स्मृतीबनातून–आ अब लौट चले...
या चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमलाच सुरांची साखर पेरणी झाली आहे. ‘मेरा नाम राजू घराना अनाम’...हे शीर्षक गीतही नाही. चित्रपटाचा नायक राजूची(राज कपूर)व्यक्तिरेखा, आणि चित्रपटाची थीम सुरांच्या साथीनं अत्यंत प्रभावीरीत्या प्रेक्षकां समोर मांडलेली आहे. चंबळच्या खोऱ्यात हिंसक लुटमार करणारी डाकूंची टोळी; समाजाच्या मुख्य धारेत कशी आणली जाते याचं कथाचित्र, हा या चित्रपटाचा आत्मा. 1961 ला आलेला हा चित्रपट सर्वोदय चळवळी पासून प्रेरणा घेऊन राजकपूरनी निर्मित केला होता. या चित्रपटात क्लायमेक्सला येणारं गीत चंबळ खोऱ्यातल्या दास्यूंना शस्त्रत्याग करून समाजाच्या मुख्य धारेत मिसळण्याचं आवाहन करणारं आहे.
राजकपूरनी या चित्रपटाची कथा जेव्हा शैलेंद्र, हसरत जयपुरी, मुकेश आणि शंकर जयकिसन यांना ऐकवली तेव्हा डाकू, लुटालुट, हिंसा अशी सगळी कथावस्तू असलेल्या या चित्रपटाची कथा आपल्याला का ऐकवली जाते आहे? सरळ गाणं विरहित चित्रपट करावा असच शंकर यांचं मत झालं. यात सूर, संगीत, गाणी यांचा शिरकाव कितीसा; कुठून होणार? आणि झाला तरी त्यांना कितपत थारा मिळणार? असा प्रश्न स्वाभाविकपणे शंकर यांना पडला होता. स्वाभाविकच आहे, प्रसंग असो नसो प्रेक्षकांची मागणी या नावाखाली, उत्तमते बाबत जराही आग्रही न राहता उत्तान आयटम साँग घुसवण्याचा प्रकार आज सारखा बोकाळला नव्हता. सौंदर्याचा स्पर्श नसेल तर उत्तानता बीभत्सच वाटते. पण सौंदर्यदृष्टी आणि संगीताची नैसर्गिक जाण लाभलेला राज कपूर हा चित्रपट हाताळणार होता. तेव्हा डाकूंवरच्या या कथेत निव्वळ बंदुका, लाठ्या काठ्या नसणार, तर डफ, सितार, व्हायोलिन, नृत्य यांचा समावेश करून सूर आणि सुरूपतेच मायाजाल राज अगदी सहजभावानं निर्माण करणार हे कविराज शैलेंद्र जाणून होता. त्याने शंकरना समजावले. सर्वांनी बसून गीतांच्या जागा हेरल्या आणि कथेशी सुसंगत तब्बल नऊ गाण्यांची स्वरगंगा चित्रपटातून अवतरली. त्यातील आठ स्वतः शैलेंद्र तर एक हसरत जयपुरींच्या लेखणीतून उतरलेलं. आज 65 वर्ष उलटून गेली तरी या गीतांच्या मोहमयी विळख्यात रसिक आजही आनंदाची अनुभूती घेत आहेत.
चित्रपटाची सुरवात जशी सुरीली आहे तसाच समारोपही एका अत्यंत भावूक गाण्यानी होतो. आ अब लौट चले...हे ते अभूतपूर्व गीत.
ऐका–आ अब लौट चले
आजही रसिकांच्या ते ओठांवर आहे. मुकेश, लता आणि सहगायकांच्या आवाजातल्या या अप्रतिम गीताचं वैशिष्ट्य म्हणजे 60 कोरस गायक, 60 व्हायोलिन, 12 सेलोस वाद्य, 4 डबल बास, 2 मैंडोलिन, 12 रिदम-सेक्शन, 2 सितार, 10 ब्रास ट्रमफेट, 6 साइड रिदम असा भारी भरकम वाद्यवृंद (Orchastra) यासाठी योजलेला होता. इतका मोठा ऑर्केस्ट्रा असलेलं हे आजवरच कदाचित एकमेव गाणं असावं. साठच्या दशकात ध्वनिमुद्रणासाठी आजच्या सारखे ट्रॅक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. गायक, वादक माईक सभोवती येत त्यातला एक जरी चुकला तर पुन्हा सुरवाती पासून सर्व ध्वनिमुद्रण करावं लागत असे. इथे तर अजस्त्र ताफा होता. सगळे बसू शकतील एवढी जागा देखील नव्हती. पण सृजनासाठी सर्वच झपाटलेले होते.
शेवटी तिथली एक भिंत हटवून जागा केली गेली अशी आठवण नितीन मुकेशनी एका कार्यक्रमाच्या वेळी सांगितली होती. या गीता संबंधी आणखी एक रंजक माहिती वाचनात आली. प्रचलित गीतात जी दोन कडवी आहेत त्या व्यतिरिक्त आणखी एक कडवं आहे. सिलोन रेडिओ वरून ऑगस्ट 1995 साली झालेल्या कार्यक्रमात कुणी रसिकानी ते ऐकलं आणि टिपून ठेवलं.
"जिस मिट्टी ने जनम दिया है
गोद खिलाया प्यार दिया है
तू जिस मिट्टी को भूल गया है
आज उसी ने याद किया है
आ अब लौट चले"...
गायकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मुकेश यांच्या गळ्याला निश्चित काही मर्यादा होत्या हे जरी मान्य केलं तरी त्याचा आवाज अद्वितीय होता हे ही तितकेच खरं. निष्पापता, भाबडेपण, वेदना त्याच्या स्वरात उपजतच होती; गाण्यात ती कृत्रिमरीत्या मिसळवावी लागत नसे. त्याच्या गळ्यातून निघणारा सूर गीतातल्या शब्दांच्या भावना जणू काही जिवंत करीत असे त्यामुळे गीतकाराच्या शब्दांची, संगीतकाराच्या स्वरावलीची परिणामकारकता श्रोत्यांच्या हृदयाला अधिक भिडत असे. हे सगळ कमी म्हणून की काय फक्त तीन शब्द; उणीपुरी एक ओळ देखील वाट्याला आलेली नसताना, केवळ आपल्या अशक्य गगनभेदी आलापीनं लतादीदींनी या गीताला अद्भुत श्रेणीत नेऊन ठेवलं. ध्वनिमुद्रक मिनू कात्रक यांनी गायक, वादक यांची एव्हडी प्रचंड मोठी सर्कस सांभाळून वन टेक रेकॉर्डिंग साधलं. ध्वनीरचना सबेस्टियन आणि दत्ताराम वाडकर यांची होती. आज तंत्रज्ञानात कितीतरी प्रगती झाली आहे. ट्रॅक रेकॉर्डिंगची सोय आहे. पण साठच्या दशकात सहा माईक वर एव्हढ्या मोठा वाद्यवृंद, गायक आणि सहगायकांचा मेळ बसवून अशी अद्भुत, अनमोल कामगिरी करणाऱ्या राज कपूर आणि चमूसाठी सर्व संगीतप्रेमींच्या हृदयात ‘नैन बिछाए बाहें पसारे, तुझको सराहे देश तेरा’ अशीच भावना राहणार.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
08092025
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा