स्मृतीबनातून – आकाश–पाणी(माझा क्रुझ प्रवास)
आकाश–पाणी
(माझा क्रुझ प्रवास)
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या, प्रामुख्यानं आकाशवाणी,दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन आणि अन्य बहुतेक सर्व विभाग मिळून सदतीस वर्षांची माझी प्रदीर्घ सेवा डिसेंबर 2024 मध्ये सुफळ संपूर्ण झाली. शेवटची पाच वर्ष डी डी न्यूज नवी दिल्लीत नियुक्त होतो. सेवानिवृत्ती नंतर झेपेल तितका प्रवास आणि जमेल तेव्हढ लेखन करण्याच्या केलेल्या निर्धाराला अखेरच्या वर्षात, मी विशेष असे प्रयत्न न करताही एका मीटिंग निमित्त मलेशियाला पाठवून आणि देशांतर्गत शिमला, वाराणसी, आग्रा, मथुरा, वृंदावन, लेपा(खरगोन), भोपाळ, नागपूर, मुंबई अशा प्रवासासाठी मला मोकळीक देऊन माझ्या निर्धाराला ऑफिसानं ही एकप्रकारे सक्रीय पाठिंबा दिला. यासाठी सहकारी, वरिष्ठ यांचं ऋण मान्य केलं पाहिजे. अशी दमदार पार्श्वभूमी लाभल्यावर, निवृत्ती पश्चात हैदराबाद, मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली, प्रयागराज, अयोध्या, गोवा, लक्षद्वीप अशी घोडदौड मी सुरूच ठेवली.
आता नमनाला याहून अधिक तेल न जाळता माझ्या एका अनोख्या पहिल्या वहिल्या प्रवास कथेला आरंभ करतो. एक अवकाश यान वगळता, मुख्यतः नोकरी निमित्त, आतापर्यंत बहुतेक सर्व प्रकारच्या, अगदी पाणबुडी, INS मुंबई सारखी युद्धनौका, प्रवासी हेलिकॉप्टर, कमांडो हेलिकॉप्टर, सर्विस एअरक्राफ्ट, रोप वे, ते सायकल, ट्रॅक्टर, बैलगाडी, रेंगी(बैलगाडीतली मोपेड)पर्यंत सर्व तऱ्हेच्या प्रवासी साधनांशी माझा संबंध आला. यातील समुद्र प्रवासा विषयी मनात काहीशी भीती असल्यानं तो टाळण्याकडे माझा कल होता. सुनामीच्या पहिल्या एनिवर्सरीला 2005 साली अंदमानात गेलो त्यावेळी ही या कारणा मुळेच जहाज प्रवास टाळून हवाई जहाजाचाच आसरा घेतला होता. मात्र आता बदललेल्या परिस्थीत म्हणा किंवा दोन तृतीयांश पेक्षा अधिक जीवन जगून झाल्यामुळे म्हणा, माझा दाक्षिणात्य सहकारी धनशेखरन यानी लक्झरी क्रूझनं लक्षद्वीप प्रवासाची पुढे केलेली ऑफर मी तात्काळ स्वीकारली. या प्रवासाचे नियोजन, आरक्षण, सूट, सवलती यासाठी भरपूर खपून, त्यानी चार केबिन आरक्षित केल्या होत्या. सर्व ग्राउंड वर्क त्याने स्वखुशीन केलं असल्यानं मला फक्त त्यांनी सांगितलेली रक्कम भरून पर्यटक म्हणून माझ्या पहिल्या समुद्र सफरीचा आनंद लुटायचा, इतकं करणंच बाकी होतं.
पर्यटना दरम्यान करायच्या विविध गोष्टींची अग्रक्रम सूची ही व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असते. गरज नसतानाही खरेदीच्या मागे लागून बाजारूपणाच्या आहारी जाण्यापेक्षा, दैनंदिन जीवनात इच्छा असूनही जे करणं शक्य होत नाही अशा सर्व गोष्टी करण्यावर माझा भर असतो आणि म्हणूनच आपल्या सभोवती नित्य सुरू असलेले प्रकृतीचे विभ्रम, निसर्ग सौंदर्य याचा पुरेपूर आनंद लुटण्याला मी नेहमीच प्राधान्य देत आलो आहे. तशीच सोबत असेल तर काय दुधात केशर! त्यादृष्टीनं कॉर्डेलिया लक्झरी क्रुझनं लक्षद्वीप प्रवासाची केलेली निवड 50 टक्के तरी योग्य ठरली. क्रुझ मुंबई–गोवा–लक्षद्वीप–मुंबई अशी फेरी मारणार असला तरी रांची, दिल्ली चेन्नई, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या आमच्या ग्रुपच्या सहकाऱ्यांसाठी मुंबई ऐवजी मार्मागोवा इथून क्रूझवर स्वार होण अर्थकारणीय गणिताप्रमाणे किफायतशीर असल्याचा निर्णय ग्रुप कॅप्टन धनशेखरन यानी घेतला होता. मी तो मनोभावे मान्य केला.
या दहा मजली लक्झरी क्रुझ प्रवासाची कल्पना डोक्यात आल्या पासून ते विशालकाय जहाज भाऊच्या धक्क्याला, आता इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल म्हणायचं, लागून पावलं परत धरणीला टेकवी पर्यंत टायटॅनिक चित्रपटाची आठवण झाली नाही असा बहुदा एकही प्रवासी नसावा. जहाजाचा कॅप्टन आणि क्रु हे ही त्यास अपवाद नसावे. त्यातून आमच्या प्रवासाचा महिनाही तोच. तारखाही 1912 साली घडलेल्या या दुर्घटनेच्या तारखेच्या( 15 एप्रिल) एक आठवडा आधीच्या होत्या. मला तर जहाजावर चेअरमन्स क्लब मध्ये संध्याकाळी सहा वाजता सुरू होणारा संगीत कार्यक्रम ऐकताना टायटॅनिक वरच्या बँड ची प्रकर्षानं आठवण झाली. एप्रिल 15, 1912 या दिवशी टायटॅनिक बुडण्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःसाठी सुरक्षा उपाय नाकारून, वॉलिस हार्टली (Wallace Hartley) यांच्या नेतृत्वाखाली, या धाडसी पथकानं संगीत सुरू ठेवून टायटॅनिकला जल समाधी मिळे पर्यंत सर्व प्रवाश्यांना आपल्या सुरांची साथ देऊ केली होती. असं कळतं की त्यांची शेवटची सुरावट “Nearer, My God, to Thee” ही होती. या बँड पथकातील एकही सदस्य वाचला नाही. पण संकट समयी त्यांनी दाखवलेली कर्तव्यपरायणता आणि धीरोदात्तपणा हा नेहमीच सर्वांसाठीच अनुसरणीय राहील. कुठल्याही संवेदनशील मनाला जहाज प्रवास दरम्यान हे आठवणारच. तसंच मला तरी सागर किनारी गेल्यावर प्रत्येकवेळी सावरकरांची ने ‘मजसी ने परत मातृभूमीला’ भा. रा. तांबे यांच्या ‘कुणा काळजी की न उमटतील पुन्हा तटावर हेच पाय, जन पळभर म्हणतील हाय हाय ’किंवा अरुणोदयाला ललतची सुरावट आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांचे ‘ तेजोनिधी लोहगोल’ चे तेजस्वी सूर आठवले नाहीत असं कधीही होत नाही.
पहिलं नागरी ‘ॲट सी’
‘ॲट सी’ म्हणजे समुद्र यात्रा. किनाऱ्या पासून दूर समुद्रावर दिवस घालवणे. या आधीही मी हे केलं होतं पण ते भारतीय संरक्षण दलाबरोबर, लष्करी इतमामात. पंतप्रधान वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस भारतीय नौदलाच्या ताफ्यात आणि कवायतींच गोवा किनाऱ्यापासून दूर समुद्रात असलेल्या युद्धनौकांचं निरीक्षण करणार होते. नौदलानं त्यावेळी एक हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मुंबईतील पत्रकारांना निमंत्रित केलं होतं. सुदैवानं त्यात मी एक होतो. एक संपूर्ण दिवस संरक्षणमंत्र्यांसह आम्ही INS Mumbai या युद्धनौकेवर होतो. पण तो कामाचा भाग होता. निखळ पर्यटन म्हणून केलेला कॉर्डेलिया क्रुझ नी केलेला हा पहिला वहिला मोठा समुद्र प्रवास आणि तो ही लक्झरी क्रुझ वरचा असल्यानं बालसुलभ उत्सुकता, कुतूहल वाटणं अगदी सहाजिकच होतं. बुधवार 9 एप्रिल, 2025 ला सकाळी दहाच्या सुमारास नाश्ता करून अल्तिनो पणजी येथून वास्कोतील मार्मागोवा बंदरासाठी थेट टॅक्सीनं निघालो. तासाभरात तिथे पोहोचलो. आदल्या दिवशी मुंबईहून निघून सकाळी गोव्यात पोहोचलेल्या आणि बंदरात नांगर घालून उभ्या असलेल्या महाकाय कॉर्डेलिया(cordelia) जहाजाचं टॅक्सीतूनच दर्शन झालं. लक्षद्वीप प्रवासासाठी जहाज जरी दुपारी 3 वाजता निघणार होतं तरी त्यावर चढण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया करण्यात तास दोन तास सहज गेले. अखेरीस दुपारी 1 च्या सुमारास आमचे क्रुझ वर आगमन झालं.
स्वागतिकेनी भारतीय पद्धतीनं कपाळावर टिळा लावला आणि आम्हाला प्रत्येकी केबिन कार्ड दिली. आमची केबिन सातव्या मजल्यावर होती. सुरवातीलाच सुरक्षा ड्रील वगैरे आटोपून दुपारच्या भोजनासाठी चौथ्या मजल्यावरच्या स्टारलाईट रेस्टॉरंट मध्ये गेलो. मांडलेल्या पदार्थांपैकी एक चतुर्थांश पदार्थ चाखणं ही शक्य नव्हतं. शाकाहारी असल्यामुळे अनेक पदार्थांवर मुळातच फुली पडली होती. भोजन सुरू असतानाच दुपारी बरोबर तीन वाजता नांगर काढला गेला आणि जहाजांनी लक्षद्वीप साठी वास्कोचा किनारा सोडला. त्यानंतर तीन चार तास फेरफटका मारून ही एखाद्या स्वयंपूर्ण नागरी वस्ती सारखं असणारं हे जहाज संपूर्ण बघून झालंच नाही. ताशी साधारण 12 ते 15 नॉटिकल माईल वेगाने प्रवास करणारं कॉर्डेलिया सूर्यास्ताच्या वेळे पर्यंत समुद्रात दुरवर आलं होतं. किनाऱ्याच्या पुसट खुणाही आता दृष्टीआड झाल्या होत्या. खाली सर्वत्र फक्त तुडुंब भरलेला निळा समुद्र, वर स्वच्छ निळं आकाश. वर– खाली पसरलेल्या या निळाई मधून संथगतीनं पण निर्धारपूर्वक मार्गक्रमणा करणारं, एखाद्या विशाल सरपटणाऱ्या जलचरा समान कॉर्डेलिया, प्रवाशांना स्वतः शेषशायी श्रीविष्णू असल्याचा आभास करून देत होतं. सुर्यास्ताचा सोहळा तर काय वर्णावा? खारे वारे मंद होऊन मतलई वारे जोर धरू लागले होते. विना अडथळा सूर्यास्त डोळी भरून घेण्यासाठी दहाव्या आणि अकराव्या मजल्यावरच्या डेक वर सारे प्रवासी पक्षी जमले होते. प्रत्यक्ष सूर्यास्त अनुभवून नंतर स्मरणरंजनासाठी तो कॅमेरात कैद करण्यात सर्व व्यग्र होते.
बोटीवरचा पहिला सूर्यास्त डोळ्यात साठवून झाल्यानंतर चेअरमन्स क्लब मधील संगीत कानात भरून ठेवावे असेच होते. त्यानंतर रात्रीभोज करून दाटून आलेल्या अंधारात डेक वरून फेरी मारून पहिल्या अर्ध्या दिवसाची सांगता झाली.
दिवस दुसरा(at sea)
बोट म्हणजे एक महाकाय तरंगत बेट होतं. सुदैवानं समुद्र अपेक्षेपेक्षा अधिक शांत होता. कापणारं पाणी बघितलं तरच बोट चालते आहे हे समजत होतं त्यामुळे केबिन मधे रात्री छान झोप लागली. सकाळी 5.30 का उठून पूल डेक(10 मजला) वर गेलो तर वाऱ्याचा जोर एवढा होता की उभ्या उभ्या हलायला होत होतं. त्यामुळे अकराव्या मजल्यावरच्या ओपन डेक चा रस्ता बंद करून ठेवला होता. तेव्हा दहाव्या मजल्यावर गरमागरम कॉफी सह सहेला रे ऐकत अरुणोदया कडे डोळे लावून बसलो होतो.
एव्हाना पहाट वाऱ्यानी सर्वांग चांगलच थोपटून निघालं होतं. हळूहळू पूर्वाच्या गाली हलकी लाली येऊ लागली. पाठोपाठ पिवळे, तांबूस बिंब कोवळे प्राचीवर उमटून आले.
पूर्वाईच्या या अपूर्वाईतून बाहेर पडायच्या आधीच दूर क्षितिज रेषेवर लक्षद्वीपांच्या अस्तित्वाच्या अस्पष्ट खुणा नजरेस पडू लागल्या. समुद्रातही आमच्या बोटी व्यतिरिक्त सहचारी दृष्टिक्षेपात येऊ लागले.
गोव्याचा किनारा सोडून 20 तास झाले होते. लवकरच बोट लक्षद्वीपच्या समुद्रात नांगर टाकणार होती. बोटीवरच्या काही जणांनी आदल्या दिवशीच लक्षद्वीपांपैकी एक, आगाती बेटावर जाण्यासाठी वेगळं बुकिंग केलं होतं. नाश्ता आटोपून सुमारे 12 या सुमारास एका लहान मोटर बोटीतून आगाती बेटा वर जाण्याची व्यवस्था केली होती. साडे अठ्ठेचाळीस हजार टनएज वहन क्षमता असलेल्या कॉर्डेलियाला डोलवू न शकलेला समुद्र या मोटरबोटीला मात्र आपल्या अंगाखांद्यावर चांगलाच नाचवत होता. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्या बोटीत चढणे श्रेयस्कर होते. पुढच्या पंधरा मिनिटातच या छोट्या (साधारण 80 प्रवासी क्षमता)बोटीने आम्हाला धक्क्यावर सोडले आणि तिथून 15 मिनिटांचा मोटर प्रवास करून आम्ही आगाती समुद्र किनारी आलो. निळा स्वच्छ आरस्पानी किनारा. पाण्यात उतरलो तर त्यात आपलं प्रतिबिंब पाहता येत होतं. ऊन आणि उकाडा ही प्रचंड होता. त्या स्वच्छ किनारी मनसोक्त समुद्र स्नानाचा आनंद घेतला. तसंच तिथल्या लोकनृत्यात ही सहभाग घेतला आणि पुन्हा कॉर्डेलिया वर परतलो. दहाव्या डेकवरच्या पूल मध्ये पोहोल्या नंतर संध्याकाळी हाय टी घेऊन मार्क्वे थिएटर (Marquee Theatre)मध्ये आयोजित दर्जेदार मॅजिक शो आणि बॉलिवूड संगीत तसंच खानपान वगैरे करून दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.
दिवस तिसरा
अजूनही हे महाकाय तरंगणार चल बेट संपूर्ण पाहून झालं नव्हतं. बोटीवरून दिसणाऱ्या सूर्योदय सुर्यास्ताचा अनुभव आगळाच होता. जमिनीवरून तो कधीच घेता येऊ शकत नाही तेव्हा बोटीवर असे पर्यंत हे दोन्ही क्षण चुकवायचे नाहीत हे मनोमन पक्क केलेलं. यापूर्वी कधी लक्षात न आलेली गोष्ट म्हणजे रोजचा सूर्योदय आणि सूर्यास्त वेगळा असतो. स्त्रियांच्या नेलपॉलिशच्या जश्या वेगवेगळ्या शेड्स असतात न तशिच प्रकृतीही रोज निरनिराळी रंगसंगती करत असते. आपण रोजच्या धकाधकीत ती टिपू शकत नाही.
त्याआधी सकाळी साडेपाच वाजता दहाव्या मजल्यावरच्या पूल डेक वर मॉर्निंग वॉक, दोन डेक वर जिम पाहण्यासाठी गेलो म्हणून फोटो ऑप पुरतं सायकलिंग केलं आणि ट्रेडमिल वर ही चाललो.
बोटीवर खाण्यापिण्याची आणि वेळेचीही रेलचेल असल्यानं तीनही दिवस गरजेपेक्षा जास्त खाल्या जाणं साहजिकच होतं पण म्हणूनच एकही दिवस चार पाच किलोमीटरची प्रभातफेरी मात्र चुकवली नाही. पूल डेक वर सकाळी पाच ला चहा, कॉफी तयार असायची. मात्र त्यावेळी माझ्या व्यतिरिक्त तिकडे कुणी न फिरकल्यानं मला एक वेगळ्याच भावनेचा आनंद घेता आला. बोटीवरच्या तिन्ही सकाळी मी डेकवर एकटाच असायचो. कर्मचारी सुद्धा नंतर यायचे. त्यामुळे अंबर आणि सागर यांच्या मध्ये त्या अजस्त्र बोटीवर पहाटेच्या अगदी अंधुक प्रकाशात आपणच त्या बोटीचे मालक असल्याचा आभास होत असे. कुठल्याही देशाच्या सर्वोच्च नेत्याला किंवा एखाद्या कुबेरपुत्राला देखील अशी संधी बहुदा मिळत नसावी. दुसरं माझ्या असं लक्षात आलं की बोटीच्या समोरील बाजूला प्रवासी आवर्जून जात होते मात्र बोटीच्या मागच्या भागात क्वचित एखादा प्रवासी फिरकत असे. टायटॅनिकच्या आकर्षक नायक नायिकेनी दिलेल्या चित्ताकर्षक आयकॉनिक पोझचा तो परिणाम असावा. मी मात्र या दुर्लक्षित जागीही गेलो. डेकवर एकटाच जात असल्याने म्हणा हवं तर. पाणी कापत पुढे जात असलेली ही जलसम्राज्ञी आपल्या मागे कापलेल्या वाटेच विलोभनीय दृश्य निर्माण करत होती. कॉर्डेलियाच्या गजगामिनीसम चाली मुळे त्या अथांग सागराच्या अंतरात जणू विलक्षण चलबिचल होत असावी.
छान! प्रवासाचा अनुभव व वर्णन अप्रतिम! पुढील सर्व मनसुबे प्रत्यक्षात आणा. व वर्णन लिहा.
उत्तर द्याहटवाफार छान वर्णन केलंय; अगदी आम्ही फिरुन आल्याचा आनंद घेता आला. उत्सुकता वाढली.
उत्तर द्याहटवा