स्मृतीबनातून - खंत(पद्य)

नमस्कार…. साहित्य, कला, संस्कृती या विषयांवर आधारित ' स्मृतीबनातून ' हा अनियतकालिक ब्लॉग मी जून 2019 (२५.६.२०१९) ला सुरू केला. तेव्हा पासून, आता पाच वर्षांहून अधिक काळ तो अनियमितपणे पण सातत्यानं आपणाला सादर करीत आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले असून साधारणतः ते सर्व, विभिन्न वृत्तपत्रं, मासिकं, दिवाळी अंक आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यानं माझा उत्साह वाढला. तसच आपणापैकी बहुतेकांनी नियमित आणि काहींनी साक्षेपी अभिप्राय देऊन मला प्रोत्साहित केलं. त्याची उतराई मी कशी करणार? या काळात हा ब्लॉग वाचलेल्यांची, पाहिलेल्यांची म्हणुया हवंतर, संख्या सुमारे 46 हजारांवर पोहोचली आहे. यात भारता खेरीज 18 हून अधिक देशांतल्या सुमारे हजार वाचकांचा ही समावेश आहे. जो माझ्या सारख्या सामान्यजनासाठी प्रेरणादायी आहे. आजवरची गद्यसेवा आपण रुजू करून घेतली आहे. तेव्हा आजच्या राम नवमीच्या मुहूर्तावर आपणासमोर या ब्लॉगच्या माध्यमातून पद्यसेवा मांडण्याचाही मानस आहे, अट्टाहास नाही. कारण सक्तीनं सृजन होत नाही. तेव्हा पद्यसेवा कितपत आणि कशी होईल माहीत नाही. गुणात्मक मूल्यांकन आपणच करणार...