स्मृतीबनातून –झूठे नहीं जूठे नैन


झूठे नहीं जूठे नैन 


चाला वाही

सकाळी डोळे उघडले ते समुद्र सपाटी पासून साधारण  11 हजार फूट उंचीवर असलेल्या लेह या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या छोट्या शहरात. सुदैवाने प्राणवायूची कमतरता तितकीशी जाणवत नव्हती त्यामुळे प्राणपाखरू विचरण करण्यासाठी सज्ज होतं. नाश्ता आटोपून 14 हजार फूट उंचीवरच्या पॅनगोँग लेक वर जाण्यासाठी निघालो. 

 

काही थोडा काळ रस्ता होता. मात्र पुढे बहुतेक मार्गक्रमणा खडकाळ कारवाटे( जर पायवाटेवरून वरून म्हणतो तर कारवाटेवरून का नाही?)वरून झाली. 

बाहेर पाहिलं तर सर्वत्र चमकणाऱ्या पांढऱ्याशुभ्र त्रिकोणी टोप्या घातलेली हिमशिखरं स्वागताला उभी होती. अधून मधून क्वचित कुठे दिसणारी खुरटी हिरवी झुडपं सोडली तर  निळशार लख्ख आकाश आणि खाली जणू राखाडी वस्त्र ल्यायलेला खडकाळ भूप्रदेश. उंच पहाडां मधलं वाळवंटच जणुकाही. 

प्रवासात संगीताची सोबत आवश्यकच. योगायोग म्हणजे पहाडी वाळवंटातील प्रवासा दरम्यान पठारावरच्या वाळवंटी प्रदेशाच चित्रण असलेल्या लेकीन चित्रपटातील सत्यशील देशपांडे यांच्या आवाजातील  विलंबित ख्याल निके घूँघरिया ठुमकत चाल चलत’...आणि पाठोपाठच आशाताईंच्या आलापीनं सुरू झालं अध्यातलं ‘जूठे नैन बोलें.’...

https://youtu.be/NZQY-WHU8YU?si=X0zWKSNvNUo4A1vh

गाणं संपलं आणि विचारचक्र फिरू लागलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 1895 मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या 'खुदितो पाषाण' (कोरीव पाषाण) या लघु कथेवर आधारित हा चित्रपट. 

कथानक

समीर नियोगी नावाच्या सरकारी अधिकाऱ्याला राजस्थानमधील एका पुरातन पडक्या हवेलीत मौल्यवान वस्तूंची यादी करण्यासाठी पाठवण्यात येतं. त्याच्या बरोबर काही असाधारण घटना तिथे घडू लागतात. त्याची  रेवा नावाच्या रहस्यमय स्त्री बरोबर भेट होते. मात्र ती भूत योनीत अडकली असते.  विश्वासघातकी, लैंगिक शोषण करणाऱ्या आणि अत्याचारी राजा परम सिंह याच्या पासून पळून जाण्याचा भूतकाळात केलेल्या तिच्या प्रयत्नाची कहाणी ती उलगडू लागते. तेव्हा तिची तुरुंगात पाठवणी केली गेली असते. पळून जाण्याचा प्रयत्नात असताना वाळवंटात आलेल्या वाळूच्या वादळात तिचा मृत्यू होतो. रेवाला पळून जाण्यात मदत करणारा पूर्वजन्मातला मेहरू, या जन्मीचा समीर असतो. अखेरीस तो तिला मुक्त करतो. असफल प्रेम, पुनर्जन्म, मुक्ती अशा संकल्पनांवर लेकीन चित्रपट आधारित आहे.

गीत–संगीत

दिग्दर्शक, गीतकार स्वतः गुलजार आहेत. संगीत दिग्दर्शन हृदयनाथ मंगेशकरांचं आहे. अनेकदा गीताची चाल एकदा मनात भरली की त्यातील शब्दांकडे, व्हायला नको, पण काहीवेळा काणाडोळा होतो. कुसुमाग्रजांच्या ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या गीतातील ‘वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची’ ही ओळ गाताना मानसाची ऐवजी माणसाची असं काहीवेळा गायलं जातं. ‘जूठे नैन बोले’ या गीतात मुखड्यात जूठे आणि अंतऱ्यात झूठे असे शब्द गुलजार यांनी योजले आहेत. मात्र या गीताचाही पहिलाच शब्द काहीवेळा, काही जणांकडून, जूठे ऐवजी झूठे असा उच्चारला जातो. इथे सच झूठ हा अर्थ नाही, तर आपल्या अगोदर दुसऱ्या स्त्रीला पाहिल्यामुळे आता आपल्याला पाहणारे  प्रियकराचे डोळे/नजर उष्टवलेली आहे अशी प्रेयसीची अतिशय प्रेमासक्त सुंदर भावनिक संकल्पना कवीला मांडायची आहे. गुलजार यांची रचना म्हटलं की त्यात शब्द, भावना यांची जादुई कसरत असणार हे ओघानी आलचं. 'मेरी लिखी बातोंको हर कोई समझ नही पाता क्योंकी, मै एहसास लिखता हूं और लोग अल्फाज पढते है' असं त्यांनी स्वतःच म्हटलं आहे. अर्थात साधारणतः लोक अल्फाझ म्हणजे शब्दच वाचणार. कारण एहसास ही संपूर्णतः व्यक्तिगत बाब असल्यामुळे लिहिणारा आणि वाचणारा हे दोघेही एकाच मानसिक पातळीवर असतील तरच तो वाचू/समजू शकण्याची अंधुकशी शक्यता असते.

निके घूँघरिया ठुमकत चाल चलत

पैंजणांची नाजूक किणकिण ऐकू येते आहे

ठुमकत मोहक पदन्यास करत तू येते आहेस

‘जूठे नैना बोले सांची बतियां 

नित चमकावे चाँद काली रतियां

जूठे नैना बोले सांची बतियां’

तुझी उष्टी झालेली नजर आता खरी कहाणी उजागर करते आहे. चंद्रप्रकाशात रात्रीचा अंधार उजळून निघावा ना अगदी त्याप्रमाणे.

‘जानू जानू झूठे माही की जात 

किन सौतन संग तुम काटी रात’

माझ्या अप्रामाणिक प्रियकराचं खरं स्वरूप मी जाणून आहे की त्यानी कुणा सवती बरोबर रात्र घालवली आहे.

अब लिपटी लिपटी

अब लिपटी लिपटी बनाओ न बतियां

जूठे नैना बोले सांची बतियां’

‘बोलो बोलो कैसी भायी सांवरी 

जिस को दे दे नी मोरी मुन्दरी’

मला सांग, तुला तिच्या सावळ्या लावण्याचा इतका कसा मोह पडला? की तू तिला माझी अंगठी देऊ केलीस?

‘अब भीनी भीनी

अब भीनी भीनी बनाओ ना बतियां’

जूठे नैना बोले सांची बतियां 

नित चमकावे चाँद काली रतियां’

आता उगीच लांबलचक खुलासे करण्यात काही अर्थ नाही.

तुझ्या डोळ्यातील खोटे भावच मला सत्य कहाणी सांगत आहेत

चंद्रप्रकाश काजळी रात्र उजळून टाकतो ना अगदी त्याप्रमाणेच.

संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी बिलासखानी तोडी रागात हे गीत अप्रतिम बांधलं आहे. सुरवातीचा ख्याल आणि पखवाज, सारंगी, सतार यांच्या उपयोग करत जे आंतरसंगीत(interlude) पेरलं आहे त्यानी गाण्याच्या व्यक्तिमत्वाला कसं एकदम खानदानी रूप आलं आहे. कारुण्य, दुःख आणि रसग्राही असा हा राग आहे. तानसेनच्या मृत्यू नंतर शोकाकुल झालेला त्याचा मुलगा बिलास खान यानी अंत्यसंस्कार समयी या रागाची निर्मिती केली अशी एक वदंता ऐकिवात आहे. ही अप्रतिम बंदिश गाताना आशा ताईंनी आपलं सर्व गानकौशल्य पणाला लावलं आहे. आपण गायलेल्या सर्वात कठीण गाण्यांपैकी हे एक आहे असं त्यांनी एकेठिकाणी म्हटलं आहे. गंमत अशी की चित्रपटाशी संगत नाही म्हणून या गाण्याला कट लावण्याच्या विचारात दिग्दर्शक गुलजार होते. सत्यशील देशपांडे यांनी दिलेली सुरुवात आणि समापनाचा तराणा गाण्याला आगळाच उभार देऊन जातात. अखेरीस समीरला रेवा जी कहाणी सांगते त्याठिकाणी स्वप्नसुंदरीच्या (हेमामालिनी) कथक नृत्याच्या बहारदार अचपळ पदन्यासाच्या संगतीत रेवा, समीरला  तिच्या मोठ्या बहिणीची म्हणजेच ताराची कहाणी सांगते असं चित्रण झाल्यामुळे गुलजार, आशा, सत्यशील देशपांडे, हृदयनाथ, हेमामालिनी या पंचतत्वांच्या एकत्रित प्रतिभेच्या प्रासादिक अनुभवाला रसिक पारखे झाले नाहीत.



नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

19122025

Nagpur 




















टिप्पण्या

  1. वा! नितीन भाई,
    किती बारकावे टिपलेत तुम्ही या गाण्यातले. लेकीन चाकोरी बाहेरचा छान चित्रपट होता.
    आशा ताईनी या गाण्यात कमालच केलीय।
    तुमचा हा लेख अप्रतिम गुलजार यांच्या कवितेसारखा.

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच छान माहिती. वाचल्यावर गाण परत ऐकणारच.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती