मराठी officers


संध्यार्तीची वेळ. सकाळच्या अगदी पहिल्या किरणा पासून चैतन्याची पखरण करणारा गगनराज आता दुसऱ्या गोलार्धात प्रकाशण्यासाठी, निरोप घेऊ पाहात होता. पश्चिम क्षितिजा वर जणू काही केशर सडा शिंपला होता. त्या भास्करानं निरोप घेतल्या मुळे की काय कोण जाणे अंतरात काहीशी उदास भावना ही रेंगाळत होती. संध्याकाळची अशी ही वेळ तृप्ती बरोबरच मनाला काहीशी हुरहूर लावून जाते. अश्या अवस्थेचं जगदीश खेबुडकर यांनी 'धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना' या धाकटी बहीण चित्रपटातल्या लोकप्रिय गीतात, फार समर्पक वर्णन केलं आहे. 'तृषा वाढते तृप्त या लोचनांची' एकाचवेळी तृप्ती आणि तृषार्ततेची भावना मनात रुंजी घालतात, ती ही वेळ. अश्या वेळी तिची साथ नसेल तर पश्चिमेचा शीतल समीर आणि शारद चांदणं सुद्धा मन पोळून टाकतं. 

धरतीनं परिधान केलेल्या हिरव्या शालुवर पहाटे हलकेच पडलेला स्वर्गीय प्राजक्त सडा किती विलोभनीय असतो! पण जर तिची चाहूल ही नसेल तर मग सृष्टीचं हे अलंकरण, अशी ही आरास अर्थशून्यच नाही का?



तिच्या साथी शिवाय साध्या, सोप्या, सरल वाटेवरची वाटचाल ही कठीण होऊन बसते. रुक्ष होऊन जाते. मग अश्या एकाकी वाटचालीत वारंवार तोल जाऊ लागतो. प्राजक्त, जाई, जुई ही खरं तर किती नाजूक फुलं पानं या सानुल्या फुलांचा ही भार वाटू लागतो मनाला तो सावरत नाही. पण अंतरीच्या या व्यथा कुणाला कश्या कळणार?

जिवलगाच्या नसण्यानं जीव अशांत, अस्वस्थ होतो. धीर सुटू पाहतो. कंठातून सुर फुटतच नाही. उरात कोंडलेली विरह वेदना मात्र सतत जागी राहते, विरहार्त गीत गाण्यासाठी.

भूतकाळातल्या चांदण रात्रीच्या आठवणी बिन मोत्याच्या शिंपल्या सारख्या आहेत, सागरात सापडणाऱ्या शिंपल्याचं मोल हे त्यात मिळणाऱ्या मोत्या मुळेच असतं. मोती नसलेला शिंपला हा चैतन्य निघून गेलेल्या कलेवरासमच असतो. आता तर ती नाही. आहे फक्त जुन्या आठवणींची स्वप्नमाया. आज तिचीच साथ नाही तर मग पश्चिमेचा हा शीतल वारा, हे चांदणे काय कामाचं?



'प्रिया आज माझी नसे साथ द्याया

नको धुंद वारे, नको चांदण्या या'

हे भावगीत म्हणजे विरह वेदनेचा उत्कट आविष्कार आहे मात्र या गीताचा जन्म हा

'स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी' या मराठीतल्या एका सर्वतोपरी लावण्यपूर्ण गीताच्या जन्मात दडलेला आहे. त्याच झालं असं की ध्वनिमुद्रिका (Gramophone Record) काढायची तर पाठपोट दोन तरी गाणी हवी. 'स्वर आले दुरुनी' हे गाणं तयार होतं. त्याची ही कहाणी मोठी गमतीदार आहे ती आधी सांगतो आणि मग प्रिये कडे वळूया.


स्वर आले दुरूनी


काही दिवसांपूर्वी व्हॉटस् अप चाळत असताना संगीतकार, गायक सुधीर फडके(#Sudhir Phadke) यांच्या जयंती निमित्त शेखर जोशी या माझ्या पत्रकार मित्राची पोस्ट समोर आली. एका आर्त भावगीताची जन्म कहाणी तो सांगत होता. बसच्या प्रवासा दरम्यान संगीतकाराला चाल सुचते. त्या चालीचं नोटेशन तो तिकिटाच्या मागे लिहून ठेवतो आणि घरी गेल्यावर संगीतरचना पूर्ण करतो. आता या चालीला शब्दांची साथ लाभली तर उत्तम भावगीताचं सृजन शक्य असल्याचं वाटतं आणि डोळ्यापुढे पहिलं नाव ज्या गीतकाराचं येत त्याला तो ते नोटेशन अंतर्देशीय पत्रानं कळवतो. आठवड्याभरातच स्वरांना शब्दांची वसनं लाभतात. स्वर रचनेच्या हाती हात गुंफून शब्दरचना येते. ती शब्दकळा जेव्हा साजूक गळ्यातून अवतरते तेव्हा एक अविस्मरणीय भावगीत मूर्त रूप घेतं आणि ते गीत ऐकताना रसिकाच्या गालांवर आसु ओघळू लागतात. चाणाक्ष वाचक निमिषात गुणगुणू लागतो….' स्वर आssले दुरुनी…'


ऐकण्यासाठी इथे क्लिक करा - स्वर आले दुरुनी


या बस प्रवासात चाल सुचलेले संगीतकार होते पंडित प्रभाकर जोग, गीतकार होते यशवंत देव आणि गायक होते भरजरी साजूक गळ्याचे सुधीर फडके. एखाद्या रचनेसाठी असे त्रिदेव एकत्रित आले तर अश्या किमयागारां कडून अपसुकच किमया साधली जाते. विशेष म्हणजे ही कलाकृती साधण्यासाठी, वेगवेगळ्या भूमिका साकारत तीन संगीतकारांची झालेली भद्र युती खरोखरच श्रुती धन्य करते. अश्या रचनेच्या मोहपाशातून एखाद्या वैरागी पुरुषाची ही सुटका जरा कठीणच.

अशी विलक्षण रचना करणाऱ्या या त्रिदेवां पैकी कुणा एकाला शरण जाता येत नाही. कारण इथे आद्य चाल आहे, शब्द नंतर. प्रभाकर जोगांनी(#Prabhakar Jog) ती इतकी साधी पण तितकीच दिलखेचक अशी बांधली आहे. संपूर्ण गाण्यात पावरी(Flute) आणि व्हायोलिनच्या(Violin 🎻) सुरांची मनमोहक साथ मिळाली आहे. विशेषतः व्हायोलिन चे सुर तर बाबूजींच्या सुरांना असे काही लगडलेले आहेत की कान तृप्त होतात. या चालीला शब्द प्रतिमा देणाऱ्या देवांनी, चपखल शब्द योजले आहेत. विरह व्याकुळ मनाला, उद्यानाची उपमा देऊन निसर्गातले दाखले देत, मनस्थितीचं अप्रतिम चित्र रेखाटलं आहे. दुसऱ्या कडव्यात देव विरहार्त शब्द लिहितात, विरहात लिहीत नाहीत. वास्तविक दोन्ही शब्द अर्थवाही असून मीटर मध्ये बसतात. पण विरह भौतिक, शारीरिकता(physical) दर्शवितो तर विरहार्त हा शब्द विरहाने व्याकुळ झालेल्या मनाकडे (psychological condition) घेऊन जातो. दुसरं म्हणजे विरहार्त शब्द हा विरहाची तीव्रता प्रगट करतो. शास्त्र शाखेच्या या पदवीधर कवीनं भाषेचा आणि शब्दांचा केलेला शास्त्रशुद्ध उपयोग शब्द, भाषा प्रेमींना 'ती'च्या भेटी इतकाच आनंद देऊन जातो. बाबूजीं सारख्या गायक संगीतकारानी हे सुधीरतेनं नीट टिपलं आहे. दुरून आलेल्या स्वरांनी तर किमया साधली पण मनावर हलकेच फुंकर घालणारी कुणी प्रिया आज सोबतीला नाही त्यामुळे त्याची अवस्था बघा कशी झालीय ती...


प्रिया आज माझी


आता या सुरेल गीताच्या जोडीला आणखी एक गीत हवं असल्यानं 'स्वर आले दुरुनी'चे संगीतकार प्रभाकर जोग यांनी पुन्हा एकदा प्रथम चाल केली. ती बांधली, ती कलावती आणि कलावतीच्या हातात हात घालून विचरण करणाऱ्या रिखब वाली कलावती म्हणजेच कर्नाटक संगीतातील प्रचलित जनसंमोहिनी रागात. श्रद्धा, भक्तिभाव, विरह वेदना, पूर्वायुष्यातील गोष्टीबद्दल आसक्ती अश्या भावनांच्या अभिव्यक्तीसाठी ही निवड चपखल ठरते.


त्यावेळी आकाशवाणी नागपूरच्या (#All India Radio) सेवेत असलेले देव(#Yashwant Deo), छोट्या रजेवर मुंबईत आले होते. जोगांनी देवांकडेच आपल्या चाली साठी शब्दांचा 'जोग'वा मागितला. या विरहार्त स्वरावलीला, शब्दावलीला आपल्या आर्त सूरांच भावप्रचुर समर्थ कोंदण बाबूजींनी

दिलं. उत्कृष्ट शब्दोच्चारासाठी ते प्रसिद्ध होतेच. गायक सुधीर फडके केवळ शब्द, शब्दार्थच नव्हे तर भावार्थही गात असत असंच म्हणावं लागेल. त्यांच्याकडे गात्या गळ्याच्या बरोबरीन गातं हृदय ही होतं, हे त्यांनी गायलेली गीतं ऐकताना प्रकर्षानं जाणवतं. 'स्वर आले दुरुनी ' प्रमाणेच हे ही गीत साकारत असताना जोग-देव- फडके या त्रिगुणात्मक त्रिमूर्तीनं आपलं सर्वस्व प्रदत्त केलं आहे. एकूण काय सर्व आले जुळूनी असं घडलं आहे आणि त्यामुळेच ही विरहिणी केवळ विरह साहणाऱ्यालाच नाही तर सहचारिणीच्या निकट सानिध्यात असलेल्याला सुद्धा वियोग वेदनेचा आवेग कसा आणि किती व्याकूळ करणारा असू शकतो याची अनुभूती देऊ शकते. हीच या भावगीताची अहमियत आहे. खासियत आहे.


'प्रिया आज माझी नसे साथ द्याया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया

नको धुंद वारे, नको चांदण्या या

प्रिया आज माझी नसे साथ द्याया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया


नको पारिजाता धरा भूषवू ही

पदांची तिच्या आज चाहूल नाही

नको पारिजाता धरा भूषवू ही

पदांची तिच्या आज चाहूल नाही

प्रियेवीण आरास जाईल वाया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया


फुले सान झेलू तरी भार होतो

पुढे वाट साधी तरी तोल जातो

फुले सान झेलू तरी भार होतो

पुढे वाट साधी तरी तोल जातो

कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या

प्रिया आज माझी नसे साथ द्याया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया


न शांती जिवाला न प्राणास धीर

कसा आज कंठात येईल सूर

न शांती जिवाला न प्राणास धीर

कसा आज कंठात येईल सूर

उरी वेदना मात्र जागेल गाया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया


अता आठवीता तशा चांदराती

उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती

अता आठवीता तशा चांदराती

उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती

उशाला उभी ती जुनी स्वप्नमाया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया

नको धुंद वारे, नको चांदण्या या

प्रिया आज माझी नसे साथ द्याया

प्रिया आज माझी नसे साथ द्याया'


ऐकण्यासाठी क्लिक करा - प्रिया आज माझी नसे



नितीन सप्रे,

ठाणे

nitinnsapre@gmail.com

8851540881

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक