स्मृतीबनातून-कांतांची अक्षयगाणी

कांतांची अक्षयगाणी अनेकदा क्रांती ही प्रितीसाठी मारक ठरते तर बरेचदा प्रितीमुळे क्रांती दुबळी होते. काही जणांना मात्र क्रांती आणि प्रीती या दोन्हीही एकाचवेळी धारण करता येतात. क्रांती आणि प्रीती या सवती प्रमाणं नाही तर सखी शेजारीणी प्रमाणे हातात हात गुंफुन त्यांच्याकडे नांदतात. प्रखर, ओजस्वी शब्दांच्या मशालीनं क्रांतीच स्फुल्लिंग चेतवित असताना, सोज्वळ, भावमधुर शब्दांनी प्रणय फुलाविण्याचं कसब ही मराठी सारस्वतात ज्या काही थोड्यांना लाभलं त्यात वा रा कांत यांचा प्रामुख्यानं समावेश होतो. वा रा कांत यांचा जन्म आणि प्रारंभिक शिक्षण मराठवाड्यात नांदेड इथं झालं. पुढील शिक्षणासाठी ते हैद्राबाद इथं गेले पण इंटर नंतर शिक्षणाशी फारकत घेऊन उपजिविकेसाठी नोकरी धारावी लागली. सुमारे एक तप त्यांनी निझाम सरकारच्या हैद्राबाद तसच औरंगाबाद रेडिओ केंद्रात आणि पंधरा वर्ष आकाशवाणीच्या विभिन्न केंद्रात मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवा केली. त्यांची इंग्रजी, हिंदी तसच उर्दु भाषेवर चांगली पकड होती. त्यामुळे काही उर्दु साहित्य त्यांनी भाषांतर करून मराठीत आणलं. त्यांनी केलेली प्रदीर्घ सहा दशकीय सर्जनशील साहित्य स...