स्मृतीबनातून – जिंदादिल भाऊसाहेब
जिंदादिल मराठी शायर " शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे कोणत्यातरी जिंदादिलांच्या दर्शना आलो इथे प्राण साऱ्या मैफलीचे,यांनाच आम्ही मानतो नुसतेच ना या मैफलीचे, आमुचे स्वतःचे मानतो " मराठी शायरी आणि शायर तसं बघायला गेलं तर ती त्यांच्या आयुष्यात खूप उशिरा म्हणजे पन्नाशी उलटून गेल्यावर आली. ती नखशिखांत अस्सल मराठमोळी होती. तिच्यात उर्दू शब्दवती(रूपवती चाय धर्तीवर) सारखीच विलक्षण कमनियता आहे, तशीच पुरेपूर नजाकत देखील; पण अनुनय लवलेश मात्र ही नाही. ती पूर्णतः स्वयंभू आहे. ती आहे मराठी शायरी. निवृत्ती नंतर अनेकांच्या आयुष्याचा प्रवास जिथे रुक्ष, निरस वाटेनी होताना दिसतो तिथे अस्सल मराठी शायरी ही साठीतल्या एका जिंदादिल व्यक्ती वर भाळली. कोण होती ही व्यक्ती? ती होती मराठी शायरीची उद्गाती, वासुदेव वामन पाटणकर उर्फ भाऊसाहेब. त्यांनी श्रृंगार, विनोद, जन्म, मृत्यू, दर्शन आदी विविध विषयस्पर्शी सशक्त आणि रसरशित शायरी साठोत्तरी आयुष्यात लिहून तरुणाईला त्याची लज्जत चाखायला दिली. त्यांनी लिहिलेली शायरी अस्सल मराठी आहे. ती उर्दुतून भाषांतरित केलेली तर नाहीच नाही ...