स्मृतीबनातून – स्वरशब्दांत नखशिखांत रमलेला सुधीर कवी
प्रतिभा! ती अशी सहजी कुणावर प्रसन्न होत नाही. अथक साधना किंवा प्रयत्नांनी ही, तिला वश करून घेता येईलच असं नाही. तिचा कृपाप्रसाद हा बहुदा पूर्व संचिताचा भाग असतो. पण तिचा एखादा कटाक्ष ज्याच्यावर पडतो, त्याची स्थिती ‘माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले’ अशी होऊन जाते. इतकेच नव्हे, तर 'माझे प्राण तुझे प्राण, उरले ना वेगळाले’ अशा अद्वैतावस्थेचा अनुभव येतो. एकदा का प्रतिभा आणि कलावंत यांच्यात हा तादात्म्य भाव रुजला, की मग पुढची वाटचाल विलक्षण होऊन जाते.
“मला लागे तुझी आस, तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे, माझे तुझे होती भास॥
माझ्यातून तू वाहसी, तुझ्यातही मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे, गूज माझ्यातुझ्यापाशी॥
तुझी माझी पटे खूण, तुझी माझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण, माझे मन तुझे मन॥”
या सुधीर शब्दांना, संधिकाळी आळविल्या जाणाऱ्या पुरिया धनश्रीचे, विरह भावना गडद करणाऱ्या सुधीर स्वरांच कोंदण लाभलं तर संधिप्रकाशाची शांतता, कोमल रिषभ आणि तीव्र मध्यम स्वरांचं आंदोलन, निसर्गालाही विरहाच्या रंगात रंगवून टाकेल. मग ही सुरावट मनाला एका अशा तृप्त पण व्याकुळ करणाऱ्या अवस्थेत घेऊन जाईल, जिथे 'विरह' वेदना न राहता एक नितांत सुंदर काव्य बनून मनातून अलगद पाझरेल.
मराठी सारस्वत विश्वात स्वर, शब्द, रंग आणि रेषा अशा विविध कलांचा बहुरंगी कृपा कटाक्ष लाभलेलं अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे कवी सुधीर मोघे. गीतकार, संगीतकार, चित्रकार, संकल्पनाकार आणि निवेदक अशा विविधांगी भूमिकां मधील त्यांचा वावर अगदी सहज सुंदर असला तरी काव्याशी त्यांचं विशेष नातं होतं. आपण कवी आहोत ही त्यांची लाडकी धारणा होती. “जेव्हा मी कविता लिहित नव्हतो तेव्हाही मी कवी होतो आणि जेव्हा मी कविता लिहिणं थांबवेन तेव्हाही मी कवीच असेन.” त्यांनीच त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या शेवटी लिहून ठेवलेलं हे वाक्य. कवितेवर त्यांचं मनस्वी प्रेम होतं. ती त्यांची सखी होती. सुखदुःखात सम, निरपेक्ष साथ देणारी अनन्य मैत्रीण.
मोघे यांचं व्यक्तिमत्व घडविण्यात आणखी एका माध्यमाचा हातभार लागला; ते म्हणजे ‘रेडिओ सिलोन.’ हे माध्यम त्यांच्यासाठी सर्वस्व होतं. कारण रेडिओ सिलोनच्या श्रवण भक्तीतून कवितांचा, रचनांचा, गीतांचा, संगीताचा अभ्यास नकळत घडत गेला. त्यांनीच म्हटल्या प्रमाणे, याच सर्व सुरेल, सुरेख घडामोडींंतून त्यांना स्वरा पलीकडची कविता सापडली. दुसरीकडे संतकवी, केशवसुत, मर्ढेकर असं वाचनही सुरू होतं. पण तरी देखील आपण कवी व्हावं अशी उत्सुकता मात्र नव्हती. हे असं कां? आयुष्यभर कवीपण मिरवणाऱ्या, कवितेवर निस्सिम प्रेम करणाऱ्या, तिला सखी मानणाऱ्या मोघेंना, कवी का बरं व्हायचं नव्हतं? तर याला कारण म्हणजे आचार्य अत्रे आणि कवींची खिल्ली उडवणारं काव्य! अत्रे व्यक्तिशः नाही, तर ‘झेंडूची फुले’ हा त्यांच्या विडंबन काव्य संग्रह त्याला जबाबदार होता. ज्यात त्यांनी कवीं वर भरपूर लेखनसुख (तोंडसुखच्या धर्तीवर) घेतलं आहे आणि त्याचबरोबर तशाच काही अन्य कविता. आहे ना प्रकरण गमतीशीर? ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या हाती अत्रेंचा म्हणजे केशवकुमार यांचा ‘झेंडूची फुले’ हा विडंबन काव्यसंग्रह आला. शिवाय त्यांच्याकडे असलेल्या एका पुस्तकातली कवीचा उपहास करणारी एक कविता, जी त्यांनीच एका कार्यक्रमात म्हणून दाखवली, ती म्हणजे,
‘अरे आला रे कवी आला
धावा धावा लपा लपा
पाठ याचे स्मरा
किंवा रामरक्षा तरी जपा,
कुण्या जन्माची पापे होती..
शिरी आली नेमकी कवीची उडी’
या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे त्यांच कविते वरचं प्रेम जरी आटलं नाही तरी कवी होण्याचा धसका मात्र त्या वयात त्यांनी घेतला होता. तो अल्पजीवी ठरला हे काव्य रसिकांच्या दृष्टीनं फारच उत्तम झालं नाहीतर, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘सजणा पुन्हा स्मरशील ना’, ‘मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा’, ‘दयाघना का तुटले चिमणे घरटे’, ‘सांज ये गोकुळी’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘काजळ रातीनं ओढून नेला’ ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?’अशा कितीतरी उत्तमोत्तम गीत काव्यांना आपण मुकलो असतो.
शब्द आणि स्वर ही सुधीर मोघे यांच्या जीवन गाण्याची दोन अभिन्न अंग होती. साधारणतः शास्त्रीय, अभिजात संगीत हे स्वरप्रधान तर भाव संगीत हे शब्दप्रधान असल्याचं म्हटलं जातं. पण स्वरप्रधान गायकीत शब्द गौण तर शब्द प्रधान गाण्यात स्वर गौण असा मात्र त्याचा अर्थ काढता कामा नये. जसे नाद लयींचे साक्षात्कार शब्दांतून ही होत असतात तद्वतच निराकार स्वरांमधून अर्थांचे लोट वहात असतात असं या कवीचं म्हणणं होतं आणि म्हणूनच ते त्या दोन्ही स्वतंत्र शक्ती मानत असत.
रागचित्रं
‘येणे कारणे मी बोलीन, बोली आरूपाचे रूप दावीन’ या ज्ञानेशाच्या उक्ती प्रमाणं या गीतकार, संगीतकार, चित्रकार कवीनं स्वरविश्व शब्दात पकडण्याचा अनोखा प्रयत्न केला. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बरोबर मुलतानी ते भैरवी असा स्वरशब्दांचा त्यांनी प्रवास केला. त्यातून जयजयवंती, बागेश्री, पुरिया, अडाणा, मारवा, दरबारी, भैरवी अशी अनोखी रागचित्रं चितारली गेली.
काव्यसृष्टीत दडलेल्या आणि घुटमळणाऱ्या सुधीर मोघे यांच्यातील गीतकाराला, स्वरांच्या विश्वात घेऊन येणाऱ्या संगीतकारां मध्ये राम फाटक, विश्वनाथ ओक, जितेंद्र अभिषेकी यांची महत्त्वपूर्ण प्रारंभिक भूमिका होती. या आणि अन्य संगीतकारांनी त्यांची कविता सुरेल, सुस्वर केली. या सुधीर काव्य वृक्षाला गीताची फांदी फुटली ती ‘हे नायका जगदीश्वरा’ या शब्दांची. हे गीत राम फाटक यांनी संगीतबद्ध केलं. पण तत्पूर्वी, मोघे काव्य प्रांतात अगदीच नवथर असताना, त्यांचेच मोठे बंधूं, श्रीकांत यांनी नाटक कंपनी स्थापन केली. एक नाटक करायचं ठरवलं. त्याची संहिता बघत असताना त्यातील शांता शेळके यांची सुंदर रचना मोघेंच्या वाचनात आली. पण कथेला ती पूर्णतः बसत नाही असं मोघे यांना वाटलं. ‘मन पाखरू पाखरू’ हे बहिणाबाईंच्याच कवितेचे शब्द नाटकाचं नाव असल्यानं त्यांना त्याच धाटणीची कविता सुचली...
‘पण तिलाही कळतो हात मायेचा कापरा,
अन् हवासा वाटतो येड्या प्रितीचा उबारा,
तिची तहान न भागे सात सागर पिऊन,
तिचं मिटे एका क्षणी पापणीतल्या थेंबानं,
मन पाखरू पाखरू असं दुनिये आगळं,
कुण्या जन्माच्या पुण्यानं देवा तुम्हा घडवलं’
कविता सर्वांनाच आवडली. कुणाला ती अशिक्षित काळजाचा उद्गार वाटली. त्यावर “माझी शिक्षणातली गती पाहता माझं काळीज अशिक्षितच म्हटलं पाहिजे” असं मोघे गमतीनं म्हणायचे. या नाटकाचे संगीत अभिषेकीबुवा करत होते त्यामुळे या कवितेला ही त्यांनीच चाल दिली. साधारणतः त्याच काळात सुधीर मोघे यांनी ‘स्वतंत्रते भगवती’ लिहिलं. गीताच्या दिशेनी अशी वाटचाल सुरू असताना त्याचं राजगडावर जाणं, तिथे त्यावेळी आलेलं राजा शिवाजी सिनेमाचं युनिट, दिग्दर्शक चंद्रवदन यांनी देऊ केलेली मदारी मेहतरची छोटेखानी भूमिका आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राजकमलच्या सेटवर हजर होणं, तिथे संगीतकार वसंत देसाईंशी भेट, त्यांनी स्वतंत्रते भगवती वाचलेलं असणं, चित्रपटासाठी आलेल्या कविता शिवाजी व्यक्तिरेखेच्या प्रखरतेशी तितक्या सुसंगत नसल्यानं; मोघेनाच त्या लिहायला सांगणं, अशी अगदी अवचित वाट त्यांच्या दिशेनी चालत येणं; हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. सुधीर मोघे यांनी गीत लिहिलं,
‘दिवसा उजेडी पुनव नसून आभाळी चांदवा आला,
समिंदरा माझ्या समिंदरा तुझ्या भाग्याचा उदय झाला’
आणि चित्रपट गीतकार सुधीर मोघे यांनाही उदयोस्तु असा आशीर्वाद मिळाला. याच सेटवर स्मिता पाटीलला भेटायला दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर आले होते. तिथे त्यांनी
‘घनदाट केसातून निथळती थेंब थेंब,
भोळंभाळं रूप असं भिजलेलं चंद्रबिंब,
ऐन लावण्याचा भर, ओठ मऊ ओलसर,
जाग जागी दंश त्याने केला गं,
सजणीला भेटायला साजणानं यावं तसा सांजवेळी पाऊस आला गं’
यासह काही गीतं ऐकली आणि त्यांना ‘खेळ सावल्यांचा’ चित्रपटाची गीतं लिहायला सांगितली. भेटी दरम्यान जोगळेकर म्हणाले, “सूर्योदय होतो आणि सावल्यांचे खेळ सुरू होतात” या वाक्यात सुधीर मोघे यांना चित्रपटाच्या शीर्षक गीताची बीजं सापडली.
‘आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
कर दो कर दो बेड़ा पार हमारा!’ ऐकवली आणि या चालीवर सुधीर मोघे यांनी शब्द लिहिले ‘दयाघना का तुटले चिमणे घरटे’ ही परीक्षाच होती पण सत्वपरीक्षेला, अनपेक्षिताला स्वतः आनंदानी सामोरं जाण्यात गंमत असते असं ते म्हणायचे. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्याकडे काम करताना आणखी वेगळीच परीक्षा असायची असं ते सांगत. त्यावेळी आघाडीच्या बहुतेक सर्व संगीतकार यांचा चाळीचा साचा तयार असे आणि त्यात मनातले शब्द ओतले की गीत दुडूदुडू धावत येत असे. मात्र बाबूजी स्वतः ही परीक्षेला बसत. ते चाल शोधत जात जात समोर साचाही घडवित आणि त्या चालीचा मागोवा घेत त्यावर कविता लिहायची अशी पद्धत होती.‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी' किंवा शापित चित्रपटातलं ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...दिस जातील दिसं येतील ’ ही गीतं असाच प्रकारे जन्माला आली. असं स्वतः मोघेंच सांगत असत.
मोघेंच्या काव्यगुणाला उपजत कौशल्य आणि सहजस्फूर्तीचा आशीर्वाद लाभला होता. असाच एकदा जानकी चित्रपटासाठी मोघेंनी पारंपरिक तालात रासावर गाणं लिहिलं होतं. ते काम अंतिम टप्प्यावर असताना नृत्य दिग्दर्शकांनी सहज विचार मांडला की नेहमीच्या पेक्षा वेगळा ताल विचार होऊ शकणार नाही का? कारण पारंपरिक तालात नृत्य बसवताना तोचतोचपणा येतो. संगीतकार हृदयनाथ गीतकार सुधीर मोघे दोघांनीही मनावर घेतलं. तयार असलेलं गीत रद्द करून नवीन चालीवर नवं गीत लिहिलं. नव्या ताल विचारात ते चित्रपटात घेतलं गेलं. ‘झुलतो बाई रास झुला, नभ निळे, रात निळी कान्हा ही निळा’ अशाप्रकारे चित्रपटसृष्टीला वेगळ्या तालात रचलेलं नवं रासगीत मिळालं.
त्यांच्या कविता या मुख्यत्वे सकारात्मकतेकडे झुकलेल्या अशा आहेत. या संदर्भात एक गमतीशीर किस्सा स्वतः मोघे यांनीच सांगितला होता. त्यावेळी त्यांचं रेडिओ, चित्रपट जगात अवतरण झालेलं होतं. ते मुंबईकर होते. त्या दिवसात एकदा भर दुपारी अचानक त्यांच्या मनात एक काव्यपंक्ती घोळू लागली. ‘तपत्या झळा उन्हाच्या सोशीत चाललो’ आपल्याला काही तरी उद्वेगजनक सुचलं म्हणून ते अगदी हुरळून गेले. मोघे सांगतात, “यामुळे झालेला आनंदही मी मनातल्या मनात लपवीत होतो. पुढच्या माणसाच्या तोंडाची चव गेलीच पाहिजे असं काहीतरी उद्वेगजनक लिहायचं या इरेला पेटून मी त्या ओळीचं पारायण करत होतो. ‘तपत्या झळा उन्हाच्या सोशीत चाललो’ पण कवितेनं पुढची ओळ दिली, ‘मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो’ तेव्हा आपल्या पिंडाशी झगडण्यात काही अर्थ नाही हे मला त्यावेळी कळून आलं.”
सुधीर मोघे म्हणायचे की,“त्यांची कविता ही नेहमीच स्वतःशीच बोलत रहायची पण गीतांसाठी मात्र बाहेरून धक्का लागायचा.” कुणी कितीही म्हटलं तरी सर्जनशील आयुष्य हे एकट्यानं जगतात येत नाही. त्यात अनेक प्रवाह येऊन मिसळतात. अनेक प्रेरणांमधून ते समृद्ध होत असत असं त्यांनी प्रांजळपणे मान्य केलं आहे.
एका दृष्टीनं सुधीर मोघे हे नशीबवान म्हटलं पाहिजे. संपूर्णतः सर्जनशील व्यावसायिकता (creative professional)त्यांच्या ठाई होती. मात्र त्यांनी गीत, काव्य यांचा व्यवसाय कधीच केला नाही. त्याची सर्जनशीलता ही स्वतःच्या आणि कला रसिकांच्या आनंदासाठी होती.
नितीन सप्रे
21062026

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा