स्मृतीबनातून – तालवाद्यांचा तालेवार




तालवाद्यांचा तालेवार 



‘लॉर्ड्स ऑफ रिदम’

आपल्या अंगीभूत आणि जोपासलेल्या तालवाद्यातील निपुणतेनं हिंदी चित्रपट सृष्टीवर 1947 ते 1987 अशी चार दशकं, पिता कावस आणि दोन मुलं बर्जोर आणि केरसी लॉर्डस  या परिवारानी अधिराज्य गाजवलं. या दरम्यान ध्वनिमुद्रित/चित्रित झालेल्या प्रत्येक तिसऱ्या गाण्यात या परिवारतील या तीन सदस्यांपैकी कुणी न कुणी वाद्य वाजवलं आहे अशी माहिती मिळते. कावस लॉर्ड तर पहिला बोलपट आलम आराच्या निर्मिती पासूनच या क्षेत्रात कार्यरत होते. इतकंच नाही तर ताल वाद्यं किंवा आघातानी ध्वनी निर्माण होणारी वाद्यं ही भारतीय चित्रपट संगीत सृष्टीला त्यांची देण आहे असं ही माहितगार सांगतात. तर केरसी या बर्जोरच्या भावानं, डिजिटल म्युझिक इक्विपमेंटचा या संगीत विश्वाला परिचय करून दिला. स्वतः बर्जोर लॉर्ड्स यांना नानाविध तालवाद्यं वाजवण्यात सिद्धहस्तता प्राप्त झाली होती. ड्रमस व्यतिरिक्त ते काँगो बाँगो, घुंगरू, झायलोफोन, व्हायब्रोफोन, लाकडी ब्लॉक्स अशी कितीतरी वाद्ये अधिकारपूर्वक वाजवित. ऑक्टोपॅड तसंच इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड वाजवण्यातही ते पारंगत होते. आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत त्यांनी शेकड्यांनी नाही तर पंधरा हजार (15000) गाणी ध्वनिमुद्रित केली. या बहारदार कामगिरी मुळेच लॉर्ड्स कुटुंबाला ‘लॉर्ड्स ऑफ रिदम’ असं संबोधण्यात येत असे.

स्वप्नपूर्ती

बर्जोर हे बुझी या संक्षिप्त नावानं ओळखले जायचे.  त्याचा जन्म मुंबईतला. 19 जुलै 1941 सालचा. संगीतमय वातावरणानी भारलेल्या घरातला. मात्र संगीताच्या प्रांतात मुशाफिरी करण्यापेक्षा मर्चंट नेव्हीत दाखल होऊन जगभरात प्रवास करण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण दहावीच्या परीक्षेत मार्कांनी दगा दिला त्यामुळे मार्ग बदलला. भर म्हणून डोळ्यांवर चष्मा आला आणि मर्चंट नेव्हीत भरती होऊन जागतिक पर्यटनाचं स्वप्न चूर झालं. मग त्याला सुरांच्या सांगीतिक दुनियेत कामगिरी करण्याचा विकल्प निवडावा लागला. वयाच्या सातव्या वर्षा पासूनच ऑर्गन, पियानो अकॉर्डियन सारखी वाद्यं तो शिकत होताच. म्हणतात ना ‘Sincere desires are always fulfilled’ या उक्तीला अनुसरून सांगितिक तालाचा हात हाती घेऊन बुझीनं लता, रफी, आशा, मुकेश, किशोर अशा दिग्गज बॉलिवूड गायकां बरोबर कार्यक्रमानिमित्त दोन डझनाहून अधिक देशांचे दौरे करून आपलं जागतिक पर्यटनाचं स्वप्न अशाप्रकारे सत्यात उतरवलं. 

करिअर

बुझीचं संगीत दुनियेतील करिअर त्याच्या वयाच्या सतराव्या वर्षी, 1958 साली सुरू झालं ते ही अकस्मात. एका ध्वनिमुद्रणाच्या वेळी भाऊ केरसी लॉर्ड्स आजारी पडला म्हणून शंकर जयकिसन यांना म्युझिक अरेंजर दत्ताराम यांनी बुझीचं नाव सुचवलं. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बुझीनं काँगो बाँगो, घुंगरू, झायलोफोन, व्हायब्रोफोन, लाकडी ब्लॉक्स, इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड, ऑक्टोपॅड अशा कितीतरी वाद्यांवर हुकूमत मिळवली होती. ड्रम वाजवत असताना वडील मागे जाऊन अचानक त्याच्या हातून ड्रमस्टिक खेचून घ्यायचे, जर ती हातातून निसटली तर ती बुझीच्या बोटांवर ते मारत. कारण ड्रम द्रुतगतीत वाजवत असताना ड्रम स्टिक हातातून निसटून वादनात रसभंग होऊ नये म्हणून; त्यांच्या वरील पकड घट्ट असावी यासाठी. मात्र हीच कडक शिस्त बुझीच्या हातात अफाट ताकद आणि वेगाची बक्षिसी देऊन गेली. ड्रमवर त्याचं हस्तलालित्य पाहणं हा एक अद्भुत अनुभव असायचा. बुझीचे हात आणि बोटं ड्रमवर अशा काही विलक्षण गतीनं नृत्यरत होत असत की ते हस्तलाघव पाहून रसिकांच्या मनात आनंदाची भावना तर निर्माण व्हायचीच पण त्याच बरोबर आश्चर्यचकित होऊन, हातात कुठे मशीन तर बसवली नाही ना अशी शंकाही त्यांच्या मनात हळूच डोकावून जायची. साठच्या दशकात त्यांनी केलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात तर स्थानिक लोक आणि पाश्चात्त्य संगीतकार द्रुत गतीत ड्रम वाजवण्याच्या त्यांच्या अनोख्या कौशल्यामुळे थक्क झाले. त्यांचा हाताच्या हालचाली इतक्या वेगानं होत की, लोक त्यांचे हात तपासून बघायचे की त्यांनी कपड्यांखाली ड्रम वाजवणारी एखादी स्वयंचलित मशीन तर लपवली नाही ना! याच दौऱ्यानंतर तिथल्या वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर त्यांचे फोटो छापून त्यांची तुलना जीन क्रूपा या अमेरिकी ड्रमरशी केली आणि त्यांना भारताचा जीन क्रूपा असंही म्हटलं गेलं. बुझीनं दिल्ली घराण्याचे इनाम खान यांच्याकडून तबला आणि किशन महाराज यांच्याकडून नगाडा वाजवण्याचं रीतसर शिक्षणही घेतलं होतं. भारतीय संगीतातल्या तालतंत्राचा सखोल अभ्यास असल्यामुळे त्यांनी पाश्चात्त्य ड्रम वाजवताना एक सुवर्णमध्य शोधला होता. त्यांचं असं मत होतं की, गाण्यात 'गायक' हा सर्वोपातरी महत्त्वाचा असतो. त्यामुळे तो जेव्हा गात असेल, तेव्हा ते ड्रमचा आवाज सौम्य ठेवायचे आणि गाण्यातील 'खाली जागेत' (Spaces/Gaps) आपली लयकारी भरायचे, जेणेकरून गायकाला त्रास होणार नाही.

हिंदुस्तानी राग–रागीण्यांशीही त्यांनी हार्मोनियमच्या माध्यमातून थोडा परिचय करून घेतला होता. पश्चिमी वाद्यांवरही चांगली पकड होती. त्याच बरोबर लॅटिन आणि मालेट वाद्यांचा मेळ घालून बुझीनी आपली स्वतःची अशी अनुपम शैली घडवली होती आणि या वाद्यमेळ्यामुळेच तो बॉलीवूड संगीत विश्वात वादक म्हणून रौप्यमहोत्सवी  कारकिर्द घडवू शकला.

1950 च्या दशकात हिंदी गाण्यांमध्ये 'अ‍ॅकॉर्डियन' (Accordion) या पाश्चात्य वाद्याचा वापर फारसा होत नसे. सी. रामचंद्र यांनी 'अलबेला' चित्रपटासाठी बर्जोर लॉर्ड्स यांना निमंत्रित केलं. बर्जोर यांनी वाजवलेल्या अ‍ॅकॉर्डियनच्या चाली इतक्या गाजल्या की, त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत अ‍ॅकॉर्डियन वापरण्याचा मोठा ट्रेंड सुरू झाला. ओपी नय्यर यांचं संगीत दिग्दर्शन असलेल्या आरपार(1954) या चित्रपटातल्या ‘ये लो मै हारी पिया ’ या गाजलेल्या गाण्यात त्यांनी वाजवलेलं अ‍ॅकॉर्डियन त्या गाण्याची ओळख बनलं. ​‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया ’(हम दोनों - १९६१) या जयदेव यांच्या संगीतातील अजरामर गाण्यात सुरुवातीला ऐकू येणारं 'ग्लोकेनस्पील' (Glockenspiel) हे विशिष्ट वाद्य बर्जोर यांनीच वाजवलं होतं. किस्मत चित्रपटातलं ​‘आओ हुजूर तुमको’, अनुभव मधलं ‘मुझे जां न कहो मेरी जान’ या गाण्यातलं मंद आणि नजाकतदार संगीत बर्जोर यांच्या अ‍ॅकॉर्डियनमुळे अधिक प्रभावी झालं यात शंका नाही. अशी आणखी कितीतरी उदाहरणं देता येतील. प्रामुख्यानं ड्रमस आणि इतरही बरीच वाद्यं वाजवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकारानं ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘दम मारो दम’, ‘मेहबूबा महबूबा’, ‘दुनिया मी लोगो  को’, ‘कजरा मोहब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘रहे ना रहे हम’, ‘सायोनारा’, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीए’...या सारख्या गाजलेल्या किती गाण्यांना आपल्या वादन कलेनं सुरेल सुरुपता आणली याची गणनाच करता येणार नाही. अत्यंत कुशल अ‍ॅकॉर्डियन वादक (Accordionist) म्हणूनही त्यांना लौकिक प्राप्त झाला होताचं. त्या काळात लाइव्ह रेकॉर्डिंग असायचं. शंभराहून अधिक वादक एकाच वेळी वादनात भाग घेत असत. बर्जोर लॉर्ड्स यांच्या वादनात एकाही सुराची किंवा तालाची जराही गल्लत होत नसे. अनेकदा मोठ्या संगीतकारांच्या कठीण कंपोझिशन ते पहिल्याच 'टेक'मध्ये ‘ओके’ करत असत.

लय आणि ताल जणुकाही त्याच्या नसानसात सतत थिरकत असे. रामसे ब्रदर्स च्या भयपटांचं पार्श्वसंगीत, वैजयंतीमालाचा इंडियन बॅले, शास्त्रीय नर्तक गोपीकृष्णन किंवा नृत्य दिग्दर्शक सरोज खान या साऱ्यांचीच बुझीवर त्याच्या कलासक्ततेमुळे विशेष मर्जी होती. त्यांच्या अनेक निर्मितीत बुझीचा अदृश्य हात असायचा. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आघाडीच्या बहुतेक सर्व संगीतकारां बरोबर बुझीनं काम केलं असलं तरी पंचम त्याला विशेष आव्हानात्मक वाटायचा. एक तर पंचमदा हे आत्यंतिक प्रयोगशील वृत्तीचे संगीतकार होते. एका मुलाखतीत बुझी लॉर्ड यांनी सांगितलं होतं की, "पंचमदा यांच्या रेकॉर्डिंगच्या आदल्या रात्री मला कधीच शांत झोप यायची नाही." कारण काय तर, ते दुसऱ्या दिवशी स्टुडिओत कोणतं नवं वाद्य वाजवायला सांगतील आणि परीक्षा घेतील, याची बुजींना नेहमीच धास्ती असायची. ते पंचमदांच्या टीमचे महत्त्वाचे सदस्य होते. एका गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान, ठराविक तालासाठी कोणतं वाद्य वापरावं असा प्रश्न पडला असता, बर्जोर यांनी 'वायब्रॅफोन' (Vibraphone) या वाद्याचा असा काही खुबीनं वापर केला की पंचमदा थक्क झाले. हरे रामा हरे कृष्णा चित्रपटातलं 'दम मारो दम' किंवा ‘शोले’तलं 'महबूबा महबूबा' ही कालजयी गाणी सर्वांनाच निश्चितच आठवत असणार. पंचमच्या या गाण्यांना अविस्मरणीय करण्यात ड्रमच्या त्या तुफानी थराराचं योगदान अमूल्य आहे हे कुणीही सहज मान्य करेल..या थराराचा करता करविता बुझी लॉर्ड आहे. ताल संगीतातल्या काही खुबी, त्यांनी ताल प्रधान संगीत रचनांसाठीही प्रख्यात असलेल्या तालेवार संगीतकार ओ पी नय्यर यांच्याकडून आत्मसात केल्या होत्या. 

आता असं ज्याचं शरीर, अंतर्मन हे सदा लय ताल युक्त होतं, हातात जादुई कौशल्य होतं, ज्याला नवनिर्मितीचा सतत ध्यास होता अशा बर्जोर लॉर्डसनं संगीत क्षेत्रापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला कारण १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात चित्रपट संगीतात 'सिंथसायझर' आणि 'डिजिटल ड्रम मशीन'चा वापर वाढू लागला. अर्थकारण आणि सुटसुटीतपणाच्या निकषांवर हा पर्याय अधिक सोईस्कर वाटू लागला. यामुळे प्रत्यक्ष वाद्यं वाजवणाऱ्या कलाकारांचं महत्त्व मात्र कमी होत गेलं. बुझी लॉर्ड यांना डिजिटल पद्धतीनं निर्मिलेले कृत्रिम ध्वनी अजिबात मान्य नव्हते. त्या बरोबरच त्याच्या सारख्या आसक्त कलाकाराला स्टुडिओतल्या बेताल राजकारणी तिकडमबाजीचाही तिटकारा येऊ लागला. या गोष्टी त्याला कशा आणि किती काळ झेपणार? त्याला मुंबईतल्या गर्दीचा आणि धकाधकीचाही वीट आला.  सर्वप्रकारचं प्रदूषण विरहित शांत आयुष्य व्यतीत करण्याचे त्याला वेध लागले असणार, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल उपकरणांमुळे संगीताच्या दुनियेत थेट नैसर्गिक कौशल्याला येत चाललेलं गौणत्व, मिळू लागलेलं मागचं स्थान निश्चित याचा एकूण परिणामानं त्याला अस्वस्थता आली. शिवाय सर्जनशील क्षेत्रात कार्यरत मंडळींनी, कलाकारांनी, प्रतिभेला ओहोटी लागण्यापूर्वीच, आता निवृत्त का होत नाही? असा प्रश्न रसिकांनी विचारण्याआधीच थांबलं पाहिजे असं त्याचं मत होतं. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून त्यानं अचानक ड्रमस्टिक्स खाली ठेवल्या. आपली सांगितिक कारकिर्द ऐन भरात असताना 1988 साली,  सुमारे तीन दशकीय तालबद्ध कारकिर्दीला त्यांनी पूर्ण विराम दिला. तत्पशात गुजरात मधल्या नारगोळ गावी जाऊन संगीताशी जराही संबंध नसला तरी निर्मितीशी संबंधित अशा बांधकाम क्षेत्रात यशस्वीपणे पाय रोवले. अर्थात संगीत क्षेत्रात कर्णदीपक कामगिरी करूनही योग्यतेनुरूप नाव झालं नाही याची आणि ज्यांच्या आधारे अक्षरशः हजारो गाणी साजिरी गोजिरी केली, अजरामर झाली ती वाद्यं न जपल्याची सल बर्जोर लॉर्डसच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी पण ठळकपणे आजन्म जिवंत असणार.

नितीन सप्रे













तालवाद्यांचा तालेवार 




 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक - उड्डाण परी- कॅप्टन जोया

स्मृतीबनातून - हृदयस्थ

स्मृतीबनातून - तरूतळीची विरहिणी