स्मृतीबनातून – ‘बी’यांचा चाफा
‘बी’यांचा चाफा
कवी बी(Bee)
मराठी भावसंगीत विश्वात काही गाणी अजर अमर होऊन गेली आहेत. “चाफा बोले ना” हे गीत त्यापैकीच एक. पन्नास वर्षांहून अधिक काळ उलटला तरी रसिक मनावरची त्याची मोहिनी लवलेश मात्र कमी झालेली नाही. या काव्याबाबत जाणून घेण्याआधी केवळ प्रसिद्धीलाच सिद्धी न मानणाऱ्या त्याच्या कर्त्या विषयी ही थोडी माहिती घेऊया. चाफा या कवितेचे कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ ‘बी’ हे वैदर्भीय. तसं हे घराणं जरी कुलाबा जिल्ह्यातल्या वाशी गावाचं. वडील सरकारी नोकरी निमित्त विदर्भात आले आणि तिथेच स्थाईक झालेत. कवीचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचा. शिक्षणासाठी ते अमरावती, यवतमाळ इथे राहिले. मात्र घराच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही आणि विधी खात्यात कारकुनाची नोकरी धरावी लागली. त्याकरता त्यांना मूर्तिजापूर, वाशीम, अकोला अशी भटकंती करावी लागली. अठराव्या वर्षीच त्यांना कविता स्फुरू लागली. 1891 मध्ये त्यांची प्रणयपत्रिका ही पहिली कविता हरिभाऊ आपटे यांच्या करमणूक मध्ये प्रकाशित झाली होती. मात्र दुसऱ्या कवितेसाठी मध्ये दोन दशकांचा कालावधी जावा लागला. 1911 मध्ये त्यांनी बी या टोपण नावानं चाफा ही कविता मनोरंजन मासिकात प्रसिद्ध केली. आता बी हे टोपणनाव कसं रुजलं? तर मधु मक्षिकेच्या वृत्तीनं ते इंग्रजी आणि इतर साहित्याचं वाचन करीत म्हणून त्यांचे स्नेही शंकर विठ्ठल दीक्षित यांनी त्यांना ‘Bee’ बी हे नाव सुचवलं होतं. ते अत्यंत सरळमार्गी, चारित्र्यवान आणि पराकाष्ठेचे प्रसिद्धी पराङ्ग्मुख होते. या टोपणनावामुळे अनायसाच ओळख लपली. याच नावानं लिहिलेल्या “ट ला ट, री ला री जन म्हणे काव्य करणारी” या त्यांच्या वेडगाणे कवितेनं काव्यरसिक खरोखरच वेडे झाले. रेव्हरंड टिळकांना देखील ही कविता प्रचंड आवडली. उत्तरादाखल त्यांनी To Bee ही कविता मनोरंजन मासिकात त्वरित प्रसिद्ध केली. "ते जरी नावानं B असले तरी त्यांचं काव्यकर्तृत्व A1 दर्जाचं आहे” अशी मिश्किल टिपण्णी आचार्य अत्रे यांनी टोपणनावाच्या अनुषंगानं केली होती. ‘बी’ यांनी कवितेचं वारेमाप पीक कधीच काढलं नाही. त्यांच्या कवितांनी जेमतेम अर्ध शतकी खेळी केली. ‘फुलांची ओंजळ ’ या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहातील ३८ आणि ‘पिकले पान’ या दुसऱ्या छोट्या काव्यसंग्रहातील ११ अशा त्यांच्या मात्र ४९ कविता आहेत. ‘माझी कन्या’ ही त्यांची स्वानुभवावर आधारलेली भावनिक कविता माध्यमिक शाळेत शिकत असताना निर वाहे डोळा अशी स्थिती झाल्याचं स्मरतं आहे. बी हे नुसते कवी नव्हते तर ते चिंतनशील, तत्वज्ञ असे कवी होते.
‘चाफा बोलेना’
ही त्यांची कविता माझ्यापेक्षा वस्यस्कर. म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी लिहिली गेलेली. तेव्हा किमान पन्नासहून अधिक वर्ष तरी तिचा माझा परिचय आहे, मुख्यत्वे तिचं गीत झाल्यामुळे. इतर बहुतेकांच्या बाबतीतही हेच लागू पडत असणार. बरं परिचय झाला तोही अर्धवट, फक्त गेय अंगाचा. एकदा कानाला गोड लागल्यानंतर मग शब्द, अर्थ, आशय यांची ओळख करून घेण्याची तसदी अनेकदा घेतली जात नाही. अलीकडेच या कवी/गाण्यावर काही लिही असं एका शालेय मैत्रिणीनं सुचवल्यामुळे स्मृतीकोशात काहीसं मागे पडलेलं हे गाणं पृष्ठभागी आलं. ते पुनःपुन्हा ऐकत असताना गोड गळा आणि चाल या बाह्य सौंदर्याच्या बरोबरीनच थोडं अधिक चिकित्सक वृत्तीनं वाचन आणि शोध घेतला. यावेळी कवी, शब्द, आशय, राग अशी अन्य सौंदर्यस्थानं निरखली गेली. तेव्हा या गीताच्या सर्वंकष व्यक्तिमत्त्वाशी थोडी अधिक ओळख झाली. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन या उक्तीला जागून केलेला हा लेखन प्रपंच.
काव्याकडून गीता कडे
‘चाफा बोलेना’ या छंद, मात्रा, वृत्त अशा कुठल्याच बंधनात नातं नसणाऱ्या काहीशा ओबडधोबड शब्द रचनेशी सामान्य रसिकांची ओळख झाली ती लता दीदींमुळे. सुडौलता अजिबात नसलेली ही रचना आपल्या सुरेल आणि मधाळ स्वरात गाऊन त्यांनी ती प्रत्येकाच्या कानात भरेल, मनात ठसेल अशी “ऐसो सुंदर सुघडवा बालमवा” करून ठेवली. अर्थात राग यमनचा आधार घेऊन तिला रूपवान करण्यात संगीतकार वसंत प्रभूंच योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे. माझ्या असं वाचनात आलं की, हे काहीसं गूढ, रूपकात्मक काव्य वाचल्यानंतर त्याचं गाणं व्हावं असं लता दीदींच्या मनात आलं. श्रीनिवास खळे, यशवंत देव यांच्यासह अन्य काही संगीतकारांकडे त्यांनी आपला मानस बोलून दाखवला, पण ते घडलं नाही. त्यांनी वसंत प्रभूंना विनंती केली. प्रभूंनी ही मूळ बारा कडवी असलेली कविता वाचली आणि त्यातील सहा निवडक कडव्यांसाठी यमनाचा आधार घेत चाल केली. आणि चाफा असा काही दरवळला की त्याचा साठ वर्ष पुरातन सुगंध आजही अगदी तजेलदार आहे.
मूळ कविता
“चाफा बोलेना, चाफा चालेना,
चाफा खंत करी काही केल्या फुलेना ॥ध्रु०॥
गेले आंब्याच्या वनी
म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून.II 1 II
गेले केतकीच्या बनी
गंध दर्वळला वनी
नागासवे गळाले देहभान.II 2 II
आले माळ सारा हिंडुन
हुंबर पशूंसवे घालुन
कोलाहलाने गलबले रान.II 3 II
कडा धिप्पाड वेढी
घाली उड्यावर उडी
नदी गर्जुन करी विहरण.II 4 II
मेघ धरू धावे
वीज चटकन लवे
गडगडाट करी दारुण.II 5 II
लागुन कळिकेच्या अंगा
वायु घाली धांगडधिंगा
विसरुनी जगाचे जगपण.II 6 II
सृष्टि सांगे खुणा
आम्हा मुखस्तंभ राणा
मुळी आवडेना ! रे आवडेना !!II 7 II
चल ये रे ये रे गड्या !
नाचु उडु घालु फुगड्या
खेळु झिम्मा, झिम् पोरी झिम्-पोरी झिम् !II 8 II
हे विश्वाचे आंगण
आम्हा दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजणII 9 II
जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान.II 10 II
दिठी दीठ जाता मिळुन
गात्रे गेली पांगळुन
अंगी रोमांच आले थरथरूनII 11 II
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी-चाफा?कोठे दोघे जण ?”II 12 II
ऊहापोह
कविता सर्वांना एकाच रूपात दर्शन देईल असं काही निश्चित सांगता येत नाही. ज्याची जशी दृष्टी त्याला ती तशी दिसते. कर्त्याच्या मनात काही वेगळं असलं तरी, काव्य वाचल्या, ऐकल्या नंतर आस्वादकाच्या मनात जे काही विचार येतील, जे रूप साकारलं जाईल, तोच त्याच्यासाठी त्या कवितेचा अर्थ असतो. त्यामुळे एकाच कवितेचे अनेक अर्थ लावले जाणं यात कोणताही अनर्थ नाही. कुणाला ‘चाफा’ ही कविता म्हणजे कवीचं आपल्या काव्य प्रतिभेशी होणारं हितगुज भासेल, कुणाला अध्यात्मिकतेचा साक्षात्कार होईल तर कुणाला ते अवखळ प्रेयसीनं गंभीरपणा धारण केलेल्या आपल्या प्रियकराला चाफा कल्पून खेळकर, उत्साहित करून रास रंगवण्यासाठी चालवलेली सफल खटपट वाटू शकेल. आणि मग हे गीत म्हणजे अभिसारिके कडून व्यक्त झालेल्या, शुद्ध निरहंकारी प्रित भावनेचा मुक्तछंदी आविष्कार भासेल.“प्रेमाचं नितांत सुंदर सूक्त” अशा शब्दात आचार्य अत्रे या कवितेवर व्यक्त झाले होतेच. आपापल्या परीनं हे सगळेच बरोबर आहेत. हे प्रीतकाव्य आहे असं म्हटलं तर एकापरीनं“रंजिश ही सही” या उर्दू गझलेतल्या शायराची“आ तू भी कभी मुझको मनाने के लिये आ” ही इच्छा “चाफा बोलेना ” या मराठी काव्यात फलद्रूप झालेली बघायला मिळते. ‘ती’ ‘त्याची’ मनधरणी करून ‘त्याला’ फुलवण्यात यशस्वी होते.
गुढतेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर इथे चाफा (आत्मा) या प्रतीकाचा वापर करून आध्यात्मक पातळीवर जीवा शिवाचं ऐक्य दर्शवलं आहे. चाफा म्हणजे परमात्मा, तर त्यासोबतची मैना आणि खेळणारी तरुणी म्हणजे आत्मा/जीव. आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होण्याची ओढ लागली आहे, जिथे जीवपण संपून आत्म्याचे मूळ स्वरूप शिल्लक राहते.
याकडे जर काव्य निर्मिती मधले अडथळे अशा दृष्टीनं बघितलं तर चाफा म्हणजे कवीची काव्यप्रतिभा. ती रुसली आहे, तिला काही सुचत नाही, ती खंत करतेय, पण अखेरीस ती पूर्णत्वास जाते.
आत्म्या परमात्म्याशी एकरूप होणारी, किंवा कवीच्या काव्य-निर्मिती प्रक्रियेतील सूक्ष्म आणि सुंदर प्रवास, शाश्वत सुगंधाच्या रूपात व्यक्त करणारी किंवा गंभीर प्रियकराला प्रेमानंदासाठी उद्युक्त करणारी प्रेमातूर अवखळ अभिसारिका अशा परस्पर विरोधी अर्थासहित निरनिराळ्या रूपात 'चाफा बोलेना' ही कविता रसिकांना भेटताना दिसते. ज्याला जे रूप आवडेल त्यानं त्या स्वरूपाचा आस्वाद घ्यावा. एकच कलाकृती एकापेक्षा अधिक छटांमध्ये अविष्कारीत होणं हे त्या कलाकृतीचा अभिजात दर्जा अधोरेखित करणारं उच्च सर्जनशील मूल्य असल्याचं द्योतकच नाही का?
https://youtu.be/1h4Y2NPq1pE?si=vRkx0YOkZawziqbg
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
03012026
Thane
******


वा ! एका अवीट गोडीच्या कवितेवरील/गाण्यावरील सुंदर लेख !
उत्तर द्याहटवाकाय योगायोग आहे पहा ! काव्यचाफ्याचा मधुरस सुंदर शब्दात टिपला तो कवी 'बीं'नी,त्याला संगीतरूपाने फुलविले ते प्रभु 'वसंता'ने आणि त्याचे मधुर कूजन केले ते प्रत्यक्ष गान कोकीळेने ! गाणे अजरामर न होते तरच नवल !
वाह, मुळातून चाफा बोले ना ही कविता 12 कडव्यांची होती, हे आजच कळले. आपलं रसग्रहण आणि बी ह्यांच्याबद्दलची माहिती उत्तम आहे.
उत्तर द्याहटवा