स्मृतीबनातून–स्वरमंगेशाचा अभिषेकी
स्वरमंगेशाचा अभिषेकी
प्रारंभिक
गणेश बळवंत नवाथे म्हणजेच पंडित जितेंद्र अभिषेकी या नावाने सर्वांना सुपरिचित असलेले विसाव्या शतकातल्या सुरलोकाचे एक कुलपती. संगीत क्षेत्रातील एक अत्यंतिक अधिकारी आदरणीय व्यक्तिमत्व. परंपरा आणि नियमांचा पट्टा गळ्याला घट्ट आवळून घेणं म्हणजे घराणा गायकी असं त्यांनी कधीच मानलं नाही आणि म्हणूनच शास्त्रीय संगीत गायनाची आपली स्वतंत्र शैली त्यांना निर्माण करता आली. ते केवळ शास्त्रीय गायकच नव्हते तर त्या बरोबरीनं नाट्यगीतं, अभंग, भावगीतं, ठुमरी, दादरा, कजरी, टप्पा यासारखे उपशास्त्रीय प्रकारही आशयपूर्ण, रसाळपणे सादर करून त्यांनी अभिजात रसिकांच्या काळजात घर केलं. अगदी लोकसंगीतासह संगीताचे नानाविध प्रकार ते तितक्याच सशक्तपणे रचित, गात असत. याबरोबरच ते एक सुजाण संगीत शिक्षकही होते. संगीत दिग्दर्शनाची हातोटी तर अशी होती की आधुनिक काळात मराठी संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवित करण्याचं श्रेय निर्विवाद त्यांच्याकडे जातं. त्यांना संस्कृत, उर्दू, पोर्तुगीज या भाषाही अवगत होत्या. एकूणच गायन आणि गायनाधिष्ठित विद्वत्तेचा त्यांचा सुरेल व्यासंग होता.
जडण घडण
जितेंद्र अभिषेकी यांचं मूळ गाव गोव्यातील मंगेशी. तिथल्या मंगेशी देवस्थानाचं पौरोहित्य आणि अभिषेक पिढ्यानपिढ्या त्यांच्या घराण्याकडे असल्यानं मूळ नवाथे हे आडनाव मागे पडून अभिषेकी असं प्रचलित झालं. अभिषेकी यांच्या घरात सूर–तालाची दरवळ होती. पहाटे पाच ते सहा घरी रोज चौघडा वाजत असे. त्यामुळे अगदी बालपणापासूनच त्यांच्यावर नकळत ताल संस्कार होत गेले. मंदिर आणि परिसरात सतत कीर्तन, भजन, नाटकं सुरू असायचं, यामुळे सूर संस्कारही आपसुकच झाले. कीर्तनकार वडिलांकडे संगीत शिक्षणाची धुळाक्षरे गिरवता गिरवता त्यांच्या मनात संगीता बद्दल प्रीती निर्माण झाली. कुणाचही संगीत ऐकलं की हाच आपलाही प्रांत आहे अशी एकप्रकारची उर्मी त्यांच्या मनात येत असे. सात्विक निसर्ग सौंदर्याचं देणं जसं गोमंतकाला लाभलं आहे तसाच या भूमीचा अवकाश हा लडिवाळ सुरांनी भारलेला आहे. अशा अनुकूल वातावरणात बांदिवड्याच्या गिरिजाबाई केळेकर यांच्या कडे अभिषेकींच्या संगीत शिक्षणाचा ओनामा झाला. मात्र गोव्यात संगीताच वातावरण असलं, गवई असले तरी गायकी शिकवण्याची, शिकण्याची अशी काही सोय नव्हती. त्यामुळे त्यांना मंगेशी सोडावं लागलं. अर्थात त्यांच्या हृदयाच्या कोपऱ्यात मंगेशीच स्थान आढळ होतं. लहान वयातच, सुमारे 1942 साली, ते पुण्यात आले. त्याकाळी विद्यार्जनाची लालसा असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याची अन्न आणि निवाऱ्याची सोय पुण्यनगरीत होत असे आणि त्यामुळे विविध क्षेत्रातले विद्वान लोक पुण्यात उदयास येत होते. नंतर मात्र परिस्थित बदल होत गेला असं निरीक्षण स्वतः पंडितजींनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. त्यावेळी कीर्तन परंपरा पुढे नेणार असल्यास थोडा बहुत खर्च करीन अन्यथा नाही अशी वडिलांची भूमिका होती. जितेंद्रला कीर्तन जरी आवडत असलं तरी गद्यापेक्षा गाण्याकडे त्याचा अधिक ओढा होता. त्यामुळे सुरवातीला वर्षभर पुण्यात भावे यांच्या कडे राहून आणि माधुकरी मागून गुजारा करावा लागला.
पुढे पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांकडे त्याचं शिक्षण सुरू झाल्यानंतर शास्त्रीय संगीताचे खरे संस्कार घडत गेले. त्यानंतर त्यांनी खाँ साहेब अजमत हुसेन खाँ, गुलुभाई जसदनवाला यांच्याकडेही संगीताचं शिक्षण घेतलं. उत्तुंग प्रतिभा, रागभाव, राग स्वरूप, शब्दाशयाची उत्तम जाण, गमकयुक्त स्वरावली, अनवट राग आणि ललित संगीतावरही असलेली उत्तम पकड, आशय गर्भित रचनाकारी यामुळे संगीत क्षेत्रावर त्यांची सुरेल मांड बसली होती.
शास्त्रीय गायन
अभिषेकी बुवांनी शास्त्रीय संगीतच शिक्षण विभिन्न घराण्यांच्या गुरुं कडून घेतलं. त्याचा निगुतीन अभ्यास केला आणि नीरक्षीर विवेक बाळगून वेगवेगळ्या घराण्याच्या गायकीत जे जे म्हणून सुबक, सुंदर, सकस आढळलं ते ते आत्मसात केलं. त्यांनी अशाप्रकारे आपली स्वतःची अशी गायन शैली विकसित केली. त्यामुळे त्यांची गायकी कोणत्या एका घराण्याच्या उंबरठ्यात अडकून राहिली नाही. त्यांच्या गायकीतून व्यासंग आणि निरनिराळ्या घराण्यातील सौंदर्यस्थळांचं दर्शन घडतं. यमन, मधूकंस, मधुवंती, मियां मल्हार, भीमपलास यासारखे प्रचलीत राग तर ते गायचेच पण त्याच बरोबर अमृतवर्षिणी, हरिकंस, त्रिवेणी, धुलिया सारंग, बधम सारंग, स्वानंदी, खत तोडी यासारखे, सामान्य श्रोत्यांनी ज्यांची नावही ऐकली नसतील, असे अप्रचलित रागही मैफिलीतून ते कुशलतापूर्वक मांडत असत. कुठल्याही रागावर अप्रचलित अशी मोहोर उठवण्यापेक्षा जर तो सौंदर्यपूर्वक सादर केला तर श्रोते निश्चितच आकर्षित होऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. राग नियमनाच्या चौकटीला निर्बंध न मानता त्याकडे सौंदर्य दर्शनासाठीची शास्त्रशुद्ध मार्गदर्शक तत्त्व म्हणून पाहिलं पाहिजे असं त्याचं मत होतं. शामरंग या टोपण नावानी त्यांनी अनेक बंदिशींचीही रचना केली.
नाट्यसंगीत
प्रख्यात नाटककार वसंत कानेटकर आणि जितेंद्र अभिषेकी यांचा घनिष्ट परिचय घडला तो मत्स्यगंधा या नाटकापासून. धी गोवा हिंदू असोसिएशन त्यावेळी या नाटकासाठी संगीत दिग्दर्शकाच्या शोधात होती. तेव्हा गोपाळकृष्ण भोबे यांनी अभिषेकी यांचं नाव सुचवलं आणि ते या नाटकाचं सोनं करतील अशी ग्वाही दिली. झालं असं की नाटक वाचल्यानंतर अभिषेकी म्हणाले की हे इतकं सुंदर गद्य नाटक आहे त्याच संगीत नाटक का करता? मात्र लेखक वसंत कानेटकरांच्या मानसी, नाट्यसंगीता बद्दल विलक्षण प्रीती होती. त्यामुळे त्यांनी संगीत नाटक करण्याचा हट्ट धरला. या नाटकातील “गर्द सभोवती रान साजणी”, “गुंतता हृदय हे”, “तव भास अंतरा झाला” “नको विसरू संकेत मिलनाचा” “अर्थशून्य भासे मज हा कलह” “देवा घरचे ज्ञात कुणाला” अशा एकाहून एक सरस पदांच्या स्वरलालित्याचा अनुभव घेताना पंडित जितेंद्र अभिषेकींच्या स्वर रचनाकारीच्या उत्कट आविष्कारानी आपली श्रावणेंद्रिये तृप्त होऊन जातात. चाफेकळी आणि तव भास या अनुक्रमे बालकवी आणि कवी गिरीश यांच्या रचनानांचा अपवाद वगळता अन्य पदं स्वतः कानेटकरांची आहेत. पदं लिहिताना कानेटकर यांनी लिहिलं होतं
साद देती हिमशिखरे या शुभ्र पर्वताची
क्रमीन वाट एकाकी मी ब्रह्म साधनेची
बुवांनी गीत वाचलं आणि सुडौल चालीच्या दृष्टीनं त्यांना दोन मात्र कमी कराव्याशा वाटल्या त्यांनी गीतकाराला विचारलं आणि त्याच्या सहमतीनं पहिल्या ओळीतील या आणि दुसऱ्या ओळीतील मी हे दोन्ही शब्द अंतर्धान पावले. बुवांनीच संगीत केलेल्या हे बंध रेशमाचे या नाटकातील पदंही खूप गाजली. त्यातील एक गीत शांता शेळके यांनी विविध प्रकारे लिहिलं तरी अभिषेकी आणि लेखक रणजीत देसाई यांच्या एकत्रित पसंतीस काही उतरत नव्हतं तेव्हा नेमकं काय आशयाचं गीत हवं ते शांताबाईंना सांगण्या करिता बुवांनी त्यांना एक शेर ऐकवला...“लोग काटों की बात करते हैं हमने तो फुलों से जख्म खाई है”...आणि शांताबाईंच्या लेखणीतून एक नितांत आशयपूर्ण गझल अवतरली “काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी मज फुल ही रुतावे हा देव योग आहे”...अशाप्रकारे आपल्या रचनेसाठी सुलभ असे शब्द गीतकारांकडून नेमके काढून घेण्याचं कसब अभिषेकी यांच्याकडे उपजतच होतं. बुवांनीच संगीत केलेल्या आणि संगीत नाटकांच्या वाटचालीत दीपस्तंभ ठरेल असं एक नाटक म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तरांच कट्यार काळजात घुसली. एखादी जबाबदारी पत्करताना अभिषेकींना बिदागी पेक्षाही यातून आपल्याला ठशीव असं काहीतरी वेगळं, नवीन काय देता येईल याची अधिक चिंता असे. म्हणूनच कट्यारचा आरंभ, सांगीतिक परंपरेला छेद देऊन, भैरवी रागातल्या “लागी कलेजवा कट्यार” या पदानी करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. या नाटकात भारतीय संगीतातले अधिकाधिक प्रकार त्यांनी श्रोत्यां समोर मांडले. या नाटकाच्या सुरवातीच्या तालमी सुरू होत्या आणि त्या दरम्यान बुआ अचानक बेपत्ता झाले. सर्वत्र त्यांचा शोध घेतला पण त्याचा ठावठिकाणा काही लागला नाही आणि सुमारे 20 दिवसां नंतर ते अचानक तालमीत अवतरले आणि कट्यार ची एकेक गाणी उलगडून दाखवली. उच्च प्रतीच्या कलात्मक सृजनासाठी एकांत मिळावा म्हणून त्यांनी हा अज्ञातवास स्वीकारला असावा. रसिकजनांच नशीब थोर म्हणून डॉक्टर वसंतराव देशपांडे, प्रसाद सावकार, रामदास कामत, आशालता वाफगावकर, फैय्याज आदी अभिषेकींच्या संगीताला संपूर्ण न्याय देऊ शकतील असे तोडीसतोड गायक लाभले आणि मराठी संगीत रंगभूमीला नव्यानं सुवर्णकाळ अनुभवता आला.
आधी उपयोगात न आणलेले सालगवराळी, जोगी भैरवी, ललत पंचम, भटियार यासारख्या रागावर आधारित रचना त्यांनी केल्या. पूर्वी पेक्षा काहीतरी वेगळं द्यावं अशी त्यामागे बुवांची भावना होती. रंगभूमीसाठी संगीत रचना करताना शक्य तोवर मूळ शास्त्रीय बंदिशी किंवा लोकगीतं यांचा आधार घेतला नाही असं ही ते सांगत. “देवाघरचे ज्ञात कुणाला” ही यमन रागातली रचना त्यापूर्वीच्या तितक्याच लोकप्रिय “नाथ हा माझा मोहिकला” पदाच्या चाली पेक्षा त्याच रागात असून सुद्धा संपूर्ण निराळी वाटते. स्वतंत्र विचाराचा त्यांना ध्यास होता म्हणूनच लेकुरे उदंड झाली नाटकाचं संगीत करताना ख्रिश्चन लोकसंगीत वळणाचाही समावेश केला असं त्यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत नमूद केलं होतं.
भावगीत
रचना करताना भावगीतांच्या बाबतीत मात्र वेगळा विचार आवश्यक ठरतो. नाट्यगीताला पद म्हटल्या जातं आणि बंदिशी प्रमाणेच ते चुस्त बांधलं जातं. मात्र भावगीता मध्ये कवीला अभिप्रेत असलेला भाव साकारणं हे मर्मस्थानी असतं. म्हणून रचना करतेवेळी काव्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. कवीला संपूर्ण न्याय देण्याची भूमिका रचनाकाराची असली पाहिजे याबाबत अभिषेकी संवेदनपूर्वक दक्ष असत. त्यांच “कशी तुज समजावू सांग” “अनंता तुला कोण पाहू शके” “दिवे लागले रे दिवे लागले” “रंध्रात पेरली मी” “नाही पुण्याची मोजणी” “माझे जीवन गाणे” या सारख्या अजर काव्यांतून अजरामर गीतं फुलून आली.
अभिषेकी संतांचे अभंग, अनेक कविता, नाट्यपदं गायले, बऱ्याच स्वर रचना ही केल्या. गोव्यातील प्रख्यात कवी बा. भ. बोरकर यांच्या काव्यावर त्यांचा विशेष लोभ होता. बोरकर स्वतःही कविता गात असत. त्यांच्या अनेक कविता स्वयंभू चाल घेऊन जन्म घेत असत.
गुरू एक जागी त्राता
अभिषेकी बुवांनी त्यांच्या लोणावळा आणि पुण्यातल्या निवासस्थानी पारंपरिक गुरुकुल पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य गाणं शिकवलं. शिष्यांना शिकवण्यासाठी ते स्वतःही पहाटे चारला रियाज सुरू करत. जर खडा पलटा, तान याची त्यांनी शिष्याला पुनरावृत्ती करायला सांगितली तर ते ही प्रत्येकवेळी त्याच्या सोबत गात असत. जो राग ते शिकवीत तो अन्य मोठ्या कलाकारांनी कसा गायला आहे हे जाणून घेण्यासाठी ते शिष्यांना ऐकायला सांगत. प्रत्येक जण शरीर, मन आणि बुद्धीने वेगळा असल्याने त्याच्या त्याच्या क्षमते नुसार त्याच गान अव्वल असलं पाहिजे अशी त्यांची भूमिका असायची.
पं. रविशंकर यांच्या अमेरिकेतील ‘किन्नरम’ या संस्थेतही सत्तरच्या दशकात त्यांनी काही काळ गान शिकवलं.
संगीत अभ्यासक
अभिषेकी हे केवळ परफॉर्मिंग आर्टिस्ट किंवा रचनाकारच नव्हते तर ते संगीताचे अभ्यासक ही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात तो प्रकर्षानं जाणवत असे. आपली कला श्रोते, प्रेक्षकवर्गा पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक कलाकाराची असते. रसिकांच्या जाणतेपणा बद्दल कलाकारांनी कुठलाच गैरसमज बाळगता उपयोगी नाही. रसिक रंजन होत नसेल तर आपलं गाणं, कलाच कुठेतरी कमी पडली असं समजलं पाहिजे अस ते म्हणत. बंदिश, नाट्यगीत, भावगीत हा भेदाभेद अमंगळ अशी त्यांची भावना होती. Music is either good or bad. It's nither classical or Light. ते म्हणत की कुणी एखादा शास्त्रीय बंदिश देखील वाईट गाऊ शकतो तर दुसरा कुणी भावगीतही शास्त्रीय पातळीला घेऊन जाऊ शकतो. नाट्यसंगीताच वेगळं असं शिक्षण घ्यावं लागत नाही कारण कुठलही गाणं नाट्यमय करणं हे शास्त्रीय संगीत तसंच नाट्य संगीत या दोन्हीला सारखंच लागू आहे. तअभिषेकींनी सुमारे 25 नाटकांना संगीत दिलं. हे साधत असताना नाटकाचं कथानक, पात्र, त्यांच्या आवाजाची जातकुळी आणि नाटकाची बांधणी आदींचा ते वेगळा विचार करीत. त्यात पुनरावृत्तीचा दोष राहणार नाही याची ही ते काळजी घेत. त्या बरोबरच पूर्वी नाटकांसाठी काटेकोर कालमर्यादा नसल्यानी गाण्यासाठी वेळ असायचा मात्र बदलत्या काळानुसार वेळेची मर्यादा आल्यानं त्यांनी पसारा आवरून चुस्त रचना आणि पेशकारी यावर त्यांनी भर दिला. नाट्यसंगीत गाताना त्यातील नाट्य अचूक हेरून गळ्याच्या माध्यमातून त्याचा आविष्कार केला गेला पाहिजे असं त्याचं गायक कलाकारांना सांगणं असे. साठच्या दशकात त्यांनी संगीत रंगभूमीवर केलेल्या नवनवीन सृजनशील प्रयोगांमुळे आणि संगीत रंगभूमीला आधुनिक काळाशी सुसंगत वळण लावण्याच्या अतुलनीय कार्यामुळे मराठी संगीत रंगभूमी पुनरुज्जीवित होऊन पुनर्वैभव प्राप्त करती झाली.
आकाशवाणीचे ऋणनिर्देश
सुमारे एक दशक अभिषेकी बुवा आकाशवाणीच्या सेवेत होते. रेडिओ सारख्या माध्यमात वृत्त, संगीत, नाट्य असा एकेक जरी विभाग म्हटला तरी त्यात चौफेर शिकण्याची संधी असते. आपापल्या कुवतीनुसार सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो. या माध्यमामुळे आपली कारकिर्द चतुरस्त्र झाली अन्यथा ती एकांगी, एकसुरी झाली असती असं ते आत्यंतिक प्रांजळपणे सांगत.
आपल्या सांगीतिक विचारांच्या, रचनांच्या, गायकीच्या अभिषेकाने श्रोत्यांची श्रावणेंद्रिये काबीज करणाऱ्या जितेंद्र अभिषेकींच्या समकालीन असणं हा आपला भाग्ययोगच म्हटला पाहिजे.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
07112025


फार छान लेख.अभिनंदन
उत्तर द्याहटवाKhup mast mahiti jama kelis mitra v shabdankan pan uttam
उत्तर द्याहटवा