वैचारिक - हे जन हाती धरी दयाळा

हे जन हाती धरी दयाळा मातृभाषेचा अभिमान हा असायलाच हवा. बहुतेक सर्वच जण तो बाळगतातही. पण भाषेचा अभिमान बाळगायचा म्हणजे नक्की काय करायचं? या बाबतीत मात्र सर्वसाधारणतः मनात, आचारात, विचारात अनेकदा अस्पष्टता आढळते. भाषेचा अभिमान हा मुख्यत्वे त्या भाषेतील साहित्य, संस्कृती, इतिहास, शब्दसंपदा, विचार दर्शन या सर्व बाबींवर ठरत असतो. या अनुषंगानं विचार केला तर मराठी संत परंपरेतून मांडलं गेलेलं विश्र्वरुप विचार दर्शन हे निश्चितच विशेष अभिमान बाळगण्या योग्य आहे. ऋग्वेदातला एक प्रचलित श्लोक, "आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च", मानवी जीवनाचे दोन महत्वपूर्ण उद्देश्य अधोरेखित करतो. एक मोक्षप्राप्ती आणि दुसरं विश्व कल्याण. स्वतः ज्ञानप्राप्ती साधून, श्रीमद्भागवतगीतेचे तत्वज्ञान सर्व साधारण लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी, ती तत्कालीन प्रचलित मराठीत लिहिली. ज्ञान यज्ञानं तोष पावून प्रसाद द्यावा अशी मागणी त्यांनी विश्वात्मक देवा कडे केली. हा प्रसाद मागताना, त्यांनी स्वतः साठी तर नाहीच पण देश, काळ, संप्रदाय या तश्या विशाल, पण तरीही संकीर्ण अश्या सीमारेषा ओलांडून, विश्र्वकल्...