स्मृतीबनातून – बासरी आणि राधा
बासरी आणि राधा
शरद ऋतूतली ती एक विलोभनीय रात्र होती. निळ्याशार नितळ पाण्यानी यमुना दुथडी भरून वाहत होती. आकाशातला केशरी पूर्णचंद्र सतत खाली डोकावून पाहत असल्यामुळे तो या कालिंदीच्या जळात सामावून गेला होता. रात्र जसजशी वाढत होती तसतसं दृष्टिपथात असलेल्या साऱ्या गोकुळानी विशेषतः यमुना पात्रानी जणू रुपेरी काठ असलेलं भरजरी तलम वस्त्र ओढून घेतलं आहे असं भासत होतं. काठावरच्या कदंब वृक्षाची पानं वाऱ्याची झुळूक आली की बागडू लागत. बहुदा ती कोजागर्ती, कोजागर्ती विचारत असावी.
डोक्यावर मोरपंखी मुकुट, गळ्यात वैजयंती माला, खांद्यावर शेला आणि पितांबर परिधान केलेला कृष्ण मध्यभागी उभा होता. कंबरपट्टयात खोचली होती त्याची प्राणप्रिय बासरी. चंद्रप्रकाशात त्याचं हे सावळे सुंदर रूप अधिकच खुलून दिसत होतं.
रासक्रीडा प्रारंभ झाला. गोप–गोपीकांनी एकमेकांचे हात हातात धरून कृष्णा भोवती फेर धरला. नृत्याचा वेग वाढत गेला आणि आनंदानी परिसीमा गाठली. इतक्यात मुरलीधरांनी आपल्या अधरी बासरी घेतली. बासरीतून निघणारे मधुर सूर हवेत विरघळू लागले. त्या सुरांची मोहिनीच अशी होती की यमुनेचा प्रवाह थबकला, वाऱ्याची गती मंदावली आणि आकाशामधील चंद्रही स्तब्ध झाला. संपूर्ण सृष्टी त्या सुरांमध्ये हरवून गेली. गोप–गोपिका भान हरपून नृत्य करू लागले. कृष्ण गालातल्या गालात मिश्किल हसत होता. चेहऱ्यावर मात्र असीम शांतता विलसत होती. पुढील नाट्याची त्याला पुरेपूर कल्पना असावी. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग असंच त्या अवस्थेच वर्णन करता येईल.
आदिम काळा पासून राधा–कृष्णाच्या प्रीतीला एक आगळंच अलौकिक परिमाण आहे. त्यामुळे या रासमंडळात राधिकेची उपस्थिती ही असणारच.
कृष्ण आत्ममुग्ध मनाने डोळे मिटून बासरी वाजवू लागला. ती वाजवताना बासरीची ओठांशी नैसर्गिक सलगी होत होती. त्यांची बोटंही अगदी सहजपणे बासरी वरून फिरत होती. दुरूनच राधा हे सर्व न्याहाळत होती. तिच्या मनात हळवा, लडिवाळ हेवा उत्पन्न झाला. तो मत्सर नव्हता तर लौकिक प्रेम संकल्पनेत न बसणारं, आगळंच प्रेम होतं ते. लटका रुसवा म्हणाना.
राधेनं नृत्य थांबवलं. घोळक्यातून ती हळूच बाहेर पडली आणि दोन्ही हात छातीवर बांधून एका कदंब वृक्षाखाली जाऊन उभी राहिली. तिच्या मनात विचार आला, ही बासरी फारच भाग्यवान आहे. सदोदित कृष्णाच्या सानिध्यात असते. अन्य कुणाही पेक्षा तीच कृष्णाला जास्त प्रिय आहे. रुसलेली राधा कृष्णाच्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं. त्याचे डोळे जरी मिटलेले होते तरी अंतःचक्षू फक्त राधेलाच पाहत होते. तिच्या मनात काय सुरू आहे याचीही त्याला चांगलीच कल्पना होती. त्यानी हळुवार पणे बासरी थांबवली आणि राधेच्या दिशेने पुढे गेला. राधेच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत “राधे” अशी तिला हाक मारली.
राधा जरी राधा असली तरी पहिले ती एक स्त्री होती. कुणी मनधरणी करायला आलं असं वाटल्यावर, लगेच शरण जायचं नाही हे ज्ञान तिला उपजतच होतं. तिने झटका देत आपला खांदा मागे घेतला. काहीच प्रतिसाद न देता तोंडही फिरवलं.
तो ही कृष्णच होता. त्यानी अगदी निष्पाप चेहरा करून तिला विचारलं, "काय झालं राधे? अशी रंगलेली रासक्रीडा सोडून तू इथे का उभी आहेस?
तुझी पावले का थांबली?"
आता राधेनं कृष्णाकडे पाहिलं, तिच्या डोळ्यांत एक कातर भाव होता आणि चेहऱ्यावर, लटका राग. ती म्हणाली, "चला काही काळ का होईना बासरीला दूर करून इतरांची चौकशी करावीशी वाटली हे काही कमी नाही.”
कृष्णाच्या ओठांवर एक मिश्किल हास्य उमटले. "बासरी? तु बासरीचा राग करते आहेस का?"
"काय चुकलं केला तर?" राधा जरा पुढे येत म्हणाली, "कृष्णा, या जगात इतर कोणाहीपेक्षा तुला ही बासरी अधिक प्रिय आहे. ती सतत तुझ्या जवळ असते. अगदी सतत तुझ्या आधारांना बिलगून असते. आम्ही गोपीका तुझ्या एका एका क्षणासाठी, एका नजरेसाठी आसुसलेल्या असतो. पण आम्हाला काही सर्वकाळ तुझं सानिध्य लाभत नाही. मग आम्ही का रुसू नये?"
राधेचा हा निरागस आणि प्रेमळ रुसवा पाहून कृष्णाचं हृदय भरून आलं. तिची समजूत घालणं आवश्यक होतं.
कृष्ण म्हणाला, “राधे, खरं आहे. मला बासरी प्रिय आहे. कारण आपल्या अहंकाराचा त्याग करून ती आतून संपूर्ण रिक्त आहे. त्यासाठी तिने शरीरावर भोकंही पाडून घ्यायला मागेपुढे पहिलं नाही. अगं, अहंकार सोडून आतून अशी रिक्त झाल्यामुळेच तर ती मधुर स्वरांनी सर्वांना आनंदी करू शकते.” मग सांग मलाच काय? कुणालाही का बरं आवडू नये ती?”
मग राधेच्या जवळ येत म्हणाला, "राधे, तू किती भोळी आहेस गं,” आणि अत्यंत मृदु आवाजात विचारलं, "तू या निर्जीव बासरीचा हेवा करावा?"
जीव नसेल, पण ती सतत तुझ्या सानिध्यात तर असते ना?" राधेनं आपलं म्हणणं लावून धरलं.
कृष्णानं आता गंभीर होऊन राधेच्या डोळ्यांत पाहिलं. त्याच्या डोळ्यांतील अथांग प्रेम पाहून राधेचा अर्धा राग तिथेच वितळला. कृष्ण म्हणाला, "राधे, ऐक. जरी ही बासरी सतत माझ्या जवळ असली, अगदी अधरांशी जुळलेली असली, तरी ती माझ्या शरीराच्या बाहेर आहे. माझ्या पासून भिन्न आहे. पण तू?, तू तर थेट माझ्या हृदयाशी आहेस. बासरीतून स्वर तेव्हाच उमटतात जेव्हा मी फुंकर मारतो. पण तू तर माझ्या हृदयाची धडधड, माझा प्रत्येक श्वास आहेस. तू आणि मी भिन्न नाही एकरूप आहोत."
तो पुढे म्हणाला, "बासरी बाहेरून माझ्या जवळ असू शकते, पण तू माझ्या आत सामावलेली आहेस. मग सांग, शरीराच्या बाहेरील वस्तूला जास्त महत्त्व की शरीराच्या आत असलेल्या आत्म्याला?"
कृष्णाचे हे शब्द ऐकून राधा थक्क झाली. तिच्या डोळ्यांतील पाणी चंद्र प्रकाशात मोती बनून चमकले.
कृष्णाने राधेचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, "राधे, तू असा विचार कसा करू शकतेस की बासरी मला तुझ्यापेक्षा जास्त प्रिय आहे? सत्य तर काही वेगळेच आहे. तू आहेस म्हणून सूर आहेत, संगीत आहे, आणि ही बासरी आहे!"
"ते कसं?" राधेनं आश्चर्यानं विचारलं.
"राधे, ही बासरी तर केवळ पोकळ बांबूचा एक तुकडा आहे," कृष्णानं बासरी तिच्या समोर धरली आणि म्हणाला, "तिला स्वतःचा कोणताही आवाज नाही, स्वतःचे कोणतेही अस्तित्व नाही. जेव्हा मी या बासरीत फुंकर मारतो, तेव्हा जे सूर बाहेर पडतात, ते सूर दुसरे काही नसून माझ्या मनात असलेले तुझ्याबद्दलचं प्रेम आहे. मी जेव्हा जेव्हा बासरी वाजवतो, तेव्हा मी फक्त तुझा विचार करत असतो. तुझा आनंद, तुझा विरह, तुझी प्रीती... हेच त्या सुरांच्या माध्यमातून जगात पसरत असतं. जर माझ्या आयुष्यात तू नसतीस, तर माझ्या मनात प्रेमाची भावनाच नसती. आणि जर प्रेम नसतं, तर या बासरीमधून संगीत कसं निर्माण झालं असतं? त्यामुळे या संगीताची खरी जननी, खरी स्वामिनी तूच आहेस."
कृष्ण पुढे म्हणाला, "म्हणूनच सांगतो, उगाच रुसू नकोस. तुझ्या शिवाय ही रासलीला, हे गोकुळ आणि हा कृष्ण, सगळं काही अपूर्ण आहे."
राधेच्या मनातील सर्व शंका, सर्व रुसवा आता पार धुऊन निघाला होता. कृष्णाच्या प्रेमाची अथांगता ऐकून ती नतमस्तक झाली होती.
राधेनं त्या बासरीकडे पाहिले, जी कृष्णाच्या हाताची, ओठांची शोभा होती. तिनं ती बासरी अत्यंत आदरानं आपल्या हातात घेतली. तिला जाणवलं की बासरी खरोखरच पोकळ आहे, पण कृष्णाच्या स्पर्शानं ती चैतन्यमय होते. तिनं बासरी आपल्या छातीशी लावली.
"नाही कान्हा," राधा अत्यंत प्रेमपूर्वक म्हणाली, "मला ही बासरी तुझ्यापासून दूर करायची नाही. ही बासरी तुझ्याच ओठांवर शोभून दिसते. कारण जेव्हा तू ही वाजवतोस, तेव्हा मला असं वाटतं की तू संपूर्ण विश्वाला प्रेमाची भाषा शिकवत आहेस. माझा रुसवा तर फक्त तुझा हा सुंदर संवाद ऐकण्यासाठी होता."
राधेनं ती बासरी पुन्हा कृष्णाच्या हातात दिली. दोघांचे डोळे एकमेकांमध्ये गुंतले होते. यमुनेचा काठ, ती पौर्णिमेची रात्र, आणि कदंब वृक्ष या अलौकिक प्रेमाचे साक्षीदार बनले होते.
कृष्ण आणि राधा पुन्हा एकदा त्या रासमंडळाच्या मध्यभागी आले. कृष्णाने बासरी आपल्या ओठांना लावली. पण यावेळी सुरांमध्ये एक वेगळीच जादू होती. कारण आता त्या सुरांना राधेच्या मधुर हास्याची आणि संमतीची जोड मिळाली होती. संपूर्ण रासलीला एका दिव्य उंचीवर पोहोचली.
नितीन सप्रे
070620260745


राधा, कृष्ण आणि बासरी हे पृथ्वीवरच अजब त्रिकुट आहे. त्यातील एकालाही वेगळं करता येतं नाही. राधे विना भ. कृष्ण काहीतर राहून गेल्यासारखं सतत वाटतं. तुमचा लेख सर्वांग सुंदर. असेच छान छान लिहीत रहा.
उत्तर द्याहटवा