स्मृतिबनातुन -ठेहरिये होश में आऊ तो चले जाईएगा……….

ठेहरिये होश में आऊ तो चले जाईएगा……….


तीन दशकां हुन अधिक काळ हिंदी चित्रपट सृष्टीत संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मोहंमद झहूर खय्याम हाश्मी
म्हणजेच  खय्याम यांनी आपली अमीट छाप उमटवली. लहानपणा पासूनच खय्याम यांना शिक्षणात विशेष रुची नव्हती मात्र त्यांचा संगीता कडे ओढा होता. दिल्लीत काकांकडे पळून आलेल्या खय्याम यांना काकांनी शाळेत दाखल तर केलं मात्र चित्रपट सृष्टीचं त्याला असलेलं आकर्षण पाहता काकांनी त्याला संगीत शिकण्याची मुभा दिली. 
पंडित अमरनाथ हे खय्याम यांचे गुरू. अभिनयाच्या संधीच्या शोधार्थ ते लाहोरला गेले. तिथे त्यांनी पंजाबी संगीत दिग्दर्शक बाबा चिस्ती यांचे कडे संगीत साधना सुरू केली. एके दिवशी चिस्ती  यांनी संगीत दिलेल्या रचनेचा मुखडा खय्याम यांनी गायला तेव्हा चिस्तीं यांनी खुश होऊन त्यांना सहायक म्हणून स्वीकारलं. त्यांनी सहा महिने ते काम केलं. दुसऱ्या महायुद्धाच्या(WW II )वेळी खय्याम काही काळ लष्करातही दाखल झाले होते. 
खय्याम यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीत सुमन कल्याणपूर, सुलक्षणा पंडित, येसुदास आदी गायकांकडून गीतं गाऊन घेतली. चित्रपट निर्मात्यांचा दबावही त्यांनी कधी फारसा सहन केला नाही. आशा भोसले मात्र त्यांच्या साठी विशेष गायिका होत्या. आशाजींनी त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी (1953) पार्श्वगायन केले ते थेट 2012 पर्यंत त्यांनी खय्याम यांच्याकडे गायन केले. आशा भोसले आणि मुकेश यांनी गायलेली वो सुबह कभी तो आयेगी, चीन-ओ-अरब आणि आसमा पे है खुदा ही चित्रपट गीतं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. 'शोला और' शबनम या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनामुळे संगीत दिग्दर्शक म्हणून चित्रपट सृष्टीत  त्यांचे स्थान पक्क झालं. एखाद्या सुंदर सरोवरात मंद वाऱ्यामुळे उठणाऱ्या हलक्या लहरीं प्रमाणे रोमान्स आणि भावपूर्णतेनं ओत प्रोत संगीत हे खय्याम यांच्या संगीताचं बलस्थान होतं. कवितेला सहज गातं करण्याची अनोखी कला त्यांना लाभली होती. 

त्यांनी अनेक लोकप्रिय गीतं दिली मात्र चांदनी रात है(दिल-ए-नादान), बहारो मेरा जीवन भी सवारो(आखरी खत), आखों में हमने(थोडीसी बेवाफाई), मोहब्बत बडे काम(त्रिशूल), ठेहरिये होश में आ लुं(मोहब्बत उसे कहते हैं), वो सुबह कभी तो(फिर सुबह होगी) दिल चीज क्या है(उमराव जान), कभी कभी मेरे दिल मे (कभी कभी) या काही गाण्यांमुळे आपण अजरामर झालो आहोत अशी खय्याम यांची भावना होती आणि ती रास्तही आहे.
राजेश खन्ना यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आर.डी. बर्मन यांना राजेश खन्ना यांची प्रथम पसंती असे. मात्र मजनू चित्रपटाच्या वेळी खय्याम यांच्या बरोबर काम केल्यानंतर राजेश खन्ना यांनी थोडीसी बेवाफाई, दिल-ए-नादान आणि दर्द या यशस्वी आणि संगीता साठी नावाजलेल्या चित्रपटांसाठी खय्याम याना घेण्याबाबत दिग्दर्शक, निर्मात्यांना खय्याम यांचे नाव सुचवले होते. तलत मेहेमूद, आशाताई आणि किशोर कुमार यांना खय्याम यांची विशेष पसंती होती. अर्थात मोहम्मद रफी, लता दीदी आणि मुकेश यांनीही खय्याम यांच्या संगीत दिग्दर्शनात गीतं गायली आहेत. राजेश खन्ना व राखी ही खय्याम यांची  आवडती जोडी होती.
त्यांनी दाग, मिर्झा गालिब, वली साहेब, अली सरदार जाफरी, साहिर लुधियानवी, मजरूह सुल्तानपुरी,निजा फाजली, नक्स लायलपुरी, अहमद वसी,जान निसार अख्तर अश्या समकालीन(contemprory) तसच पूर्वसुरी(legand) दिग्गज कवी/गीतकारां बरोबर काम केलं. गीतकारांच्या निवडी संदर्भात ते फार चोखंदळ होते. म्हणूनच त्यांच्या संगीत रचनांमध्ये गायक आणि संगीताच्या बरोबरीने कवितेला/गीताला स्थान मिळालेल दिसतं. ते कवी/गीतकाराला पूर्ण स्वातंत्र्य देत. आणि म्हणूनच त्यांच्या रचना अधिक काव्यात्मक, अर्थवाही, गेय आणि प्रासादिक वाटतात.


खय्याम यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी कभी कभी(1977), उमराव जान(1982) तसंच जीवन गौरव पुरस्कार(2010) त्यांना प्रदान करण्यात आले. उमराव जान साठी उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award)त्यांना प्राप्त झाला. सृजनात्मक (Creative) आणि प्रायोगिक(Experimental) संगीतासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने(Sangeet Natak Academy Award) गौरविण्यात आले. 1988-89 मध्ये त्यांना मध्य प्रदेश सरकारचा प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कार(Lata Mangeshkar Award) बहाल करण्यात आला.  या पुरस्कार समारंभासाठी खय्याम कुटुंबीय इंदूरला आले होते. मीही त्यावेळी आकाशवाणीच्या सेवेत होतो आणि योगायोगाने त्याच वेळी कार्यालयीन कामासाठी इंदूर दौऱ्यावर होतो. त्यामुळे मला आकाशवाणी इंदूरच्या स्टुडिओत खय्याम, त्यांच्या गायिका असलेल्या पत्नी जगजीत कौर आणि मुलगा प्रदीप यांच्याशी समोरा समोर बसून अनौपचारिक बातचीत करण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी इंडी चित्रपट संगीताशी संबंधित अनेक पैलूंवर मनसोक्त गप्पा झाल्या. त्यांच्या मुलाचा एक चित्रपट त्या सुमाराला येऊ घातला होता. त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी त्या अनौपचारिक भेटी दरम्यान सादर केलेल्या 'तुम अपना रंज-ओ-गम या गीतानी त्या गप्पांच्या मैफिलीची पर्वणी साधली गेली.



नितीन सप्रे
9869375422

टिप्पण्या

  1. खूप मस्त लिहिलंय. जुन्या गाण्यांचे मुखडे ओळी व्यवस्थित आठवताहेत. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. खय्याम यांच्या सांगीतिक जीवनाचा आलेख समर्पक शब्दात मांडला. खय्याम जी ग्रेट संगीतकार होतेच् ,मला खय्याम यांची भावणारी गोष्ट म्हणजे त्यानी तत्त्वाशी तड़जोड कधी केली नाही

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक