मंगेशाची यशवंत अरूणी सांजवेळ संध्याकाळ….दिवस आणि रात्र यांचा संधिकाल. दिवस आहे म्हणावं तर अंधारून यायला सुरुवात झालेली असते आणि म्हणून रात्र झाली म्हणावं तर अजूनही प्रकाश संपूर्णतः लोपलेला नसतो. दिनक्रमा प्रमाणेच जीवन क्रमात ही संध्याकाळ येते. तरुणपणा वर हक्क सांगता येत नाही कारण गात्र, रात्र थकायला सुरुवात झालेली असते. पण अद्यापही उमेद, एखाद्या खोडसाळ मुला-मुली प्रमाणे वृद्धत्वावर संपूर्ण दावा सांगू देत नाही. अशी ही संध्याकाळ मारव्याच्या सूरां सारखी हुरहूर लावणारी, कातर करणारी, आर्ततेला साद घालणारी असते. लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, गायक, कलाकार या साऱ्यांनाच ती नेहमीच खुणावत असते कारण अश्या संधीकाळी; जगण्यात, वागण्यात, बोलण्यात थोडी अधिक प्रगल्भता आलेली असते. निदान तशी ती अपेक्षित असते. तेव्हा अनेक जुन्या गोष्टींचा, घटनांचा, कलाकृतींचा अर्थ नव्यानं उलगडू लागतो. आकाशवाणी सारख्या माध्यमात सेवेची संधी मिळाल्या बद्दल मला त्या आकाशातल्या परमेशाचे ऋण अखेर पर्यंत मानले पाहिजे. कारण व्यावहारिक बाबींवर वाजवीपेक्षा जास्त भर देऊन स्वभाव धर्माच्या विपरीत केलेल्या किंवा झालेल्या शिक्षणाच्या ...