स्मृतीबनातून - खंत(पद्य)

 नमस्कार….


साहित्य, कला, संस्कृती या विषयांवर आधारित 'स्मृतीबनातून ' हा अनियतकालिक ब्लॉग मी जून 2019 (२५.६.२०१९) ला सुरू केला. तेव्हा पासून, आता पाच वर्षांहून अधिक काळ तो अनियतकालिका प्रमाणे पण सातत्यानं आपणाला सादर करीत आहे. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त लेख/कविता प्रकाशित झाले असून साधारणतः बहुतेक सर्व,लेख विभिन्न वृत्तपत्रं, मासिकं, दिवाळी अंक आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यानं माझा उत्साह वाढला. तसच आपणा पैकी बहुतेकांनी नियमित आणि काहींनी साक्षेपी अभिप्राय देऊन मला प्रोत्साहित केलं. त्याची उतराई मी कशी करणार?


या काळात हा ब्लॉग वाचलेल्यांची, पाहिलेल्यांची म्हणुया हवंतर, संख्या सुमारे 57 हजारांवर पोहोचली आहे. यात भारता खेरीज अमेरिका आणि अन्य 18 हून अधिक देशांतल्या सुमारे तीन हजार वाचकांचा ही समावेश आहे. 


आजवरची गद्यसेवा आपण रुजू करून घेतली आहे. तेव्हा आता आपणासमोर या ब्लॉगच्या माध्यमातून पद्यसेवा मांडण्याचाही मानस आहे, अट्टाहास नाही. कारण सक्तीनं सृजन होत नाही. ब्लॉगच्या शेवटी असलेल्या चौकटीत अभिप्राय जरूर नोंदवा.. 


 पुष्प पहिलं



खंत


पाऊस चांदण्यांचा बरसला जेव्हा मनात

निष्पर्ण कोरडा दारु उदास उभा वनात 

 

उसळल्या या अंतरात फेसाळ शुभ्र लाटा

भिजण्यास सागरी सोबती कुणीच नव्हता



स्वर कृष्ण बासरीचे तरळले आसमंती

ऐकण्या सुरावटीला राधा अधीर नव्हती



तन तंबुरी अशी झंकारली स्वरात

रुसले शब्द सारे अबोल भावगीत


चित्ती उमलून येता स्वर राग भैरवीचा
देण्यास मोकळी दाद नव्हती कुणी रसिका



रजकण अस्तित्वाचे विखुरले जगात जेव्हा

तर्पण करावयाला वारस कुणीही नव्हता



नितीन सप्रे, दिल्ली 

nitinnsapre@gmail.com 

190922

रामनवमी

टिप्पण्या

  1. माणसाच्या एकाकीपणाची वेदना फार प्रभावीपणे प्रतिबिंबित झाली आहे कवितेत !

    उत्तर द्याहटवा
  2. *खंत*

    पाऊस चांदण्यांचा बरसला जेव्हा मनात
    निष्पर्ण कोरडा दारु उदास उभा वनात

    उसळल्या अंतरात फेसाळ शुभ्र लाटा
    भिजण्यास सागरात सोबती कुणीच नव्हता
    स्वर कृष्ण बासरीचे तरळले आसमंती
    ऐकण्या सुरावटीला राधिका अधीर नव्हती

    तन तंबुरी अशी झंकारली स्वरात
    रुसले शब्द सारे अबोल भावगीत
    चित्तात उमलूनी येता स्वर राग भैरवीचा
    देण्यास दाद त्याला नव्हती कुणी रसिका
    रजकण अस्तित्वाचे विखुरले जगात जेव्हा
    तर्पण करावयाला वारस कुणीही नव्हता


    *श्री नितीन सप्रे*




    ही कविता वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, इथे दुःख केवळ सांगितलेलं नाही, तर ते जगलेलं आहे.
    “खंत” हा शब्द शीर्षकात आहे, पण प्रत्यक्षात ही खंत एखाद्या प्रसंगापुरती मर्यादित राहत नाही; ती अस्तित्वाच्या कडेला उभी राहून स्वतःलाच प्रश्न विचारते.
    पहिल्याच ओळीतला “पाऊस चांदण्यांचा” हा विरोधाभास...पाऊस म्हणजे ओलावा, चांदणं म्हणजे शीतल प्रकाश; मनाच्या आतल्या द्वंद्वाची खूण आहे. पण त्याच वेळी “निष्पर्ण कोरडा दारू” उभा आहे. म्हणजेच, बाहेरून बरसणाऱ्या सौंदर्यालाही आतल्या उरलेल्या कोरडेपणाने स्वीकारण्याची क्षमता गमावली आहे. हीच खरी खंत...
    अनुभव येतो, पण स्पर्श करत नाही.

    “उसळल्या अंतरात फेसाळ शुभ्र लाटा” ही ओळ अंतर्गत उन्मेषाची आहे. पण लगेचच “भिजण्यास सागरात सोबती कुणीच नव्हता” असं सांगून ती उन्मेषाची ऊर्जा एकाकीपणात विरघळते. इथे ‘सागर’ म्हणजे व्यापकता, पण ‘सोबती’ नसल्याने ती व्यापकताही व्यर्थ ठरते. माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं शोकांत वास्तव कदाचित हेच... भावना प्रचंड, पण साक्षीदार नाही.

    कवितेचा मधला भाग संगीताच्या रूपकांनी भरलेला आहे. “स्वर कृष्ण बासरीचे”, “राधिका”, “तंबुरी”, “राग भैरवी” हे सगळं सांस्कृतिक स्मरणांचं जग आहे. पण इथेही एकच धागा चालू आहे संगीत आहे, पण श्रोता नाही. कृष्णाची बासरी आहे, पण राधा अधीर नाही; तंबुरी झंकारते, पण शब्द रुसलेले; भैरवी उमलते, पण दाद द्यायला रसिक नाही. म्हणजेच, अभिव्यक्ती पूर्ण आहे, पण प्रतिसादाचा अभाव आहे. जणू कलाकाराने सगळी तयारी केली, पण सभागृह रिकामंच राहिलं.

    शेवटच्या दोन ओळी मात्र या कवितेला एका वेगळ्याच पातळीवर नेतात. “रजकण अस्तित्वाचे विखुरले जगात जेव्हा / तर्पण करावयाला वारस कुणीही नव्हता”
    इथे खंत वैयक्तिक राहात नाही; ती *अस्तित्वाच्या निरर्थकतेकडे* झुकते. आपण जे काही जगलो, अनुभवलं, ते शेवटी कुणाच्या स्मरणातही उरणार नाही, ही जाणीव माणसाला आतून पोखरते.

    एकंदर, ही कविता “एकटेपणा” या शब्दावर थांबत नाही; ती “अनुभव असूनही तो वाटता न येणं” या अधिक खोल जखमेवर बोट ठेवते. आजच्या काळात, जिथे संवादाच्या असंख्य साधनांचा गजर आहे, तिथे ही कविता शांतपणे विचारते...
    खरंच आपण कुणाला ऐकतोय का?


    *बिपीन बाकळे*
    ९८२२०१७०९१
    ३१ मार्च २०२६
    शालिवाहन शक :शक १९४८,चैत्र
    शुक्ल पक्ष त्रयोदशी
    विक्रम संवत: संवत २०८३,चैत्र
    शुक्ल पक्ष त्रयोदशी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ब्लॉग वर प्रकाशित केलेली ही माझी पहिलीच कविता. आपलं सार्थक विवेचन वाचून रसिक वाचकां पर्यंत भावना कवितेतून पोहोचत असल्याची एकप्रकारे पोच पावती मिळाली. समाधान वाटले. मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती