स्मृतीबनातून – जिंदादिल भाऊसाहेब
जिंदादिल मराठी शायर
प्राण साऱ्या मैफलीचे,यांनाच आम्ही मानतो नुसतेच ना या मैफलीचे, आमुचे स्वतःचे मानतो"
मराठी शायरी आणि शायर
तसं बघायला गेलं तर ती त्यांच्या आयुष्यात खूप उशिरा म्हणजे पन्नाशी उलटून गेल्यावर आली. ती नखशिखांत अस्सल मराठमोळी होती. तिच्यात उर्दू शब्दवती(रूपवती चाय धर्तीवर) सारखीच विलक्षण कमनियता आहे, तशीच पुरेपूर नजाकत देखील; पण अनुनय लवलेश मात्र ही नाही. ती पूर्णतः स्वयंभू आहे. ती आहे मराठी शायरी. निवृत्ती नंतर अनेकांच्या आयुष्याचा प्रवास जिथे रुक्ष, निरस वाटेनी होताना दिसतो तिथे अस्सल मराठी शायरी ही साठीतल्या एका जिंदादिल व्यक्ती वर भाळली. कोण होती ही व्यक्ती? ती होती मराठी शायरीची उद्गाती, वासुदेव वामन पाटणकर उर्फ भाऊसाहेब. त्यांनी श्रृंगार, विनोद, जन्म, मृत्यू, दर्शन आदी विविध विषयस्पर्शी सशक्त आणि रसरशित शायरी साठोत्तरी आयुष्यात लिहून तरुणाईला त्याची लज्जत चाखायला दिली. त्यांनी लिहिलेली शायरी अस्सल मराठी आहे. ती उर्दुतून भाषांतरित केलेली तर नाहीच नाही पण त्या संस्कृतीशी साधर्म्य ही न सांगता संपूर्ण मराठी परिवेश परिधान करून रसिकां समोर अवतरते.
आता स्वर्गलोकात वावरणाऱ्या अप्सरा आपल्या पाहण्यातल्या कशा असणार? आपण सर्व त्यांची रसभरीत वर्णनं ऐकून कल्पनेत रंगवीत असतो. पण भाऊसाहेबांच्या शायरीचं लावण्य हे स्वर्ग लोकीच्या अप्सरां पेक्षाही अधिक असावं असं वाटतं. या भूतलावर ज्यांना कुणीही आणि कधीही पाहिलं नाही त्या मेनका, रंभा, उर्वशी यांची या मर्त्यलोकी किती मात्तबरी आहे! त्या मेनकेनं तर म्हणे विश्वामित्र यांच्या सारख्या घनघोर तपस्व्याचा ही तेजोभंग केला. पण अश्या या मानिव लवण्यवतींचा भाऊसाहेबांनी केला इतका तेजोभंग कोणी केला नसेल. ते म्हणतात
“इंद्रा अरे सांगू नको त्या मेनका अन उर्वश्या
कोणा हव्या विसळून तुमच्या या चहाच्या कपबश्या?” पुढे जाऊन ते स्वर्गातल्या कल्पवृक्षाचा ही पाणउतारा करायला मागेपुढे पाहत नाही. ते लिहितात “कल्पवृक्षाची तुझ्या या ना आम्हा मात्तबरी आमुच्या या कुंपणाची त्याहुनी मेंदी बरी” पण असं जरी असलं तरी याला त्यांचा उद्दामपणा, उद्धटपणा म्हणता येणार नाही. ते हे का म्हणू शकले? कारण “स्वर्गात जाऊन आता काय मज मिळवायचे, मिळविले सारेच येथे जे स्वर्गात मिळवायचे” हाताचे सोडून पळत्याच्या मागे न लागता, वृथाच संयम, नैतिक अनैतिकतेच्या अशाश्र्वत जाळ्यात गुरफटून, अळणी आयुष्य जगून, मानवी भावभावनांचा गळा न घोटण्याचा मोलाचा संदेशच जणू ते आपल्या शायरीच्या माध्यमातून देतात. स्वर्गात कोणाला न्यावं हे इंद्र देवाना त्यांनी सुचवलं आहे. ते म्हणतात “त्यांनाच ने स्वर्गात ज्यांनी त्रास येथे भोगला राहुनी नुसत्या संयमाने वनवास येथे भोगला”
हजल
हास्य कविते प्रमाणे गझलेत हास्य गझल म्हणजेच आता ज्याला हजल असं म्हणल्या जातं, तो प्रांतही भाऊसाहेबांनी नुसता पादाक्रांत केला असं नव्हे तर आपल्या जिंदादिल विनोदबुद्धीनं त्यावर यथार्थ अधिकार सिद्ध करून काबीज केला. गुलाबी पत्रांचं निमित्त करून स्वतःचीच दिलखुलास टिंगल करताना ते म्हणतात “पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडीली, धाडीली होती अशी की नसतील कोणी धाडीली, धाडीली तिने मलाही काय मी सांगू तिचे, सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे”. इथेच ते थांबत नाही. स्वर्ग हाती आल्यागत रोमान्स एका खास उंचीवर नेऊन तिथून ते त्याचा कसा कडेलोट करतात बघा “पत्रात त्या जेव्हा तिचेही पत्र हाती लागले वाटले जैसे कुणाचे गाल हाती लागले, पत्रातही हाय काय ती लिहिते बघा, रोमान्स असा चरम पातळीवर नेऊन सगळ्यांची उत्कंठा ताणून पुढच्या क्षणी ते धक्का देत नाकावर पाडतात “माकडा आरशात अपुला चेहरा थोडा बघा” एक मिनिट, इथेच थांबू नका आणखी थोडं पुढे जाऊया “सार्थता संबोधनाची आज ही कळली मला, वैयर्थताही यौवनाची ती ही आता कळली मला, नाही तरीही धीर आम्ही सोडला काही कुठे, ऐसे नव्हे की माकडाला माकडी नसते कुठे”
शायरी कोणासाठी
सुरे शिवाय शायराचा मुळी सूर लागतच नाही. शायरीची ही उठबस उठाठेव आपण कोणासाठी करतो, ही निर्मिती कोणासाठी करायची या बाबत त्यांच्या मनात अतीव स्पष्टता होती. त्यांचा हा आगळा अंदाज बघा…
“उन्मेष ज्यांच्या यौवनाचा न झाला कमी, प्यायले जे खूप त्यांना वाटे झाली थोडी कमी
निर्मिली मी फक्त माझी त्यांच्या साठीच शायरी, इतरास मी सांगतो बाबा वाचा सुखे ज्ञानेश्वरी”
शायरीचा मराठी ढंग
शायरी ह्या काव्य प्रकारात दुःख, यातना अशा भावनांचा प्रामुख्यानं समावेश होतो. हजल साठी मिश्किल शेर लिहिणारे भाऊसाहेब गंभीरपणे शायरी बद्दल भावना व्यक्त करतात तेव्हा मनाला चटका लावून जातात “अंतरीच्या यातनांना अमरता द्याया इथे, शायरीचा ताज मी ही निर्मिला आहे इथे, स्पर्शून त्या शिल्पास तेथे यमुनाच नुसती वाहते, यमुने सवे गंगा ही येथे नयनातून वाहते” डोळ्यातून गंगा यमुना वाहणे या मायबोलीतील वाक्प्रचाराचा किती चपखल, नेटका उपयोग करत शेर आशय गर्भित केला आहे पहा. “विरहातले सौंदर्य जेव्हा शिल्पातूनी कोठे कधी साकारते, साकारते शिल्पात जैसे शब्दातही साकारते”
विरह वेदना ही काही सुंदर शिल्पाच्या माध्यमातूनच साकारत अस नाही. शिल्पाच्या माध्यमातून ती जशी साकारते तशीच ती शब्द धनातूनही साकारली जाऊ शकते असं ते सांगतात.शायरी म्हटली म्हणजे प्रेम, प्रेमभंग, साफल्य, वैफल्य अशा मानवी भावनांची कैफियत मांडण्याची हक्काची जागा. साहजिकच भाऊसाहेबांनी अशी बरीच शायरी लिहिली. उर्दू शायरीतलं फार कळतं अशातला जरी भाग नसला तरी लोकप्रिय शायरी थोडीफार ऐकून असं जाणवतं की उर्दू शायरी आणि भाऊसाहेबांच्या मराठी शायरीचा मिजाजे इश्क भिन्न आहे. तिथले बहुतेक मजनू लाचार वाटावे इतके लैलेच्या आणि सूरेच्या आहारी गेलेले दिसतात. भाऊसाहेबांच्या शायरीतला प्रेमी हा बहुतेक ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रेम'वीर' म्हणावा असा आहे. तो प्रेमात बुडतो पण स्वतःची आब राखून. प्रेमात तो ही हळवा तर होतो, पण कसा? ‘रडलो इश्कात आम्ही जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले”
आग आहे इश्क काय उपमा दुसरी द्यायची पेटूनियाही यात नसते राख होऊ द्यायची
ऐसे नव्हे आम्हास आहे इन्कार तू नुसता दिला, नसता दिला कोणीच ऐसा दर्द तू आम्हा दिला”
आसुंवरी अधिकार हा ईश्कात ज्याला साधला नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे साधला’
बाणेदार प्रेमालाप
त्यांच्या शायरीत भेटणारा शायर हा सौंदर्य वृत्ती बाळगून असला तरी तितकाच बाणेदार आहे. ‘हसतील ना कुसूमे जरी, ना जरी म्हणतील 'ये'
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती अमुची नव्हे
भ्रमरा परी सौंदर्यवेडे आहो जरी ऐसे आम्ही
इश्कातही नाही कुठे भिक्षुकी केली आम्ही
खेळलो इश्कात आम्ही बेधुंद आम्ही खेळलो
लोळलो मस्तीत नाही पायी कूणाच्या लोळलो
अस्मिता इश्कात सा-या केव्हांच नाही विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो’
प्रीती पथावर वाटचाल करताना आगीशी खेळण्याची दिलेरी त्यांचा प्रेमवीर दाखवतो. एखाद्या व्रतस्था सारखा तो अग्नी पूजा बांधण्याची तयारी ठेवतो.
‘पाहता ओशाळूनी तू मान खाली घातली
बघवली नाही तुलाही आग तू जी लावली
पेटती ती आग आम्ही जन्मभर सांभाळीतो
प्रितीच्या पंथात आम्ही अग्नीपूजा मानतो’
भाऊसाहेबांची शायरी इश्काचा हा खेळ कोणी खेळावा, त्यासाठी कोणती पात्रता लागते ते ही सांगते.
‘दोस्त हो हा इश्क काही ऐसा करावा लागतो
ऐसे नव्हे नुसताच येथे जीव द्यावा लागतो
वाटते नागीण ज्याला खेळण्या साक्षात हवी
त्याने करावा इश्क येथे छाती हवी मस्ती हवी’
स्वप्नविलास
स्वप्न ह्या संकल्पनेवर रुबाया लिहितांना त्यांनी आपली प्रतिभेचा आविष्कार मांडताना सुरेख कल्पनाविलास केला आहे
‘भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते, येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते
म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या, सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या,
जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी, स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी
भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे, स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे,
त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा, नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा
ऐकिले दुसर्या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे,
बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे,
आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले,
पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले’
भाऊसाहेबांच्या शायरी कामनापूर्तीतून आलेल्या निर्वासनेचा पुरस्कार करताना दिसते.
आत्मविश्वास आणि अभिमान
भाऊसाहेबांनी मराठी शायरीला लखनऊ पासून देशभरात अनेक ठिकाणी फिरवून आणलं. तरीही ते नम्रपणे असं म्हणतात, ‘सांगेन काही भव्य ऐशी शायरी माझी नव्हे तो कवीचा मान इतुकी पायरी माझी नव्हे, आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो, सम्मानितो हासू तसे या आसवां सम्मानितो’ मात्र त्याच वेळी त्यांना आपल्या शायरीचा सार्थ अभिमानही होता. जिंदादिल माणसाला मोहित करेल अशी त्यांची शायरी होती. एखाद्या रुपगर्वितेला जशी स्वतःचा सौंदर्याची जाणीव असते तशी भाऊसाहेबही आपल्या शायरीचं सौंदर्य जाणून होते. म्हणूनच, ‘ऐकून माझी शायरी सांगेल जो आता पुरे तो रतीच्या चुंबना ही सांगेल की आता पुरे’ अश्या चपखल भिडणाऱ्या शब्दात दुर्दम्य आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात आपली नोंद उर्दू मुशायाऱ्यात जाऊन मराठी शायरीची चुणूक दाखवणारा पहिला मराठी शायर अशीच करावी लागेल हे देखील ते अत्यंत ठामपणे सांगतात.
जरावस्थेवर मार्मिक भाष्य
जीवनातल्या वृद्धावस्थेवर भाऊसाहेबांची शायरी अत्यंत मार्मिक भाष्य करते.
"वाटले नव्हते कधी हा काळ आहे यायचा, संपेल हे उद्यान आणि आहे सहारा यायचा, या ही स्थळी रेतीत आम्ही फुलबाग आहे लाविली, इतुकेच आज मी इथे नुसती अबोली लविली" तारुण्य म्हणजे वसंत बहार पण ते स्थायी नाही. कालमानानुसार ते ओसरणार आणि वाळवंटी प्रदेशही लागणारच. खरंतर या टप्प्यात सहाऱ्याची अधिक गरज असते. अशा या वृद्धापकाळात अनेकदा ही मौनाची, अबोलीची फुलबाग लावावी लागते. इथे फुलांना सुवास नसतो मात्र वार्धक्यातल्या मौनाच्या फुलबागेत स्मृतींचा सुगंध दरवळत राहतो आणि आसवांची सोबत ही असते. ते लिहितात
सांग तर आम्ही कशाला, कुंकू तुझे लावायचे" भाऊसाहेबांच्या शायरीत शृंगारपासून अध्यात्मिकते पर्यंत साऱ्याच संकल्पनांची अगदी रेलचेल आढळते. त्यांच्या लेखणीला मानवी आयुष्याच्या नानाविध प्रांतातला कुठलाच विषय वर्ज्य नव्हता. भाऊसाहेबांच्या शायरीत मानवी जीवनातील नानाविध भाव भावनांचा सुरेखासा फुलोरा फुलून आलेला बघायला मिळतो. विस्मयकारी कल्पनाविष्कार ही शायरीचं मर्मस्थळं आहे याची भाऊसाहेबांना जाण होती. त्यामुळेच त्यांची शायरी सुजाण रसिकाच्या मर्मबंधातली ठेव होऊन गेली. त्यांच्या शायराना प्रकृती बद्दल लिहावे तितके कमीच आहे. तेव्हा त्यांच्याच शब्दक्रीडेतून साकारलेल्या पत्त्यांच्या खेळातून त्यांच्या दर्शनिक प्रगल्भतेचं दर्शन घडतं.
पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे
आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला
राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली
दिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला
पंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला
विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले
भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले
नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे
आणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे
खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी
म्हणती तयाला ईश, म्हणति अल्ला कुणी, येशू कुणी
त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले
एका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले
आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला
आहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला
नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी
ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी
हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा
आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा
नितीन सप्रे

फारच छान!
उत्तर द्याहटवाSundar lihiles nehmi pramane mitra.
उत्तर द्याहटवा