स्मृतीबनातून साहित्य...महाकुंभ...अयोध्या...गालिब
साहित्य...महाकुंभ...
अयोध्या...गालिब
- एक रोजनिशी
दिवस पहिला(19.02.25)
मुंबई हजरत निजामुद्दीन 12909 गरीब रथ सकाळी 10.20 ल नियोजित वेळी दिल्लीत पोहोचली. साहित्य संमेलन, प्रयागराज कुंभमेळा, अयोध्या असा बृहद् पर्यटन प्लान असला तरी अमुक वेळ गाठायची असं दडपण संमेलन उद्घाटन सोहळा वगळता नसल्यामुळे आगळाच निवांतपणा अनुभवत होतो. अचानक जाणवलं की आजवरच्या आयुष्यात कदाचित असं पहिल्यांदाच घडत होतं. एखादं लक्ष्य गाठण्यासाठी आपण स्वतःच स्वतःला किती शिणवून घेत असतो? उशिरा का होईना याची आज जाणीव झाली याचं मनात कुठेतरी समाधान वाटलं. त्यातच कोरोना काळा सकट; गेली पाच वर्ष दिल्लीनी मला खूप छान सांभाळलं. महाराष्ट्राला डावलण्याचा ठपका दिल्लीवर पूर्वापार ठेवला जातो. मात्र बहुतेक मराठी जन; विशेषतः मुंबई पुण्याचे मूळ निवासी(रागावू नका) हे दिल्लीत अस्वस्थ मनाने आणि उगाचच बिचकुन वावरतात असं माझं निरीक्षण आहे. सेवा कालाच्या शेवटच्या टप्प्यात मी एकटाच दिल्लीत होतो आणि दिल्लीत कार्यालय किंवा अन्यत्र माझा, मराठीचा आणि महाराष्ट्राचा सकारात्मक ठसा उमटवून वावरू शकलो याचं एक प्रकारे समाधान आहे. अर्थात यात संपर्कात आलेल्या सर्वांचा समान वाटा आहे. निवृत्ती नंतर दिल्ली सोडून एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेल्या नंतर ही दिल्लीतली पत अद्याप कायम असल्याचा प्रत्यय आला. मुक्कामाला जाता येईल असे चार पांच पर्याय होते. त्यात हक्कानी राहता येईल अशा दोन घरांचा ही समावेश होता. या जाणीवेनं मन सुखावलं. या आधी दिल्लीत आलो तेव्हा किती असुरक्षिततेची भावना असायची. सलग पाच वर्षे; मराठी असूनही; दिल्लीत प्रेमपूर्वक राहिल्यानं ही श्रीमंती आलेली असावी. रेल्वे स्थानकात उतरल्यावर स्थानिक फिरण्यात वेळ वाचवा म्हणून प्रमोद कृपेनं मिळालेलं महाराष्ट्र सदन गाठायचं ठरवलं. त्याचवेळी का कोणास ठाऊक अचानक अशोक सराफचा सुखी माणसांचा सदरा हा चित्रपट आठवला आणि यापूर्वी कधीही न केलेली गोष्ट म्हणजे; रस्त्याच्या कडेला असलेल्या ओपन एअर सलून मध्ये; म्हणजे फुटपाथ वरच्या न्हाव्या कडून दाढी करून घेतली. नॅपकिन मात्र स्वतःचा होता. त्यानी काम छान केलं म्हणून हेड मसाज ही करवून घेतला. शेजारी टपरीवर चहा घेतला. डीटीसीच्या बसनं (966) नव्या महाराष्ट्र सदनाच्या अगदी दारात सोडलं. तिथे शिव जयंती(19.02.2025)निमित्त कार्यक्रम सुरू होता. लोकं उत्साहानं एकत्र आले होते. फेटे बांधले जात होते. सर्वांसाठी भोजन व्यवस्था होती. शिवरायांना वंदन करून मी मागच्या रस्त्यानी जुन्या सदनात जाऊन कार्यालयीन कामकाजासाठी दूरदर्शन भवनला जाण्याची तयारी केली. सेवानिवृत्ती नंतर हैदराबाद मार्गे मुंबईला जाण्यासाठी चार जानेवारीला दिल्ली सोडल्या नंतर आज प्रथमच मी पुन्हा दूरदर्शन भवनात आलो होतो. पूर्वीची कवच कुंडलं आता अर्थातच नव्हती. महिनाभर आधी पर्यंत, प्रवेशद्वारावर अडवलेल्या कुणाला एडिटर इन चार्ज म्हणून; मी हस्तक्षेप करून योग्य त्या व्यक्तीला प्रवेश मिळवून देऊ शकत असे. आज त्याच परिसरात आपल्याला सहज प्रवेश मिळेल का अशी एक शंका होती. मात्र संजय सोनीनं सोन्या सारखी व्यवस्था केली होती. गाडी मथुरेला असतानाच मी त्याला भोजनावकाशा पर्यंत येत असल्याची वर्दी दिली होती. सुदैवानं तोच ENC होता. निवृत्तीच्या वेळी; दिल्ली सोडण्या आधीच अर्ज करून ठेवलेला पास तयार करून घेऊन त्यानं आमचा शिपाई मित्र दिलीप याला तो घेऊन मुख्य प्रवेश द्वारावर उभ केलं होतं. मी किती वाजता येतोय ते कळवा हे सांगण्यासाठी त्याचा फोन ही येऊन गेलेला. त्यामुळे प्रवेश सुकर आणि अगदी सन्मानपूर्वक झाला.
दिवस दुसरा(20.02.25)
रात्री झोपायला थोडा उशीर झाला असला तरी सकाळी नेहमी प्रमाणे लवकर जाग आली. मुक्काम त्या रात्री महेश अय्यंगारच्या हुडको प्लेस; दिल्लीच्या भाषेत सांगायच तर सरकारी मकान मध्ये होता. पंचम स्तरावर. हा माझा भारतीय माहिती सेवेतला बॅचमेट. महिन्याहून अधिक काळ माझी चार पांच किलोमिटर नियमित प्रभात फेरी सुरू आहे. तिच्यात खंड पडू नये म्हणून सहाच्या सुमारास बाहेर पडण्याच्या विचार, मध्यरात्री ऐकलेल्या दिल्लीकर श्वानांच्या तार सप्तकातल्या मैफलीची आठवण होऊन, बासनात बांधावा लागला. उगाच एखाद्याचा चावा महागात पडला असता. अर्थात घरी लिओ आल्या पासून त्याचे जातभाई माझ्याशी स्नेहपूर्ण वर्तन करू लागले आहेत. गेल्या सहा सात वर्षातला हा नवा अनुभव आहे. पण हल्ली वर्तनाच्या बाबतीत कुणीच कुणाची खात्री देऊ घेऊ शकत नाही. तेव्हा प्रभात फेरी रद्द केली. मग थोडं लिखाण, वाचन(मोबाईलवर) अश्या गोष्टीत साडे सहा वाजवल्यावर तडक उठून आम्हा दोघांसाठी चहा केला. सकाळची अन्य आन्हिकं आटोपून तो ऑफिस साठी आणि मी सेवानिवृत्ती अनुषंगानं राहिलेली काही कामं व संमेलनातील सहभागाची व्यवस्था लावण्यासाठी बाहेर पडलो. प्रथम पोटपूजा. दिल्लीत असल्यानं नाश्त्यासाठी आलू पराठ्यांना शरण गेलो. बाकी दिवसभर
दिवस तिसरा(21.02.2025)
महाराष्ट्र सदनात(जुनं) ब्रम्ह मुहूर्तावर खग रवानं जाग आली. आपल्या नेहमीच्या कावळा चिमणी(?) यांच्या सोबतीनं पोपट, मोर या सारखे, आजकालच्या भाषेत सांगायच तर सेलिब्रिटी पक्षांनी देखील मैफिलीत हजारी लावली होती. बंगाली मार्केट, इंडिया गेट परिसरात पहाट फेरी झाली. हिमाचल भवनच्या थोडं पुढं गेल्यावर बैठकीची चहा टपरी आहे. तिथे पहाटे 5.30 ला वाफाळता चहा तयार असतो. सोबत मुख प्रक्षालन आणि सेवनार्थ कोमट पाणी सुद्धा. सकाळच्या सुखद थंडीत न्यूज रूमच्या काही सहकाऱ्यां बरोबर गरमागरम चहा आणि चर्चा असा आनंददायी कार्यक्रम. यातून बरेचदा दिवसभरासाठी छान टोन सेट होऊन जातो.
दिल्ली वारीतील तीन प्रमुख अजेंडां पैकी पहिला म्हणजे साहित्य संमेलन...सकाळी निघालेल्या ग्रंथ दिंडीत थोडी चहल कदमी, ग्रंथ नगरीत फेरफटका वगैरे तालकटोरा स्टेडियम परिसरातील उपक्रमांना हजेरी लावली.
इतिहासात युद्धा साठी मराठ्यांनी छावणी घातलेले स्थळ, वर्तमानात साहित्य संमेलना साठी निवडणं; ही कल्पकता होती, योगायोग होता का मजबुरी? संमेलनाचा उद्घाटन सोहळा भाग दोन आणि अन्य कार्यक्रम ज्या तालकटोरा स्टेडियमच्या परिसरात झाले तिथे पहिले बाजीराव पेशवे महादजी शिंदे, सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दिल्लीत पहिला तळ ठोकला होता. असो. कार्यक्रम पत्रिका, ओळखपत्र, माहिती पुस्तिका वगैरे साहित्य मिळवण्यासाठी दर्दींची गर्दी झाली होती. सुदैवानं कोणी गर्दुल्ले मात्र नव्हते. उत्साह आणि व्यवस्था यांचं व्यस्त त्रैराशिक सोडवणं सर्वांच्या नशिबी आलं होतं. सरहद या आयोजक संस्थेचे विपुल कार्यकर्ते; त्यांचे सरदार संजय नाहर यांच्यासह भरपूर मेहनत करत होते. नीटस बोलत होते मात्र व्यवस्थित काहीच घडत नव्हतं. काही मदती साठी नाहर यांना गाठलं तर त्यांनी विज्ञान भवनात दुपारी 3.30 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटन समारंभाच्या सन्माननीय व्यक्तींना द्यावयाच्या निमंत्रण पत्रिका अजूनही दिल्या गेल्या नसल्यानं आपणालाच मदतीची आवश्यकता असल्याचं अगतिकपणे सांगितलं. डेलिगेट, रसिक,पत्रकार, कार्यकर्ते आणि संयोजकही समानतेनं हवालदिल शब्दाचा अर्थ अनुभवताना दिसत होते. हजार लोकांसाठी साहित्य जुळवावं लागेल असं अपेक्षिलेलं असताना तीन हजार लोकांची संमेलनाची व्यवस्था करावी लागत असल्यानं अनागोंदी माजली असं संजय नाहर म्हणाले. असं का व्हावं ते कळू शकलं नाही. या सर्व गोष्टींना कार्यकर्त्यांची अधिक संख्या, त्यांचं स्थानिक नसणं, त्यांना आवश्यक अधिकार आणि किमान ठोस माहिती देखील न दिली गेल्यामुळे हे झालं असावं असा एक प्राथमिक अंदाज. ग्रंथ नगरीत घालवता आला असता असा बराच वेळ विज्ञान भवनाच्या प्रवेश पत्रिका कुठे, केव्हा व कशा मिळतील आणि मुख्य म्हणजे ओळखपत्र न मिळाल्यामुळे 6500 रुपये भरूनही भोजन मिळेल का नाही या विवंचनेत गेला. पण देशाच्या राजधानीत सात दशकानंतर, अभिजात दर्जा मिळवल्या नंतर, होणाऱ्या या माय मराठीच्या उत्सवात, आपसात पाय ओढणी करण्याचं खास मराठी वैशिष्ट्य न पाळण्याचा निर्धार केला होता. शेवटी साहित्य नगरीतून काढता पाय घ्यावा लागला. बरीच फोनाफोनी करून अखेरीस महाराष्ट्र सदन इथून प्रवेशपत्र मिळतील असं कळलं. तिथेच सशुल्क भोजन करून; श्रीराम जोशी आणि अन्य काही पत्रकार मित्रां समवेत विज्ञान भवन गाठलं. दूरदर्शन न्यूज दिल्ली इथे गेली पाच वर्षे नियुक्त असल्यानं सहज शक्य असूनही जिथे कधी गेलो नव्हतो त्या विज्ञान भवन या सेलिब्रिटी वास्तूत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी व्हीआयपी(आसन क्रमांक जी2)म्हणून वावरताना जीव थोडा सुखावला हे मान्य केलच पाहिजे.
तिथे कव्हरेज साठी आलेल्या डॉ. नरेंद्र आणि डॉ. सुयश यांना ते चांगल व्हावं यासाठी शक्य ती सर्व मदत केली. वयानी लहान पण सांगीतिक गुणांनी थोर असा मित्र कौशल इनामदार याचं गीत सादर झालं त्याचा बाईट करवून दिला. काही प्रतिष्ठित मान्यवरांचे नंबर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, शहर दिल्ली, स्थळ विज्ञान भवन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि हो नियोजित अध्यक्ष तारा भवाळकर, आणि अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे अशा साऱ्या ऐवजा मुळे उद्घाटन सोहळा भव्य दिव्य असा झाला.
तिथे झालेल्या भाषणांतून मिडियाला बरेच दिवस सोई नुसार चर्चेत ठेवता येतील असे काही मुद्दे मिळाले.
णमो अरिहंताणं, णमो सिद्धाणं
णमो आयरियाणं, णमो उवज्झायाणं
णमो लोए सव्व साहूणं, एसो पंच णमोक्कारो
सव्वपावप्पणासणो, मंगलाणं च सव्वेसिं
पढमं हवइ मंगलं ||
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात काश्मिरी कन्या रुकय्या मकबूल हिनं सादर केलेल्या, मराठीप्रमाणेच अभिजात भाषेचा दर्जा लाभलेल्या प्राकृत भाषेतील सुमारे 2500 वर्षांपूर्वीच्या मंगलकामना करणाऱ्या जैन धर्मातील नवकार मंत्राने झाली. पुढे महाराष्ट्र गीत हे ही काश्मिरी कन्या शमीमा अख्तर हिने गायलं. इथवर सर्व ठीक वाटलं. मात्र आता विश्वात्मके देवे ते सर्वात्मका सर्वेश्र्वरा असा सातत्यानं वैश्विक विचार मराठीनं मांडला असला तरी तिच्याच कडून माय मराठीतलं ज्ञानेश्वर माऊलींच पसायदान म्हणून घेऊन समारोप करण्याची कल्पकता(?) मला तरी भावली नाही. ही मात्रा थोडी अधिक झाली. जिथे इतिहासात दिल्ली विजयासाठी मराठ्यांनी छावणी टाकली होती त्या वर्तमानातल्या तालकटोरा इनडोअर स्टेडियमचा परिसर संमेलनाचे मुख्य स्थळ होते. ताराबाईंच दम न दिलेलं भाषण इथे झालं. हा दम खरंच दिला गेला होता का?कोणी, का दिला होता त्या बद्दल मी अनभिज्ञ आहे. विज्ञान भवनातील चहापान आटोपून तालकटोरा इथे पोहोचायला उशीर होणार होता शिवाय दोन दिवस आधी पोहोचूनही, संयोजक संस्थे कडून ओळखपत्र न मिळाल्यामुळे तालकटोरा साहित्य छावणीत भोजन लाभ होणं दुष्कर होतंच. साहित्य मनाचं पोषण करू शकतं शरीराचं नाही तेव्हा सविस्तर अध्यक्षीय भाषण ऐकण्याची इच्छा असूनही ती दडपून, यूट्यूब अथवा छापील भाषणावर ती तहान भागवून, भूक भागवण्यासाठी महाराष्ट्र सदनाकडे मोर्चा वळवला.
दिवस चौथा (22.02.2025)
सकाळी 5.30 ची इंडिया गेट, मंडी हाऊस परिसरात प्रभात फेरी, हिमाचल भवन शेजारी टपरीवर कोमट पाणी आणि आलं मिश्रित वाफाळता चहा, दूरदर्शन न्यूज मधील प्रतिभावान सहकाऱ्यां बरोबर गप्पा
आणि नंतर तयार होऊन साहित्य नगरीत दाखल झालो. दुपार पर्यंतही ओळखपत्र मिळालं नव्हतं त्यामुळे पुनः एकदा कशासाठी प्रश्नाला, पोटासाठी असं उत्तर देत छावणी सोडावी लागली. तहानभूक अशा पोटार्थी विवंचनात न अडकता वैचारिक समागमात रममाण होण्याचा उच्च हेतू गळून पडला. साहित्यिक भुकेला प्राधान्य न देता रुची आणि क्षुधा यांच्या आहारी जाऊन स्वतःच्याच सामान्यत्वा वर स्वतःच शिक्कामोर्तब केलं. आता हे सामान्यत्व धुवून टाकावं या सद्हेतूनं 144 वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ साठी प्रयागराज अयोध्या प्रवासाचा बेत आखला होता.
मुंबईहून माझा सनदी लेखापाल(CA)मित्र राजेश पाटेकर मुद्दाम दिल्लीला आला होता. माझ्या सकट त्यालाही कमीतकमी त्रासात सुरक्षितपणे शुचिर्भूत करण्याची जबाबदारी अर्थातच माझ्याकडे होती. या कामी अन्य सहकाऱ्यां बरोबरच डी डी न्यूजच्या अँकर, रिपोर्टर अश्विनी मिश्रा याची खूपच मदत झाली. कुंभ सुरू झाल्यापासून संपूर्ण काळ तो तिथेच आहे. आता या 45 दिवसात त्यांनी किती आंघोळी संगमात केल्या ते पाहावं लागेल. 26 च्या महाशिवरात्री पूर्वी 24 आणि 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 2.30 पर्यंत पोहोचण्याचा त्यानी दिलेला सल्ला महत्वाचा ठरला. त्यानी नुसत सल्लाच दिला नाही तर ती संपूर्ण रात्र अश्विनी ने आमच्या साठी जगून काढली आमच स्नान झाल्या नंतरच थोडी डुलकी घेतली असावी. बाय द वे अश्विनी ’ही’ नाही ’तो’च आहे.
दिवस पांचवा(23.02.2025)
अश्विनी मिश्रा च्या सल्ल्या प्रमाणे 24 ला पहाटे निघण्याच्या नियोजनात बदल करून 23 ला दुपारीच दिल्ली सोडण्याचा निर्णय केला आणि टॅक्सीनं प्रयागराज साठी रवाना झालो. पहाटे 3 च्या सुमारास इलाहाबाद हाई कोर्ट, कचहरी मार्गे इलाहाबाद यूनिवर्सिटी च्या डीजे हॉस्टेल समोरच्या रस्त्यानी हाशिमपुर चौक, अल्लापुर चौकी मटियारा रोड अशी मार्गक्रमणा करत एलोपी बाग मंदिरा जवळ पोहोचलो. संपूर्ण रस्ता अप्रतिम होता त्यामुळे रात्रभरात सुमारे 800 किलोमीटर प्रवास करूनही ताजेतवाने होतो. तिथल्या पार्किंग मध्ये स्विफ्ट डिझायर पार्क केली. तिथून संगम घाट, नंदीद्वार हे फार तर फार 1 किलोमीटर होते. त्या प्रहरीही गर्दी होती मात्र शिस्तीत होती. घाटावर जाण्यापूर्वी आलं मिश्रित उत्तम चहा 10 रुपयात मिळाला. तिथली व्यवस्थाही चोख होती. जराही वेळ न दवडता ब्रम्ह मुहूर्तावर 4.30 ते 5.15 संगम स्नान घाटावर पवित्र स्नान केलं.
4 हजार हेक्टरमध्ये विस्तारलेल्या या महाकुंभ क्षेत्री सुमारे 65 कोटीं हून अधिक भाविकांनी साधलेल्या स्नान पर्वणीत आपण ही एक होतो ही भावना काही वेगळीच होती.
महाकुंभा कडे निव्वळ धार्मिकतेच्या चष्म्यातून बघितलं तर ते लघुदृष्टी दोष असलेल्याला दिसतं तसं दिसेल. मुख्य धार्मिक पैलूच्या जोडीनं त्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सुरक्षा, व्यवस्थापन असा बहुविध आयाम ही होता. तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या कुंभ नगरीत 4 लाखांहून अधिक तंबू आणि 1.5 लाख स्वच्छतागृह उभारण्यात आली होती. ठिकठिकाणी नळाद्वारे पाणी पुरवठ्याची सोय केली होती. सुमारे 50 हजार सुरक्षा रक्षक 2500 हून अधिक कॅमेऱ्याच्या सहाय्यानं परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. 13 हजाराहून अधिक रेल्वे गाड्यातून 30 कोटी भाविकांनी प्रयागराजला भेट दिली. 2,800 हून अधिक विमान उड्डाणं 4.5 लाख श्रद्धाळूंना इथे घेऊन आली. 43 रुग्णालयांनी 6 लाख लोकांना वैद्यकीय सेवा पुरवली. आम्हाला पहाटे 4.30 वाजता संगम घाटावर भेटलेला चहा विक्रेता मुलगा दिवसाकाठी चार पांच हजाराचा गल्ला जमवत होता. अशी 600 मुलं तिथे व्यवसाय करत असल्याचं त्यानीच सांगितलं. शिवाय दातून (कडुलिंबाच्या काड्या) विकून 5000 रुपये दिवसभरात मिळवित असल्याचं सांगणारा एक 19 वर्षांचा नाव प्रियकर एका रिॲलिटी शो मध्ये सहभागी झाला त्याची क्लिप बघितली. 11 हजार कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी मेहनत घेतली. ठिकठिकाणी कचरा पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. सर्वत्र गेमाग्झिन/डी डी टी पावडर टाकलेली दिसली. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही दुर्गंध नव्हता. छेडछाडीचे प्रकार होत नसावेत. सर्वजण शांतीपूर्ण प्रकारे शिस्तीत कुंभ स्नान पर्वणीचा लाभ घेताना आढळले. पाणी वाहतं असल्यानी स्वच्छ होतं. अंघोळ केल्यानंतर कुठलाही त्रास झाला नाही.
दिवस सहावा(24.02.2025)
पहाटे 4.30 ब्रम्ह मुहूर्तावर अनायसे स्नान घडल्या नंतर तिथेच उत्तम चहा(फक्त रुपये 10)घेऊन 5.30 पर्यंत आम्ही संगम स्नान घाट सोडला. आमचा सारथी(बिहार) जितू रात्रभर कार चालवीत असल्यानी त्याला झोप घेऊ देणे परस्पर गरजेचं होतं. शिवाय आम्ही तिथली स्वच्छतागृह वापरली नव्हती. म्हणून प्रयागराजच्या केंद्र सरकारच्या फिशरीज विभागाच्या विश्रामगृहात थोडं थबकलो आणि मग अयोध्येसाठी प्रयाण केलं. प्रयागराजला येणारा बहुतेक श्रद्धाळू अयोध्येला ही दर्शनासाठी जात होता त्यामुळे अयोध्या मार्गावर प्रचंड वाहतूक, थोडी कोंडी आणि अयोध्या शहराला जनसागराचं रूप आलं होतं.
रात्री मंदिरा जवळच्याच मिथिला गेस्ट हाऊस मध्ये मुक्काम केला. मंदिर मार्गावरच्या एका तीन मजली अत्याधुनिक हॉटेल मध्ये भोजन करून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 ते 9 वेळेत केलेल्या दर्शन व्यवस्थे साठी विश्रांती घेऊन ताजेतवाने झालो. खरंतर देवाच्या दरबारी व्हीआयपी वगैरे म्हणून जाणं मला अनैतिक वाटत आलं आहे. पण प्राप्त परिस्थीत तत्वाला थोडी मुरड घालून ती व्यवस्था स्वीकारण्याला पर्याय नव्हता. श्रीरामचंद्रांची मनातल्या मनात माफी मागून सीआरपीएफ जवानाच्या सहकार्यानं व्हिआयपी दर्शन घेऊन सुखरूप बाहेर पडलो. फक्त बाहेर पडताना चुकीच्या बाजूला गेल्यानी आमची आणि आमच्या पादुकांची फारकत झाली. माझी भावना बेगडी नसून खरी असल्याची पावती जणू श्रीरामानं दिली. कारण पादुका मिळवण्यासाठी पुन्हा प्रवेश करावा लागणार होता. व्हीआयपी पास जमा करून घेतला होता त्यामुळे आता जनसामान्य, जो मी आहेच, म्हणून प्रवेश घ्यावा लागणार होता. त्यामुळे चपला प्राप्ती साठी सामान्य दर्शनार्थींच्या गर्दीतून वाट काढत मी पुन्हा एकदा रामाच्या चरणी पोचलो. यावेळी मात्र योग्य दिशेला बाहेर पडून आम्हा दोघांच्याही वाहणा, श्रीरामाचा विशेष प्रसाद आदी घेऊन बाहेर पडलो. त्रेतायुगातल्या श्रीरामाच्या पारिवारिक देवघरात तयार झालेले शुद्ध तुपातले लाडू घरी परतल्यावर देण्यासाठी घेतले.
अयोध्या नगरीत पुरातन दशरथ महाल, कनक महाल तसच अन्य स्थळं आणि आधुनिक लता मंगेशकर चौक आवर्जून बघितला. प्रचंड गर्दीमुळे पवनसुताच दर्शन हनुमान गाडी चढून नव्हे तर खालूनच नमस्कार करून समाधानी व्हावं लागलं.
एका घरगुती छोटेखानी व्यवस्थेत उत्तम आलू पराठे आणि दही(मी नाही) यांचा आस्वाद घेऊन मिथिला गेस्ट हाऊस सोडलं आणि दिल्लीच्या परतीच्या प्रवासाला दुपारी 2 या सुमारास लागलो.
दिवस सातवा(26.02.2025)
गाडीची बुक, पोटाची भूक, चहा, सारथीची विश्रांती यासाठी थांबे घेत रात्रभर प्रवास करून सकाळी सहाला दिल्लीत दाखल झालो. एकूण 1600 किलोमीटर आणि दोन रात्री टॅक्सीनं प्रवास करूनही प्रवासाचा त्रास झाला नाही कारण रस्ते एकदम सुस्थितीत होते. थोडा आराम करून महाराष्ट्र सदनच्या कॅन्टीन मध्ये फक्कड साबुदाणा खिचडी आणि वडा सेवन करून महाशिवरात्रीचा उपवास साधला. दुपारी माझा बॅचमेट राकेश रंजनशी भेट आणि राजघाट असा घाट घातला होता. पैकी राजघाटावर गेल्यावर तो दोन दिवस बंद असल्याचं कळलं. पण राकेशची भेट झाली. त्या भेटीत त्यांनी गालिब हवेली बघण्याचा दिलेला सल्ला मी व राजेश दोघांनीही शिरसावंद्य मानून चांदणी चौकाकडे मोर्चा वळवला. तिथल्या प्रसिद्ध जिलेबीवाल्या कडे नुसती रबडी खाऊन महाशिवरात्री व्रताचं पालन केलं.
सायकल रिक्षात बसून बल्लीमारन भागात कासिम जान गल्लीतल्या मिर्ज़ा ग़ालिब या प्रख्यात उर्दू कवी/ शायर यांच्या हवेलीत दाखल झालो.
महाशिवरात्रीचा सुटी असल्यानं ती बंद होती. आम्ही निराश होऊन बाहेरूनच गालिब यांच्या प्रतिभेला वंदन करून एक फोटो घेऊन निघणार तोच राजेशच्या तोंडून आम्ही मुंबईहून आल्याचं तिथल्या सुरक्षा रक्षकांनी ऐकलं. कवीच्या हवेलीचाच गार्ड तो, त्याच मन द्रवलं त्यांनी हवेलीत प्रवेश दिला. ही अनियोजित भेट होती आणि दिल्लीतल्या मराठी सारस्वतांचा मेळा असलेल्या साहित्य संमेलनानी सुरू झालेल्या प्रवासाची इतिश्री थोर उर्दू शायर मिर्ज़ा ग़ालिबच्या हवेलीला भेट देऊन झाली हा किती अकल्पित योगायोग बघा.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
030320251955
ठाणे
अत्यंत मुद्देसूद आणि माहितीपूर्ण प्रवासवर्णन. खूप खूप धन्यवाद....
उत्तर द्याहटवाUttam लिहिले आहे
हटवा