स्मृतीबनातून – ऐ, ज़िन्दगी गले लगा ले
ऐ, ज़िन्दगी गले लगा ले
मानवी नातेसंबंधांचा प्रांत हा बरेचदा काहीसा गूढ, अनाकलनीय असा असतो. निसर्गचक्रात पानं फुलं यांच्या बहरण्याला, कोमेजण्याला जसे काही नियम असतात, ऋतुमान असतं तसे ते मानवी नाते संबंधात आढळतीलंच याची काही खात्री नाही. इथे येणारा बहर किंवा शिशिर; हा समज, गैरसमज, संशय, अहंकार, उपयुक्तता, अपघात यासारख्या गोष्टींवर अवलंबून असतो. कधी कुणा अपरिचित अथवा वर्षानुवर्ष संबंध नसलेल्यां लोकांमध्ये अतर्क्य जवळीक साधली जाते तर कधी अनेक वर्षांच्या स्नेह संबंधात अगदी रक्ताच्या नात्यातही असा काही दुरावा, रुक्षता येते की ज्याची स्वप्नातही कल्पना केली जाऊ शकत नाही. तर कधी परिस्थित अशी निर्माण होते की दूर गेलेले जवळ येतात आणि जवळ असलेले कायमचे दुरावतात. अर्थात सगळ्यांच्या बाबतीत आणि प्रत्येक वेळी नकारात्मकच काही घडेल असंही नाही. समाज माध्यमावर वाचनात आलेल्या एका लेखामुळे विचारचक्राला गती मिळाली आणि अगदी कॉलेजच्या दिवसात पाहिलेल्या कमल हसन, श्रीदेवी यांच्या सदमा चित्रपटाची कथा आठवली. स्नेहलता(श्रीदेवी) ही कॉलेज तरुणीला एका कार अपघातात डोक्याला मार बसातो. तिचा स्मृतीलोप होतो. ती अगदी पाच सहा वर्षांच्या मुली सारखी वागू लागते. उपचारा दरम्यान ती रुग्णालयातून नाहीशी होते आणि दुर्दैव तिला वेश्यागृहात पोहोचवतं. आपल्या छंदीफंदी मित्रा बरोबर तिथे गेलेल्या सद्वर्तनी, भावनाशील हळव्या सोमप्रकाश (कमल हसन) या तरुण शिक्षकाशी तिची गाठभेट होते. मोठी रक्कम देऊन बाहेर फिरायला नेण्याच्या कारणावरून तो त्या परिस्थितीतून तिला बाहेर काढतो आणि आपल्या घरी घेऊन जातो. अगदी आपुलकीनं तिचा सांभाळ करू लागतो. या दरम्यान अनाथ सोमुच्या मनात स्नेहलता/रेशमी(श्रीदेवी) बद्दल आपसुकच हळुवार नितळ प्रमांकुर फुलू लागतो. कुणा वैद्याकडे स्मृतीभ्रंशावर उपचार केले जातात असं कळल्यावर तो तिला उपचारासाठी घेऊन जातो. मधल्या काळात स्नेहलता/रेशमीच्या आईवडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली असते आणि वर्तमानपत्रात जाहिरात ही दिली असते. त्यावरून तपास करत ते पोलिसां समवेत तिथे पोहोचतात. त्यामुळे सोमु समोर येत नाही. सुदैवाने ती बरी होते. तिची स्मृती परत येते. ती स्नेहलता होते. रेशमी म्हणून सोमु बरोबर जगलेला कालखंड तिच्या विस्मरणात जातो. पूर्वी स्नेहलतेच्या काळात झालेला स्मृतीदोष नाहीसा झाल्यामुळे के.सोमप्रकाश हा तिच्यासाठी संपूर्णतः अपरिचित असतो. सोमुला ती ओळखुही शकत नाही. रेशमी आता अस्तित्वातच नसते आणि स्नेहलतेला ती अपरिचित असते. तिच्या रुपात त्याच्या अनाथ एकाकी आयुष्यात उगवलेली हिरवळ करपून जाते. अशा कथानकावर सदमा बेतलेला आहे.
भावनिक कथानक, कमल हसन–श्रीदेवी यांचा उत्कृष्ट अभिनय यांच्या बरोबरीनच गुलजार यांची आशय संपन्न गीतं, येसुदास, सुरेश वाडकर यांचं गायन, आपल्या हिंदी चित्रसृष्टीत पदार्पणातच इलाईराजा यांचं संगीत; या गोष्टीनी चित्रपटाचं सौंदर्यवर्धन करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. ‘सूरमयी अखियों में’ आणि ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ ही गुलजार यांच्या रूपकात्मक शैलीतून झरलेली हळवी, दवबिंदूं प्रमाणे निर्मळ, बाळबोध गाणी तर सोने पे सुहागा म्हटली पाहिजेत.
सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं ऐ जिंदगी हे गीत कानांनी ऐकत असताना डोळ्यांनी पाहिलं, वाचलं तर रुपकातील आशय अधिक सुस्पष्ट उलगडत जातो.
ऐ, ज़िन्दगी गले लगा ले
हमने भी तेरे हर इक ग़म को
गले से लगाया है, है ना?
ऐ, ज़िन्दगी गले लगा ले
ऐ, ज़िन्दगी...
जीवनातल्या दुःखांचा विना तक्रार स्वीकार केला आहे तेव्हा आता जीवना तूही मला स्वीकार हा झाला शब्दार्थ. पण गीत गुलजारचं आहे तेव्हा त्यात छुपा मतितार्थ ही असणारच. अपघाता नंतर विस्मृतीमुळे पाच सहा वर्षांच्या मुलीसारखं वागणाऱ्या स्नेहलतेला, म्हणजेच पूर्वेतिहास माहित नसल्यानी सोमुसाठी रेशमी असलेल्या; वेश्यालयाच्या चंगूल मधून सोडवून आणून तिची सर्व तऱ्हेने देखभाल करता करता या अनाथ, सद्वर्तनी, सरळ, हळव्या शिक्षक सोमुला हळूहळू तिच्या बाबत ओढ जाणवू लागते. गुलजार यांनी तिच्यासाठी जिंदगी हे रूपक योजून सोमूच्या मनातील, जशी मी तुझी दुःखे माझी म्हणून स्वीकारली आहेत तसच रेशमी तूही मला स्वीकारावंस हा आशय किती छानपणे समोर आणला आहे.
हमने बहाने से, छुप के ज़माने से
पलकों के पर्दे में घर भर लिया
तेरा सहारा मिल गया है ज़िन्दगी
ऐ, ज़िन्दगी गले लगा ले
सोमु मोठी रक्कम खर्च करून, फिरायला घेऊन जाण्याचं कारण देत, वेश्यागृहात अडकलेल्या रेशमीला, तिथून बाहेर काढतो आणि लोकांपासून लपवून थेट तिला आपल्या घरी घेऊन जातो. पापण्यांच्या पडद्याआड जतन करतो. अनाथ सुमोला जणुकाही रेशमी रुपी एक सहाराच मिळातो.
छोटा सा साया था, आँखों में आया था हमने दो बूँदों से मन भर लिया
हमको किनारा मिल गया है ज़िन्दगी
ऐ, ज़िन्दगी गले लगा ले’
इथे साया शब्द गुलजारनी स्वप्न या अर्थी घेतला असावा किंवा रेशमीची मानसिक स्थिती बघता तिचा सहारा म्हणजे बुडत्याला काडीचा आधार या अर्थी असू शकेल. रेशमी रुपी एक छोटंस स्वप्न साकारलं गेलं आणि किनारा गाठल्याचं समाधान सोमुला आहे. किंवा सोमुच्या एकाकी जीवनात रेशमी एखाद्या छोट्याशा सावली सारखी आली आणि त्यांनी ती डोळी भरून घेतली. अशाप्रकारच्या त्याच्या भावना गुलजारनी व्यक्त केल्या आहेत. या ठिकाणी का कोण जाणे वा. रा. कांत यांच्या डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी लोकप्रिय केलेल्या‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे’ या कवितेतल्या,‘दोन थेंबांच्या क्षणांचे प्रितीचे तकदीर माझे’ या ओळीची आवर्जून आठवण होते.
ऐ जिंदगी गले लगा ले
https://youtu.be/8A30PWazxMU?si=tlVJW-8REAdKSQCA
इलाईराजा यांनी आरंभिक(prelude) आणि आंतरिक(interludes) संगीतानी गाणं छान सुशोभित केलं आहे. पाश्चिमात्य वाद्यांच्या सुरेल मेळ्यात सतारीचे बोलांची पखरणही किती सुमधुर वाटते. विदेशी गवताच्या पाचूच्या लॉन वर पडलेला शेफाली(प्राजक्त) सडाच जणूकाही. गंमत म्हणजे सदमा ज्या मूळ मुंदरम पिराई या तमिळ चित्रपटावर आधारित आहे, त्यात या सुरावटीचं गाणंच नाही. कारण मूळ तमिळ गीताच्या मिटर मध्ये बसेल असं हिंदी रुपांतरण करण्यात काही अडचणी येत होत्या म्हणून एक संपूर्ण नवीच स्वररचना(धून) रचण्यात आली.
इथवर रेशमी बाबत ज्या हळुवार भावना सोमुच्या मनात निर्माण झालेल्या आहेत त्यांची पाळंमुळं सहवासाच्या ओलाव्यानी अधिक खोलवर गेली आहेत. सुमोची रेशमी मधली भावनिक गुंतवणूक अधिक वाढली आहे. तिलाही त्याची चांगलीच सवय झाली आहे आणि त्यांनी तिला एकटीला सोडून कुठे जाऊ नये अशी अपेक्षा पण निर्माण झाली आहे. अशावेळी गुलजार यांचे आशयघन शब्द किरवाणीच्या आधारानी उत्कट संगीत देऊन इलाईराजा यांनी, जणू मन उचंबळून आलंच पाहिजे अशा ईर्षेनी संगीत रचना केली आहे. येसुदास यांनीही त्यांच्या प्रयत्नांना आपल्या भावोत्कट गायनानी अप्रतिम न्याय केला आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा