स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

सुधीर स्वरलालित्य योग आणि गुण यशोशिखरावर आरूढ व्हायचं असेल तर काही योग जुळून यावे लागतात तसच काही गुण व्यक्तिमत्त्वात असावे लागतात. योग म्हणाल, तर अगदी अजाण वयात गुण हेरू शकतील अशी मंडळी आसपास असणं, हेरलेले गुण विकसित व्हावे या साठी त्यांच्या कडून कृती होणं, उत्तम गुरू लाभणं, नियती आणि त्याबरोबरच दैवी कृपा लाभणं अशी यादी देता येईल आणि गुण म्हणाल तर गुरूनिष्ठा, तन्मयता, मेहनतीची तयारी, मन–बुद्धीची तरलता, अशा बाबी सांगता येतील. कोल्हापुरात 25 जुलै, 1919 साली जन्मलेल्या रामचंद्राच्या बाबतीत हे योग तसंच गुण, छान जुळून आले. दारावर येणाऱ्या बैराग्यांनी गायलेली भजनं, कवनं, गाणी यांची सही सही नक्कल अडीच तीन वर्षांचा राम करीत असे. त्याचं घराणं हे निस्सिम राष्ट्रभक्त. वडील व्यवसायानं वकील. कोल्हापुरातील टिळक असा नावलौकिक कमावलेला. छोट्या रामाची गायन कलेतली रुची आणि गती त्यांनी वेळीच हेरली. (वडील) सुदैव असं की त्याच्या दोन्ही मामांनीही त्याला गायन शिकवण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली आणि अवघ्या सहाव्या वर्षी या रामलल्लाला त्याचे वडील गानवासासाठी वामनराव पाध्येबुवां कडे पाठवते झाले. क...