स्मृतीबनातून –गान प्रभाकर

गान प्रभाकर

गान संस्कार

निसर्ग संपदेच्या बाबतीत गोमंतक प्रांत जसा भाग्यवान आहे तसाच विद्या संपदा, कला संपदेच्या बाबतीतही गोव्यावर देवी सरस्वतीचा विशेष वरदहस्त आहे. अनेक विद्वान, कलाकार या भूमीशी आपलं नातं सांगतात. याच गोव्यातल्या मूळ म्हापसा परिसरातील पण मडगाव इथे स्थायिक झालेल्या एका कुटुंबात गान सरस्वतीचा वरदहस्त लाभलेलं मूल 4 जुलै,1944 ला जन्माला येतं आणि निष्ठा पूर्वक गान साधना करून गायन क्षेत्रात घराण्याचा नावलौकिक वाढवतं.

उपजिविके साठी सोनारकाम आणि जीवनासाठी संगीत अशा परिवेशात जन्माला आलेल हा मुलगा संगीतासाठी निष्ठापूर्वक मेहेनत करून आयुष्याचं सोनं न करता तरच नवल. घरी दर गुरुवारी भजन गायनाची प्रथा होती. वडील स्वतः भजनं म्हणत.  आपल्या बारा चौदा वर्षांच्या दोन्ही मुलांनाही भजन गायला सांगत. मोठा नारायण पेटी वाजवायचा तर धाकटा थोडं बहुत गात असे. एकदा मडगावच्या नोवेरा शाळेत शिकणाऱ्या या मुलाला वर्गात बाकड्यावर ठेका धरून गाताना मास्तरांनी ऐकलं आणि त्याला शिक्षकांच्या खोलीत भेटायला सांगितलं. आता शिक्षा होणार या अपेक्षेने गेलेल्या या मुलाला मास्तरांनी शाळेच्या गॅदरिंग मध्ये एक दोन गाणी म्हणण्याचं चक्क आवताण दिलं. त्यानं ते आनंदानं स्वीकारलं आणि अत्यंत जोरकसपणे गाणी सादर करून वन्स मोर मिळवला. आसपास गुणग्राहक मंडळी होती. हा त्याचा भाग्ययोग म्हणायचा. त्यांनी त्याला चांगल्या ठिकाणी, मुंबईत गाणं शिकवावं असा लकडा त्याच्या वडिलांकडे लावला. साल होतं 1955. भारताला स्वातंत्र्य जरी मिळालेलं होतं तरी देखील गोव्यात पोर्तुगीज राजवटीचा अंमल होता. गोवा ते मुंबई हा प्रवासही आज सारखा सोपा नव्हता. पासपोर्ट लागायचा. तो नसल्यानी सतत आठ रात्री पदयात्रा करून मुंबई गाठल्याची आठवण स्वतः कारेकर बुवांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली आहे. अखेरीस जनार्दन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मुंबईत दाखल झाले आणि थेट हळदणकर बुवांच्या शिवाजीपार्कच्या घरच्या दारावर थाप दिली. बुवांनी स्वतःच दरवाजा उघडला दोघांचही गाण ऐकलं. धाकट्या मुलानं गायलेलं पंडितजींच कुलवधू नाटकातलं ‘हेतू थोर साध्य होत’ हे नाट्यगीत निवडलं. ते ऐकून हळदणकर बुवा प्रसन्न झाले. आणि या छोट्या गायकाच्या मनीचा थोर हेतूही सुफळ साध्य झाला. संगीतविश्वाचं महाद्वार  प्रभाकर कारेकर या गुणी गायकासाठी कायमचं खुलं झालं. 

गुरू अनुसरण

गवय्येगिरी साठी उपयुक्त गोड गळा जन्मजात लाभला असला तरी गवयी वगैरे होण्याचं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. हळदणकर बुवांनी तालीम द्यायला सुरुवात केली आणि लवकरच प्रभाकराला गुरुगृहीच दाखल करून घेतलं. मुंबईत राहण्याची अर्थातच व्यवस्था नव्हती. म्हणून जवळच माहीम मध्ये असलेल्या मॉडर्न लाँड्री नजीक फुटपाथ वरच त्याकाळी सुरवातीला आसरा घ्यावा लागला.

हळदणकर बुवांची शिकवणी एक दशक अव्याहत सुरू राहिली. इथे बुवांच्या घरी त्यांचा रियाज ऐकता आला, त्यांच्या घरी ये जा असलेल्या मोगुबाई कुर्डीकर, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर अशा  मोठमोठ्या गवैयांच्या संपर्कात कारेकर आले. त्यांच्या कडूनही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. रियाज कसा करावा याच मार्गदर्शन घडलं. मुख्य म्हणजे या सुरेशाच्या घरी त्यांच्या कानांवर सतत उत्तमोत्तम गाणं पडत असल्यानं त्यांच्यातला गायक अधिक संपन्न घडत गेला.

गानसाधना सुरू असतानाच ते पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने प्रभावित झाले आणि त्यांच्याकडे गाणं शिकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यातच पंडित राम मराठे यांनीही कार्यकारांच गाणं ऐकलं असल्यानं आणि त्यांच्यावर विशेष लोभ असल्यानं त्यांनीही आपल्या गुरुबंधू असलेल्या अभिषेकी बुवांकडे शब्द घातला त्यामुळे त्यांना हा अद्वितीय कलाकार, शिक्षक द्वितीय गुरू म्हणून लाभला. इथे गाण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी त्यांना मिळाली. ते राष्ट्रीय पातळीवर गायक म्हणून उदयास यावे यासाठी अनेक नवे राग, ख्याल, टप्पा, हिंदी भजनं याचा अभ्यास अभिषेकी बुवांनी त्यांच्याकडून करून घेतला. आठ नऊ वर्ष गुरुकुलातच हा ज्ञानयज्ञ सुरू राहिला. पुढे अभिषेकी बुवांनी मुंबई सोडली आणि पुणे गाठलं. त्यामुळे आणखी एक गुरूचा शोध कारेकरांनी घेतला. हे तिसरे गुरू होते ग्वाल्हेर आणि आग्रा या दोन्ही घराण्याची गायकी शिकलेले पंडित चिंतामण रघुनाथ व्यास. याचा परिणाम असा झाला की ग्वाल्हेर घराण्याची सुस्पष्ट, साधी सरळ गायकी आणि आग्रा घराण्याची लयकारी अशा दोन्ही परंपरांचे संस्कार कारेकर यांच्यावर सहाजिकच घडले. शिवाय पंडित सी. आर. व्यास यांच्याकडे बंदिशींचं भांडारच होतं. त्यांनी स्वतः रचलेल्या काही बंदिशी होत्या. व्यासांनी कारेकरांना राग दर्शन घडवलं. राग मांडण्याची हातोटी समजावली. त्याचं गायन ऐकताना अभिषेकी बुवा यांची शांत, गंभीर गायकी जशी अनुभवायला मिळते तद्वतच हळदणकर बुवांच्या तडफदार शैलीच ही दर्शन घडतं. अशा रीतीने त्यांची गायकी अधिक विविधांगी समृद्ध होत गेली. कारेकरांनी या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती गुरुवर्यां कडून यथेच्च ज्ञानकण वेचले. गवयी म्हणून घडत असताना कुणाचही अनुकरण त्यांनी केलं नाही. तीनही गुरुंच्या वैशिष्ट्यांचं अनुसरण जरूर केलं. प्रथम गुरु हळदणकर बुवांनी कारेकरांचा कोरा गळा सुरेल केला. द्वितीय गुरू अभिषेकी बुवांनी त्या वर ख्याल,टप्पा, ठुमरी, भजन अशा चतुरंगांनी तो देश पातळी वर गाण्यासाठी घडवला आणि प्रभाकराची गायन प्रभा विस्तीर्ण प्रदेशावर झगमगेल याची तयारी करून घेतली. तर तृतीय आणि अंतिम गुरू पंडित व्यास यांनी त्यांना अनेक बंदिशी दिल्या तसच राग दर्शन घडवले. अशा प्रकारे सुरेशाकडे सुरू झालेली संगीत आराधना जितेंद्रीय होऊन अखेरीस चिंतामणी कडे संपृक्त होऊन प्रभाकरात स्थिरावली.

गायक मात्र नट नाही

एकाही नाटकात अभिनय न करताही अनेक लोकप्रिय नाट्यपदं त्यांनी गायली आणि ती रसिक मान्यही झाली. खरं तर विद्याधर गोखले लिखित मंदारमाला नाटकात अभिनय करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली होती. तालीम ही सुरू झाली होती. संगीत दिग्दर्शक प्रभाकर भालेकर यांनी दोन गाणी ही बसवली मात्र त्याच सुमारास, अभिषेकी बुवांकडे शिकत असताना, त्यांना भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी बोलावणं (Call) आलं. दिल्लीला जाऊन दिलेल्या स्वर परीक्षेत (Audition) यशस्वी होऊन शिष्यवृत्ती मिळाली. नियमाप्रमाणे तीन वर्ष अन्यत्र कुठेही काम करता येत नसे. अभिषेकी बुवांनी संगीताच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे मंदारमाला खंडित झाली. नाटकाशी ताटातूट झाली ती कायमची. उमेदवारीच्या काळात कारेकर, त्यांना अधिक रुचलेली रवी मी, चंद्रिका ही जणू अशी मास्टर दिनानाथांची पदं म्हणत असत. पण प्रियेशी गाठ पडली ती पु. ल. देशपांडे यांच्या रंगसंगीत कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी गाणार होती. तबलजी लालजी देसाई यांनी पी एल कडे प्रभाकर कारेकर यांच्या साठी शब्द टाकला. पुलंनी त्यांना काही पदं म्हणायला सांगितली. त्यांची गायनशैली त्यांना आवडली त्यामुळे चंचुप्रवेश तर झाला. प्रिये पाहा’ व ‘नच सुंदरी करु कोपा’ अशी दोन नाटय़पदं त्यांच्या वाट्याला आली. पुलंनी स्वत: ती गाणी कारेकरां कडून बसवून घेतली. कार्यक्रमात शेवटी गाणाऱ्या प्रभाकर कारेकर यांनी प्रिये पहा वर अशी काही जोरकस तान घेतली की अवघ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सुंदरीला कोपू नकोस अशी केलेली विनंती फळली. आणि प्रिया वश झाली. नाट्यसंगीताशी वयाच्या तिशीत झालेली ही सोयरिक अखंड राहिली. “प्रिये पहा” तर त्यांची ओळख बनली. गायन कारकिर्दीची चाळीशी उलटली तरी या प्रियेनी त्यांची साथ सोडली नाही. मंदारमाला सोडल्यामुळे नाट्याभिनयाशी जरी ताटातूट झाली तरी नाट्यसंगीताशी ऋणानुबंध मात्र कायम राहिला.

गायन कारकिर्द

आजची परिस्थिती माहीत नाही पण एक काळी अभिजात संगीत रुजविण्यात आणि कलाकार घडविण्यात आकाशवाणीचा वाटा मोलाचा होता. हे  कुणालाच अमान्य करता येणार नाही. पंडित प्रभाकर कारेकर आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार होते. शास्त्रीय संगीताच्या अखिल भारतीय संमेलनात त्यांनी आपलं गायन सादर केलं आहे. तसंच आकाशवाणीच्या विभिन्न केंद्रांवरूनही त्यांचं गायन प्रसारित झालं. 

संगीत मग ते कुठल्याही जॉनरचं असो उत्तमच असतं मात्र शास्त्रीय संगीत हे अथांग सागरा सारखं आहे. ते गाताना काही प्रथा आणि परंपरा जपल्या पाहिजेत या बाबत कारेकर आग्रही असत. शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीत यात उच्च नीच असा भेदभाव करणं निरर्थक असल्याचं त्याचं मत ते आवर्जून मांडत. संगीत मैफिलीं, जलशां मधून बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, हिराबाई या सारख्या दिग्गजांनी रागदारी बाजानं उत्तम नाट्य संगीत देखील ऐकवून लोकांना राग परिचय करून दिला. शास्त्रीय संगीता बद्दल त्यांच्या मनात ममत्व निर्माण केलं. हल्ली निरनिराळ्या कारणांमुळे शास्त्रीय संगीत मैफिलींचा संकोच झाला आहे. पूर्वी शास्त्रीय संगीताच्या मैफली चार पाच तास चालायच्या. त्यात ठुमरी, भजन, नाट्यगीत वगैरे प्रकार गायले जायचे. हल्ली फारफार तर तास दीड तास मैफिल होते त्यात एखादी बंदिश, ठुमरी अथवा भजन व नाट्यपद गायलं जातं त्यामुळे खरा संगीतानुभव प्राप्त होत नाही. म्हणून अलीकडे गाणं ऐकायला जावसं वाटत नाही अशी भावना त्यांनी आयुष्य मैफिलीच्या अखेरच्या टप्यात मोकळेपणानं सखंतपणे व्यक्त केली होती. शास्त्रीय संगीत आणि ललित संगीत ते सारख्याच ताकदीनं पेश करू शकत. त्यांनी गायलेले चंद्रकंस, भूपाळी सारखे राग तसंच प्रिये पहा, मर्मबंधातली ठेव ही किंवा गगना गंध आला या सारखं ललित संगीत यात विशेष आकर्षण मूल्य आहे. 

पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याचं निमंत्रण हा कुठल्याही कलाकारासाठी मोठा सन्मान मानला जातो. तिथे फड जमला की कलाकारावर मान्यतेची मोहर उठते. या महोत्सवात कारेकरांनी मोठ्या तयारीनं सादर केलेल्या राग ‘अहिर भैरव’ आणि प्रिये पहा वर रसिकप्रिया भाळली आणि पंडित प्रभाकर कारेकर या नावाला संगीत अवकाशात झळाळी प्राप्त झाली.

एचएमव्ही (HMV) कंपनीनं त्यांची पहिली वाहिली ध्वनिमुद्रिका काढली ती प्रिये पहा याच नाट्यपदाची. ‘प्रिये’च्या लोकप्रियते नंतर अन्य पदांच्या, भजनांच्या आणि शास्त्रीय संगीताच्या बऱ्याच ध्वनिमुद्रिका आल्या.

न्यूयॉर्कच्या ‘रागा फेस्टिव्हल’, इटलीतील ‘अम्ब्रिआ ९८’ अशा आंतरराष्ट्रीय महोत्सवासह इंग्लंड,  अमेरिका,ऑस्ट्रेलिया,इटली तसच आखाती देशांमध्ये आपल्या अनेक यशस्वी मैफिलींद्वारे त्यांनी अभिजात हिंदुस्थानी संगीताची पताका फडकावली. बऱ्याच आंतरराष्ट्रीय वादक-कलाकारांबरोबर ही त्यांनी गायन सादर केलं. कोलमन (अमेरिका), उस्ताद सुलतान खाँ (भारत) यांच्यासह त्यांनी अनेक देशांत या तिघांनी एकत्रितपणे गायन-वादन सादर केलं. देश परदेशात त्यांनी हजारो मैफली तसचं कार्यक्रम केले.

गाणं शिकण्यासाठी, काहीसा बावचळत, गोव्याहून मुंबईत आलेल्या छोट्या प्रभाकराचे सुरवातीचे काही दिवस अगदी चाचपडण्यात गेले. पण आपल्या तीनही गुरुवर्यां कडून निष्ठापूर्वक तालीम घेत, त्यांचं मार्गदर्शन घेत, गायनाच्या बळावर पंडित म्हणून जगभर प्रवास करता आल्या बद्दल आयुष्याच्या सायंकाळी प्रभाकर कारेकर यांनी तृप्तीची संतुष्टीची भावना व्यक्त केली होती. त्यांच्या गायन कारकिर्दीला कृतार्थतेचा जणू स्पर्श लाभला.


 नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

020620251710



 










 

टिप्पण्या

  1. प्रभाकर कार्येकर यांची प्रत्यक्ष गाणी ऐकायचे भाग्य अनेकदा लाभले. या बाबतीत नशीबवान आहे. उत्तम लेख

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक