स्मृतिबनातून - विकलचंद्र

विकलचंद्र

गाण्यातला मी तानसेन नाही पण कानसेन नक्कीच आहे. याचे बरंच मोठे श्रेय माझ्या आईला आणि आकाशवाणीला आहे. नागपूर आकाशवाणी केंद्रावरून सकाळी प्रसारित होणारा अर्चना ह्या भक्तिसंगीताचा कार्यक्रमच माझी आई गेली कित्येक वर्ष नियमितपणे भक्तिभावानं ऐकत आहे. 

पहाटे लवकर उठून कामांना सुरुवात करतांना चहाचं आधण ठेवणे आणि रेडिओच बटन दाबणे हे तिचे व्यसन आहे…….. हो व्यसनच म्हणावं लागेल. याचा परिणाम असा झाला की सकाळी अंथरुणातून बाहेर येताना कुमारजींचा  ' मलयगिरीचा चंदन गंधित धूप' लागलेला असायचा आणि सुमन ताईंची राधिका हरी भजनी रंगलेली असायची. पाठोपाठ माणिकताईं 'क्षणभर उघड नयन' आळवायच्या, आशाबाईंच्या 'प्रभाती सूर नभी रंगती' ' लता दिदींच 'तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता' काना मनावर बिंबवायच्या, आशालता वाबगावकरांच्या 'रविकिरणांची झारी' बाबूजींच्या 'देहाची तिजोरी' अश्या कित्येक गीतांच्या साथीने शाळेची तयारी होत असे.  जस जसे मोठे होत गेलो तसं तशी अशी समृद्ध सकाळ मात्र अभावानेच अनुभवता येऊ लागली. लहानपणीच झालेल्या या सूरसंस्कारां नंतरही,  गळ्याला जरी फारशी प्रगती साधता आली नाही तरी कान मात्र तयार होत गेले आणि सूरांच्या संगतीने मी नेहमीच असा भारावत राहिलो.

शाळेच्या त्याच दिवसांत, नागपूरमध्ये आजोळ शहरातच असल्याने सुट्टी लागताच माझा मुक्काम तिकडेच हलायचा. आजोळचा वाडा प्रशस्त होता. समोरा समोर तीन मजली दोन इमारती होत्या. आमच्या समोरच्या इमारतीत आजोबांचे मामा राहत. तेच वाड्याचे मालक. त्यांच्या कडे त्याकाळी चावीचा ग्रामोफोन होता. मला त्याचे आकर्षण तर होतेच पण अधिक आकर्षण होते ते त्याच्या त्या सोनेरी भोंग्यातून निघणाऱ्या आसमंत भारून टाकणाऱ्या सूरावटिचे. त्यावेळी शब्दार्थ जाणण्याची समज पूर्णतः आली नव्हती.
१९६५ च्या सुमारास आलेली आणि आजतागायत तजेला तसच लोकप्रियता जराही कमी न झालेली, आणि मी पहिल्यांदाच ऐकत असलेली दोन गीतं माझ्या मनात खोलवर घर करून गेली. मोजकेच पण वेधक शब्द, निव्वळ हार्मोनियम आणि तबल्याची साथ, द्रुत ठेका, मोहक चाल आणि चित्ताकर्षक लयकारीत निरतिशय सुरेल अदाकारी ही त्या दोन्ही गीतांची मर्मस्थानं होती.
नृसिंह जन्मोत्सवासाठी राजापूरात केळवली इथे गेलो असताना दुसऱ्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. केशर मिसळलेल्या दुधाच्या रंगा सारखा चंद्र (१८/५/२०१९) पाहून  अचानक लहानपणीच मनात आणि कानांत घर करून बसलेल्या गीतांच्या आठवणी उजळून निघाल्या. माझ्या आठवणीप्रमाणे ७८ आर पी एम च्या ग्रामोफोन तबकडीच्या एका बाजूला असलेलं 'उगवला चंद्र पुनवेचा' आणि दुसऱ्या बाजूला 'विकल मन आज' ही ती अप्रतिम नाट्यगीतं.

उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा

दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गिचा

उगवला चंद्र पुनवेचा(गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा)


किती शुद्ध, सात्विक, सकस शृंगारिक रचना. बजारु पणाचा लवलेशही नाही. प्रणयरस वितळला आहे, मात्र तो ही या मर्त्यलोकीचा नसून स्वर्गलोकीचा आहे. शतप्रतिशत खानदानी कल्पना. आचार्यांच्या कलासक्तीला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. या गीता इतकाच गीतकारही लोकप्रिय आणि चतुरस्त्र पण गंमत अशी की हे पद प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणीतून उतरल्याची माहिती बऱ्याच जणांना नसते. ह्या रोमँटिक पदा साठी संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अतिशय चपखल पणे मालकंस राग निवडला आहे. 

याच तबकडीवर असलेलं दुसरं पदही तितकंच दिलखेचक! हे बंध रेशमाचे या नाटकातील अभिषेकी बुआंनी कर्नाटक संगीतात प्रचलित असलेल्या राग सरस्वती मध्ये संगीतबद्ध केलेली आणि शांताबाई शेळकेंच्या सिद्धहस्त झरणीतून झरलेली ही विरहीणीच म्हणा न!


विकल मन आज झुरत असहाय
नाही मज चैन,
क्षण क्षण झरती नैन
कोणा सांगू

ही चांद रात नीज नच त्यात
विरह सखी मी कुठवर साहू
नाही मज चैन,
क्षण क्षण झरती नैन
कोणा सांगू



विकल मन आज(गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा)


आपल्या किंचित अनुनासिक स्वरांनी, गळ्यातील फिरतीने, उत्तम लयकारीने आणि आवाजातल्या अवीट मधुर्याने बकुल पंडित यांनी या दोन्ही पदांना आगळ्या वेगळ्या उंचीवर नेऊन अक्षय लोकप्रियतेच्या शिखरावर विराजित केलं आहे. लहानपणा पासूनच मनात रुंजी घालणारी ही नाट्यगीते बकुलताईं कडून प्रत्यक्ष ऐकायला मिळाली तर काय बहार येईल अशी कल्पना नेहमीच मनात बाळगून होतो. माझ्या सुदैवाने माझा मुंबई आकाशवाणीतला मित्र आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा गुणी शिष्य रघुनाथ फडके याच्यामुळे माझी ही इच्छा अवचितपणे फलद्रुप झाली. रघुनाथ दरवर्षी ठाण्यात आपल्या गुरुजींच्या स्मृती निमित्त मैफिल आयोजित करतो. अनेक प्रतिथयश कलाकार आवर्जून यात सहभागी होतात. माझ्यातल्या कानसेनी गुणांची जाणीव असल्याने बहुदा दरवर्षी तो मला आग्रहपूर्वक निमंत्रणही देतो. त्याच्या ह्या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी बकुलताईं कडून ही नाट्यगीतं प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला मिळाली. माझ्या झुरत असलेल्या विकल मनात पौर्णिमेचा चंद्र उगवला. मी धन्य झालो.


(गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा)



नितीन सप्रे
8851540881
nitinnsapre@gmail.com

टिप्पण्या

  1. अप्रतिम सर खुपच छान आठवणींना सुवर्णमय उजाळा शब्द बध्द केलात सर

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर. त्या आठवणी आता विरळाच.

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतीम लेखन, स्मृतिविभोर करणारे! धन्यवाद! 🙏

    उत्तर द्याहटवा
  4. दोन्ही गाणी व बकुल पंडित ही एकच आहेत. अजरामर गाणी.

    उत्तर द्याहटवा
  5. नितीन
    खूप छान लेखन. तुझ्या या आवडी/निवडी मुळे छान ऐकायला मिळते.

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान सुरेख लेख- मी पहिल्यांदा ऐकली दोन्ही गाणी.

    उत्तर द्याहटवा
  7. नितीन, तुझ्यामुळे गतस्मृतीना उजाळा मिळाला.. आणि कित्येक वर्षे मनामध्ये हरवलेली गीत रत्ने ओठाबाहेर आली.

    उत्तर द्याहटवा
  8. आमच्या बालपणी देखील पहाटेच्या समयी आईची घरकाम सुरु असताना मुंबई ब वर मराठी भक्तिसंगीत लागायचे व मन प्रफुल्लित करायचे, त्याची आठवण झाली. मन आनंदी झाले. आपले बालपण खरोखरच रम्य होते.

    उत्तर द्याहटवा
  9. पुण्यात असल्याने बकुळ पंडित यांचे गाणे ऐकायला मिळाले. हे बंध रेशमाचे नाटकात नंतर एकदा त्या, वसंतराव देशपांडे व सतीश दुभाषी आमच्या घरी आले होते. पण ते उशीरा म्हणजे नाट्य प्रयोग संपल्यावर आले होते. त्यामुळे वडिलांनी मला उठवले नाही. बकुळ पंडित व सतीश दुभाषी यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी हुकली. आजही वाईट वाटते.

    उत्तर द्याहटवा
  10. रेडिओत नोकरी असल्यामुळे खूप म्हणजे खूप गाणी ऐकली. रेडीओवर आणि आकाशवाणीच्या रेकॉर्ड संग्रहालयात. बकुल पंडीत यांचं उगवला चंद्र तर मला खुप आवडायचं ते त्यांच्या गायन शैलीमुळे.
    नितीनजी, छान लिहिलय तुम्ही त्यांची वेगळी ओळख झाली. समाधान वाटले.

    उत्तर द्याहटवा
  11. विकल चंद्र.. अहाहा शीर्षक आणि लेख सुंदर! आठवणींच्या गंधकोषी घेऊन जाणारा लेख! अभिनंदन 💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक