कविराज : दर्शनिक गीतकार
कविराज : दर्शनिक गीतकार
प्रीती आणि क्रांती
‘ओ सजना बरखा बहार आइ रस की फुआर लायी’ या सारख्या सरल, तरल, उत्कट सदाफुली शब्दांतून हळुवार प्रीत भावना फुलवणारा कवी आणि ‘हर जोर जुलूम की टक्कर में हडताल हमारा नारा है’ असा क्रांतीचा जळजळीत एल्गार करणारा कॉमरेड, या कुणी दोन भिन्न व्यक्ती नसून एकच आहे असं सांगितलं; तर सकृतदर्शनी कुणाचाही विश्वास बसणं कठीण आहे. पण हे निखळ सत्य आहे. या परस्पर विरोधी भावनांची अभिव्यक्ती शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र या एकाच व्यक्तीच्या लेखणीतून साकारली आहे. ऐन तारुण्यात ध्येयवादाच्या अश्वावर आरूढ, वर्गसंघर्षावर मनात धगधगत असलेली आग शब्दरूपातून व्यक्त करणाऱ्या या प्रतिभावान कवीनं सामान्य माणसाच्या सुखदुःखाची, प्रीतीची, जीवन विषयक गहन तत्त्वज्ञान सांगणारी अनेक गीतं अगदी सरल शब्दात रचून आपल्या अमोघ काव्य प्रतिभेचा जणू पुरावाच सादर केला. साध्या शब्दांतून अर्थाशयाची सखोल दार्शनिकता उलगडून दाखवणं ही मुळी त्याची विशेषता. पण शब्दांच्या फुलोऱ्यानी चरितार्थ सजवता येत नसतो. म्हणून संसाराची गाडी रुळावर ठेवण्यासाठी या संवेदनशील, अवलिया कवीनं मुंबईत रेल्वेत वेल्डरची नोकरी धरली. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानका लगत असलेल्या रेल्वे वर्कशॉप मधल्या या नोकरी दरम्यान लोखंडाच वेल्डिंग किती आणि कितपत सफाईनं त्याच्या कडून घडलं हे सांगता येणं कठीण आहे पण शब्दांच वेल्डिंग म्हणाल तर ते मात्र अनुपम, बेमिसाल अतुलनीय घडलं. कामगार चळवळीतही ते सक्रिय होते. वर्गसंघर्षा वरच्या त्यांच्या तडफदार कविता नेहमीच सभा गाजवित. कारखान्याच्या त्या शुष्क खडखडाटातही त्यांच्या मनातला काव्यझरा कधीच आटला नाही. स्वातंत्र्य लढ्यातील सत्याग्रहींसाठीही ते कविता रचू लागले मात्र कार्यस्थळी घडणाऱ्या या काव्यप्रसूतीमुळे त्यांच्यावर वरिष्ठ नाराज असत. अखेरीस नोकरीला तिलांजली देऊन त्यांनी आंतरिक उर्मी जिवंत राखली. त्यांच्या रूपानी हिंदी चित्रनगरीला पहिला सुपरस्टार गीतकार मिळाला. आपल्या हृदयस्पर्शी ओघवत्या गीतरचनांमुळे तो हिंदी चित्रसृष्टीत ‘आसमान का तारा’ ठरला.
सोपे शब्द मोठा आशय
एखादा विषय, एखादा आशय जड, कठीण शब्दात मांडणं एकवेळ सोपं म्हणता येईल पण तीच गोष्ट सध्या, सरळ, सोप्या शब्दात मांडायची म्हटलं तर महाकठीण कर्म असतं. शैलेंद्रच्या लेखणीला मात्र हे सहज साध्य होत असे...
‘किसी की मुस्कराहटों पे हो निसार,
किसी का दर्द मिल सके तो ले उधार,
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है’
त्याच्या गीतांमधल्या मानवी जीवन, मृत्यू, प्रेम आणि नाते संबंध यांच्या संवेदनात्मक चित्रणात दर्शनिक स्पर्शगंध बेमालूम शिंपले गेले आहेत. त्यातून जीवन विषयक तत्त्वज्ञान ओतप्रोत भरून वाहतं. म्हणूनच त्याकडे निव्वळ चित्रपट गीतं म्हणून पाहणं हे अनुचित होईल आणि ग्रहणशक्तीची लघुताच सिद्ध होईल. त्याची गीतं ही केवळ चित्रपट गीतं नव्हेत तर ती साहित्यिक मूल्य सामावलेली दर्शन गीतं आहेत. काव्य आणि शैलेंद्र हे एक अद्वैत होतं. त्याच्या मनात सतत काव्यधारा वाहत असे. त्याला बहुदा कधी काव्य करावं लागलं नसेल ते नैसर्गिक प्रेरणेतून उतरत असे. शब्दाशयाची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यागत त्याच्या लेखणीतून शब्द प्रवाहित होत. सामान्य शब्दात असामान्य तत्त्वज्ञान सांगणारा असा तो लोकतत्वज्ञ होता. जनता जनार्दनाच्या सुखदुःखांचा हा उपासक, अतुलनीय गीतकार, हिंदी चित्रपटसृष्टीला लाभला याचं बरंचसं श्रेय, कलासक्त गुणग्राहक राज कपूरला द्यावं लागेल.
शीर्षक गीताचा जनक
राज कपूर ‘आग’ या त्याच्या पहिल्या चित्रपटावर काम करत होता. त्या दरम्यान पृथ्वीराज कपूर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या एका कवी संमेलनात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित ‘जलता है पंजाब’ ही कविता शैलेंद्र सादर करतात. राज कपूरला कविता आणि त्याची शैली विशेष आवडते. आग मध्ये ती घ्यावी म्हणून लगेचच त्याच्याकडे ते विचारणा करतात. आपली कविता विकाऊ नाही असं सांगत चित्रपटासाठी गीतं लिहण्याची राजची विनंती तत्क्षणी अगदी सहजभावानं बाणेदारपणे हा कवी नाकारतो. तरीही “कधी काही लागलं तर भेटायला ये” असं म्हणत आपल्या स्टुडिओचा पत्ता लिहिलेला कागद राज कपूरनं त्याच्या खिशात ठेवतो. क्रांतिकारी कवी आणि भावी शोमन राज यांची ती पहिली भेट असते. संसाराच्या वास्तवात गटांगळ्या खाऊ लागल्यावर केवळ नाईलाज झाल्यामुळे पैशाची निकड भागवण्यासाठी शैलेंद्र राजची भेट घेऊन पाचशे रुपयांची मागणी करतो. त्याकाळी ती मोठी रक्कम असूनही राज देऊ करतो. काही काळा नंतर शैलेंद्र जेव्हा राज कपूरला पैसे परत करायला जातो तेव्हा राजही त्याला स्पष्ट सांगतो की, “मी व्याजावर पैसे देणारा सावकार नाही” त्यावेळी त्याचा दुसरा चित्रपट बरसात साठी दोन गाणी हवी असतात. तो शैलेंद्राला सांगतो तुला जर माझं देणं परत करायचं असेल तर गाणी लिही. त्यावेळी बाहेर पाऊस पडत असतो. प्रस्ताव स्वीकारण्या वाचून तरणोपाय नसलेल्या शैलेंद्रच्या लेखणीतूनही शब्दवर्षा सुरू होते...‘प्रीत ने सिंगार किया, मैं बनी दुल्हन सपनों की रिमझिम में, नाच उठा मन आज मैं तुम्हारी हुई, तुम मेरे सनम बरसात में’...हाच हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या शीर्षक गीताचा(title song) जन्मदिन.
https://youtu.be/CQRsm3CWzRc?si=ed72Not2RCEIYuFc
राजकपूरच्या गुणग्राहकतेमुळे, आस्मानी ताऱ्यांप्रमाणे लकाकती प्रतिभा असलेला एक हुकमी गीतकार हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या अजोड काव्यशलाकांची बरसात घडवू लागला. हिंदी सिनेमातल पहिलं कॅब्रेट साँग ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ चा कर्ता पण शैलेंद्रच. योगायोग असा की गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर–जयकिशन यांच्या गाण्याचं सप्तरंगी इंद्रधनुष्य, ज्या बरसात चित्रपटापासून हिंदी चित्रपट सृष्टीच्या अवकाशात उगवलं, तो त्यांचाही पहिलाच चित्रपट होता. शैलेंद्रनी या जोडीसाठीच जास्तीजास्त गीतं लिहिली.
आसमान का तारा
बरसातच्या गीतांना अफाट लोकप्रियता लाभली. आगामी चित्रपटांसाठी लिहिण्याचा राज कपूर पुन्हा शैलेंद्र कडे आग्रह धरतो. पैसे घेतले होते ते परत करायचे असल्यानी माझा नाईलाज होता म्हणून गीतं लिहिली. पण हे काम मी करू शकणार नाही. त्याचा पुनश्च स्पष्ट नकार. पण राज चिकाटी सोडत नाही. एक दिवस राज कपूर शैलेंद्राला म्हणतो, “गीतं नाही लिहायची तर नको लिहूस पण एका चित्रपटाची कथा ऐकायला तर हरकत नाही?” शैलेंद्र राजी होतो. राज त्याला आपल्या गाडीतून ख्वाजा अहमद अब्बास यांच्याकडे घेऊन जातो आणि कथा वाचायला सांगतो. सुमारे अडीच तास कथा वाचून झाल्यावर शैलेंद्र अभिप्राय देतो “आवारा है, गर्दीश मे है, आसमान का तारा है” मोजक्या शब्दात इतका नेटका सारांश ऐकल्याबरोबर इतक्या नेटक्या अब्बास घायाळ होतात. राजला चित्रपटाचं नाव मिळतं, ‘आवारा’. चित्रपटासाठी गीतं न लिहिण्याचा शैलेंद्राचा निर्धार डळमळीत करण्यात तो यशस्वी होतो. आवारा साठी लिहिलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांमुळे हिंदी सिनेमाचा डंका सरहद पार वाजू लागला.
राज कपूर आणि शैलेंद्र यांच्यात एक आगळच मैत्र होतं. शंकरलाल केसरीलालचं शैलेंद्र हे नामांतरण राज कपूरनंच केलं होतं. तो स्वतः त्याला कविराज किंवा पुश्किन( महान कवी, आधुनिक रशियन साहित्याचा जनक) संबोधत असे. कविता/गीतं लिहिताना अनेकदा शैलेंद्र डफावर ताल धरत असे. राज कपूर बऱ्याच भूमिकेत हाती डफ घेत असे तो शैलेंद्राच्या या सवयीचा प्रभाव होता. आवारा पासून राज कपूर नि कविराज शैलेंद्रला त्याच्या अंतरंगी कलाकारांच्या पंक्तीत स्थान दिलं. शैलेंद्र, राज कपूर, मुकेश आणि शंकर–जयकिसान अशी ती संपूर्ण एकरूप टीम होती. या चार वेगवेगळ्या व्यक्ती असल्या तरी त्यांच्या ठायी ‘चार तनु परी एक जीव’ असं अद्भुत अचतुर्थत्व(अद्वैत या धर्तीवर) होतं.
शब्द, विचार, संस्कृतीचं वैभव
“हाय कैसे बिते दीन, कैसी बीती रातियां”, “ओ सजना बरखा बहार आयी”, “तुझसे मोहोब्बत करते सनम”, “याद न जाये बितें दिनोंकी”, “चली कौनसे देश गुजरिया तू सजधज के”, “ये मेरा दिवानापन है या मोहोब्बत का सुरुर”, “मन मोहना बडे झूठे”, “जब से बलम घर आए”, “सुहाना सफर”, “किसी की मुस्कराहटों पे हो निसार”, “दिन ढल जाए हाय रात न जाय”, “रूक जा रात ठहर जा रे चंदा”, “सबकुछ सिखा हमने, आँसु भरी है”, “आजा सनम मधुर चांदनी मे”, “खोया खोया चांद”, “भैया मेरे राखी के बंधन को निभाना”, “नानी तेरी मोरनी को”, “जानू जानू री काहे छनके है तोरा कंगना”, “उपरवाला जान कर अंजान है”, “सूर ना सजे क्या गाऊं मैं”, “झुमती चली हवा”, “पान खायें सैया” ...शैलेंद्रनी पाहिलं गीत लिहिलं ते 1949 मध्ये बरसात मे तुमसे मिले हम आणि 1966 साली त्याच्या अखेरच्या दिवशी, ‘जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ’ असा मुखडा लिहून जगाचा निरोप घेतला. म्हणजे गीतलेखनासाठी 17 वर्षांचा काळ मिळाला. त्यात त्यांनी साधारण 170 चित्रपटांसाठी 800 गीतं लिहिली अशी माहिती मिळते. त्याशिवाय तिसरी कसम, बूटपॉलिश आणि श्री 420 या चित्रपटांतून त्यांनी अभिनय साकारला तर परख साठी संवाद लेखनही केलं होतं. त्याच्या केवळ गाजलेल्या गीतांची यादी करतो म्हटलं तरी ते कठीण आहे. नानाविध गीतांतून शब्द चैतन्याची असिमित उजवण शैलेंद्रच करू जाणे कारण शब्दांना तेव्हाच चैतन्य प्राप्त होतं जेव्हा लिहिणाऱ्यानी त्या शब्दाशयाची अनुभूती घेतली असते. म्हणूनच शैलेंद्रला निव्वळ फिल्म गीतकार समजणं म्हणजे त्याचं घोर अवमूल्यन आहे.
शैलेंद्र यांचं गीतलेखन व्यावसायिक नव्हतं. ते काव्य असे. त्याला साहित्यिक मूल्य असे. बासुंदीत जशी चारोळी घालतो न, तशी त्यांच्या गीतात अनुभवांची, अनुभूतीची पेरणी असे. त्याचे वडील बिहारचे, जन्म रावळपिंडी पंजाबचा, लहानपण मथुरेत आणि कामकाज मुंबईत अशी शब्दशः बहुसांस्कृतिक पार्श्वभूमी त्याला लाभली. त्यामुळे आर्थिक दैन्यावस्थेचा जरी सामना करावा लागला तरी शब्द, विचार, संस्कृती यांचं वैभव मात्र शैलेंद्र यांच्या पदरी पुरेपूर पडलं.
फुरंगटलेले शब्द
कवी/गीतकार कितीही सिद्धहस्त असला तरी शब्द काही त्याचे बटिक नसतात. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी कधी कधी बरीच आराधना करावी लागते. शैलेंद्र यांच्याही बाबतीत असा एक किस्सा ऐकण्यात आला. कालाबाजार चित्रपटाच्या एका गाण्याची सचिनदेव बर्मन यांची चाल बरेच दिवस तयार होती. मात्र शैलेंद्रला काही केल्या त्यावर शब्द सुचत नव्हते. एक दिवस सचिनदा यांनी आर डी बर्मन पंचमला बोलावून सांगितलं की आज शैलेंद्र कडून गाणं घेतल्याशिवाय घरी येऊ नको. पंचम आणि शैलेंद्र तिथून बाहेर पडतात. दिवसभर मुंबईत फिरतात. दिवस मावळतीला आला तरी एक शब्दही लिहून होतं नाही. अखेरीस ते जुहू चौपाटीवर पोहोचतात. रात्रही बहुदा बाहेरच काढावी लागणार अशी चिन्ह असतात. आकाशातल्या पौर्णिमेच्या चंद्रमाची प्रतिमा सागरी लहरीवर उचंबळत असते. हे दृश्य बघत असतानाच शैलेंद्र सिगारेट शिलगवण्यासाठी पंचम कडे काडेपेटी मागतो. नंतर त्याच आगलावीच्या तालावर धून ऐकवायला सांगतो आणि रात्र घराबाहेर काढावी लागणार नाही असं पंचमला सांगत त्याला कागद मागतो. इतका काळ फुरंगटून आत दडून बसलेले शब्द बाहेर येण्यास जणु काही अधीर होतात. अगदी जादू घडावी तसे ते त्याच्यापुढे फेर धरू लागतात. मग काय हाती असलेल्या सिगारेटच्या पाकिटातल्या कागदावरच शब्द उमटू लागतात... ‘खोया खोया चांद खुला आसमान आँखो मे सारी रात जाएगी तुमको भी कैसे निंद आएगी’ पंचम घरी परततो. सचिनदा विचारतात, “गाना लाया?” पंचम सिगारेटच्या पाकिटातला कागद पुढे करतो. ते पाहून सचिनदा अधिकच भडकतात मात्र ती शब्दकळा बघतात मात्र आणि निमिषात चंद्रकळेगत शितळ होउन जातात.
https://youtu.be/EsENO8IjmoY?si=pgok9NF4XRw70XGK
कालजयी गाईड
बरसात पासून आर. के. फिल्म्स च्या तंबूत डेरे दाखल झाल्यामुळे राज कपूरचा गीतकार असा ठप्पा शैलेंद्रवर बसला होता. मात्र देवानंद आणि विजय आनंद यांच्या गाईड मुळे त्याचा प्रतिभा परीघ अधिक विस्तारला. गाईडचं प्रत्येक गाणं गाजलं. वास्तविक गाईडच्या अगोदर अन्य गीतकारानी केलेला या बंधूद्वयीचा चित्रपट भरपूर गाजला तेव्हा या नव्या चित्रपटाची धुराही त्याच्याच खांद्यावर देण्यात आली. दोन गाणी रेकॉर्डही केली जातात. पण त्या शब्द कामगिरीवर आनंद बंधू तितकेसे समाधानी नसतात. बर्मनदा यांना ते जेव्हा हे सांगतात तेव्हा ते शैलेंद्रच नाव पुढे करतात. प्रथमतः विचार न होता, दुसरी पसंद ठरवल्यामुळे सुरवातीला शैलेंद्र गीतं लिहिण्यास फारसे उत्सुक नव्हते. तरीही बर्मनदा यांचा आदर म्हणून ते भेटीला जातात आणि ठरवतात की पैसे अवाच्यासवा मागायचे म्हणजे पुढूनच नकार येईल. मात्र प्रत्यक्षात वेगळंच घडतं. शैलेंद्रनी मागितलेली रक्कम द्यायला आनंद बंधू तयार होतात. त्यामुळे माघार तर सोडाच उलट भक्कम कामगिरी करण्याची जबाबदारी येते. त्या बैठकीतच दिवस ढळण्यापूर्वी शैलेंद्र लिहितो ‘दिन ढल जाए हाय रात न जाय’ असं सांगतात की हे नव्यानं लिहून घेतलेलं गीत आहे. मूळ गीत होतं...हम ही मे थी ना कोई बात याद तुमको न आ सके, तुमने हमको भूला दिया हम न तुमको भूला सके...असं समाजमाध्यमांवर वाचण्यात आलं. शैलेंद्रच्या लेखणीत असलेली आत्मिक तीव्रता (Soulful Intensity) स्पष्ट करणारं हे बोलकं उदाहरण आहे. देवानंदने उगीच नाही मोठी रक्कम देऊन रफीच्याच आवाजात पाहिले रेकॉर्डिंग झालेलं गीत रद्द करून शैलेंद्र कडून हे नवे शब्द लिहून घेतले. या गाण्यासहित गाईडची अन्य सर्वच गाणी कालजयी ठरली.
https://youtu.be/HrbzfLFj6Es?si=eQVcnwSTF2QFL8Ai
गीत सृजन
एकदा शंकर जय–किसन जोडीनं शैलेंद्रला केवळ दोन तीन तासांच्या अवधीत गीत, किमान मुखडा लिहायची मागणी केली. धून ऐकवण्यासाठी सोबत त्यांचे सहाय्यक दत्ताराम यांची नेमणूक केली. शैलेंद्र आणि दत्ताराम मुंबईतल्या हँगिंग गार्डन का गेले. येरझाऱ्या घालत सिगरेट ओढीत असलेल्या शैलेंद्राला काही केल्या शब्द सुचत नव्हते. इतक्यात शब्द प्रसन्न झाले. लिहायला कागद घेतला पण पेनातली शाई नेमकी संपलेली. डोक्यातला विचार विरून जाण्याआधी लिहिणं गरजेचं होतं तेव्हा जळालेली आगलावी आणि सिगारेटच्या राखेवर शब्द लिहिले.. ‘ए मेरे दिल कहीं और चल’...हेच ते दाग चित्रपटातलं प्रसिद्ध गाणं.
https://youtu.be/1B9sm1HHAlQ?si=X3uLIOSnOsAnDOKp
प्रतिभावानांच्या रुसाव्या फुगव्यातूनही सृजनाची बीजे अंकुरतात. शैलेंद्र, हसरत, शंकर जयकिसान यांच्यात एक अलिखित करार झाला होता की अन्य कुणा लेखका साठी काम करायचं नाही. पण एकदा एका लेखकानं शंकर जय–किसन जोडीला एकरकमी मोठी दक्षिणा मिळणार म्हणून दक्षिणेतला चित्रपट, सर्व गीतं तो लिहिणार या अटीवर साईन करायला लावला. शैलेंद्र, हसरत जयपुरी यांना घेऊन शंकर–जयकिसनच्या म्युझिक रूम मधे दाखल झाले. तिथे ते न भेटल्यामुळे एका कागदावर त्यांच्यासाठी रागारागत चिठ्ठी लिहिली. प्रकरण राज कपूरच्या कानावर गेलं. त्यांनी सर्वांना एकत्र बोलावलं आणि त्यांच्यातील अनबन संपुष्टात आणली. काही दिवसांनी शैलेंद्र शंकर–जयकिसन कडे गेल्यावर शंकर यांनी त्यांना मुखडा छान झाला आहे आता अंतरे लिहून दे असं सांगितलं. शैलेंद्राला आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यांनी कुठला मुखडा लिहिलाच नव्हता. मी तर मुखडा लिहिलाच नाही तेव्हा शंकरनी त्यांना मुखडा ऐकवला तो असा...‘छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते तुम कहीं तो मिलोगे तो पुछेंगे हाल’ नाराजी दर्शक लिहिलेल्या चिठ्ठीतले शब्द रंगोली चित्रपटातील एका गाण्याच्या मुखडा होऊन गेले.
https://youtu.be/IVcVQaJFyxs?si=LigqE3ht8AjlnYLM
शैलेंद्र यांचं गीतलेखनावर विलक्षण प्रभुत्व सिद्ध करणारा एक प्रसंग त्यांच्या मुलानीच एक कार्यक्रमात सांगितला. आम्रपाली चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी सर्व संबंधित मंडळी सकाळी दहाच्या सुमारास जमली होती. सर्व तयारी ही झाली. त्याचवेळी राज कपूर लेख टंडन या त्यांच्या सहाय्यक दिग्दर्शकाला फोन करतात. स्वतः लता दीदी उपस्थित असतात. फोन वर गाणं ऐकवलं जातं. मात्र ते गाणं मेरा नाम जोकर साठी अधिक योग्य असल्यानं दुसरं गीत रेकॉर्ड करावं असं राज कपूर सांगतात. लता मंगेशकर, शैलेंद्र, शंकर जय–किसन मंडळी लगेचच नव्या गाण्याचा मुखडा तयार करतात...‘जाओ रे जोगी तुम जाओ रे ये है प्रेमियो की नगरी यहाँ प्रेमही है पूजा’...आता अंतऱ्यांचं काय? त्यासाठी वेळ लागणार असतो. सर्व भिस्त शैलेंद्र वर असते. दुपारी तीन वाजता सर्वांनी परत भेटायचं असं ठरतं. शैलेंद्र अंतरे लिहायचे म्हणून आरे मिल्क कॉलनीतल्या आपल्या आवडत्या स्थळी जातात. दोन वाजून गेले तरी एकही शब्द लिहून होतं नाही. तीन वाजता सर्वांना बोलावल्यामुळे स्टुडिओत पोहोचणं गरजेचं असतं. नाहीतर लता दीदी रागावणार, निर्मात्याचं आर्थिक नुकसान अशा चिंतेत लेख टंडन असतात. तेव्हा अंतरे लिहिणं म्हणजे काही पोरखेळ नाही. अवधी फारच कमी होता त्यामुळे प्रयत्न करूनही नाही सुचलं काही. आपण लताजींशी बोलू असं शैलेंद्र लेख टंडन यांना सांगतात आणि दोघेही जण स्टुडिओ पोचतात. लतादीदी आधीच स्टुडिओत पोहोचलेल्या असतात आणि त्या मुखड्याचा सराव करत असतात. शैलेंद्र आत जातात आणि लतादीदी आणि ते काही बोलत असल्याचं बाहेर उभे असलेले लेख काचेतून पाहतात. ते स्टुडिओ मधला माईक सुरू करायला सांगतात आणि जे ऐकतात त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. अंतरे तयार नाहीत असं दीदींना समजवायला म्हणून आत गेलेल्या शैलेंद्र यांना दीदी म्हणत असतात की आता तीन अंतरे झाले ना? आणखी काय करायचे? याचा अर्थ गाडी चालवत परत येत असतानाच्या काळात गीताचे तीनाहून अधिक अंतरे शैलेंद्राच्या डोक्यात तयार होतात आणि कागदावर टिपूनही न घेता त्यांनी ते दीदींना ऐकवले असतात. एकप्रकारे दैवी आशीर्वाद लाभलेली प्रतिभा त्यांचावर प्रसन्न होती असच म्हणावं लागेल.
https://youtu.be/2nAGWNAXt8c?si=uFIG15PbjUkiRfZs
शैलेंद्र वर बोलायचं, लिहायच म्हणजे तिसरी कसम चित्रपटचा उल्लेख अनिवार्य आहे. फणिंद्रनाथ रेणू यांच्या मारे गये गुलफाम या कथेवर तिसरी कसम बेतला होता. नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथे रेणू दहा हजार रुपये मानधनावर करारबद्ध झाले. पाठोपाठ वहिदा रहमान आणि राजकपूर यांना पण नायक नायिकेच्या भूमिकेसाठी साईन केलं गेलं. जास्तीतजास्त वर्षभरात पूर्णत्वाला जाऊ शकणाऱ्या तिसरी कसमनं तब्बल पाच वर्ष घेतली. त्यामुळे बजेटचा बोजवारा उडाला. कर्जाचा डोंगर झाला. गीतकार शैलेंद्र व्यवहारात कमी पडला. नियतीची रीती मोठी अगम्य असते. चित्रपटांसाठी लेखन न करण्याचा निर्धार केलेल्या एका प्रतिभावंताला राजपाट देऊ करून ती हिंदी चित्रपट सृष्टीचा अनभिषिक्त कविराज करते आणि पुढे राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या चित्रपटाला पदार्पणात व्यावसायिक अपयश पदरी टाकून प्राणांतिक क्लेश देऊन राज्य खालसाही करते. व्यावसायिक अपयश आणि आर्थिक गुंतवणुकी पेक्षाही स्वजनातील गुंतवणूक फसल्यामुळे कविराज खचून गेले. व्यसनाधीन झाले. ‘सबकुछ सिखा हमने न सिखी होशियरी’ हे त्याचेच शब्द त्याच्या बाबतीत यथार्थ ठरले. तेव्हा गम की दुनिया से शैलेंद्र का दिल भर गया ढूँढ ले अब कोई घर नया अशीच त्याची मानसिकता झाली.
शैलेंद्र यांच्या गीतमालेत अनेक रंगांचे अनेक भावनांचे, विभिन्न परिस्थितिचे पदर होते. आपणा सर्वांना अधिक परिचित आहे ते गीतकार शैलेंद्र पण ते प्रथमतः कवी होते. त्याचा सर्वसामान्यांना म्हणावा तसा परिचय होऊ शकला नाही आपल्या कविता ते पत्नी शकून(शकुंतला) ला आवर्जून ऐकवीत असत. एकदा त्यांना तिला काही ऐकवायची उर्मी आली. ती घरकामात व्यग्र असल्यानी आता वेळ नाही नंतर ऐकते म्हणून कामाला निघून गेली. शब्दसिद्धी प्राप्त असलेला हा कवी लिहितो...‘जो बात मैं कहते कहते रह गयी, जो बात तुम सुनते सुनते चली गयी, वो बात ना अब कभी कही जाएगी ना सुनी जाएगी’ संवेदनशील कवीनी केलेली ही भविष्यवाणीच होती. त्याचे हे भावनिक शब्द दुर्दैवाने शब्दशः खरे ठरले. पत्नी शकूनला नंतर कधीही ऐकण्याची संधी खरोखरच मिळाली नाही. शैलेंद्र इहलोकीच्या शब्दयात्रेत आणि देहयात्रेत त्यानंतर फार काळ गुंतून राहिला नाही.
कविराज शैलेंद्र अनन्य होते. त्यांची लौकिक काया इहलोकी चार दशकं राहून विरून गेली मात्र त्याची अलौकिक शब्दमाया दशकानुदशकं साहित्य प्रेमींच्या हृदयात घर करून राहिली आहे. आकाशात ज्याप्रमाणे असंख्य चांदण्या चमचमत असतात त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीच्या अवकाशात शैलेंद्र यांची अनुपम, अतुलनीय शब्दकारी अक्षत चमकत राहिल.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com






'दिल का हाल सुने दिलवाला
उत्तर द्याहटवासीधीसी बात ना मिर्चमसाला
कह के रहेगा कहनेवाला'
इतक्या साध्या पण परिणामकारक शब्दात गीत लिहिणारे गीतकार शैलेन्द्र हे नावाप्रमाणेच उत्तुंग प्रतिभेचे आणि संवेदनशीलतेचे धनी होते.त्यांच्या गीतरचनेमधील उत्स्फूर्तेबद्दलची छान माहिती आपल्या या लेखामुळे कळली नितीनजी !
त्याबद्दल खूप धन्यवाद !
किसी की आसू ओं में मुस्कुराऐंगे या ओळीचा खरा अर्थ शैली शैलेंद्र यांना शैलेंद्र यांच्या मृत्यूच्या वेळी राज कपूर रडत असताना समजला! तुम्ही खुपच चांगली माहिती दिली आहे.
उत्तर द्याहटवा