एक मुलाखत कथा अंतरीचे प्रतिबिंब दिवाळी अंक 20257
एक मुलाखत
"Is there any red light area in your city?"
कर्नल विक्रम सिंग यांनी फर्ड्या इंग्रजीत विचारलेल्या पहिल्याच प्रश्नानी निखिल नाही म्हटलं तरी थोडा गोंधळला. साहजिकच होतं. आयुष्यात तो प्रथमच इंटरव्ह्यू बोर्डाला सामोरा जात होता. हा प्रश्न त्याला संपूर्ण अनपेक्षित होता.
सरकारी कार्यालयात भरावयाच्या एका जागेसाठी देशभरातून तब्बल 40 उमेदवार मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते; हे कळल्या पासूनच आपली निवड अशक्य आहे असं त्याला वाटून गेलं होतं. त्याला कारणं ही तशीच होती. एक तर मुलाखतीला आलेल्यांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता निखिलपेक्षा अधिक होती. पाच, सहा जण तर इंजिनीयर आणि डॉक्टर होते. दुसरं कारण, याला वगळता अन्य प्रत्येकाकडे दोन ते पाच वर्षांच्या अनुभवाची प्रमाणपत्रे होती.
काय करावं ते निखिलला सुचेना. त्याच्या समोर टेबलावर पाण्याचा ग्लास होता.
"may I have this water please?"
स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी काही क्षण मिळावे म्हणून त्यानी समयसूचकता दाखवून हा ड्रिंक्स इंटरवल घेतला.
पाणी पिण्यासाठी मिळालेल्या वेळेत परम सुपर कॉम्प्युटर पेक्षाही जलद गतीनं त्यानी सरसकट आढावा घेतला. आपण ज्या नोकरीसाठी अर्ज केला आहे त्या कामाच स्वरूप, कार्यालय, हुद्दा, याचा आणि विचारलेला पहिलाच प्रश्न या सगळ्याचा बादरायण संबंध देखील लावता येत नाही हे त्याच्या लक्षात आलं. तेव्हा वशिल्याच्या तट्टूची निवड आधीच झाली आहे हे तो पक्क समजून गेला. नोकरी मिळणार नाहीच आहे तर मग मुलाखत घेणाऱ्यांची ती देणाऱ्यानी वृथा भीड का बाळगा? असा त्यानी विचार केला आणि अगदी बिनधास्त सामोरं जाण्याचं ठरवलं.
"क्या नाम से जाना जाता है?" पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवत असतानाच कर्नल साहेबांचा दुसरा प्रश्न आदळला. भाषा बदलली इंग्रजी जाऊन राजभाषा हिंदी अवतरली. विषय मात्र तोच.
"रेशम रोड"
रणनीती ठरली असल्यानं निखिल क्षणाचाही विलंब न लावता उत्तरला.
"क्या होता है वहां?" कर्नल साहेब अजूनही तिथेच.
“प्रोस्टिट्यूशन”
निखिलचा ही तोच पवित्रा. कर्नल साहेब काही रेड लाईट एरियातून बाहेर पडायला तयार नव्हते. उमेदवार गडबडलेला बघायची त्यांची इच्छा होती की काय, कोण जाणे. पण आता निखिल प्रारंभिक धाक्यातून सावरला होता. मुलाखत जणुकाही याच विषयावर आहे असं समजून प्रत्येक प्रश्न सीमापार टोलवायचा हे त्यांनी मनोमन पक्क केलं होतं. आता त्यांनी अखेरचा वार करण्याच्या दृष्टीनं अमोघ शस्त्र सोडलं.
"आप जाते हो वहां?"
निखिलनी मुद्दाम मिस्किल आणि त्यांनाच संभ्रमात टाकणारं उत्तर दिलं.
"हां अक्सर...एक हप्ते मे दो तीन बार" कर्नल साहेबांना हे उत्तर आणि आविर्भाव मात्र अगदीच अनपेक्षित होता. रेड लाईट एरियात, आठवड्यातून दोन तीन वेळा जातो असं मुलाखती साठी आलेला 23 वर्षांचा मुलगा अगदी अभिमानानं सांगतो म्हटल्यावर, कर्नल असूनही ते गडबडून गेले. चाणाक्ष निखिलच्या हे लक्षात आलं. क्षणभर मुद्दाम थांबलेला निखिल पुढे सांगू लागला,
"माझा मित्र डॉक्टर आहे, त्याची एनजीओ असून ती त्या भागात विविध उपक्रम करत असते त्या निमित्तानं नेहमीच जाणं होतं"
उत्तर पूर्ण झाल्यावर कर्नल साहेबांच्या जीवात जीव आला. निखिलच्या संवादशैली आणि धक्का तंत्रावर ते खूश झालेले स्पष्ट दिसत होतं.
"माझं विचारून झालं" असं सांगत त्यांनीअन्य सदस्यांकडे सूत्र सोपवली.
पाच सदस्य असलेल्या इंटरव्ह्यू बोर्डाचे कर्नल विक्रम सिंग चेअरमन होते. आता अन्य चार सदस्य प्रश्न विचारू लागले. निखिलनं बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं समाधानकारक दिली. विभागा तर्फे आलेल्या सदस्यानं(Departmental Expert) तर शैक्षणिक बाबींवर अगदी सखोल प्रश्न विचारले. पदवी परीक्षा तो नुकतीच पास झाला होता. आता लोक सेवा आयोगाच्या परीक्षेसह विभिन्न स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत होता. सोबत काही नोकऱ्यांसाठी अर्ज करणं सुरू होतं. शैक्षणिक प्रश्नांना सामोरं जातानाही निखिलला विशेष अडचण आली नाही. नोकरीचा अनुभव तर नव्हताच. त्यामुळे त्याबाबत काही विचारणं शक्यच नव्हतं.
खरंतर या नोकरीप्रती तो फार गंभीर होता असंही नाही. पदवीधर झाल्यानंतर काश्मीरसह उत्तरभाराच्या कौटुंबिक सहलीवर असताना एक मुक्काम दिल्लीत होता. हॉटेलच्या खोलीत वेळ घालवण्या ऐवजी तो खाली उतरला. तिथल्या एका बुक स्टॉलवर विविध नोकऱ्यांसाठीच्या जाहिराती लावलेल्या त्यानी पहिल्या. सहज म्हणून त्या वाचत असताना या एका नोकरीच्या आर्हतेत तो बसत होता. अर्जाचा नमुना (Application Form) तिथेच विक्रीला उपलब्ध होता. प्रश्न होता तो अर्जावर फी म्हणून लावायचा 8 रुपये किमतीचा रिक्रुटमेंट फी स्टँप कुठे मिळेल आणि अर्ज सोबत जोडायच्या कागदपत्रांच्या ट्रू कॉपीजचा; कारण पर्यटन करत असल्यानी ती जवळ बाळगण्याचा प्रश्नच नव्हता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन दिवसांवर होती त्यामुळे घरी पोहोचून मग अर्ज करणं शक्य नव्हतं. पैकी रिक्रुटमेंट फी स्टँप बाजूलाच असलेल्या पोस्टात मिळेल अशी माहिती त्या स्टॉलवाल्याकडून मिळाली. आता इतक्या सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे प्रमाणपत्र, कागदपत्र अर्जासोबत लावता येणार नसली तरी अर्ज करूया असं निखिलच्या मनानी घेतलं. फॉर्म भरून त्यावर फोटो, 8 रुपयांचा रिक्रुटमेंट फी स्टँप लावून सही करून त्यानं तो पोस्टात टाकण्यापूर्वी, सध्या प्रवासात असल्यानी आवश्यक ती कागदपत्रं अर्जा सोबत जोडता आली नाहीत मात्र मुलाखतीसाठी बोलावल्यास त्यावेळी ती सर्व देण्यात येतील. तरी कृपया अर्जाचा विचार करावा. अशी एक नम्र सूचना त्यावर लिहिली. अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही असं जाहिरातीत स्पष्ट लिहिलं असलं तरी कर्मधर्म संयोगानं इंटरव्ह्यूचं त्याला बोलावणं आलं होतं. तीच ही मुलाखत होती.
मुलाखतीनंतर निखिल आपल्या गावी परतला. निवड होण्याची कुठलीच शक्यता वाटत नसल्यानी घरी कथाकथन करून झाल्यानंतर त्यानी तो विषय डोक्यातून काढून टाकला. तोंडावर आलेल्या लोक सेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला तो आता जोमानं लागला. इंटरव्ह्यूसाठी इतका लांबचा प्रवास करून आधीच बराच कालापव्यय झाला होता. मुळात तो जायला फार उत्सुक नव्हताच पण पहिले कधीच मुलाखत न दिल्यामुळे अनुभव पदरी पाडून घेण्यासाठी जावं असा सल्ला वडिलांनी दिल्यामुळे तो तयार झाला होता. नोकरीची जरी सुतराम शक्यता वाटत नसली तरी या अनुभवातून त्याला अनपेक्षित गोष्टीचा सामना कसा करावा, तिथला वावर कसा असावा, कपडे कोणते घालावे असं बरंच काही शिकायला मिळालं होतं. एव्हाना लोक सेवा आयोगाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं होतं. मधेच दिवाळी आल्यामुळे सुमारे महिनाभर ती चालणार होती. संपूर्ण तयारीनिशी तो परीक्षेला बसला होता. सामान्य ज्ञानाचे दोन आणि दोन वैकल्पिक विषयांपैकी एक, असे झालेले तीनही पेपर्स छान सोडवले होते. शेवटचा पेपर दिवाळी नंतर होता. तो त्याच्या आवडत्या विषयाचा असल्यानी त्याच्या मनात यशाची आशा जागृत झाली होती. एकूण स्वतःच्या नवीन घरात राहायला आल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी मस्त साजरी करण्यासाठी एकदम अनुकूल वातावरण होतं. तो दिवाळीच्या तयारीत गढून गेला.
तो धनत्रयोदशीचा दिवस होता. संध्याकाळी कार्यालयातून घरी येताच वडिलांनी त्याच्या हाती एक खाकी पाकीट दिलं आणि देवाजवळ ठेवून नंतर उघडण्यास सांगितलं. निखिलनं पाकीट उघडलं आणि पाहतो तर काय त्यात नोकरीसाठीचं ऑफर लेटर होतं. देशभरातून आलेल्या शेकडो अर्जांमधून मुलाखतीसाठी निवडलेल्या 40 उमेदवारां मधून त्या एका जागेसाठी त्याची निवड झाली होती. पुढच्या आठ दिवसात दूर परगावी रुजू व्हायचं होतं. म्हणजे राहिलेला शेवटचा पेपर देता येणार नव्हता. लोक सेवा आयोगाच्या नोकरीच्या तुलनेत हे कनिष्ठ पद होतं पण ती परीक्षा उत्तीर्ण होणं, नंतर मुलाखतीतही चांगल्या मार्कांनी पास होणं वगैरे बरेच टप्पे बाकी होते. थोडक्यात तिथे अनिश्चितता होती आणि इथे तर नियुक्ती पत्र हातात होतं. हातच सोडून पळत्याच्या मागे लागायचं की पदरी पडलेलं पवित्र मानून घ्यायचं यावर सुयोग्य निर्णय घेण्याचं आव्हान मुलाखतीच्यावेळी योग्य निर्णय घेणाऱ्या निखिल समोर होतं.
****
लोक सेवा आयोगाच्या सेवेतलं पद उच्च श्रेणीचं होतं. त्या परीक्षेत पास होणार, असा आत्मविश्वासही निखिलला होता. पण कितीही म्हटलं तरी ते त्या क्षणी आळवावरचं पाणी होतं. पानावर असेल तोवर प्रकाश किरणात मोत्यागत चमचमणारं, त्या तुलनेत हे पद निम्नस्तरीय, पण ‘रेडी टू इट’ प्रकारातलं. चोवीस तासात, सुशिक्षित बेकार प्रवर्गातून बाहेर काढून जबाबदार अधिकारी म्हणून स्थापित करू शकणारं. लगेच नोकरी धरलीच पाहिजे अशी सुदैवानं परिस्थिती नसली तरी पदवीधर झाल्यानंतर आलेली ही संधी सोडणंही कदाचित चुकीच ठरलं असतं. म्हणतातनं संधी वारंवार दार ठोठावत नाही.
अर्थात लगेच रुजू होण्याच्या अटीमुळे राहिलेल्या एका पेपरवर पाणी सोडावं लागणार होतं. तेव्हा निर्णय सोपा नव्हता. मात्र मिळालेल्या मार्गदर्शनातील त्रुटींमुळे म्हणा, कल करे सो आज उक्तीला जागून म्हणा किंवा शक्यतो जोखीम न उचलण्याच्या मराठी संस्काराच्या पगड्यामुळे म्हणा निखिलनं सांगोपांग विचारा नंतर नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशीचं रेल्वेचं तिकीटही काढलं.
*****
तिथे ही गंमतच झाली. प्रवासाच्या दिवशी निखिल आटोपशीर सामान घेऊन रात्री दहा वाजता रेल्वे स्टेशनवर पोहोचला. दिवाळी नुकतीच झाली होती. कडक थंडी अजून सुरू झाली नसली तरी हवेत एकप्रकारचा सुखद गारवा होता. रेल्वे प्रवास ही काही निखिल साठी नवलाईची बाब नव्हती. लहान का होईना जन्मापासून तो शहरात वाढलेला. त्याचं काम ही व्यवस्थित आणि शिस्तीत असायचं आणि हुशार तर तो होताच. अशा व्यक्तींच्या बाबतीतही काही वेळा अशी काही घटना घडते की त्याचा विचार स्वप्नातही केल्या जाणार नाही. म्हणतात ना, बरेचदा पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून माणूस पक्क शिकतो त्याचा निखिलला प्रत्यय आला. प्रवासासाठीची सर्व तयारी लक्षपूर्वक केली होती. प्रवासाचं तिकीट, तारीख वगैरे तपशीलांचीही त्याने पुन्ह पुन्हा खात्री करून घेतली होती. तरीही व्हायचा तो घोळ झालाच.
रेल्वे स्थानकावर पोहोचताच प्रवेश दारावर उभ्या असलेल्या तिकीट तपासनीसाकडे त्यांनी चौकशी केली.
"गाडी कोणत्या फलाटावर येणार? वेळेवर आहे ना?
त्यांनी तिकीट बघितलं आणि इतक्या उशीरा कसे आलात? अशा आशयाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर आलेले स्पष्ट दिसत होते. "आत्ता येताय? ही गाडी तर कधीच गेली" असं त्यांनी सांगितलं. "गाडी मध्यरात्री नंतरची आहे. आता तर रात्रीचे 10च वाजत आहे, गाडी अशी कशी जाऊ शकते?" त्याने तिकीट तपासनीसावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तपासनीसानी त्याला मध्यरात्री नंतरच तिकीट असल्यानं झालेला तारखेचा घोळ समजावून सांगितला. गाडी मध्यरात्रीनंतर ची असल्यानं रेल्वे वेळापत्रकानुसार ती 0030 वाजताची म्हणजेच प्रवास तिकिटावरील तारखेच्या रात्रीची नसून पहाटेची होती. मध्यरात्री 12 नंतर तारीख बदलली. याआधी अशा वेळेच्या प्रवास करण्याची त्यावर कधी वेळ आली नव्हती. त्यामुळे निखिलच्याच काय, घरीही हे कुणाच्या लक्षात आलं नाही. पुढची गाडी सकाळी 9 वाजता असल्यानं रात्री परत घरी जाऊन सकाळी पुन्हा येण्याला अन्य पर्याय नव्हता. UPSC/MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या कडून असं व्हावं या विचारानी त्याला काहीसं ओशाळल्यागत झालं.
*****
अनुभवा अभावी म्हणा व्हायची ती फजिती झाली होती. पहिलं तिकीट तर वाया गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आयत्यावेळी तिकीट काढून तो नोकरीच्या शहरात पोहचला. सुदैवानं तिथे दूरचे एक नातेवाईक राहत होते त्यामुळे उतरण्याची सोय होती. त्यांनीच निखिलला ‘हमारा बजाज’ वरून पहिल्या दिवशी ऑफिसला सोडलं होतं.
नियुक्ती असलेल्या विभागाच्या प्रमुखांच्या दालनात सकाळी ठीक दहा वाजता निखिल दाखल झाला. वरिष्ठ पदाचा चोंगा सतत न मिरवणाऱ्या दुर्मिळ अधिकाऱ्यांपैकी त्याचे साहेब होते. निखिलशी पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे फार सहजतेने ते वागत होते. त्यालाही त्यांचा चेहरा ओळखीचा वाटत असला तरी ओळख पटत नव्हती. साहेबांनी अन्य सहकाऱ्यांनाही दालनात बोलावून निखिलची ओळख करून दिली. प्रारंभिक चौकशी; म्हणजे प्रवास कसा झाला?; कुठे उतरला? आणि इंटरव्ह्यू संदर्भात विचारपूस करू लागले. अचानक नव्या वेगळ्या वातावरणात आल्याचा परिणाम असावा कदाचित किंवा त्यावेळच्या निखिलच्या मनस्थितीमुळे असेल, साहेबांचा चेहरा ओळखीचा वाटत असला, त्यांनी काही सूचक प्रश्नही केले असले तरी त्यांची ओळख त्याला अजूनही काही पटली नव्हती. निखिलनं इंटरव्ह्यू चांगला झाल्याचं सांगितलं पण पॅनलिस्ट असलेल्यांची नावं त्याला काही आठवेना. बोलण्याच्या ओघात चेअरमन साहेबांनी कसे असंबद्ध प्रश्न विचारले आणि अन्य एका सदस्यानी कसे सतत प्रश्नावर प्रश्न विचारून अगदी हैराण केलं यावर नको तितक्या स्पष्ट शब्दात त्यानी मतप्रदर्शन केलं. हाताचं राखून बोलणं तसंही त्याच्या स्वभावातचं नव्हतं. तो वृतांत त्याने अगदी रंगवून सांगितला. दुसरीकडे मनातल्या मनात तो साहेबांना कुठे पाहिले ते आठवण्याचा प्रयत्न ही करत होता. पण व्यर्थ. शेवटी एका सहकाऱ्यानी "साहेब होते का इंटरव्ह्यूला?" असा थेट प्रश्न विचारताच त्याच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. निखिलवर इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नांची सरबत्ती करणारे साहेब ते हेच होते आणि त्यांनीच प्रश्नांची झाड लावून कसा त्रास दिला, याचच रसभरीत वर्णन त्यांनाच ऐकवून, निखिल घोडचूक नव्हे अगदी गेंडाचूक करून बसला होता. नोकरीवर रुजू झाल्याच्या पहिल्या अर्ध्या तासातच त्यानी हा अक्षम्य मोठा फाउल केला होता. आपल्या गोष्टीवेल्हाळपणाचा त्याचा त्यालाच अगदी मनापासून राग आला. नंतर यथामती त्याने जरूर ती सारवासराव केली आणि तुमच्यामुळेच आपल्याला ही नोकरी मिळाली या बद्दल त्यांच्या कडे आभारही व्यक्त केले. पण निखिलचे साहेब सज्जन होते; पापभीरू होते. त्यांनी निखिलचा धन्यवाद प्रस्तावाचा नम्रपणे अस्विकार केला.
अंदर की बात अशी की, साहेबांना इंटरव्ह्यू घेण्यासाठी जेव्हा बोलावणं आलं, त्यावेळी त्याच ऑफिस मध्ये कार्यरत एक लिपिक त्यांना भेटला होता. दोन तीन वर्षांची त्यांची ओळख होती. त्यानीही या पदासाठी अर्ज केला होता. अशोक त्याच नाव. आपल्याकडे थोडं लक्ष ठेवावं अशी साहेबांना विनंती अशोकनं केली होती. इंटरव्ह्यू झाले तेव्हा, सर्व परीक्षकांच्या यादीत निखिल तिसरा किंवा चौथा होता. साहेबांच्या यादीतही तो चौथ्या क्रमांकावर होता मात्र निखिलचं नाव खाली करून, त्या ऑफिस मधल्या अशोकला त्यांनी वर आणलं होतं. विशेष म्हणजे शक्य असेल तर या मुलाची निवड करुया असा कर्नल साहेबांकडे त्यांनी शब्द टाकला होता. निवडलेल्या मुलाकडून साहेबांनाच काम घ्यायचं असल्यानी, कर्नल विक्रम यांचीही काहीच हरकत नव्हती. फक्त साहेबांनी अशोकची निवड करायची हे अगदी स्पष्ट सांगावं इतकचं त्याचं म्हणणं होतं. हो सके तो इस का काम करना अशी आधांतरी भाषा त्यांच्या लष्करी खाक्यात बसत नव्हती आणि साहेबांचा पापभीरू स्वभाव असं स्पष्ट म्हणायला धजत नव्हता. कारण नाही म्हटलं तरी ते अन्य उमेदवारांवर अन्याय करण्या सारखंच होतं. अशोकची इंटरव्ह्यू मधली कामगिरीही बेताचीच होती. अंतिम यादीत इंटरव्ह्यू मधल्या कामगिरीच्या जोरावर निखिलनं तिसऱ्या नंबरची जागा पटकावली होती. इथे चेअरमन या नात्यानी कर्नल साहेबांनी एक विचार बोर्डा समोर मांडला. तिसऱ्या क्रमांकावरच्या निखिलचं शिक्षण अजून सुरू होतं. कार्यानुभव पण नव्हता. त्यामुळे तो हुशार असला तरी निव्वळ पदवीच्या जोरावर त्याला आताच अन्य नोकरी मिळणं शक्य नसल्यानी तो निदान दोन तीन वर्ष तरी या पदावर काम करेल. अन्य दोघे अधिक शिकलेले आहेत, अनुभव गाठीशी आहे त्यामुळे ते या नोकरी कडे स्टेपिंग स्टोन म्हणूनच पाहणार आणि फार काळ या पदावर काम करणार नाहीत. पदाच्या भरती प्रक्रियेत सहज एक वर्ष निघून जातं. तेव्हा निवडलेला उमेदवार जर लगेच सोडून गेला तर साहेबांच्या विभागात जागा रिक्त राहणार आणि पुन्हा निवड प्रक्रियेत वर्षभर जाणार. तेव्हा सर्वानुमते सारासार विचार करता निखिल ची निवड करणं सयुक्तिक ठरेल.
कर्नल साहेबांनी मांडलेला विचार तर्कसंगत होता. शिवाय एकप्रकारे निष्पक्ष होता. साहेबांच्या कार्यालयाची पण सोय बघितली गेली होती आणि साहेबां सारख्या सत्शील, पापभीरू माणसाकडून कारण नसताना घडणारा पक्षपातही टळणार होता. त्यामुळे सर्वच सदस्यांनी निखिलच्या निवडीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं. खरं तर ही सर्व माहिती निखिलला साहेबांच्या निर्व्याज, सरळ, पारदर्शक स्वभावामुळे कळली होती. फुकटच श्रेय लाटणाऱ्या संधी साधूंच्या काळात अशी माणसं अद्यापही आहेत ही बाब निखिलच्या मनावर कायमची कोरली गेली. सुमारे चार वर्ष निखिलनं ती नोकरी उत्तम प्रकारे केली. त्याच बरोबर शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी ही सुरू ठेवली. यथावकाश लोकसेवा आयोगाकडून वरच्या पदावर निवड झाल्यानंतरही जबाबदारीच्या पदांवर काम करताना श्रेयस आणि प्रेयस यांच्यातल्या द्वंद्वात निर्णय घेताना ही पहिली नोकरी आणि भेटलेली माणसं त्याला सदैव मार्गदर्शक ठरली.
("एक मुलाखत" कथा अंतरीचे प्रतिबिंब दिवाळी अंक 2025 साठी)
15082025
नितीन सप्रे
टीप: लेखक भारतीय माहिती सेवेचे माजी अधिकारी असून नुकतेच उपसंचालक डी.डी.न्युज(वृत्त), नवी दिल्ली इथून निवृत्त झाले आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तीगत आहेत. विभिन्न दैनिक, मासिक, दिवाळी अंक तसंच एखाद्या विषयाला वाहिलेल्या विशेषांकां मधून त्यांचं लिखाण प्रकाशित होत असतं. त्याशिवाय ब्लॉगवर केलेलं विपुल लिखाण भारतासह 15 हून अधिक देशात वाचलं जातं. त्यांच लिखाण
https://saprenitin.blogspot.com
या ब्लॉगवर उपलब्ध आहे.
............................ संपादक.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा