स्मृतीबनातून - अलक्षीत कवी
अलक्षीत कवी
वैद्यक क्षेत्राशी संबंधित अनेकांनी साहित्य आणि संकृतीच्या प्रांतातही ध्यानाकर्षण होईल अशी उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्रा पुरतं बघायचं झालं तर सर्वश्री डॉक्टर श्रीराम लागू, काशिनाथ घाणेकर, मोहन आगाशे, गिरीश ओक, सलील कुलकर्णी अशी नाव पटकन डोळ्यापुढे येतात. कलेच मनाशी फार जवळच नातं आहे असं मला नेहमीच वाटतं. मनाचा शोध हा तसा आत्यंतिक गहन विषय आहे. वैद्यकशात्राचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना मानवी शरीराची जडण घडण शिकत असताना त्याच्या मना कडे जाणाऱ्या वाटेचा ही पत्ता मिळत असावा आणि जो जितका या वाटेवर अधिक वाटचाल करेल त्याला त्याप्रमाणात रसिकांच्या मनाची ओळख होत असावी. शरीर प्रकृतीतल्या विकृती जाणून घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नाडी परीक्षेच्या सरावामुळे रसिकांची नाडी सुध्धा त्यांच्या हाती येत असावी असा आपला माझा एक तर्क आहे. इथे हा सगळा उहापोह करण्याचं कारण म्हणजे माझ्या शालेय दिवसां पासून कानावर पाडणारं एक अत्यंत गोड गीत. कोकीळ सुद्धा हेवा करील असा अत्यंतिक गोड गळा आणि आकर्षक चाल यामुळे त्यावेळी या गीतानी मनात कधी कसा शिरकाव केला ते कळलंच नाही. पुढे ही हे गीत अन्य गीतांच्या बरोबर कानावर पडत असे. हळूहळू औपचारिक शिक्षण संपलं. त्याकाळी मध्यमवर्गीय, मध्यम हुशार आणि मध्यम मार्गी मुलांना तरी नोकरी, छोकरी आणि त्यानंतर त्यांचे छोकरा छोकरी अशी सरधोपट वाटचाल साधारणतः करावी लागत असे. पण माझ्या सुदैवाने उदरनिर्वाहासाठी कराव्या लागणाऱ्या माझ्या नोकरीतच अनायसे श्रवणनिर्वाह ही साधला गेला. बहुतेकांना करमणुकीसाठी घरी वेळ आणि पैसा खर्चून जे करावं लागे, ते माझ्या कार्यालयीन कामाचा भाग होतं आणि त्यासाठी वर वेतन ही मिळत असे. चि. त्र्यं. खानोलकर, पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर, ग. दी. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, यशवंत देव, ज्योत्स्ना देवधर, डॉ प्रभा अत्रे अशी सांस्कृतिक आकाशात लकाकणारी अनेक मानवी रत्न ज्या आकाशवाणीच्या सेवेत होती त्याच संस्थेत सेवा देण्याची संधी मला ही मिळाली याचा मला नेहमीच अभिमान वाटतं आला आहे. या प्रभावळीचा वारसा चालवण्याचं जरी नसलं, तरी तो सांगण्याचं भाग्य मला मिळालं. म्हणतात ना फुला संगे मातीस वास लागे तसं आणि तेवढंच. आकाशवाणीत नाही म्हटलं तरी पगारा बरोबरच बोनस म्हणून सांस्कृतिक संस्कार ही मिळत गेले. त्यांनीच लहानपणी ऐकलेली गाणी, कविता, साहित्य यांचा रसास्वाद घेण्याची दृष्टी आणि थोडा चोखंदळपणा दिला हे अमान्य करताच येणार नाही.
फार पूर्वी पासून ऐकण्यात असलेलं ते गोड गीत दोनच दिवसांपूर्वी वाऱ्यावरती लकेरी घेत कानावर आलं आणि मनात घोळू लागलं. यावेळी मात्र गीताच्या सूर, चाल यांनीच केवळ आकर्षित व्हायला न होता अधिक जाणून घेण्याची उर्मी जागली आणि विविधांगांनी गीताचा शोध घेण्यासाठीची आनंदयात्रा सुरू झाली. मीरेचा भक्तिभाव आर्ततेने प्रकट करणारं ते एक भक्तीगीत होतं…'कृष्ण गाथा एक गाणे जाणते ही वैखरी'
एकतारी सूर जाणी श्रीहरी जय श्रीहरी’ माझ्या पर्यंतच्या पिढीचा या गाण्याशी परिचय असेलही; मात्र पुढील पिढीही गोड आवाज, सुरेल चाल आणि भावपूर्ण तसच आशय पूर्ण शब्दरचना यापासून विन्मुख राहू नये यासाठी शोध यात्रेत मला जे काही गवसलं ते सर्वांसाठी मांडत आहे.
दशरथ पुजारी या बिनीच्या संगीतकारानी ही गीतरचना अतिशय मनोहारी केली आहे. निव्वळ सुरांच्या साथीनं पहिली ओळ रचून दुसऱ्या ओळीत एकतारी शब्द संपता संपता सुरू होणारा ठेका आणि साथ संगत मस्त जमून आली आहे. कृष्णा विषयीचा अनन्य भक्तीभाव अगदी प्रारंभीच ठसवण्यात संगीतकार पुजारी यशस्वी होतात. निर्मळ तजेलदार भावपुष्पांनी मानस पूजा बांधावी तद्वत सुमन ताई अतिशय आर्त सूरात पहिली ओळ गाऊन जणू गीताचा मतितार्थ सुरवातीलाच स्पष्ट करतात. अंतऱ्यांचं संगीत नियोजन करताना पुजारी यांनी संगीतालंकारांनी गीताचं सौंदर्य वाढवलं आहे. गायिकेची निवड ही अचूक ठरली आहे. सुमन कल्याणपूर यांना नुसता गोड गळा लाभला होता असं नाही तर त्यांचे अंतरंगातील सूर हे शेफाली(प्राजक्त) सुगंधानी अवगुंठीत होऊन उमटतात. शिवाय कवीच्या मनातल्या भावानुसार गाण्याचा त्यांचा कटाक्ष असतो. कवीच्या शब्दांना आणि संगीतकाराच्या चालीला आपल्या संयत चपखल हरकतींनी अधिक लावण्यवान करण्याची अद्भुत किमया त्यांना सहज साधते. या गीताच्या पहिल्या अंतऱ्यात 'आळवीते नाम ज्याला' या ओळीत घेतलेलं आंदोलन आणि 'अमृताची माधुरी ' ह्या दोन्ही शब्दांच उच्चारण ऐकणाऱ्याला खरोखरीच अमृत प्राशनाची अनुभूती देतं आणि तत्क्षणीच ‘माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले’ अशी आपली अवस्था होऊन जाते. दुसऱ्या अंतऱ्यातही याचा प्रत्यय येतो. आणि शेवटच्या अंतऱ्यात तर ‘दे सहारा, दे निवारा’ उंच पट्टीत आंदोलना सह गाऊन जी आर्तता साधली गेली आहे त्याला तोड नाही. तसच ‘या भवाच्या संगरी’ या शेवटी येणाऱ्या शब्दांतून आत्मसमर्पणाचा परिणाम मनावर अंकित होतो. नाही म्हणायला ‘आणि स्वप्नी माधवाच्या संगती मी नाचते’ या दुसऱ्या कडव्याच्या दुसऱ्या ओळीत ‘आणि स्वप्नी माधवाच्या संगरी मी नाचते’ असं अनवधानानं झालं असावं. कदाचित या अप्रतिम सुंदर गीताला दृष्ट लागू नये म्हणून काजळ तीट लावली गेली असं म्हणुया.
या सर्वांग सुंदर भावयुक्त भक्तिगीताचे दोन मानकरी बहुतेकांना माहीत असतील मात्र या सरल, आशयघन कवितेचा कर्ता अनेकांना माहीत नसेल. ही शब्द रचना आहे कवी डॉक्टर यशोदकुमार गवळणकर यांची. दशरथ पुजारी यांचे ते डॉक्टर. वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी हे काव्य लिहिलं आणि कधीतरी ते पुजारी यांना दाखवलं. त्यांनाही ते आवडल्यानं या काव्याच सुंदर गीत झालं. गीतकार मात्र काहीसा अलक्षित राहिला.
कृष्ण गाथा एक गाणे जाणते ही वैखरी
एक तारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी
तू सखा, तू पाठिराखा, तूच माझा ईश्वर
राहिलासी व्यापूनीया तूच माझे अंतर
आळवीते नाम ज्याला अमृताची माधुरी
पाहते मी सर्व ते ते कृष्ण रूपी भासते
आणि स्वप्नी माधवाच्या संगती मी नाचते
ध्यान रंगी रंगताना ऐकते मी बासरी
तारिलेसी तू कन्हैया दीनवाणे, बापुडे
हीन मीरा त्याहूनीही, भाव भोळे भाबडे
दे सहारा, दे निवारा या भवाच्या संगरी
ऐकण्यासाठी क्लिक करा - कृष्ण गाथा एक गाणे
उत्सुकता म्हणून यांच्या अन्य काव्य रचना वाचण्या ऐकण्या साठी इंटरनेट वर शोध घेतला असता दशरथ पुजारी यांनीच संगीत दिलेलं आणि सुमन ताईंनी गायलेलं गीतकार यशोदकुमार यांचं ‘क्षणी या दुभंगुनिया घेई कुशीत’ हे आणखी एकच गीत सापडलं. सीतेची व्यथा मांडणारी ही रचनाही काव्य, संगीताच्या दृष्टीनं अभिजात आणि रसपूर्ण आहे. बरेचदा मुबलक सपक पुरवठयाच्या भाऊगर्दीत सकस गोष्टी हरवून जातात या दोन्ही उत्कृष्ट रचानांच्या बाबतीत तसं होऊ नये यासाठी शोधयात्रेत मला सापडलेला ठेवा अभिजाततेवर लोभ असणाऱ्या रसिकांसाठी या लेखाच्या माध्यमातून आपणा समोर ठेवत आहे.
ऐकण्यासाठी क्लिक करा - क्षणी या दुभंगुनिया
नितीन सप्रे
170420242030
हे गीत अनेक वेळेस ऐकले. पण गीतकार माहिती नव्हते. कदाचित यांची गीते नंतर प्रसिद्ध झाली नसावीत. लेख वाचला. मनापासून आवडला. धन्यवाद.
उत्तर द्याहटवायशोदकुमार गाळवणकर यांची सुंदर रचना आणि तुमचं विवेचन खूप छान.श्रवण निर्वाह ..तर खूपच 👍
उत्तर द्याहटवा