स्मृतीबनातून –रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी


रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी’




उन्हाळ्याचे दिवस. दिवसभर आग ओकणारा सूर्य आता थोडा मवाळ झाला होता. मावळतीचं  त्याचं हे आरक्त रूपबिंब फारच विलोभनीय दिसत होतं. ते कॅमेरात कैद करण्याचा मोह आवरला नाही. आकाशी जणू झुंबर लावल्या प्रमाणे तो लोहगोल दिसत होता. दिवे लागण्याची ही वेळ. भास्कराच्या मावळण्यानी पसरत जाणाऱ्या अंधारात रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूर पर्यंत दिसत असलेल्या वस्त्यांमध्ये लागलेले दिवे, परिसर प्रकाशमान करत होते. दिठीनं हे सारं पाहत असताना अगदी सहजपणे एक आशयपूर्ण कविता ओठी आली. ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले....’

गोव्याचे प्रतिभावंत कवी शंकरबाब रामाणी यांची ही कविता. गोव्याचेच एक प्रतिभा संपन्न गायक, संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी या काव्याचं गाणं करून ते अनेक कानांपर्यंत पोहोचवलं. या गाण्याकडे निव्वळ गाणं म्हणून न पाहता नीट आकळून घेणं आनंददायी आणि योग्य ही ठरेल.

दिवे लागले’ या काव्याची जी काही माहिती हाती लागली त्यानुसार या कवितेला रामाणी यांच्या पत्नीच्या अखेरच्या असाध्य आजारपणाचा पदर आहे. त्यावेळी असलेल्या मानसिक स्थितीत मनात उत्पन्न झालेल्या मानसिक आंदोलनातून या काव्याचा जन्म झाला. पण विशेष म्हणजे, अशी पार्श्वभूमी असूनही या कवितेत कुठेही उथळ आक्रस्ताळेपणा अथवा केविलवाणेपण न जाणवता, माणसाच्या अंतर्मनातील अंधार दूर होऊन तिथे ज्ञानाचा, ईश्वरी कृपेचा उदय कसा होतो, याचे अत्यंत तरल आणि भावनिक वर्णन आहे. जेव्हा माणसाला स्वतःची खरी ओळख पटते, तेव्हा त्याचे संपूर्ण अस्तित्व चैतन्यानं न्हाऊन निघते, हाच या कवितेचा मुख्य गाभा आहे.

साधारणतः दिवे लागण्याचा संबंध आनंदाशी असला तरी ही कविता वाचल्यानंतर त्यातील शब्दांच वजन लक्षात घेता इथे तो दिवाळीतल्या दिव्यांशी नातं सांगणारा न वाटता अधिक मोठ्या आशयाशी निगडित असल्याचं जाणवतं.  रामाणी यांच्या कवितांतून मनाचं एकाकीपण, निसर्ग यांचं अतिशय सुंदर चित्रण पाहायला मिळतं. त्यांच्या काव्यातील प्रतिमा या सुस्पष्ट आणि थेट मनाला भिडतील अशा आहेत म्हणूनच भावकवी अशीही त्यांची ओळख आहे. अभिषेकी यांची स्वररचना आणि गायन भावार्थाशी कसं अगदी सुसंगत झालं आहे हे प्रमाणित होण्यासाठी काव्याचे पदर उलगडून पाहणं औत्सुक्यपूर्ण ठरेल.

​‘दिवे लागले रे, दिवे लागले रे,

तमाच्या तळाशी दिवे लागले;’

दिवे लागण्याचा प्रकाशाची, जागृतीशी थेट संबंध आहे. दिव्याचा प्रकाश अंधार नाहीसा करतो. आता हा अंधार अज्ञान रुपी अथवा मनातला ही असू शकतो. इथे तर दिवे तमाच्या तळाशी लागले आहे. अगदी अंतर्मनातील तळातला, कानाकोपऱ्यातला अंधार दूर करणारी ही दिवे लागणी आहे. पत्नीच्या आजारपणाची पार्श्वभूमी लक्षात घेता कवितेतला तम हा केवळ रात्रीचा अंधार न राहता तो मृत्यूछाया, भीती आणि असहायतेचा दर्शक असल्याचं लक्षात येतं. अशा परिस्थितीत लागणारे दिवे सुद्धा साहजिकच निव्वळ प्रकाशाचे नसून एकप्रकारे 'आत्मबळ आणि स्वीकार यांचे आहेत हा प्रतिकार्थ सहज लक्षात येतो. 

‘दिठीच्या दिशा खोल तेजाळतांना

कुणी जागले रे? कुणी जागले?’

'दिठी' म्हणजे दृष्टी अथवा नजर. दिठीच्या टप्प्यात येणारा प्रकाशात मनातला अंधार जेव्हा दूर होतो, तेव्हा खोलवर पसरलेल्या प्रकाशात आत्मबोध जागृत होवून स्वतःचा शोध सुरू होतो.

‘रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी

असे झाड पैलाड पान्हावले;’

रिकाम्या ओंजळीत म्हणजेच जीवन रस संपूर्ण आटून गेला आहे अशा परिस्थितीत अगदी अचानक ओंजळ जेव्हा पुष्पवृष्टीनी काठोकाठ भरुन जाते. वठलेल्या मनाला अवचित अशी पालवी फुटते ती कशामुळे? तर पैलतीरी, असणाऱ्या विश्वात चैतन्यरुपी झाड पान्हावलं आणि त्याला मायेचा, कृपेचा पाझर फुटल्यानी नव्यानं आत्मशोधाचा जीवनरस पाझरला आहे.

‘तिथे मोकळा मी मला हुंगितांना

उरी गंध कल्लोळुनी फाकले...’

पल्याडच्या, पलीकडच्या मुक्त वातावरणात स्वतःला हुंगतो म्हणजेच स्वतःच्या आत्म्याचा अनुभव घेतो तेव्हा  'उरी', हृदयात आनंदाचा, समाधानाचा आणि आत्मज्ञानाचा सुवासिक गंध कल्लोळ, वेगाने उसळून सर्वत्र पसरतो. 

‘उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा 

कुणी देहयात्रेत या गुंतले?’

'चैत्र' हा वसंत ऋतूचा, नव पल्लवीचा, नव्या सुरुवातीचा महिना असतो. कवीला म्हणतो की त्याच्या शरीराच्या प्रत्येक 'रोमरोमातून' जणूकाही चैत्राच्या वाटा निघत आहेत; शरीर नवचैतन्यानं, ऊर्जेनी भरून गेलं आहे. जीवन आता फक्त दैहीक, कायिकते पुरतं उरलेलं नाही, तर त्यात कुणीतरी दिव्य शक्ती किंवा परमोच्च आनंद मिसळला आहे, गुंतला आहे. आजारपणामुळे पत्नीची देहयात्रा अंतिम टप्प्यावर असताना, शरीराची साथ जरी संपत असली तरी आत्म्याची आभा एखाद्या नवप्रभेपणे प्रकट होत असल्याचं कवीला जाणवलं. 

​‘आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन

उष:सूक्त ओठात ओथंबले...’

कवी म्हणतो ती निसर्ग किंवा ईश्वरीय कृपा आता अरुणोदया प्रमाणे तेजमान आणि तांबूस झाली आहे. थोडक्यात कृपा प्रभात  झाली आहे आणि ओठांवर 'उष:सूक्त', पहाट गाणे  आपोआप दाटून आले आहे, ओथंबून वाहत आहे.

दिवे लागले रे दिवे लागले ही कविता बाह्य जगातील प्रतिमांच्या मदतीनं अंतर्ज्ञानाच्या अनुभवाची अनुभूती देणारी आहे. तिचं गीत होत असताना त्यातील शब्दकळेचा शांत, गंभीर आणि संथ भाव अभिषेकींच्या गानकळेत ही हुबेहूब उतरला आहे. कवी रामाणी यांचे हे शब्दमौक्तिक पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी यमनाचा आधार घेत सुरेल स्वरमाळेत ओवलं आणि त्यांच्या कंठीची ही स्वरमाला व्यासंगी रसिक श्रोत्यांसाठी, कधी ही न कोमेजणारी कर्णफुलं होऊन गेली. 

दिवे लागले रे - शंकर रामाणी

‘दिवे लागले रे, दिवे लागले रे,
तमाच्या तळाशी दिवे लागले;
दिठीच्या दिशा खोल तेजाळतांना
कुणी जागले रे? कुणी जागले?

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले;
तिथे मोकळा मी मला हुंगितांना
उरी गंध कल्लोळुनी फाकले...

उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले?
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन
उष:सूक्त ओठात ओथंबले...’

दिवे लागले रे_– ऐकण्या साठी क्लिक करा


नितीन सप्रे

240520261540








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य