स्मृतीबनातून –सजण दारी उभा

 

सजण दारी उभा

लवचिकता हा भाषेचा स्वभावधर्म आहे. जशी वळवावी तशी ती वळत जाते. एकाच शब्दाला अर्थाच्या कितीतरी छटा असू शकतात. ही भाषेची श्रीमंती मानली जाते. मराठी भाषेतही विभिन्न अर्थछटा असलेले कितीतरी शब्द आहेत. जसे जीवन, तीर, मान, पाठ, वर, नाव, काळ अशी मोठी यादी देता येईल. जी गोष्ट शब्दांना लागू तीच वाक्याला, लेखाला, कवितेला ही लागू होते. त्यामुळेच एकच साहित्यकृती निरनिराळ्या वाचकांना निरनिराळी भासू शकते. त्यांना निरनिराळा अर्थबोध होऊ शकतो. जो जशी व्याख्या करेल, अर्थ काढेल त्याप्रमाणे तो बदलतो. मराठी काव्याचा प्रांत तर या वैशिष्ट्यानं समृद्ध आहे. मराठीत अशी कितीतरी गाणी, कविता, रचना आहेत की त्यांचा वरवरचा अर्थ एक, तर सखोल अर्थ अगदीच निराळा असतो. काहीवेळा वरकरणी शृंगारिक, लौकिक वाटणाऱ्या एखाद्या कवितेच्या गर्भात गहन, गूढ, रहस्यमयी, अलौकिक अर्थ जोपासलेला असू शकतो किंवा जुळ्या भावंडांप्रमाणे दोन्ही अर्थ अगदी सुखनैव नांदू शकतात. अनेकदा तर पुनःपुन्हा ऐकताना दरवेळी अर्थाचा नवा पदर उलगडून येतो. 

सकृतदर्शनी प्रियकर–प्रेयसी, विरह भावना, मीलनाची ओढ अशा शृंगार प्रांतात घेऊन जाणारी सुरेश भटांची एक फारच तरल कविता ‘सजण दारी उभा’ सर्वांना सुपरिचित आहे. या कवितेला डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि लिटिल चॅम्प फेम आर्या आंबेकर या नव्या पिढीच्या गायिकेनी  रचना नीट समजून–उमजून गायली आहे. प्रथमच ऐकणाऱ्या कुणालाही ते नर्म शृंगार काव्यच वाटेल. संगीतकाराला देखील विरह व्याकुळ प्रेयसी हाच आशय अभिप्रेत असावा कारण विरहाची भावना अधिक ठळक करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला ती अधोरेखित व्हावी यासाठी श्रुती आंबेकर यांची स्वलिखित, स्वरचित रागमाला जोडून सौंदर्य वर्धन केलं आहे. या रागदारी मुळे मधुर, शृंगारिक आणि तितकीच शांत गंभीर भावनिर्मिती झाली आहे.

पिया बिन तरसत रहूँ दिन रैना,

दिन रैना, सजन बिन जिया बेचैन, बरसत मोरे नैन...

पिया बिन तरसत रहूँ दिन रैना।’

सख्याविना दिवस आणि रात्री तळमळण्यात चालल्या आहेत, त्याच्या शिवाय मन बेचैन आहे आणि माझ्या डोळ्यांतून सतत अश्रूपात सुरू आहे. शास्त्रीय संगीताची अशी पुरक जोड दिल्या नंतर भटांचे शब्द येतात...

"सजण दारी उभा काय आता करू 

 घर कधी आवरू मज कधी सावरू?"

विरह व्याकुळ अवस्थेत दिवस काढत असतानाच एक दिवस सखा अवचितपणे दारी आल्यावर आधी घर आवरू की स्वतःचा साजशृंगार करू अशा दुश्चित मनस्थितीत ती सापडली आहे. तिची धांदल उडाली आहे.

"मी न केली सखे अजुन वेणीफणी 

मी न पुरते मला निरखिले दर्पणी"

"अन् सडाही न मी टाकिला अंगणी 

राहिले नाहणे, कुठुन काजळ भरू?"

आपल्या सखी कडे ती मनातलं सांगते कि सखा आलाय खरा पण माझी तर वेणीफणी  झालेली नाही. आरशात चेहरा बघितलेला नाही. अंगणात सडा ही घातलेला नाही. इतकंच नाही तर स्नान देखील झालेलं नाही मग काजळ तरी कसं रेखणार?

"मी न दुबळी कुडी अजुन शृंगारली 

 मी न सगळीच ही आसवे माळिली"

"प्राणपूजा न मी अजुनही बांधिली 

काय दारातुनी परत मागे फिरू?"

मी माझी काया कपडेलत्ते, दागिन्यांनी अजून सजवली नाही. विरह अश्रू देखील अजून पुरते पुसलेले नाहीत. त्यामुळे चेहरा जसा असावा तसा आनंदी कसा दिसणार?  सख्याच्या स्वागताची ही पुरेशी तयारी केलेली नाही. अशा स्थितीत त्याला सामोरी कशी जाणार? मग काय त्याचं स्वागत न करता दारातून माघारी फिरू की काय?

"बघ पुन्हा वाजली थाप दारावरी 

हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी"

इतक्यात दारावर पुन्हा थाप पडते. ती सखीला सांगते बघ त्यानी दारावर पुन्हा थाप दिली आहे. इथे तिने आधीची थाप ऐकली होती हे ओघानी आलच. म्हणून ती म्हणते ही मला नवीन नाही. मला हा आवाज चिरपरिचित आहे. आमचं जन्म–जन्मांतरीचं नातं आहे. 

"तीच मी राधिका तोच हा श्रीहरी 

 हृदय माझे कसे मीच हृदयी धरू?"

आणि हीच ती जागा आहे, आतापर्यंत विरह, शृंगार, मिलन या वाटेवरून आपला प्रवास सुरू असतानाच अगदी अचानक, वाट जरी बदलली नाही तरी, त्याच वाटेवरच एक नवं वळण आपल्याला लागतं आणि फिरत्या रंगमंचीय आविष्कारा प्रमाणे सारं दृश्य पालटतं. तसं पाहिलं तर तिसऱ्या कडव्यात आलेले ‘दुबळी कुडी’ आणि ‘आसवे माळली’ या शब्द प्रयोगांनी पुढे येणाऱ्या वेगळ्या वळणा कडे अंगुलीनिर्देश केलेला आहे. पण ‘ती’च्या विरह भावनेत आपण आकंठ बुडालेले असतो त्यामुळे त्या निर्देशाकडे थोडा कानाडोळा होतो. इथवर आपल्या मनात असलेला सखा, हा जरी अजूनही सखाच राहिला, तरी आता त्यानी लौकिक वस्त्रां ऐवजी अलौकिक वस्त्रं धारण केलेली असतात. तो आता जीवात्मा नव्हे तर परमात्मा रूप भासू लागतो.

प्रश्न ही घर कधी आवरू? हाच पडतो. पण आता घर म्हणजे वास्तू नाही तर नातीगोती, संसार आवरणं होऊन जातं. मज कधी सावरू? हा प्रश्न पण उरतो मात्र ते भौतिक सावरणं न राहता राग, लोभ, अहंकार याचा त्याग करून त्याच्या भेटीसाठी मनाची मशागत अशा आशयात प्रकट होतो. परमात्म्याची आस असली तरी त्याच्या भेटीसाठी प्राणपूजा म्हणजेच शरीर मन तयार नसल्याची, चित्तशुद्धी न झाल्याची जाणीव होते. पण मग काय परमेश्वर स्वतःहून असा दारी चालून आला असताना, मोक्षाची संधी असताना, त्याला विन्मुख करून, संसार मोह, विकारात परत अडकायचं की काय? असं वाटून जातं. काय दारातून परत मागे फिरू? यात ‘परत’ असा शब्द आहे. तसंच दारावर पुन्हा थाप वाजली आहे म्हणजे यापूर्वी ही त्याला विन्मुख पाठवलं आहे की काय? या शंकेला वाव आहे. दारावर पुन्हा थाप पडणं ही कदाचित पूर्वपुण्याई असेल. अशा जन्मो–जन्मीच्या पुण्याई मुळे तो दारी आलेला असताना त्याला शरण जाणं इष्ट हे उमजतं. राधिका ही व्यक्ती न राहता जीवात्मा होते आणि श्रीहरी परमात्मा असं हे अलौकिक मिलन असतं. अशा परमोच्च आनंदाच्या क्षणी हृदय अनावर होऊन उचलणं हा आनंदाचा क्षण आहे आणि अनावर आनंदानं उचंबळणारं माझं हृदय माझ्याच हृदयात कसं सांभाळावं? असं तीला वाटू लागतं.

हेच भाषेचं वैभव आहे. कवीची प्रतिभा आहे. ती निसर्गदत्त असली तरी जेव्हा तिला विशेष आशीर्वाद लाभतो त्यावेळी सर्वार्थाने परिपूर्ण कलाकृती जन्म घेते. म्हणूनच सुरेश भटांची 'सजण दारी उभा' ही रचना केवळ एका विरही प्रेयसीची व्याकुळता नाही, तर ती प्रत्येक मानवी मनाची, जीवात्म्याची मोक्षासाठी चाललेली एक निरंतर क्रिया आहे. सुरुवातीला शृंगाराच्या सुरावटीत बांधणारी ही कविता शेवटी आपल्याला भक्तीच्या आणि आत्मज्ञानाच्या एका अशा शिखरावर घेऊन जाते, जिथे लौकिक आणि अलौकिक यांतील रेषा पुसट होऊन जाते. शब्दांचे सामर्थ्य, संगीताची साथ आणि अर्थाची गहनता यामुळेच ही रचना एकाच वेळी दोन परस्परविरोधी वाटणारे अर्थ इतक्या सुखनैव धारण करू शकते आणि केवळ कानांना सुखावणारी न ठरता, रसिकांच्या अंतरात्म्याला स्पर्शून जाते. 

https://youtu.be/ZHDAYpEVYtg?si=dCjsmCVcWl0OQeUc

नितीन सप्रे

25052026




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती