स्वरमंगेशाचा अभिषेकी प्रारंभिक गणेश बळवंत नवाथे म्हणजेच पंडित जितेंद्र अभिषेकी या नावाने सर्वांना सुपरिचित असलेले विसाव्या शतकातल्या सुरलोकाचे एक कुलपती. संगीत क्षेत्रातील एक अत्यंतिक अधिकारी आदरणीय व्यक्तिमत्व. परंपरा आणि नियमांचा पट्टा गळ्याला घट्ट आवळून घेणं म्हणजे घराणा गायकी असं त्यांनी कधीच मानलं नाही आणि म्हणूनच शास्त्रीय संगीत गायनाची आपली स्वतंत्र शैली त्यांना निर्माण करता आली. ते केवळ शास्त्रीय गायकच नव्हते तर त्या बरोबरीनं नाट्यगीतं, अभंग, भावगीतं, ठुमरी, दादरा, कजरी, टप्पा यासारखे उपशास्त्रीय प्रकारही आशयपूर्ण, रसाळपणे सादर करून त्यांनी अभिजात रसिकांच्या काळजात घर केलं. अगदी लोकसंगीतासह संगीताचे नानाविध प्रकार ते तितक्याच सशक्तपणे रचित, गात असत. याबरोबरच ते एक सुजाण संगीत शिक्षकही होते. संगीत दिग्दर्शनाची हातोटी तर अशी होती की आधुनिक काळात मराठी संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवित करण्याचं श्रेय निर्विवाद त्यांच्याकडे जातं. त्यांना संस्कृत, उर्दू, पोर्तुगीज या भाषाही अवगत होत्या. एकूणच गायन आणि गायनाधिष्ठित विद्वत्तेचा त्यांचा सुरेल व्यासंग होता. जडण घडण जितेंद्र अभिषेकी यांचं...