स्मृतीबनातून – उदयोस्तु(पद्य)
उदयोस्तु
ओढून केशरी रजाई निद्रेत होती अवनी
तेजाळ शुक्र तारा गेला हळू निघूनी
कोवळी लाल किरणं अवघ्या क्षितिजावर शिंपूनी
उदयास मित्र आला पूर्वा नाहली तेजानी
झुलत्या पर्णांवरी दहिवर चमकती ते खुशीनी
मिटल्या कलिका फुलांच्या सांडती गंध उमलूनी
फिरला गंधीत वारा गेला सुगंध वाटूनी
उदयास मित्र आला पूर्वा नाहली तेजानी
किलबिल पाखरांची मग गोड आली कानी
चैतन्य नाचले सर्वत्र सोडली निद्रा जगानी
प्रभा नवी समोरी पातली सुहास्य वदनी
उदयास मित्र आला पूर्वा नाहली तेजानी
(दहिवर–दवबिंदू)
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
221220250900
Nagpur

खूप छान काव्य रचना केली आहेत आपण.
उत्तर द्याहटवा