स्मृतीबनातून - 'कर्मयोग'

'कर्मयोग'


(Note - Image courtesy : Google)
कित्येकदा एखादा विषय गहन आहे, क्लिष्ट आहे, आपल्या समजुतीच्या बाहेर आहे असे काही समज (stereos) आपण आपल्या मनात बाळगून असतो. मनाच्या असल्या धारणे मुळे, एखादा प्रांत हा आपला नाही असा निष्कर्षच काढतो. पण दुर्बोधता ही मुळी विषयात नसावी तर ती समजावणार्ऱ्यांच्या मांडणीत असते असे मला वाटते. काही जणांना  दुर्बोध, कठीण असा विषयही सुबोध, सरल आणि सुगमपणे मांडण्याचे कसब साध्य असते. 
भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ, भगवद्‌गीतेचच उदाहरण घेतलं तर एखादा व्यासंगी ज्ञानार्जनासाठी  मूळ ग्रंथ वाचेल, त्यावरील टीका वाचेल पण सरसकट सामान्य माणसाला "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन","नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः","वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि" हया श्लोकांची तोंडओळख असेलही पण अठरा अध्याय, सातशे श्लोक असा व्यासंग करणारे लोक निश्चितच मर्यादित असणार.अश्या लोकांपर्यंत गीतेचे तत्वज्ञान पोहोचवायचे असेल तर फार विद्वत्तापूर्ण, जटील विवेचन निश्चितच कामी येणार नाही.  मग असे लोक यापासून विन्मुखच राहणार का? असा प्रश्न मनात येतो आणि मग गीतकार, संगीतकार पंडित मनोहर कवीश्वर यांनी आपलं नाव आणि आडनाव सार्थ करीत गीतेच्या केलेल्या सुलभ, सुगम मांडणीतून या प्रश्नाचे उत्तर समोर येते. अवघ्या पांच कडव्याच्या आपल्या गीतातून आणि संगीतरचनेद्वारे कवीश्वर यांनी गीतेचे सार सुगम पद्धतीने सामान्यजनां समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था

शस्त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला
घे शस्त्र ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था II१II

कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा
मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा
इह परलोकी अशांतीने तव विक्रम
झुकवील माथा II२II

कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा
क्षणभंगूर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था II३II

रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो
मीच घडवीतो मीच मोडीतो उमज आता 
परमार्था II४II

कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परी त्यजून येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था II५II

खरंतर सर्वांगाने अलौकिक अशी रचना! कवितेतल्या शब्दांची निवड अत्यंत चपखल. गीताची चाल आणि गायन असे की कुरूक्षत्रावर  कर्तव्यच्युत होऊ पहाणाऱ्या अर्जुनाला, भगवान श्रीकृष्णांनी केलेल्या उपदेशाचा प्रसंग, ऐकणाऱ्याच्या डोळ्यांपुढे साकारू शकण्याच्या ताकदीच. स्वतः बाबूजींनीच (श्री सुधीर फडके) हे गीत गायल्यामुळे ते बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं ही जरी समाधानाची बाब असली तरी आपल्या हयातीत आणि अजूनही बहुमुखी प्रतिभेचा हा वैदर्भीय गीतकार, संगीतकार आणि गायक अवघ्या महाराष्ट्राला म्हणावा तसा परिचित झाला नाही.
गदिमां यांनी (गजानन दिगंबर माडगूळकर) लिहिलेल्या गीतरामायणा पासून प्रेरणा घेऊन कवीश्वर यांनी 'गीतगोविंद' या गीतसंग्रहाची रचना केली त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम ते स्वत: करत असत आणि गायन वादन अशा दुहेरी भूमिका ते बजावत. 
याच धर्तीवर त्यांनी 'गीतगजानन' (गजानन महाराजांचे चरित्र), 'गीतगौतम' आणि 'गीतचक्रधर' (चक्रधरस्वामींचे चरित्र) अशी चरित्रे गीतबद्ध आणि संगीतबद्ध केली.२००७ साली त्यांना देवाज्ञा झाली. अलौकिक रचनेच्या आणि रचनाकाराच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा प्रपंच!

विमोह त्यागून कर्म फलांचा - सुधीर फडके


संदर्भ : विकिपीडिया, इंटरनेट

नितीन सप्रे
8851540881
nitinnsapre@gmail.com

टिप्पण्या

  1. खूप नवीन माहिती!!-भारती निरगुडकर

    उत्तर द्याहटवा
  2. आदरणीय कवीश्वर सरांकडे मी एक वर्ष गीत गायनाचे धडे घेऊ शकलो, सर. आपला लेख सर्वांगसुंदर झालाय. त्यांचं गाव बेलोरा जि. अमरावती, ता. चांदूरबाजार ते अमरावतीला स्थायिक झाले होते. सर आम्हाला 'गीत गोविंद, 'गीतगौतम' मधील काही पदही शिकवीत असत.

    उत्तर द्याहटवा
  3. आदरणीय कवीश्वर यांचं हे गीत कोणालाही आवडेल असेच आहे बाबूजींनी ते इतके सुंदर गायले आहे की गीतेच सार लगेच कळावं.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. आदरणीय मनोहर कविश्वरांवर आपण लिहिलेला हा लेख खुप छान ! मनोहर पंत गीत गोविंंद कार्यक्रम खुप सुंदर रितीने सादर करीत असत . मी
    जवळ जवळ ३५ वर्षे अमरावतीत राहिलेलो असल्याने त्यांच्या कार्यक्रमाबद्दल नेहमी कानावर पडायचं . त्यांंनी रचलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी विशेष करुन हे गीत आणि " माना मानव वा परमेश्वर, माझ्या वडिलांची आवडती गाणी होती . आमच्या घरी जेव्हा भजन किंवा गाण्यांचा कार्यक्रम होत असे त्या मध्ये बरेेचदा ही गाणी असायची.
    आपण लिहिलंय ते खरंच. स्वत: सुधीर फडके यांनी हे गीत गायलेलं असल्यामुळे याला विदर्भाबाहेर थोडी तरी प्रसिद्धी मिळाली .
    आपल्या या लेखामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला .
    खुप धन्यवाद या पोस्ट बद्दल. 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  5. ब्लॉगच्या माध्यमातून सुंदरतेने मांडणी करून जे लिहिलं गेलं आहे त्यास तोड नाही, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
    स्व. श्री. बाबूजींचा ज्या गीताला हातभार लागतो ते गीत अजरामर होतं असं म्हटलं तर ती देखील अतिशयोक्ती नाहीच.
    माझ्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी हेही एक सुंदर गीत... नितीनजी, खरंच सुंदर ब्लॉग.
    संदीप कळके, ठाणे

    उत्तर द्याहटवा
  6. फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

    उत्तर द्याहटवा
  7. भगवद् गीतेचे सार आहे हे ते ही अगदी मोजक्या शब्दात. नमन.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक