंगातून बरसलेल्या काव्यपर्जन्य सरींचा नुसता आढावा जरी घेतला तरी त्यातून कल्पनाविलास, नादमाधूर्य, शब्द लालित्य या काव्य गुणांनी चिंब भिजायला होईल. ऋतू राणी वर्षा ही तशी समस्त कवीजनांची विशेष लाडकी. ग्रीष्मात सागरावर रागावून दूर निघून जाणाऱ्या आणि विरह सहन न होऊन अंती त्याच्याच भेटी साठी वर्षा रूपात निळ्या जांभळ्या मेघातून अधिरपणे धावून येणाऱ्या चंदेरी रेशीम सरींच आकर्षण कोणाला नसतं? गोव्याच्या पावसात सचैल भिजलेलली बोरकरांची काव्यप्रतिभा, आकाशीच्या या जलधारांच सौंदर्य वर्णन करते त्यावेळी तो अनुभव सर्वांगाहून पाणी निथळत असणाऱ्या एखाद्या ओलेतीच्या दर्शना सारखा खुळावणारा असतो. बोरकरांच्या वर्षा गीतांच्या काव्यधारा रसिकांना चिंबचिंब करून टाकतात.'चुरल्यागत सखि मरवा मिरमिरते तरल हवा ये कवेंत या हवेत या सम नच ऋतू हिरवा’,
‘झाले अंबर झुलते झुंबर हवेत अत्तर तरते गं क्षितिजीं आले भरते गं’,
‘ टप टप टप पडति थेंब
मनिंवनिंचे विझति डोंब
वत्सल ये वास भूमि आशीर्वच बोले जलद भरूनि आले शीतल तरू चपल चरण अनीलगण निघाले’,
‘फांदीसारखी झुकते सांज
जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होऊन
पेंगुळपांगुळ होते जग’,
‘झाले हवेचेंच दहीं माती लोण्याहून मऊ पाणी होऊनियां दूधलागे चहूकडे धावूं’,
‘धटिंगण पावसाने बाई उच्छाद मांडिला माझा फुलांचा शृंगार ओली चिखली सांडला’,
‘सरीवंर सरी आल्या गं सचैल गोपी न्हाल्या गं गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कांपति कदंब निंब वेली ऋतूमति झाल्या गं’,
‘ढग आले- येई घना अजुन पुन्हा अजुन पुन्हा चाहूल लागून तुझी हर्ष वना विहंगजना’,
‘लक्ष आंचळांनी दुभे.निळी आकाशाची गाय
भिजणा-या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय’
पाऊस या एका नैसर्गिक प्रक्रियेला बोरकरांची लेखणी इंद्रधनुष्यागत अविष्कारांनी अक्षरशः न्हाऊ घालते.
सिंधू किनारी उदयांचली आलेल्या बाकीबाब यांनी सागरात सापडणाऱ्या शिंपल्यातल्या मोत्या प्रमाणे अमाप मोतिया काव्यरचना रसिकांना देऊ केल्या. बऱ्याच भाषाभिमानी लोकांना माहितही नसतील इतक्या म्हणजेच सुमारे ३५० वृत, छंद आणि जातींत बोरकरांची कविता मोठ्या दिमाखात मिरवते. त्यांच्या मराठी, कोंकणी काव्य संपदेची अनेकांना ओळख असते मात्र त्यांच्या काव्य निर्मितीला हिंदी, पोर्तुगीज, इंग्रजी भाषांनीही कधी अडसर घातला नाही.
बोरकरांना लाभलेली सौंदर्यदृष्टी आणि सर्वसामान्य सौंदर्यदृष्टी यातही स्पष्ट अंतर आहे. त्यांच्या लावण्यरेखा या कवितेतून याचा प्रत्यय येतो.
‘देखणे ते चेहरे जे प्रांजळा चे आरसे
सावळे की गोमटे या मोल नाही फारसे
सामान्यतः कायिक सुंदरतेवर सर्वांचा भर असतो. अंतरंगापेक्षा बाह्यरंगाचा सर्वत्र बोलबाला दिसून येतो. पण कवीनं मात्र वर्ण गोरा की काळा याला महत्व न देता चेहऱ्याचा देखणेपणाची सांगड ही मनाच्या निर्मळतेशी, प्रांजळपणाशी घातली आहे.
तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा
वोळीती दु:खे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा
रेखीव, मृगाक्षी असणं डोळ्यांची सुंदरता सिद्ध करत नाही तर ज्या नेत्रांमध्ये सकलजनांना सामावून घेण्याची क्षमता आहे आणि जनसामान्यांच्या दुःखाने जे आसावतात तेच सुनयनी या संबोधनाला पात्र आहेत अशी कवीची मांडणी आहे.
देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे
आणी ज्यांच्या लाघवाने सत्य होई कोवळे
दुसऱ्याच्या कमतरताच फक्त न मांडता त्याच्या चांगुलपणा ही प्रकर्षानं वदणारे तसच मधुर भाषणामुळे सत्य दवबिंदू सारखं कोवळं होईल असे ओठच सुंदर म्हणवण्यास पात्र आहेत
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुन्दराचे सोहळे
सृजन, नवनिर्मिती साठी जे हात नेहमीच सरसावलेले असतात. सतत मंगल कार्य प्रक्रियेत गुंतलेले असतात तेच हात सुंदर म्हटले पाहिजेत.
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातून जाता स्वस्तिपद्मे रेखिती
ध्येय पथावर निश्चयपूर्वक मार्गक्रमणा करणारे आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता यशस्वी वाटचाल करणारी पाऊले ही निर्विवाद सुंदर ठरतात असं कवीनं म्हटलं आहे.
देखणे ते स्कंध ज्यां ये सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया
जे खांदे मोठ्यात मोठी जबाबदारी लीलया आणि स्वेच्छेने स्वीकारू शकतील, वहन करू शकतील तेच मजबूत आणि म्हणूनच सुंदर असे खांदे ठरतील. कुठलीही जबाबदारी ही प्राणपणाने पूर्ण करण्यातच खांद्यांच सौंदर्य दडलेले आहे.
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे
दैनंदिन जीवनात आपण अनेक माणसांच्या संपर्कात येतो. अनेकांना दुरून न्याहळत असतो. पण प्रत्यक्षात किती जणांची आयुष्ये ही कैवल्यगामी कृतार्थतेची किमान जाणीव करून देणारी असतात? म्हणूनच बोरकर म्हणतात की जे आपल्या जीवनात तृप्त, निर्मळ आणि एखाद्या तीर्थक्षेत्रा सारखे पवित्र आहेत त्यांची जीवने देखणी म्हणता येतील. अश्या लोकांची जीवनं ही शीतल चांदण्या सारखी प्रकाशमान असतात.
देखणा देहांत तो जो सागरी सुर्यास्तसा
अग्निचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा’
दिवसभर नभांगणात तळपून, पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीवर पोषक असं वातावरण निर्माण करण्याचा पुरुषार्थ करणारा तो तेजोनिधी भास्कर मावळतीच्या समयी ही दीन दुबळा भासत नाही कारण तो पश्चिमालयास मावळतो जरूर पण त्याच वेळी दुसऱ्या दिवशीची सकाळ तेजोमय करण्यासाठी, जातेवेळी रात्रीच्या गर्भात अग्निकलिकांचा गर्भ पेरून ठेवतो. या मर्त्यलोकी देह धारण करणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. पण नीजधामी परतण्यापूर्वी आयुष्यभर जे महानुभाव पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरक असा पुरुषार्थ करून जातात त्यांचा देहांतही सूर्यास्ता सारखा देखणा ठरतो. इथे बोरकरांच्याच या शब्द रचनेचं अनुसरण करत ‘देखण्या त्या काव्यपंक्ती ज्या थोर आशय सांगती, आचरता जयांना जीवने सार्थ होती’ अशी दाद देण्याचा अनिवार मोह होतो. मानवी जीवना बद्दल आकलन असूनही त्यांना त्याच्याप्रती एकप्रकारची आसोशी होती. ते सल्ला देतात,
‘रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना
नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना
त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे
तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे’
नियंत्याकडे ते काय मागणी करतात ते बघा
‘स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा’
बोरकरांची काव्य संपदा विपुल, बहुभाषी, बहुछंदी, बहुरंगी, बहुढंगी आणि बहुपेडी होती. प्रतिभा जणू काही त्यांची प्राणसखी होती. म्हणूनच सार्थ अभिमानाने ते म्हणतात…
'मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
आणि परमेश्वराला आर्त साद घालून मागणं मागतात,
‘एकच माझा साद ऐक प्रभु एकच माझा साद
पचू न देई मला कधीही इवलासाहि प्रमाद’
आयुष्याकडे बघण्याचा बोरकरांच्या दृष्टिकोन सकारात्मक आहे याची प्रचिती त्यांच्या इंद्रधनुष्य या कवितेतून येते.
‘इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी-तळी,
असू तिथे सखि! ओला वट मी
आणिक तूं तर देव-तळी.
शिणुनी येती गुरें-पाखरें
तीच लेकरें जाण सखे,
दिवस जरेचे आले जरी त्यां
काठ जरीचा लावू सुखें...!’
या ओळी लिहिताना काव्याला जरीच्या अनुप्रासाचं भरजरी अलंकरण, बहाल करणं बोरकरांना लीलया साधून जातं.
बोरकरांच्या साहित्याला विशेषतः कवितेला तत्त्वचिंतन आणि आध्यात्मिक विचारांची बैठक आहे. त्यांचा विरक्ति भावही सायं समयी देवघरात लावलेल्या उदबत्ती सारखा सुगंधित आहे. जीवनात बहुढंगी मुशाफिरी करणारा हा कविश्रेष्ठ म्हणूनच शाश्वताचे इशारे हेरून आता अशाश्वताची उरली मुळी न माया असं म्हणू शकला. लौकिकाच्या पसाऱ्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेऊन अलौकिकत्वास कवटाळू शकला.
ज्यांच्यावर बोरकरांचा अनंत लोभ होता त्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी बोरकरांच्या शब्दलाघवाला आपल्या सुरांच्या पाळण्यात जोजावलं. त्यांच्या नाही पुण्याची मोजणी, अनंता तुला कोण पाहू शके? या कविता/गीत ऐकताना याची प्रचिती येते. त्या खचितच अभंग स्वरूप आहेत.
‘आम्हां नाही नामरूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळानिळा धूप
पूजेतल्या पानाफुलां
मृत्यु सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा’
किंवा
‘नवीं भावपुष्पें तुला वाहिलीं,
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू! कल्पना जल्पना त्या हरो’
कविवर्य बोरकरांच्या काव्यसंपदे विषयी लिहिण्या, वाचाण्या आणि अनुभवण्या सारखं अनंत आकाश आहे. माझी शब्द संपदा त्यासाठी तोकडी असल्याची जाणीव असल्यानं त्यांच्या प्रतिभेला विनम्र नमन करत त्यांच्याच कवितेच्या ओळीत एका शब्दाचा बदल करून म्हणावसं वाटतं...
ll काव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती ll
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
नवी दिल्ली
23032024
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे....अगदी असाच झालाय अप्रतिम लेख फार सुंदर. कवी बाकीबाब यांच्या पावन स्मृती जपूया ..त्यांच्या कवितांचा असाच आस्वाद घेत राहूया.🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप छान लेख. बा. भ. बोरकरांची काव्यसंपदा विपुल आणि विविधांगी आहे. तसेच त्यांच्या कवितेचं नाविन्य..अथवा ताजेपण चिरस्थायी आहे. तुम्ही त्यांच्या काव्याचे अनेक पदर उलगडून दाखविलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
उत्तर द्याहटवाफारच उत्तम. बा. भ. बोरकर यांच्या व्यक्तित्वा सारखी काही माणसं मला नाशिकला पनवेलला भेटली.
उत्तर द्याहटवाअगदी योग्य वर्णन. बा भ बोरकर यांनी कविता लिहिल्या नसून त्या प्रकटल्या आहेत असं वाटतं.
उत्तर द्याहटवाबा. भ. बोरकर एक प्रतिभावंत कवी. त्यांना प्रतिभावंत का म्हणायचं तर पु. ल. आणि सुनीता देशपांडे त्याच्या कविता वाचून दाखवायचे. कविता सुंदर असते, आशयगर्भ असते म्हणजे काय हे तुमचा सर्वांग सुंदर लेख वाचला की कळते. बा भ बद्दल तुम्ही अप्रतीम लिहिलं म्हणून बोरकर समजून घ्यायला मदत झाली. मस्तच.
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख!
उत्तर द्याहटवा