प्रासंगिक - श्रीगुरू: मम चित्ता शमवी आता

श्रीगुरू: मम चित्ता शमवी आता अज्ञानरुपी निबीड अंध:कारातून तेजोमयी शाश्वत ज्ञान प्राप्तीच्या दिशेने जे मार्गस्थ झाले आहेत, जे तिमिरातून तेजाकडे वाटचाल करत आहेत, अशा मुमुक्षुंना, आत्मदीप(अंतरंगीचा प्रकाश), पथदीप (बाह्य प्रकाश)अशा दोन्ही दीपज्योतींनी मार्ग उजळून, इप्सित साध्य व्हावं, यासाठी सद्गुरु हे सतत मार्गदर्शन करत असतात. सुदैवानं भारतीय परिवेशात गुरु-शिष्य परंपरा, गुरूभक्तीचं माहत्म्य विषद करणाऱ्या अनेक घटना, उदाहरणं, कृती आढळतात. सद्गुरूंच्या कृपा दृष्टीस पात्र ठरलो, त्यांनी मस्तकी हात ठेवला, तर अवघा मानवी जन्मच कृतार्थ, सार्थक होऊ शकेल, अशी शक्ती त्यात सामावलेली असते. मात्र गुरुभक्ती ही मुळात सहेतुक असू नये. व्यवहारी जगण्यातल्या, देवाणघेवाणीच्या समिकरणाचा भाव त्यात असू नये, हे फार महत्वाचं. कदाचित म्हणूनच असं म्हटलं जातं की की गुरू हा करता येत नाही तो लाभावा लागतो. असं घडलं तर लौकिक, पारमार्थिक जीवन सफल, संपूर्ण होतं. अन्यथा गुरुबाजीच्या जाळ्यात गुरफटून त्यातच घुसमटणाऱ्या, गटांगळ्या खाणाऱ्यांचीही वानवा नाही. इहलोकी जीवाला त्याच्या संचितानुसार, कर्मानुसार...