स्मृतीबनातून – रुसवा

 

रुसवा


उपोदघात

रुसणे हा शब्द निश्चितच नकारार्थी आहे. तरी त्यात राग, रागावणे या अर्थापेक्षा नाराजीची छटा अधिक आहे. हा शब्द बराचसा प्रेमल, लडिवाळ, काहीसा गोंडस अशा नाराजीचा दर्शक आहे. बहुतेक वेळी तो लहान मुलं, खास मित्र, खास मैत्रीण, आवडणारी व्यक्ती यांच्या नाराजीच्या संदर्भात वापरला जातो. म्हणजेच तो कडकलक्ष्मी थाटाच्या रागावण्यासाठी नाही तर हलक्या फुलक्या, खेळकर, खोडकर असा लटका राग सूचवण्यासाठी वापरला जातो. थोडक्यात रुसणे म्हणजे आर्जवाच्या अपेक्षेने व्यक्त केलेला राग असं म्हणता येईल. अर्थात रुसणे हे एकाअर्थी अप्रसन्नता दर्शक जरी असलं तरी, अशा रुसलेल्या कुणा तिचा, त्याचा, किंवा अन्य कुणाचाही रुसवा घालवून प्रसन्न करून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नामध्ये तणाव कमी आणि गंमत अधिक असते. मुख्य म्हणजे या रुसण्यात, द्वेषाचा लवलेश ही नसतो. अदृश्य असा गोडवा असतो. या रुसण्यात आपलेपणा अध्यारूत आहे. त्रयस्थ, परक्या व्यक्तीवर रागावता येऊ शकतं पण रुसण्यासाठी ती व्यक्ती आप्तच असावी लागते. 

रुसण्याचं प्रयोजन

आता कुणालाही असं वाटू शकतं की रुसण्यावर इतकी कलमकारी करण्याचं प्रयोजन काय? तर ते म्हणजे आकाशवाणी वरून ‘आपली गाणी,’ ‘कामगार विश्व,’ ‘वनिता मंडळ’ अशा विभिन्न कार्यक्रमातून अनेकदा ऐकण्यात आलेलं एक चिरतरुण गाणं. सकाळी कोवळं उन अंगावर घेत बागेत सहज निवांत बसलो असताना एखादं बहुरंगी फुलपाखरू अलगद हातावर येऊन बसावं त्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकी बरोबर लहरत येऊन कानांद्वारे ते हळूच मनात उतरलं…‘अजुनी रुसुनी आहे’...

पंडित कुमार गंधर्व यांनी या गीताला स्वरबद्ध करून आपल्या गोड गळ्याद्वारे ते मराठी घराघरात पोचवलं. हे गीत माहित नाही अशी मराठी व्यक्ती सापडणं अवघडच आहे. मात्र वैदर्भीय कवी आत्माराम रावजी देशपांडे उपाख्य अनिल यांच्या या गीताच्या जन्मकथे बद्दल बरेच प्रवाद कानावर पडतात. 

अनिल आणि कुसुमावती 

मुळात कवी अनिल आणि कुसुम रामकृष्ण जयवंत हे दोघेही क्रमशः अकोला आणि अमरावतीचे हळवे, कविमनाचे नवथर तरुण तरुणी अध्ययनासाठी पुण्यनगरीत असताना एकमेकांना भेटतात. त्यांची ओळख होते. ती मैत्रीच्या मार्गानी प्रेमात रूपांतरित होते. कुसुम गंधाने मोहित होऊन त्या सभोवती रुंजी घालत फिरणारा वारा म्हणजेच अनिल, म्हणून त्यांनी काव्यरचनांसाठी अनिल हे टोपण नाव स्वीकारलं. हे प्रकरण आंतरधर्मीय नाही पण आंतरजातीय असल्यानी घरच्यांचा कडवा विरोध होता. कालांतराने दोघेही कलाशाखेचे पदवीधर होतात. करिअर उत्तम घडवतात. प्रेम खरं असल्याने मध्यंतरी काही काळ गेला तरी, दूर वेगवेगळ्या ठिकाणी राहूनही ते विवाहबद्ध होतात. हा काळ आहे एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध(1929). कविवृत्ती आणि लेखनप्रेमी असलेल्या या युगुलानी काळ आणि भौगोलिक अंतर यावर पत्राचारानी मात केली. त्याकाळी अदबशीरपणे, पण खुल्लम खुला प्यार करेंगे हम दोनो अशा वृत्तीनं प्रेम जगणारे हे अगदी दुर्मिळ युगुल असावं.

मूळ पदावर येताना

आता मूळ पदावर येऊ. कला शाखा आणि शास्त्र(विज्ञान, गणित) यात सर्वात मोठा मूलभूत फरक म्हणजे कला प्रांतात, व्यक्ती गणिक एखाद्या गोष्टीचे, कलाकृतीचे नानाविध अर्थ लावता येऊ शकतात. त्यामुळे आपापल्या कल्पने प्रमाणे केलेले विविध तर्क, वस्तुस्थिती काहीही असली तरी ते लोकांना मान्य होऊ शकतात. एखादी कविता, गीत जेव्हा फुलतं तेव्हा ते कवीच्या जगण्यातून, जाणिवेतून उमलतं आणि रसिकां कडून घेतला जाणारा रसास्वाद; हा त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार झालेलं आकलन असू शकतं. अशावेळी एकाच कविता, गीताकडे निरनिराळ्या दृष्टीनं बघितलं जाऊ शकतं आणि मग काहीवेळा त्या त्या दृष्टिकोनाला पूरक किंवा त्याचा विपर्यास करणाऱ्या दंतकथा प्रसूत होऊ लागतात. 

जन्मकथेचा विपर्यास

कवी अनिल यांच्या रुसवा(अजुनी रुसून आहे) या कवितेच्या बाबतीत असंच काहीसं घडलं. या एकाच कवितेच्या दोन तीन जन्मकथा वाचक वर्तुळात फिरत असतात. त्यातील सर्वाधिक प्रचलित कथा म्हणजे कवी अनिल कुठल्याशा कार्यक्रमासाठी बाहेर गेलेले असतात. परतायला थोडा अधिक उशीर होतो. पत्नी कुसुमावती घरीच असतात मात्र दार वाजवल्यावर उघडले जात नाही. म्हणून मग दरवाजा तोडून प्रवेश केल्यावर पत्नींची इहलोकीची यात्रा संपल्याचं लक्षात येतं आणि अत्यंतिक संवेदनशील कविमानाच्या अनिलांना तिच्या अचेतन शरीराकडे पाहत असताना ‘अजुनी रुसुनी आहे’ हे काव्य स्फुरतं. वरकरणी हा तपशील बरोबर असावा असं कुणालाही सहजीच वाटू शकतं मात्र कवी अनिलांना काव्याच्या शेवटी स्थळ, काळ नोंदवण्याची सवय होती. उपलब्ध माहिती नुसार ही कविता 5 ऑगस्ट, 1947 ला यवतमाळ इथे लिहिली असल्याची नोंद आढळते. काही काळ आकाशवाणी दिल्ली केंद्रात ही निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या, 1961 मध्ये ग्वाल्हेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष राहिलेल्या कुसुमावती देशपांडे यांचं निधन हे 17 नोव्हेंबर, 1961 रोजी दिल्लीत झालं. आता या माहितीनुसार ‘अजुनी रुसुनी आहे’ हे काव्य त्यांच्या निधनाच्या एक तपाहून अधिक काळ पहिले लिहिलं गेलं हे स्पष्ट होतं. कवि अनिल यांनीही या संदर्भात खुलासे केले मात्र तरीही अगदी मान्यवरांसह अनेकां कडून ती प्रसूत होत राहिली. अन्य एका प्रचलित प्रवादा नुसार 1929 साली पत्नी झालेली कवी अनिलांची ही प्रेयसी खरोखरच त्यांच्यावर रुसली होती आणि तिचा रुसवा, लटका राग काढण्यासाठी, समजूत काढण्यासाठी त्यांनी ही कविता केली. परंतु

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे

मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,’ इतकी सालस, निरलस पत्नी रुसली तरी ‘खुलता कळी खुले ना मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना’ इतकं ताणून धरेल, अटीतटीवर येईल असं वाटत नाही. मग ‘अजुनी रुसुनी आहे’ या कवितेची नायिका कोण असावी? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो आणि ते जाणून घेण्याची उत्सुकता तर इतकी ताणली जाते की मनाला अस्वस्थता जाणवू लागते. मग हा रुसवा प्रतिभेचा आहे का? म्हणजे एका अर्थी प्रेयसीचाही, कारण प्रतिभा ही कवीची प्रेयसीही असतेच असते. नाही का? हे काव्य, प्रतिभेला उद्देशून आहे का? अशी शंका डोकावते. आता अगदी इरेला पेटल्यासारखं होतं. अशावेळी वेगवेगळे संदर्भ धुंडाळत असताना कवी अनिलांच्या कौटुंबिक सूत्राच्या हवाल्यानी; जो की माझ्या वाचनात आला; त्यावर भिस्त ठेवली तर हे काव्य प्रतिभेला उद्देशून असलं तरी ती काव्यप्रतिभा नाही. मग ही कोण असावी?  

कोणती प्रतिभा 

कवी अनिल हे यवतमाळ इथे न्यायाधीशही होते. ऑगस्ट 1947 च्या सुमारास त्यांचा समोर अत्यंतिक गुंतागुंतीच एक क्लिष्ट प्रकरण सुनावणी साठी आलं. त्याचा निवाडा करणं मोठं अवघड काम झालं होतं. भावना आणि बुद्धीचं द्वंद्व सुरू होतं. श्रेयस आणि प्रेयस यांच्यातील संघर्षात योग्य त्याची निवड करण्यासाठी निर्णयशक्ती नेहमीप्रमाणे प्रतिसाद देत नव्हती. तेव्हा आपल्या न्यायबुद्धीला आतल्या आवाजाला उद्देशून कवी अनिल यांनी हे काव्य लिहीलं. त्यानंतर बुद्धीचा रुसवा दूर झाला. आतल्या आवाजाकडून मार्गदर्शन झालं. प्रश्नाची उकल सापडली. मनावरच दडपण हलकं झालं. प्रतिभा ही काही केवळ उत्कृष्ट साहित्य निर्मिती साठीच उपयुक्त असते असं नाही तर ती सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून क्रियाशील राहण्यासाठीही तेव्हढीच महत्वाची असते. संवेदनशील व्यक्तीच्या प्रतिभेचं हे रूप ओळखणं हे रसिकांना कदाचित थोडं अवघड जात असावं आणि त्यातूनच कलाकृतीच्या अर्थाचा, जन्मकथेचा काहीवेळा विपर्यास होत असावा.

काव्य

‘अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना

मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ।


समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे

मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,

ते आज का नसावे, समजावणी पटे ना

धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।


का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,

विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?

चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,

मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ।


की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,

घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?

रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।’


ऐकण्यासाठी क्लिक करा 

https://youtu.be/sWal9PaAbQU?si=vty_eompOV-5s5zY

नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

061220250600










टिप्पण्या

  1. Nitin khoob Sundar shabdanchi mandani keli ahes. Tuzha abhyas khup dandga ahe. Tuzhya doordarshanatil nokrichya kalat tula milalelya sandhincha khup uttam upyog tu kela ahes. Tuzhya pudhachya yashat ashich pragati hot raho hich shubh iccha mi bhagvanta jawal magto.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय नितीन,
    अतिशय सुंदर. सोप्प्या आणि आशयदार शब्दांतील तरल प्रितीचे विवेचन. तसेच ’ कुसुम ’ गंधाने मोहित झाल्यामुळे ’ अनिल’ ही कल्पनाच वेड लावणारी आहे. भावार्थ वाचताना ब्रम्हानंदी टाळी लागली. तसेच पुन्हा एकदा लटके रुसणे काय असते ते नव्याने उमगले. एकूणच अत्यंत तरल आणि प्रसन्न वाचनानुभव....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती