स्मृतीबनातून – तालवाद्यांचा तालेवार


तालवाद्यांचा तालेवार 



प्रस्ताविक

लॉर्ड्स ऑफ रिदम’

आपल्या अंगीभूत आणि जोपासलेल्या तालवाद्यातील निपुणतेनं हिंदी चित्रपट सृष्टीवर 1947 ते 1987 अशी चार दशकं, पिता कावस आणि दोन मुलं बर्जोर आणि केरसी लॉर्डस  या परिवारानी अधिराज्य गाजवलं. या दरम्यान ध्वनिमुद्रित/चित्रित झालेल्या प्रत्येक तिसऱ्या गाण्यात या परिवारतल्या या तीन सदस्यांपैकी कुणी न कुणी वाद्य वाजवलं आहे अशी माहिती मिळते. कावस लॉर्ड तर पहिला बोलपट आलम आराच्या निर्मिती पासूनच या क्षेत्रात कार्यरत होते. इतकंच नाही तर ताल वाद्ये किंवा आघातानी ध्वनी निर्माण होणारी वाद्ये ही भारतीय चित्रपट संगीत सृष्टीला त्यांची देण आहे असं ही माहितगार सांगतात. तर केरसी या बर्जोरच्या भावानं डिजिटल म्युझिक इक्विपमेंटचा या संगीत विश्वाला परिचय करून दिला. स्वतः बर्जोर लॉर्ड्स यांना नानाविध तालवाद्य बजावण्यात सिद्धहस्तता प्राप्त झाली होती. ड्रमस व्यतिरिक्त ते काँगो बाँगो, घुंगरू, झायलोफोन, व्हायब्रोफोन, लाकडी ब्लॉक्स अशी कितीतरी वाद्ये अधिकारपूर्वक वाजवित. ऑक्टोपॅड तसंच इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड वाजवण्यातही ते पारंगत होते. आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत त्यांनी काही शे नाही तर 15000 गाणी ध्वनिमुद्रित केली. या बहारदार कामगिरी मुळेच लॉर्ड्स कुटुंबाला ‘लॉर्ड्स ऑफ रिदम’ असं संबोधण्यात येत असे.

स्वप्नपूर्ती

बर्जोर हे बुझी या संक्षिप्त नावानं ओळखले जायचे.  त्याचा जन्म मुंबईतला. 19 जुलै 1941 सालचा. संगीतमय वातावरणाची भारलेल्या घरातला. मात्र संगीताच्या प्रांतात मुशाफिरी करण्यापेक्षा मर्चंट नेव्हीत दाखल होऊन जगभरात प्रवास करण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण दहावीच्या परीक्षेत मार्कांनी दगा दिला त्यामुळे मार्ग बदलला. भर म्हणून डोळ्यांवर चष्मा आला आणि मर्चंट नेव्हीत भरती होऊन जागतिक पर्यटनाचं स्वप्न चूर झालं. मग त्याला सुरांच्या सांगीतिक दुनियेत कामगिरी करण्याचा विकल्प निवडावा लागला. वयाच्या सातव्या वर्षा पासूनच ऑर्गन, पियानो अकॉर्डियन सारखी वाद्य  तो शिकत होताच. आणि म्हणतात ना ‘Sincere desires are fullfild’ या उक्तीला अनुसरून सांगितिक तालाचा हात हाती घेऊन बुझीनं लता, रफी, आशा, मुकेश, किशोर अशा दिग्गज बॉलिवूड गायकां बरोबर कार्यक्रमानिमित्त दोन डझनाहून अधिक देशांचे दौरे करून आपलं जागतिक पर्यटनाचं स्वप्न अशाप्रकारे सत्यात उतरवलं. 

करिअर

बुझीचं संगीत दुनियेतील करिअर त्याच्या वयाच्या सतराव्या वर्षी, 1958 साली सुरू झालं ते ही अकस्मात. एका ध्वनिमुद्रणाच्या वेळी भाऊ केरसी लॉर्ड्स आजारी पडला म्हणून शंकर जयकिसन यांना म्युझिक अरेंजर दत्ताराम यांनी बुझीचं नाव सुचवलं. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बुझीनं काँगो बाँगो, घुंगरू, झायलोफोन, व्हायब्रोफोन, लाकडी ब्लॉक्स, इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड, ऑक्टोपॅड अशा कितीतरी वाद्यांवर हुकूमत मिळवली होती. ड्रम वाजवत असताना वडील त्याच्या हातून ड्रमस्टिक खेचून घ्यायचे, जर ती हातातून निसटली तर ती बुझीच्या बोटांवर ते मारत. कारण ड्रम द्रुतगतीत वाजवत असताना ड्रम स्टिक हातातून निसटून वादनात रसभंग होऊ नये म्हणून; त्यांच्या वरील पकड पकड घट्ट व्हावी यासाठी. बुझीनी दिल्ली घराण्याचा तबला आणि नगारा यात हि कौशल्य मिळवलं होतं. हिंदुस्तानी राग रागीण्यांशीही त्यांनी हार्मोनियम या माध्यमातून थोडा परिचय करून घेतलं होता. त्याची पश्चिमी वाद्यांवरही चांगली पकड होती. याच्या बरोबर लॅटिन आणि मालेट वाद्यांचा मेळ घालून बुझीनी आपली स्वतःची अशी अनुपम शैली घडवली होती आणि या वाद्यमेळ्या मुळेच तो बॉलीवूड संगीत विश्वात वादक म्हणून रौप्यमहोत्सवी कारकिर्द घडवू शकला. प्रामुख्यानं ड्रमस आणि व्हायब्रोफोन वाजवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकारानं ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘दम मारो दम’, ‘मेहबूबा महबूबा’, ‘दुनिया मी लोगो  को’, ‘कजरा मोहब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘रहे ना रहे हम’, ‘सायोनारा’, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीए’...या सारख्या गाजलेल्या असंख्य गाण्यांतून बुझीनं कितीक वाद्ये वाजवली असतील याची गणनाच करता येणार नाही. लय आणि ताल जणुकाही त्याच्या नसानसात सतत थिरकत असे. रामसे ब्रदर्स च्या भयपटांचं पार्श्वसंगीत, वैजयंतीमालाचा इंडियन बॅले, शास्त्रीय नर्तक गोपीकृष्णन किंवा नृत्य दिग्दर्शक सरोज खान या साऱ्यांचीच बुझीवर त्याच्या कलासक्तते मुळे विशेष मर्जी होती. त्यांच्या अनेक निर्मितीत बुझीचा अदृश्य हात असायचा. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आघाडीच्या बहुतेक सर्व संगीतकारां बरोबर बुझीनं काम केलं असलं तरी पंचम त्याला विशेष आव्हानात्मक वाटायचा. संगीतातल्या काही खुबी त्याला ओ पी नय्यर यांच्याकडून शिकायला मिळाल्या.

संगीताला अलविदा

ज्याचं शरीर, अंतर्मन हे सदा लय ताल युक्त होतं, हातात जादुई कौशल्य होतं, ज्याला नवनिर्मितीचा सतत ध्यास होता अशा बर्जोर लॉर्डस सारख्या आसक्त कलाकाराला राजकारणी तिकडमबाजी कशी आणि किती काळ झेपणार? त्याला मुंबईतल्या गर्दीचा, धकाधकीचा वीट आला असणार. सर्वप्रकारचं प्रदूषण विरहित शांत आयुष्य व्यतीत करण्याचे वेध लागले असणार, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल उपकरणांमुळे संगीताच्या दुनियेत थेट नैसर्गिक कौशल्याला मिळू लागलेली मागची सीट अस्वस्थ करू लागली असणार. शिवाय सर्जनशील अशा क्षेत्रात कार्यरत कलाकारांनी प्रतिभेला ओहोटी लागण्या पूर्वीच, आता निवृत्त का होत नाही? असा प्रश्न रसिकांनी विचारण्या आधीच थांबलं पाहिजे असं त्याचं मत होतं. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून की काय आपली सांगितिक कारकिर्द ऐन भरात असताना 1988 साली त्यांनी त्यांच्या सुमारे तीन दशकीय तालबद्ध कारकिर्दीला पूर्ण विराम दिला आणि गुजरात मधल्या नारगोळ गावी जाऊन संगीताशी जराही संबंध नसला तरी निर्मितीशी संबंधित अशा बांधकाम क्षेत्रात यशस्वीपणे पाय रोवले. अर्थात संगीत क्षेत्रात कर्णदीपक कामगिरी करूनही योग्यतेनुरूप नाव झालं नाही याची आणि ज्यांच्या आधारे अक्षरशः हजारो गाणी साजिरी गोजिरी केली, अजरामर झाली ती वाद्यं न  जपल्याची सल बर्जोर लॉर्डसच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आजन्म जिवंत राहणार.

नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

19072025

 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक