स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

 


सुधीर स्वरलालित्य

योग आणि गुण 

यशोशिखरावर आरूढ व्हायचं असेल तर काही योग जुळून यावे लागतात तसच काही गुण व्यक्तिमत्त्वात असावे लागतात. योग म्हणाल, तर अगदी अजाण वयात गुण हेरू शकतील अशी मंडळी आसपास असणं, हेरलेले गुण विकसित व्हावे या साठी त्यांच्या कडून कृती होणं, उत्तम गुरू लाभणं, नियती आणि त्याबरोबरच दैवी कृपा लाभणं अशी यादी देता येईल आणि गुण म्हणाल तर गुरूनिष्ठा, तन्मयता, मेहनतीची तयारी, मन–बुद्धीची तरलता, अशा बाबी सांगता येतील. कोल्हापुरात 25 जुलै, 1919 साली जन्मलेल्या रामचंद्राच्या बाबतीत हे योग तसंच गुण, छान जुळून आले. दारावर येणाऱ्या बैराग्यांनी गायलेली भजनं, कवनं, गाणी यांची सही सही नक्कल अडीच तीन वर्षांचा राम करीत असे. त्याचं घराणं हे निस्सिम राष्ट्रभक्त. वडील व्यवसायानं वकील. कोल्हापुरातील टिळक असा नावलौकिक कमावलेला. छोट्या रामाची गायन कलेतली रुची आणि गती त्यांनी वेळीच हेरली.


(वडील)

सुदैव असं की त्याच्या दोन्ही मामांनीही त्याला गायन शिकवण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली आणि अवघ्या सहाव्या वर्षी या रामलल्लाला त्याचे वडील गानवासासाठी वामनराव पाध्येबुवां कडे पाठवते झाले. केवळ एकट्या रामा साठीच नव्हे तर ललितसंगीत पंढरीच्या समस्त यात्रेकरुंसाठी हा क्षण मोठा भाग्योदयाचा ठरला. आणखी एक योगायोग असा की रामाच्या मोठ्या भावाचे वर्गबंधू पंडितराव दांडेकर हे चांगले गायक होते आणि ते वामनराव पाध्ये यांचे शिष्य होते. त्यांनी काही चिजा, गाणी छोट्या रामचंद्राला शिकवली होती. रामाने पाध्ये बुवांना त्यातीलच काही प्रकार ऐकवले. बुवा खुश झाले. त्यांनी सरळ तिसऱ्या वर्गात रामाला दाखल करून घेतलं. वर्ष, दोन वर्षातच पुढचे दोन वर्ग आणि अगदी शेवटच्या वर्गासही ते रामचंद्राला बसवू लागले. बरं बुवांनी त्याला नुसतं गाणं शिकवलं असं नाही तर ते भरपूर ऐकवलं सुद्धा. गाणं शिकण्यासाठी उत्तम गुरु मिळणं हे जितकं महत्वाचं तितकंच उत्तम गाणं ऐकायला मिळणं आणि ते जाणिवेतून ऐकणं याला देखील चांगला कलाकार घडण्याच्या प्रक्रियेत अनन्य महत्त्व आहे. पाध्येबुवा हे मर्म जाणत होते वरच्या वर्गात बसवून चांगला कान घडवत असतानाच ते अधेमधे गायला लावून रामाचा गळा ही तयार करून घेत होते. रामाची ही एकप्रकारे आकस्मिक परीक्षाच असे. अशा जाणत्या घरंदाज सांगीतिक संस्कारांमुळे रामाचा आत्मविश्वासही बळकट झाला. तो स्वरधनुष्याची प्रत्यंचा ओढून सुरांच्या बाणाने रसिकांची हृदयं भेदण्यास नव्हे तर वेधण्यास सज्ज होऊ लागला. गुरू आज्ञेनुसार साधारण तीन वर्ष राम पाच ते नऊ असे चार तास न कंटाळता शिकवणीस उपस्थित रहात असे. आत्यंतिक तन्मयतेनं गुरुजींची शिकवणी त्यानी आत्मसात केली. वयाच्या बाराव्या वर्षीच अडीच तीन तासांच्या शास्त्रीय संगीताच्या बैठकीत ख्याल, तराणा अगदी आत्मविश्वासानं तो गाऊ लागला. 


(वामनराव पाध्ये, कोल्हापूर)

पुढील काळातही बालगंधर्व आणि हिराबाई बडोदेकर यांच्या संगीताच्या तबकड्या अगदी घासून जाई पर्यंत पुनःपुन्हा ऐकून त्यानी एकलव्या प्रमाणे या दोन्ही गुरूंची शागीर्दी केली. गाणं म्हटलं की ते तालासूरात तर हवंच तसंच या थोर मंडळींच्या गायना प्रमाणे भावना, लय, स्वर यांच वजन निभावल्या जाईल असं असलं पाहिजे. हाच ध्यास घेऊन रामानी समर्पक अभ्यास केला. एकूण काय तर गायक होण्यासाठी उत्तम पायाभरणी झाली. त्याकाळी नारायणराव बालगंधर्व यांच्या गायकीची तर इतकी हुबेहुब नक्कल त्यांना साधली होती की स्वतः बालगंधर्व यशोशिखरावर असताना त्यांच्या गाण्यांची ध्वनिमुद्रिका या रामाच्या आवाजात काढायला तेव्हाची ओरियन म्युझिक कंपनी तयार होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भक्त असलेल्या या कलाकाराचं, त्यांच्याच शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते' आपल्या गळ्यातून उतरलं पाहिजे असा त्याचा  अट्टाहास असे. अशा प्रेरणेनं गान तपश्चर्या केल्यामुळे की काय त्याच्या जीवनात आणखी एक योगायोग असा घडला की त्यांनी ज्यांची एकलव्या प्रमाणे शागिर्दी केली त्या दोन्ही दिग्गजां कडून आपल्या स्वतःच्या रचना ऐकवून, शिकवून गाऊन घेण्याचं भाग्य या रामाला लाभलं. एका अर्थी मानस गुरुंच क्षणकाळ गुरुपद अनुभवण्याचा दुर्मिळ योगायोग साधला गेला. हा रामचंद्र म्हणजेच आपणा सर्वांच्या हृदयस्थ असणारे महाराष्ट्राचे विशेष लाडके, अखिल भारतीय कीर्तीचे गायक, नट, संगीतकार आणि निर्माते सुधीर फडके उर्फ बाबूजी! 

संगीत सत्याची नांदी

उत्तम स्वरज्ञान, स्वरलेखन(नोटेशन) ही बाबूजींना परमेश्वरा कडून मिळालेली आणखी एक अलौकिक देणगी. उर्दूत याला फार छान शब्द आहे तो म्हणजे आमद. गाणं शिकायला सुरुवात करताच अवघ्या पांच सहा महिन्यातच त्यांना हा प्रसाद प्राप्त झाला. ते अवघे दहा वर्षांचे असताना कोल्हापूर इथे भरलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या अखिल भारतीय कॉन्फरन्स मध्ये विनायक बुआ पटवर्धन, ओंकारनाथ ठाकूर, नारायणराव व्यास आदी दिग्गज कलाकारां समोर पाध्ये बुवांनी, आपल्या या सर्वात लहान शिष्या कडून दिग्गज मंडळी जे काही गातील त्याचं नोटेशन गाण्याच यशस्वी प्रात्यक्षिक देऊन त्यांच्या वरचा विश्वास व्यक्त केला. परिस्थितीनुरूप त्यांना शास्त्रीय गायक होण्याचं लक्ष्य काही साधता आलं नाही. याची त्यांना खंत ही होती. पाध्येबुवां कडे गिरवलेल्या शास्त्रीय संगीताच्या धड्यां पैकी दुर्गा रागातली ‘ओ रसिया मै तो शरण तिहारी’ ही चीज त्यांच्या दीर्घ काळ स्मरणात राहिली. त्या लहान वयात गुरू कडून झालेल्या स्वर संस्कारांमुळे प्रतिथयश गायक, संगीतकार सुधीर फडके नामक ही सुरेल नांदी, सुवर्ण मोहत्सवी कारकीर्द गाजवून; बाबूजी अशी अदबशीर ओळख प्राप्त करती झाली आणि ‘मै तो शरण तिहारी’ याच भावनेची दाद स्वरभाव भक्तांकडून त्यांनी तहहयात आणि जीवन सीमापारही मिळवली.

नियतीचा फेरा

“एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे” मानवी जीवनाची यथार्थता मांडणारे हे काव्य महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी असा ज्यांचा गौरव केला जातो त्या ग.दी. माडगूळकर यांनी, अनेक काव्य शिल्पात आपल्या सुमधुर सात्विक स्वरांनी प्राण फुंकणारे अनन्य गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवन कथेवरून बेतले असावे असं कुणालाही वाटावं. आत्यंतिक खडतर संघर्ष करून बाबूजींनी संगीत तसंच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक कमावला. त्यांची सांगीतिक यशोवेल सुगंधी स्वरफुलांनी बहरली पण तिला दुःख, कष्ट, अवहेलनेच्या काजळी सावलीची पार्श्वभूमी होती. स्वतः सुधीर फडके यांची आणि त्याच्याहूनही अधिक, त्यांचे गुरू पाध्ये बुवांची इच्छा लक्षात घेतली तर ते शास्त्रीय संगीत गायक झाले असते. मात्र सुस्थितीत असलेल्या फडके यांच्या घराची गत त्यांच्या आईच्या असमायिक निधनानंतर बिकट झाली. या धक्यामुळे बाबूजींच्या वडिलांचं  वकिली व्यवसायात लक्ष लागेनासं झालं. त्यांनी वकिली सोडून दिली. घरी पांच भावंडं. कुटुंबाचं पोषण करणं कठीण होऊन गेलं. घरातील वस्तू विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली. लग्न झालेल्या मोठ्या भावाच्या अवघ्या 20 रुपये पगारात भर घालावी या उद्देशानं त्यांनी श्रीकृष्ण संगीत मेळ्यात गायक आणि गायन मास्तर अशी दुहेरी जबाबदारी घेतली. बासरी वादक दिनकर अमेंबल यांच्याशी त्यांची गाठ पडली आणि त्यांनी दहा रुपये मानधनावर दर महिन्याला एक गीत असा करार सुधीर फडके यांच्याशी केला. त्यानुसार फेब्रुवारी 1937 मध्ये बाबूजी प्रथम रेडिओ केंद्रावर गायले. त्यानंतर मुंबईत अक्षरशः पदपथावर झोपून, अन्नान दशेत दिवस काढले. प्रकृतीवर याचा साहजिकच विपरीत परिणाम झाला. ते क्षयरोगाच्या उंबरठ्यावर पोहचले म्हणून 1939 साली मुंबई सोडून गावोगावी जाऊन एकप्रकारे सुरांची भिक्षुकी सुरू केली. या भटकंती दरम्यान बिहार मध्ये गयेच्या मंदिरात त्यांचं गाणं झालं. तिथे देवाच्या गळ्यातला हार त्यांच्या गळ्यात घालण्यात आला. बाबूजींच्या गळ्यातल्या सुरांना जणुकाही कोमल, सुकुमार ईशतत्वाचा स्पर्श लाभला. तिथल्या महाराष्ट्र मंडळातही त्यांचं गाणं झालं. निवास व्यवस्था मंडळाच्या अध्यक्षांकडेच होती. हा मुक्काम प्रकृती बिघडल्याने थोडा वाढला. इथे पुन्हा नियतीचा प्रत्यय आला. दोन्ही ठिकाणी त्यांच्या गाण्याला उपस्थित असलेले भागवत नावाचे रेल्वेचे गार्ड तत्कालीन मुघलसराय विभागात नियुक्तीवर होते. अलीकडे मुघलसराय हे नाव बदलून ते पंडित दीनदयाळ उपाध्याय असं करण्यात आलं आहे. 

अद्वैत योग

वर्षभरातच म्हणजे 1940 साली, मराठी गानवेड्या रसिकांसाठी क्षण आला भाग्याचा असं म्हणावं अशी अलौकिक आनंदाचा चिरंतन स्रोत सुरू करणारी घटना घडली. ही घटना म्हणजे आपल्या अजोड शब्दकळेनी शेकडो अक्षर चित्रपट गीतं, भावगीतं लिहिणारे गदिमा आणि शब्दांना आशय, भावनेसह सूरात गुंफणाऱ्या आणि त्यातील काही आपल्या अवीट आवाजात गाणाऱ्या बाबूजींची भेट झाली. 

ही भेट केवळ दोन मूर्धन्य गुणवंतांचीच नव्हती तर ती सगुण आणि निर्गुण या दोन्ही विलक्षणांचं अद्वैत साधणारी होती. गदिमा यांचे सगुण साकार शब्द आणि बाबूजींचा निर्गुण निराकार सूर यांचं अद्वैत श्रोतृविठ्ठला समोर ठाकलं. गानपंढरीच्या वारकऱ्यांना जणू गेय विठ्ठलाचं साक्षात दर्शन घडलं. या दोघांची सिद्ध हस्तता चटकन लक्षात यावी असा एक किस्सा मी ऐकला आहे. ‘धुंद येथ मी स्वैर झोकतो’ हे गीत गदिमांनी बाबूजींच्या उपस्थितीत पुणे स्टेशन समोरच्या धर्मशाळेतल्या पारावर बसून लिहिलं. गाणं लिहिलेला कागद खिशात घेऊन बाबूजी मुंबईत आले. त्या गीतावर कुठलंही काम केलं नसताना, कार्यक्रम स्थळी जाता जाता एकवार त्यांनी त्या कागदावरून नजर फिरवली आणि लगेचच तिथे ते स्वरात वाचून दाखवलं. आज आपण ऐकतो तीच चाल त्या स्वरातल्या वाचनाची होती. एखादा शीघ्र कवी असावा तद्वतच ते शीघ्र रचिता(संगीतकार)होते. या अद्वैताच्या अलौकिक प्रतिभेचा अमृत वर्षाव श्रोत्यांनी अनुभवला तो गीत रामायणातून...

गीत रामायण पर्व

अनेकदा सरकारी विभागांच्या माथी सरकारी खातं अशी उपरोधिक टिकली बऱ्याच दादल्यां कडून सहजीच लावली जाते. मात्र सरकारी विभागांची सरसकट सर्वकाळ अशी अवहेलना करणं खरंतर योग्य नाही. कारण अनेकदा याच सरकारी विभागांकडून अगदी असामान्य कामगिरी घडत असते. याला आधार म्हणून स्वर,शब्द,संस्कृती यांचा मिलाफ करून आकाशवाणी च्या पुणे केंद्रानी सुजाण श्रोत्यांना बहाल केलेली गीत रामायण ही त्रिगुणी मात्रा. 

साठी उलटून गेली तरी या चीरयौवन कलाकृतीचं सुशील, सुभग लावण्य तसूभरही कमी झालेलं नाही. आकाशवाणी पुणे इथे कार्यरत असलेले तत्कालीन केंद्र संचालक सीताकांत लाड यांची नैतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाची संकल्पना शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू सुधीर फडके यांनी अत्यंत लाडानं प्रत्यक्षात उतरवली. अतिशय दर्जेदार कार्यक्रम सादर करणारे आणि उत्तम कार्यक्रमासाठी आग्रही असणारे अधिकारी अशी लाडांची ख्याती होती. पहाटफेरी दरम्यान त्यांनी गदिमा यांच्या कडे अशी कल्पना मांडली की सलग वर्षभर एकाच विषयावरचा पण श्रोत्यांची उत्कंठा सतत कायम राखणारा कार्यक्रम करावा. या संकल्पनेतूनच, रामकथा गीत स्वरूपात 52 आठवडे करण्याचं नियोजन झालं. गीतांची जबाबदारी गदिमा यांच्याकडे म्हटल्यावर संगीताची जबाबदारी सुधीर फडके यांच्या कडे येणं हे जणू क्रमप्राप्तच होतं. बाबूजी आणि गदिमा हे अद्वैत होतं. कुणाही एका व्यक्तिमत्त्वाचं वर्णन दुसऱ्याच्या उल्लेख शिवाय अपूर्ण आहे. 1 एप्रिल 1955, शुक्रवारी रामनवमीला दर आठवड्याला एक या प्रमाणे 52 गीतांची लाईव्ह मालिका सुरू झाली मात्र मराठी पंचांगा प्रमाणे अधिकमास आल्यानं अधिक चार गीतांचं अमूल्य वाण श्रोत्यांना मिळालं. आकाशवाणी पुणे केंद्रावरून वर्षभर प्रसारित झालेलं गीत रामायण म्हणजे शिवधनुष्य पेलण्या सारखं दिव्य होतं. इथे गीतधनुष्य, संगीतधनुष्य आणि गानधनुष्य अश्या तिन्ही धनुष्यांवर प्रत्यंचा रोखून लक्षभेद नव्हे तर लक्षवेध करण्याचं आव्हान होतं. गजाननाच्या शब्दांनी आणि रामचंद्रांच्या(सुधीर फडके) स्वरांनी सितकांतांची(म्हणजे राम) ही कल्पना आकाशवाणीच्या सेनेनी उत्तमरीत्या अमलात आणली. "ही अजोड निर्मिती आम्ही केली असं म्हणण्याची पेक्षा ती आमच्या कडून करवून घेतल्या गेली" अशी भावना स्वतः बाबूजींनी एके ठिकाणी मांडलेली मी ऐकली आहे. रामकथेच्या या काव्यगीत स्वरुपानं गदिमा आणि बाबुजींना दिगंत कीर्ती मिळवून दिली आणि हनुमंता प्रमाणेच ते चिरंजीव झाले. 

कुमारांना आत्म्याचं दर्शन

कुमार गंधर्व जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आले होते तेव्हा त्यांचा मुक्काम पु ल देशपांडे यांच्याकडे होता. बाबूजीही त्यांच्या भेटीसाठी गेले. त्यावेळी बाबूजींच्या अनेक चाली लोकप्रिय झालेल्या होत्या. सुनीता बाईंच्या आग्रहावरून त्यांनी काही चाली कुमारजींना ऐकवल्या. त्यावर चाली चांगल्या आहेत पण त्यात आत्मा नाही असा अभिप्राय कुमारांनी दिला. साहजिकच त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्यासाठी बाबूजींनी जवळ जवळ त्यांच्या मागे लकडा लावला पण कुमारजींनी काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर बरेच वर्षांनी इंदौरला सुधीर फडके यांचं गाणं होत. कुमार त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बराच वेळ त्यांनी गाणं ऐकलं आणि नंतर भावपूर्ण गाणं कसं गावं ते सुधीर फडके यांच्याकडून शिकावं असं ते अनेकांना सांगत असतं. त्यानंतर देवासला घराच्या गणपतीत गाण्याचं निमंत्रण देण्यासाठी कुमाराजी फडके यांच्या घरी आले आणि होकार मिळे पर्यंत हलणार नाही असं त्यांनी सांगितलं. साहजिकच सुधीर फडके गाण्यासाठी देवासला गेले. त्यावेळी गाणं झाल्यानंतर कुमार यांनी बाबूजींना जी काही मिठी मारली त्यावरून आपल्या गाण्यात अन्य काही असो नसो मात्र आवश्यक तो आत्मा निश्चित असतो आणि तो कुमारजींनी अनुभवला असा आत्मविश्वास दृढ झाल्याचं बाबूजींनी दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं. 

सुधीर तन्मयता

सुरेलता आणि समर्पण हे बाबूजींच्या जीवन रागाचे वादी–संवादी स्वर होते. गीतकार, कवी यांच्या रचनांच्या अर्थ गाभाऱ्यात प्रवेश केल्या शिवाय अजर चाल संगीतकाराला मुळी दर्शनच देत नाही. असं त्यांचं मत होतं. स्वतः ते कटाक्षानं ह्या बाबी आचरणात आणीत. त्यांनी पोटासाठी म्हणून साधारण तीन वर्ष उत्तर भारतात पूर्व प्रांतात जी भटकंती केली त्यावेळी पंजाबी, लखनवी ढंग, पूर्व भारतातील प्रकार असे बहुविध सांगीतिक संस्कारांच बीज नकळत त्यांच्या मनात रुजलं. प्रसंगानुरूप, भावानुकुल चाली तसंच तन्मयता हे त्यांच्या सृजनाचं व्यवच्छेदक लक्षण होतं. सहज बसल्या बसल्या चाल सुचली किंवा एखादं काव्य वाचून चाल सुचली असं अपल्या बाबतीत फारसं कधी घडलं नाही असंही ते सांगतात. त्यांनी मुख्यत्वे चित्रपटांसाठी म्हणजेच प्रसंगावर आधारित गीतांसाठी चाली बांधल्या. यासाठी संगीतकाराला कविता तर उत्तम कळायलाच लागते; त्यातील शब्द, स्वर, व्यंजन वगैरे, पण त्याच बरोबरीनं नाट्यांश ही कळवा लागतो. अन्यथा नाट्याला आवश्यक जी लय आहे तिचा साक्षात्कार त्याला होत नाही. काहीवेळा संगीतकारांच्या चाली चतुर असतात; म्हणजेच उथळ अर्थानं आकर्षक असतात. सुधीर फडके यांच्या रचना अनेक वर्षे उलटून गेली तरी तितक्याच आकर्षक आणि ताजातवान्या वाटतात अशा शब्दात पु. ल. देशपांडे यांनी बाबूजींचा सार्थ गौरव केला होता. एखाद्या काव्याला चालीत बसवताना संगीतकारांनी शब्दार्थाच्या प्राणाला हात घातलेला नसतो. बाबूजींच्या चाली ऐकताना त्यांनी अर्थाच्या गाभ्याला स्पर्श केल्याचं प्रकर्षानं जाणवतं.

1946 साल सुरू होता होता चित्रपट संगीताच्या प्रांतात बाबूजींचा प्रवेश झाला. त्यावेळी प्रभात चित्र कंपनीला संगीत दिग्दर्शकाची आवश्यकता होती. दिग्दर्शक यशवंत पेटकर यांच्या सौजन्यानं प्रभातच्या मालकांची आणि बाबूजींची भेट घडून आली. प्रभातनी त्यांना गोकुल या हिंदी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपविली. 

त्या पाठोपाठ आगे बढो, अपराधी असे आणखी दोन हिंदी चित्रपटांचं संगीत केल्या नंतर वंदे मातरम् या चित्रपटानी बाबूजी मराठी चित्रसृष्टीत अवतरले.

संगीताच्या बाबतीत ते परिपूर्णतवादी होते. एखादी चाल बांधल्यानंतरही ते त्यावर विचार करत असत. केलेली चाल योग्य आहे ना? शब्दांच्या अर्थाला, आशयाला, व्यक्तिमत्वाला ती शोभून दिसते की नाही? वगैरे. जर त्याचं समाधान झालं नाही तर ते पेटी(Harmonium) वरून हात फिरवित असत, म्हणजे केलेली चाल पुसून टाकली आणि पुन्हा नव्यानं चाल बांधायला घेत. ते सूराला अत्यंत पक्के होते. वादक मंडळीतल्या कुणा एखाद्याच वाद्य सूरात लागलं नसेल तर ते बाबूजींच्या तत्काळ लक्षात यायचं. या संदर्भात त्यांनी संगीत दिलेल्या आणि लता दीदींनी गायलेल्या हिंदी तसच मराठीत प्रचंड गाजलेल्या पहाट गीताचा किस्सा मी ऐकला आहे. लता बाई गात होत्या. मात्र बाबूजी अस्वस्थ होते. वाद्यवृंदात जी काही व्हायोलिन्स वाजत होती त्यातलं एक सूरात नीट लागलं नव्हतं. सूरातली सुतभर गल्लत ही पकडण्यात वाकबदार असलेल्या त्यांच्या कानांना हे खटकलं. त्यांनी लतादीदींच रेकॉर्डिंग थांबवून प्रथम सर्व वाद्य पुन्हा एकदा सूरात जुळवून घेतली.

त्यांच्या परिपूर्णते बाबतचा आणखी एक आठवण. बायपास शस्त्रक्रिये नंतर त्यांच्या श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम झाला होता. त्या सुमारास दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या सुपरिचित निर्मात्या डॉक्टर किरण चित्रे बाबूजीं वर आरोही या कार्यक्रमाची निर्मिती करत होत्या. दोन दिवसात पाच गाणी असं काहीसं नियोजन होतं. मात्र चार दिवस उलटले तरी काम अपूर्णच. कारण प्रत्येक गाण्यात काही काही सूर योग्य लागले नाहीत म्हणून बाबूजी पुनःपुन्हा ध्वनिमुद्रण करायला सांगत होते. खरं पाहता त्या उतार वयात त्यांना स्वतःला सिद्ध करण्याचं काही दडपण नव्हतं पण परिपूर्णतेच्या ध्यासापायी ते त्या वयात ही स्वतःचा अपवाद करत नव्हते. किरण ताईंनी स्वतः मला हा किस्सा कळवला. उत्तमाच्या अशा  आग्रहा मुळेच चीरयौवनाचं वरदान लाभलेलं 'ज्योती कलश छलके' हे गीत आजही श्रोत्यांची पहाट सुरम्य करण्यात यशस्वी आहे. 

ओतप्रोत देशभक्ती 

बाबूजींच्या गळ्यात जसे ओजस्वी सूर होते तसेच मनात प्रखर देशभक्तीचा पूर होता. आपल्या अवीट संगीत रचना आणि साजूक सुरेल घरंदाज सुरांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या या संगीतकारांनी प्रसंगी बंदूककारी ने शत्रुलाही घायाळ करण्याची बेदरकारी प्रत्यक्ष करून दाखविली आहे. केवळ गवय्येगिरीतच नाही तर लढवय्येगिरीत ही त्यांनी चमकदार कामगिरी करून आघाडी सांभाळली होती. त्यांची स्वर जाणीव जितकी तीव्र होती तितकीच सामाजिक आणि राजकीय जाणीव ही धारदार होती. सावरकर यांच्याप्रती त्यांना असलेल्या अतीव श्रद्धाभावनेतून त्यांची ही जाणीव निर्माण झाली असावी. भारताला योग्य ते स्थान मिळवून देऊ शकणारी जर कुणी व्यक्ती असेल तर ती सावरकर होती असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. त्यांच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावामुळे  दादरा नगर हवेली च्या सशस्त्र मुक्ती संग्रामात आपण सक्रिय सहभागी झाल्याचं त्यांनी दूरदर्शनवर झालेल्या कार्यक्रमात स्पष्टपणे म्हटलं आहे. 

त्यानंतर ही गोव्याचे स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे आणि डॉक्टर मस्करेन्स यांना गोवा स्वंतत्र होण्यापूर्वी पोर्तुगालच्या तुरुंगात डांबलं होतं. पुढे गोवा स्वतंत्र झाला. पोर्तूगालचे हजारो सैनिक, अधिकारी जे भारतानं पकडले होते ते सोडण्यात आले. त्याआधी भारतीय देशभक्त स्वातंत्र्य सैनिक सोडून देण्याची प्रक्रिया होणं गरजेचं होतं मात्र दुर्दैवानं ते झालं नाही. हे कार्य कोणीतरी केलं पाहिजे तर मग मीच का नाही म्हणून प्रयत्न सुरू केले असंही बाबूजींनी त्या मुलाखतीत सांगितलं. त्यांच्या सुटकेसाठी समिती गठीत केल्या गेल्या. त्याला देशभरातून भरघोस पाठिंबाही मिळाला. फडके स्वतः इंग्लंडला जाऊन तिथेही समिती स्थापन केली आणि तेथील वकील अत अमनेस्टी इंटरनॅशनल इंटरनॅशनल, आणि अन्य देशांच्या सहकार्याने इप्सित कार्य साध्य केलं. यासंदर्भात बाबासाहेब पुरंदरे यांनी बाबूजींच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू सांगितला. हल्ला करण्यापूर्वी साधारण अर्धातास आधी सुधीर फडके यांच्या हातात व्हायोलिनची पेटी पाहून बाबासाहेबाना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं या ठिकाणी ह्याचं काय काम? हा काय संगीताचा कार्यक्रम आहे? तेव्हा बाबूजींनी त्यांना केस उघडुन दाखवत सांगितलं की हो हा रौद्र संगीताचा कार्यक्रम आहे. त्या केस मध्ये LMG लाईट मशीन गन होती. सांगीतिक जाणिवेतून गीतरामायणाचे जसे सुमारे 1800 कार्यक्रम परदेशी केले तसच जागरूक नागरिकाच्या जाणिवेतून देशकार्य करण्यासाठीही देश परदेशात दौरे करणारा हा कलाकार विरळाच म्हटला पाहिजे.

बायपास शस्त्रक्रियेनंतर जंतू संसर्ग झाल्यानं बाबूजींना जी प्रतिजैविक घ्यावी लागली त्यामुळे फ्रीक्वेन्सी जाणण्याची कानाची शक्तीच गेली. त्यांच्या सारख्या सुरेल गायकाला बेसूर स्वर ओळखण ही अशक्य झालं. होमिओपॅथी उपचारांनी त्यात थोडी सुधारणा झाली. तेव्हा सूर, ताल आणि संगीत यावरच अवघं आयुष्य तोलणाऱ्या ह्या गानासक्त कलाकारानी निजधामी परतण्यापूर्वी एकदाच श्रोत्यांना उत्तम गाणं ऐकवता येऊ दे हेच साकडं परमेश्वरा कडे घालून आपली सूरनिष्ठा प्रमाणित केली. 


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

260520251525



 





















टिप्पण्या

  1. वाह वाह, बाबूजी म्हणजे समस्त महाराष्ट्राला वेड लावलेले व्यक्तिमत्व. ते आणि गदिमा ह्या जोडीने कमीतकमी 3 पिढ्यांना त्यांच्या गाण्यांवर अक्षरशः डोलायला लावले. अशा दिग्गज बाबूजींवर तुम्ही एक अप्रतिम लेख लिहिलात, लेख खूप आवडला. कायम संग्रही ठेवण्यासारखा हा लेख आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक