स्मृतीबनातून – चुकावे परी प्रीतिरूपी उरावे

 


चुकावे परी प्रीतिरूपी उरावे



प्रास्ताविक

To err is human’ ही इंग्रजी म्हण आपणा सर्वांना सुपरिचित आहे. चुका होणं, करणं हा सर्वसाधारण मनुष्य स्वभाव आहे. अर्थात म्हणून चुकांच कुणी समर्थन करायला जाऊ नये. शिवाय त्यांची पुनरुक्ती तर अवश्य टाळलीच पाहिजे. नवीन चुका झाल्या तर एकवेळ हरकत नाही पण तीच ती चूक परत परत करणं मात्र खचितच पूर्णतः चुकीच आहे. बरं, झालेल्या किंवा केलेल्या चुकांच समर्थन करायचं, अवडंबर माजवायचं की त्या मान्य करून जीवनधारा प्रवाही ठेवायची हे ज्याच्या त्याच्या विवेक बुद्धीवर निर्भर असतं. प्रितीच्या प्रदेशात प्रेमभावना जर खरी असेल तर तिथे कुणी कितीही चुका केल्या तरी क्षमाशीलतेचीच कास धरणं हे सर्वार्थानं श्रेयस्कर. तिथे चुकांपेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचं असतं. चूक की बरोबर यापेक्षा प्रेम अनमोल असतं, नाही का? बहुदा म्हणूनच ‘लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीत’...असं प्रामाणिक कथन, कुठलाही अभिनिवेश न बाळगता तो किंवा ती मोकळ्या मनानी करू शकते.

काव्य सौंदर्य आणि संगीत

आपल्या शब्द लालित्य भांडारातून नेमके शब्द हेरून उत्कृष्ट तरल भाव निर्मिती करण्यात पाडगावकरांचा हातखंडा होता. मोहक, सूचक आणि आशयघन चालीरीती योजून त्या शब्दांना यशवंत करण्यात देवांकडून जराही कुसूर होणं शक्यच नाही आणि अरुण दातेंचा आवाजच मुळी इतका साजूक, मृदुल, सोज्वळ की, उत्तम सुरावटीत, आशयानी चिंब भिजलेले शब्द, हे त्यांच्या स्वरात, चांदण्या रात्रीतल्या दवाच्या तुषारांनी टवटवीत झालेल्या लतिकांसम होऊन जातात. त्यात इथे तर पार्श्वभूमी ही प्रेमाची आहे. ते असफल झालं असं ठामपणे जरी सांगता येत नसलं  तरी हातून निसटल्या सारखी परिस्थिती जरूर भासते. 

विरहाची आर्तता:

‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती’

प्रेम असफलतेच्या पायवाटेवरून मार्गक्रमणा करत असताना त्या दोघातल्या ती किंवा तो यापैकी कुणा एकाची जर ही भावना असेल तर  व्यवहाराची भेसळ होऊन ते प्रेम अपेक्षांच्या जाळ्यात सापडलं असण्याची  दाट शक्यता. कारण हे प्रेम जर निरपेक्ष, निर्व्याज असेल तर ही भावना समसमानतेनं दोघांचीही असायला हवी. बहुतेकदा आपला अशा प्रेमाशी परिचय नसतो गोकुळ वासियांनी मात्र कधीकाळी तशा प्रेमाचा अनुभव घेतला. आपण फक्त त्याची वर्णनं ऐकून असतो. 

प्रेमाचार 

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

अपेक्षांच्या ओझ्याआड दडलेल्या प्रेमात ते फुलण्या आधीच कोमेजण्याची शक्यता ही नेहमीच अधिक असावी. अशा प्रेमातली विफलता ही डोळ्यातल्या पाण्यात प्रतिबिंबित होऊन साक्ष देत राहणार. उरी घाव बसणार आणि क्रंदन गीतातून व्यक्त होणार. निरपेक्ष प्रेमातही ‘असुवन जलं सिंच सिंच प्रेमबेल बोइ’ असं म्हटलं असलं तरी ते परस्पर अतूट असत ‘जो तुम तोडो पिया मैं नहीं तोडूं’ असा भाव त्या ठिकाणी असतो.

आभाळ आणि माती रुपकं 

‘सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती’

पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा विचारही न करता आपली पात्र मर्यादा खुशाल झुगारून देत काहीवेळा नदी बेधुंद वाहते. खरं प्रेम हे असंच समर्पणाच्या भावनेतून फुललेलं असतं आणि कायम राहतं. चित्रपटांच्या सिक्वेल प्रमाणे प्रेम पुनःपुन्हा करता येत नाही. त्या भावनेनी ओथंबलेल्या मनाला पाडगावकरांनी आभाळाची उपमा दिली आहे. या आभाळाला माती म्हणजेच सच्च प्रेम एकदाच भेटतं.

सुगंध आणि काटे

‘गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी’

प्रितीचे गोडवे गायला आणि वर्णनं ऐकायला कितीही गोड वाटलं आणि खऱ्या प्रितीची वाट गांधळलेली जरूर असली तरी अगदी क्वचितच निष्कंटक वाट वाटसरूच्या नशिबी येते. असं जरी असलं तरी गंधमोहिनीच अशी असते की वाटचाल सोडून देता येत नाही.

अंतरीचे गूज

‘आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती’

सुगंध म्हटल्यावर तो कायम दरवळत राहील असं कसं शक्य आहे. कधीतरी तो विरणारच. अशावेळी जर विरहार्त गीत कानावर पडलं तर ती माझी आंतरिक प्रांजळ प्रीतभावना समजून तू आपल्या नेत्रात मला सामावून घ्यावस. कारण कितीही चुका केल्या असल्या तरी अखेर पर्यंत तुझ्यावर माझं निरलस, निर्व्याज प्रेम राहणार हे तू समजून घ्यावंस.

https://youtu.be/33hkBtgvbao?si=8-B6NJFV-X_sA7ja

कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही एक सुंदर, अजर कविता. संगीतकार यशवंत देवांनी तिचं भावगीत केलं आणि गायक अरुण दातेंनी ते लोकप्रिय केलं. मराठी भावसंगीतधारा समृद्ध आहे. विषय प्रेमाचा आहे. गीत रचनेत कितीही आशय असला, सुरेख असली तरी ती चटकन नजरेत भरेलच असं नाही. पण तेच शब्द सूरांच्या संगतीनं जेव्हा कानावाटे मनात शिरतात त्यावेळी शब्दसूरांच हे एकत्रित सौंदर्य रसिकांना मोहविल्या शिवाय राहत नाही. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी' हे केवळ एक गीत नाही, तर ती एका हळव्या प्रेमी जिवाची प्रांजळ कबुली आहे. इथे विरह वेदना जरी प्रबळ असली तरी आदळ आपट न करता प्रेमाच्या वास्तविकतेचा स्वीकार करून केलेलं निरहंकारी आर्जव आहे. संधिप्रकाशात भूतकाळाकडे बघताना होणाऱ्या पश्चात्तापापेक्षाही, मनापासून प्रेम केलं या समाधानाचा हुंकार या गीतातून उमटतो. म्हणूनचलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती’- ही अभिव्यक्ती या कवितेचा प्राण आहे. हे निव्वळ विरह गीत नसून तो प्रेमाच्या अजेय शक्तीचा लोभस तराणा आहे. उत्कटता, उदात्तता, हळवेपण, विरह आणि असीम समर्पण अशा पंचतत्वांचा आविष्कार या शब्द–सूर संगमातून अविरत प्रवाहित होतो. 


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

25122025

Nagpur 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती