स्मृतीबनातून: कंठमती सूर मालिनी
‘कंठी कौस्तुभ मणी विराजित’
कंठमती सूर मालिनी : कलाकार नव्हे कलोपासक
आजच्या सारखं ग्लॅमरस शाळांचं पेव फुटलं नसतानाच्या काळात, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण मराठी शाळेत जाणारी मुलं साधारणतः प्राथमिक शाळेत असतानाच पाठ करायची आणि पुढे समाजात वावरत असताना त्या म्हणीचा अर्थ नीट समजायला लागायचा. नागपूर, मुंबई, पुणे अशा शहरांत बव्हंशी काळ घालवलेल्या माझ्या आयुष्यात, नुकत्याच संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात क्वचित घडावा असा योगायोग प्रथमच घडून आला. या डिसेंबर महिन्यात(2024) वाराणसी, आग्रा, गोकुळ, वृंदावन आणि खरगोन (मध्यप्रदेश) प्रवासाच्या निमित्तानं, गंगा, यमुना आणि नर्मदा या तीनही पुण्यपावन नद्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. या तीनही नद्यांच्या शांत, विस्तीर्ण पात्रांकडे बघताना मनातील उथळ खळखळाट निवून जाऊन एकप्रकारचा शांतभाव आपोआप उगम पावतो.
सेवा निवृत्तीच्या महिन्यात जुळून आलेला हा योग विशेष होता. या पार्श्वभुमीवर नवीन वर्षाची आणि आयुष्याच्या नव्या आवृत्तीची सुरुवात झाली ती भाग्यनगर संस्कृती संमेलनाच्या निमित्तानं हैद्राबाद प्रवासानी.
आता हैद्राबाद हे नाव घेताच चटकन आठवतात ते सलारगंज संग्रहालय, चारमिनार, भाग्यलक्ष्मी मंदिर, कलचर्ड मोती, हुसेन सागर, कराची बेकरी, पुथरेकुलू पेपर रॅप मिठाई(Putharekulu) आणि संगीत प्रेमींसाठी जहागीरदार वाडा आणि आता बरकतपुरा…करणं इथेच ग्वाल्हेर घराण्याची सुरेल जहागिरी अधिक बरकत पावली ती मालिनी ताई राजूरकर यांच्या गायनानं. पण गंगा, यमुना, नर्मदेच्या पात्रां प्रमाणेच मालिनी ताईंची पात्रता सखोल असल्यानं कधीही खळखळाट ऐकू आला नाही.
कारकीर्द
मालिनी ताई या पूर्वाश्रमीच्या प्रभा वैद्य. आई,वडील, काका यांच्याकडून त्यांच्यात अगदी लहानपणा पासून; म्हणजे वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षा पासूनच गायनाचे बीज रुजले. अजमेरच्या संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य पं. गोविंदराव राजूरकर यांच्याकडे त्यांची तालीम ही सुरू झाली. पुढे ही अजमेरी प्रभा, ग्वाल्हेर इथे पं वसंतराव राजूरकर (गोविंदराव यांचे पुतणे) यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे पाठ गिरवून संगीताच्या या आद्य घराण्याची राजवैद्य झाली. हैद्राबाद इथे नव्यानं स्थापन झालेल्या सरकारी संगीत महाविद्यालयात शिक्षक म्हणून पं. वसंतरावांची नियुक्ती झाली. पाठोपाठ लग्न योग ही जुळून आला. त्यांच्याकडे गायन शिकता शिकता त्यांचे आणि प्रभा वैद्य यांचे सूर असे काही जुळले की कुमारी प्रभा वैद्य, सौ. मालिनी राजूरकर झाल्या. संगीत पाठांबरोबर हैद्राबाद इथे संसार पाट ही सुरू झाला. जहागीरदार वाडा सुरेल सूरमयी झाला. इथेच त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ही झाला. पती आणि गुरू पंडित वसंतराव राजूरकर यांनी त्यांना लग्नानंतरही गाणं न सोडण्याची मुळी प्रेमपूर्वक अट घातली होती. ताईंनी गायला हवं यासाठी ते फार आग्रही असत. एकदा ताई गात नाहीत म्हणून त्यांनी चार दिवस उपवास सोसला होता. एकप्रकारे पती पं. वसंतराव यांच्या आग्रहाखातर कारकीर्द करण्यासाठी त्यांनी गाण्याचा प्रांत निवडला अन्यथा त्या कदाचित गणितज्ञ झाल्या असत्या. गणित विषयाच्या त्या पदवीधर होत्या, चार पांच वर्ष गणिताच अध्यापन कार्य ही त्यांनी केलं आणि सुगृहिणी तर त्या प्राधान्यानं होत्याच. सुलतान बाजारात पायी जाऊन भाजी आणणं किंवा पिठाच्या गिरणीवरून पीठ आणणं, अशी हल्ली सामान्य गृहिणी न करणारी कामं, ही सूर विदुषी अगदी सहज भावानं करीत असे. यशस्वी स्त्री गायिके मागे पुरुष उभा असलेल्या सुमन कल्याणपूर, वाणी जयराम, माणिक वर्मा या यादीत विदुषी मालिनी ताई हे आणखी एक उदाहरण. विमल नाट्य समाजाच्या संगीत संशय कल्लोळच्या नायिका रेवतीची भूमिकाही मालिनी ताईंनी गाजवली. वद जाऊ कुणाला शरण आणि पांडू नृपती अशा दोन नाट्यगीतांची ध्वनिमुद्रिका ही निघाली.
रागदारी संगीत ही जरी सर्व गायन प्रकारांची जननी असली तरी, नाट्यगीत, भावगीत, भक्तीगीत, ठुमरी, गझल या सर्व गायनविधांचा आपला स्वतःचा असा एक बाज असतो आणि त्यासाठी गळा तयार करण्यासाठी वेगवेगळी मेहनत आवश्यक असते. असा अतिरिक्त वेळ काढता येईल यासाठी त्यांचं व्यक्तिमत्त्व, जबाबदाऱ्या, परिस्थिती अनुकूल नव्हती. केवळ मैफिलीसाठी काहीतरी अर्धवट तयारीच गाण्यापेक्षा, रियाजानी साध्य झालेले सकस तेच गायचं अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळेच त्या ग्वाल्हेर घराण्याच्या अष्टांग गायकीचे दर्शन प्रामुख्यानं मैफिलीतून श्रोत्यांना घडवीत असत. आलाप, बोल आलाप, गमक, मिंड, मुरकी, खटके, बोलताना आणि लयकारी यांचा अष्टांग गायकीत अंतर्भाव होतो. सुस्पष्ट शब्दोच्चार, खुला आवाज, दाणेदार तानकाम, सुरेल तान ही ताईंची बलस्थानं होती. टप्पा, तराना गाताना त्यांचा गळा चपलेच्या(वीज) चपळतेशी जणू स्पर्धा करायचा. परमेश्वरी, बिलासखानी तोडी, शंकरा, किरवानी, सालगवराळी या सारखे गायिकें कडून क्वचित गायले जाणारे रागही मलिनीताईंच्या मैफिलीत स्थान मिळवीत. जहागीरदार वाड्यातल्या पहिल्या मैफिली नंतर त्या शात्रीय संगीताचा सुकाळ असलेल्या कर्नाटकात पोहचल्या. गंगुबाई हंगल यांच्या कानावर त्यांची कीर्ती गेली. त्यांनी मालिनी ताईंना हुबळीला गाण्यासाठी निमंत्रण तर दिलंच शिवाय पंडित भीमसेन जोशी यांना ही त्यांचं नाव सुचवलं आणि 1966 साली त्यांचं पुण्यात पहिल्यांदा सवाई गंधर्व महोत्सवात गाणं झालं. त्यांनी ग्वाल्हेर इथे होणारा तानसेन समारोह, दिल्लीत शंकरलाल महोत्सव, मुंबईत गुणीदास संमेलन पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अश्या नावाजलेल्या आयोजनातुन आपलं गायन सादर केलं. त्यामुळे हैद्राबाद बाहेर मुंबई, पुणे, नागपूर, ग्वाल्हेर, वडोदरा, अमृतसर सह देशभर त्यांचा श्रोतृवर्ग पसरला होता. त्या जरी ख्याल, ठुमरी, टप्पा आदी गायन प्रकार विशेषत्वानं गात असल्या तरी सुगम संगीता बद्दलही त्यांना आकर्षण होतं.
टप्पा
पंजाबी टप्पा म्हणजे खरं तर गायक/गायिकेची कसोटी लावणारा गायन प्रकार. पंजाबच्या गुलाम नबी नामक गवय्यानं टप्पा गायन शैली निर्माण केली. ते शौरी मिया या टोपण नावाने टप्पे रचत. हे विशेषत्वाने शृंगारिक लोककाव्य असून, उंट पाळणाऱ्या समूहाशी त्याचा संबंध आहे. यात छोटे छोटे वर्णालंकार लहान पण द्रुतगती तान कामाच्या साह्यानं सादर केल्या जातात. यासाठी स्वतंत्र रियाज अनिवार्य असतो. बंदिशीचे बोल आणि ताल यांच्या सौंदर्यपूर्ण योग्य संतुलनातून टप्पा साधला जाऊ शकतो. या गायन प्रकारासाठी गुरूच मार्गदर्शन अत्यावश्यक आहे असं मालिनी ताईंच आवर्जून सांगत. अश्या या चपळ गतीमान टप्पा या गायन प्रकारात मालिनी ताईंनी एक विलक्षण आगळाच उंच टप्पा गाठला होता. टप्पा सादर करण्यासाठी कंठमती असणं गरजेचं आहे. गळा आणि बुद्धी या दोन्हींचा उत्कृष्ट मेळ साधला तरच सुरेख टप्पा साध्य होतो. टप्पा प्रकार शिकत असताना आत्यंतिक कंटाळवाणं व्हायचं कारण गुरुजी एकच तुकडा तासंतास गिरवायला लावत पण पुढे जाऊन त्याच महत्व उमजलं असं त्या प्रांजळ पाने सांगत. प्रभूकृपेला मेहनतीची जोड देऊन ताईंनी टप्प्याला गळ्यातला ताईत बनवून संगीत कलाविश्र्वात निःसंशय निगर्विपणे ताईगीरी केली. ‘कंठी कौस्तुभ मणी विराजित’ असच त्यांचं वर्णन सार्थ ठरेल. साधारण जास्तीतजास्त 10 मिनिटां पर्यंत गायला जाणाऱ्या ह्या प्रकाराची मांडणी, आपल्या कलाविचाराच्या जोरावर दुप्पट कालावधी पर्यंत त्या करत असत. विलयाकडे मार्गक्रमणा करणाऱ्या टप्प्याला अश्या प्रयोगशील मांडणीतून त्यांनी पुनरुज्जीवित केलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये.
वैचारिक भूमिका
मालिनी ताई या केवळ शास्त्रीय गायिका होत्या असं नाही तर त्यांच्या कडे स्वतःचे असे विचार होते. विचक्षण कलाकार असूनही त्यांनी स्वतःला कधीच कलाकार मानलं नाही किंबहुना एका विशिष्ट अर्थानं कलाकार होण्यासाठीची पात्रताच नसल्याची आणि त्या अर्थानं कलाकार म्हणून जगूच शकणार नाही अशी त्यांची पक्की धारणा होती. हा विचार ज्या मुलाखतीत ताईंनी मांडला ती मुलाखत ऐकली तर, हे आपलं काहीतरी उगीच, असा विचार कुणाच्या मनात येईलही पण शास्त्रीय संगीता सारख्या अभिजात कलेनं ज्यांना प्रेमपूर्वक घट्ट कवटाळलं होतं अशा दिग्गज कलावंता कडून असे विचार व्यक्त होतात तेव्हा ते मानभावीपणा पासून अस्पर्श असतात हे वेगळं नमूद करण्याची खरंतर गरजच नाही. हा लेख लिहिण्यासाठी श्रवण वाचन करताना असं लक्षात आलं की त्या खरंच कलाकार नव्हत्या. मालिनीताई संगीत कलोपासक होत्या. त्यांनी संगीत साधना केली. कर्तृत्वाची झळाळी लाभलेलं साधेपण आणि निर्व्याज माणूसपण, हे त्यांच्या जीवन रागाचे वादी-संवादी स्वर होते असं म्हणता येईल. चांगलं मनुष्य म्हणून घडण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की “मी सामान्य आहे. अनेक अडचणीतून, त्रासातून काहीतरी शिकत आली आहे. आयुष्यात मी कधीही पुढे येण्याचा प्रयत्न केला नाही कारण ते माझं कधीच ध्येय नव्हतं” त्याच बरोबर, “माझं गाणं लोकांना आवडत नसेल तर मलाही स्टेजवर बसण्यात जराही रस नाही” अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली होती. त्यांच्या पुढे माणिक वर्मा, हिराबाई बडोदेकर यांचा आदर्श होता. स्वराची पारदर्शकता माणसाच्या पारदर्शकतेशी निगडित असते असं त्यांचं म्हणणं होतं. पुरस्कारां पासून त्यांनी स्वतःला काळजी पूर्वक दूर ठेवलं होतं. त्यांना ते खरोखरीच मनापासून नको असत असं त्यांच्या निकटवर्तीयां कडून कळलं आहे. संगतकारांना त्या नेहमीच सहकलाकार मानत. त्यांच्या शिवाय गाणं होऊ शकत नाही. ते ही कलाकारच असतात त्यामुळे त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे यासाठी त्या नेहमीच आग्रही राहिल्या. विभिन्न दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील म्युझिक रिॲलिटी शो मध्ये स्पर्धक/सहभागी गायकांकडून सादर होणाऱ्या गायनाला साथ करताना प्रत्येकवेळी कुचराई न करता वादक, त्या नवीन कलाकारांना तितक्याच उत्साहानं साथ संगत करतात याबद्दल त्यांनी संगतकारां विषयी जाहीर गौरवोद्गार काढले होते. संगतकारांना केवळ स्टेज पुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या निवास, भोजन व्यवस्थेची त्या जातीनं चौकशी करत.
उंच स्वरात गायनाच्या हल्लीच्या प्रघाता विषयी आकाशवाणी विविध भारतीच्या संगीत सरिता या प्रख्यात कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या होत्या की “प्रत्येकानी आपापल्या कंठ स्वभाव, कंठ धर्माचं पालन केलं पाहिजे”
संगीताचं प्राथमिक शिक्षण घेणाऱ्यांनी ध्वनिमुद्रित माध्यमांचा वापर करणं उचित नसल्याचं मत ही त्यांनी नोंदवलं होतं. “प्रत्येक रागाचा स्वर लगाव हा वेगवेगळा असतो आणि तो गुरु मुखातून ऐकून त्याचा रियाज करूनच सिद्ध व्हावा लागतो. निव्वळ ध्वनिमुद्रण ऐकून गाणं शिकता येत नाही अन्यथा प्रत्येक जण गायक झाला असता” अशी पुस्ती ही त्यांनी जोडली. तसच रियाजाला विचारांची बैठक असली पाहिजे. असं ही त्या सांगत असत. कुठलीही कला म्हटली की तिला दोन अंग असतात. एक म्हणजे भाव विचार आणि दुसरं शास्त्र विचार. कलाकारानं शास्त्र विचाराला धक्का न लागू देता भाव विचारही प्रस्तुत केला तरच त्यात रंजनाचा प्रवेश होऊन ती सामान्य रसिकाश्रयाला पात्र होईल असं त्या म्हणत. निव्वळ शास्त्रावर भर दिला तर सामान्य श्रोता कंटाळतो मात्र त्याच वेळी श्रोत्यांनी ही शास्त्रीय संगीत ऐकण्याची मानसिकता ठेवून आपला कान घडवला पाहिजे. यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेऊन निव्वळ प्रतिष्ठित कलाकारांच गाणं न ठेवता नवोदितांना .ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि त्यांनी ही अश्या संधींचा यथायोग्य उपयोग करायला हवा, तसच प्रात्यक्षिकासह व्याख्यानं आयोजित करून श्रोता घडवण्याच्या प्रक्रियेत आपला वाटा उचलला पाहिजे असं त्यांचं मत होतं.
नव्या पिढी विषयी आशावाद व्यक्त करतानाच त्या म्हणाल्या होत्या की त्यांनी अर्थ आणि कीर्ती च्या प्रीतीत न अडकता निष्काम भावनेनं आपलं कर्म केलं तर ते चांगले कलाकार होण्या बरोबरच अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत होतील आणि इर्षा द्वेष या सारख्या असुरां पासून स्वतःला दूर ठेवू शकतील.
एखाद्या क्षेत्रात, विद्येत, कलेत पारंगत होणं, सर्व अर्थी मोठं होणं जितकं कठीण त्यापेक्षा ते मोठेपण निभावणं अधिक कठीण असतं. मालिनी ताई विदुषी होत्या, विख्यात गायिका होत्या पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी भूतलीच्या मैफिलीत विशुद्ध मानववंशी म्हणून सहजभावानं जीवनराग आळवला, सजवला, रंगवला असं निःशंक, निर्भय मनाने म्हणता येईल.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
110220251620
नागपूर, ठाणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा