स्मृतीबनातून – ‘राधा को साथ लाना ’


‘राधा को साथ लाना ’

खरं तर रोज कितीतरी गोष्टी आपल्या नजरे खालून जात असतात, कानावर पडत असतात. मात्र या सगळ्याच आपल्या स्मृतींमध्ये जागा मिळवतात असं नाही. आयुष्यभरात प्रत्येक जण किती साहित्य, गीतं, कविता, रचना वाचत असतो, ऐकत असतो. कालौघात त्यातलं कित्येक स्मृतीकोषातून बाहेर फेकल्या जातं. ऐकताना, वाचताना कदाचित हे जाणवतही नाही पण काही गोष्टी अगदी नकळत स्मृती पटलावर कायमच्या कोरल्या जातात. स्मृतीबनात त्या जागा मिळवतात. 

चाळीस एक वर्षांपूर्वी रस्तामार्गे काश्मीर प्रवास करत असताना अनुप जलोटा यांनी गायलेली एक सुरेल, सुंदर पारंपरिक रचना हळूच मनाच्या कोपऱ्यात कधी जाऊन बसली हे त्यावेळी कळलंच नाही. त्यानंतर पुढे कधीतरी अभिषेकीबुवांनी सवाई गंधर्व महोत्सवात भैरवी रागात बांधलेलं तेच भजन ऐकलं आणि स्मृतीबनात सळसळ झाली. अनेक विचार उचंबळून आले.

ही रचना म्हणजे एक वैष्णव भजन आहे. कर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करता काही ठिकाणी ती भक्त कवी चित्रविचित्र महाराज यांची असल्याचा उल्लेख सापडला तर काही ठिकाणी नुसतं पारंपरिक इतकाच उल्लेख आढळला. जीवनाच्या समारोप प्रसंगी भगवंताच सानिध्य लाभावं आणि मुखी गोविंद नाम राहावं अशी अत्यंत भावपूर्ण आशयघन शब्द रचना आहे. इतकी वर्ष नकळत मनात दडून बसलेल्या या रचनेवर काही विवेचन करण्याचा प्रयत्न करून ते सर्वांसमोर मांडण्याची उर्मी मनात अपसूकच दाटून आली.

“इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले।”

जीवनयात्रेच्या अंत समयी, प्राण शरीर सोडण्यापूर्वी गोविंदाच नाव मुखी असावं इतकी कृपा भगवंता तू करावीस अशी विनंती पण प्रेमाच्या अधिकारात, भक्त करतो आहे.

“श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो। मेरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले।”

मानवी जीवनाचा अंत कधी आणि कुठे होईल हे कुणालाही नेमकं सांगता येत नाही. पण मनात काही संकल्पना असू शकतात. भारतीय परिकल्पनेत नद्या, विशेषतः गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी यांना केवळ पाण्याचा नाही तर पुण्याचा, पवित्रतेचा ही स्त्रोत मानतात. जीवनाची इतिश्री कुठे व्हावी याबाबत इथे किती सुंदर मागणी केली आहे पहा. गंगा माईच्या काठी, ‘वंशिवट,’ हा बहुदा ‘बन्सीवट’ या शब्दाचा अपभ्रंश असावा. यमुनाकाठी श्रीकृष्ण ज्या वटवृक्षाखाली बासरी वाजवत तो वृक्ष. असं ठिकाण अंतिम क्षणी असावं. अधिक महत्त्वाचं म्हणजे मुख्यतः अशावेळी डोळ्यासमोर संसार रूप नाही तर कृष्ण रूप असावं. अशी इच्छा भक्त बाळगून आहे.

“पीताम्बरी कसी हो, छवि मन में यह बसी हो।
होठों पे कुछ हसी हो, जब प्राण तन से निकले।”

कृष्णरूपही कसं तर पितांबर परिधान केलेलं,  हलकं स्मित ओठी असावं. कारण सर्वसामान्य माणसाला मृत्यूचं भय असतं पण भक्त,
तृप्त भावनेनी, जीवन सार्थकी लागलं म्हणून सस्मित त्याचं स्वागत करू इच्छितो.

“श्री वृन्दावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो।
विष्णु चरण का जल हो, जब प्राण तन से निकले।”

इथे वैष्णवाचा भाव अधिक उच्चीवर जातो. तो म्हणतो अंत होईल तो परिसर वृंदावनाचा असावा. हिंदू धर्माच्या मान्यते प्रमाणे तुळशीपत्र आणि गंगाजल देण्याची परंपरा आहे. जेणेकरून आत्म्याला मुक्ती लाभते. त्या अनुसार माझ्या मुखात तुळशीपत्र आणि भगवंताचे चरणामृत असावे.

“जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे।
यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले।”

अंतकाळ जेव्हा येईल तेव्हा कुठलीही असाध्य व्याधी नसावी कारण शरीर व्याधींमुळे नामाचा विसर पडतो. दुसरं म्हणजे यमदर्शनानी भयकंपित व्हायला होतं तेव्हा तो न दिसता डोळ्यांसमोर तूच असावं.

“उस वक़्त जल्दी आना, नहीं श्याम भूल जाना।
राधा को साथ लाना, जब प्राण तन से निकले।”

इथे हा भक्त आपली भूमिका तर सोडत नाही पण भगवंत आपला सखा असल्याप्रमाणे त्याला, अंत समयी न विसरता लवकर यायला सांगतो आहे. शिवाय एकटा न येता राधेसह येण्याचा आग्रह करतो आहे. आतापर्यंत भक्ताच्या मानसिकतेतून केलेल्या सर्व मागण्या सहज समजण्या सारख्या आहेत. पण राधेला सोबत आण अस तो का बरं म्हणाला असेल असा प्रश्न पडतो, नाही का? थोडा विचार, थोडी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की कर्मफळाच्या बाबतीत साक्षात परमेश्वरही काही करू शकत नाही असं मानलं जातं. त्यामुळे कृष्ण न्यायोचित कर्मफळच देणार. अशावेळी जीवनात नकळत झालेल्या काही चुकांकडेही ते कठोरपणेच पाहणार. मात्र राधा ही प्रेमस्वरूप आणि करूणामयी आहे. त्यामुळे ती, कृष्णाला भक्ताकडे थोडं कनवाळूपणे पाहण्याची शिफारस करू शकेल असा भक्ताचा होरा असावा, म्हणून तिलाही सोबत आण असा तो आग्रह करतो आहे. 

“सुधि होवे नाही तन की, तैयारी हो गमन की।
लकड़ी हो ब्रज के वन की, जब प्राण तन से निकले।”

जग सोडण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा देहभान उरणार नाही. मात्र शरीर त्याग करण्यासाठी, ज्या ब्रजभूमीचे आयुष्यभर गुणगान केलं, त्या भूमीतील लाकडांचीच चिता असावी अशी त्याची इच्छा आहे.

“एक भक्त की है अर्जी, खुदगर्ज की है गरजी।
आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले।”

“शरणागत हो, शरणागत हो, शरणागत हो शरण्ये” असा त्याचा भाव हा अगदी शरणागतीचा आहे. तुकाराम महाराज म्हणतातात त्याप्रमाणे “याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा” 
जीवनाखेरीस कृतार्थतेची भावना असावी, मोक्ष प्राप्ती व्हावी, ही माझी गरज आहे म्हणून मी हे आर्जव करतो आहे. अर्थात पुढं तुझी मर्जी असेल तसं कर. ‘यथा योग्यम तथा कुरू.’

“ये नेक सी अरज है, मानो तो क्या हरज है।
कुछ आप का फरज है, जब प्राण तन से निकले।”

पण अखेरीस त्याची भक्ती ही प्रामाणिक असल्यानं तो परमेश्वराला त्याच्या कर्तव्याचीही जाणीव करून देण्यासही कचरत नाही. देव आणि भक्त हे नातं परस्पर पुरक असतं. ज्याप्रमाणे भक्ताला देवाची गरज आहे त्याप्रमाणे भक्तामुळेच देवाची महती आहे. म्हणूनच तो म्हणतो आयुष्यभर यथाशक्ती मी प्रामाणिकपणे तुझी भक्ती केली आता या शेवटच्या क्षणी मला सांभाळून घेणं हे तुझं कर्तव्यच नाही का? त्यामुळे माझं हे प्रामाणिक आर्जव तू पूर्ण करायला काय हरकत आहे? भक्त वत्सल भगवंताला असा प्रश्न करण्याची, कर्तव्याची जाणीव करून देण्याची ताकद खऱ्या भक्तीतून येत असावी.
या भजनाचा मुख्य गाभा 'पूर्ण शरणागती' हा आहे. जेव्हा आपण आपले सर्वस्व – आपले कर्तृत्व, आपले अहंकार, आपले नातेसंबंध – भगवंताच्या चरणी सोपवतो, तेव्हाच अशी आर्त हाक कंठातून फुटू शकते. 'माझे' म्हणायला या जगात काहीच नाही, आणि जे आहे ते सर्व 'तुझेच' आहे, या भावनेतून हे भजन जन्माला आले आहे. 

​चाळीस वर्षांपूर्वी मनाच्या तळघरात जाऊन बसलेली ही रचना अभिषेकी बुवांच्या आर्त सुरातील भैरवी ऐकताना विचारांच मंथन होऊन अवचित मनाच्या पृष्ठभागी आली. तेव्हा भवताल वृंदावन झालं. संगीताच्या मैफिलीचा समारोप भैरवीनं करण्याची प्रथा आहे. इथे जीवन मैफिलीच्या समारोप प्रसंगाच्या एका भक्ताच्या आर्जवाची, त्याच भैरवीच्या सूरात कानावर पडलेली आळवणी एका आगळ्याच संकेताकडे अंगुलीनिर्देश करून गेली.  हा शेवटचा दिवस, हा अंतिम क्षण गोड व्हावा हीच प्रत्येक जिवाची आर्त हाक असते. मोक्ष प्राप्ती ही भक्ताची गरज आहे. कारण या पूर्णत्वासाठीच त्यानी जीवनात सर्वकाही सहन केलेलं असतं. मंगेश पाडगावकरांनी ही अवस्था छान शब्दात मांडली आहे. ‘पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले’. आणि म्हणूनच शेवटच्या प्रवासात भगवंतानं करुणामयी राधेसह त्याच्या सोबत असणं हा भक्ताचा अधिकार आहे हाच सुंदर विश्वास ही रचना देते.

​शरीराची गाठ सुटताना, देहाची सुधि हरपताना मुखातून फक्त एकच आर्त सूर उमटावा—

इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले... गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले!’ 

​'इतना तो करना स्वामी' हे केवळ मृत्यू प्रसंगीचं भजन नाही, तर ते कसं जगावं हे शिकवणारं संजीवन संगीत आहे. जर शेवटचा क्षण इतका सुंदर आणि पवित्र हवा असेल, तर आजचे जगणंही तितकंच शुद्ध, निष्पाप आणि भक्तीमय असावं लागेल, हाच या भजनाचा सुप्त संदेश आहे. ​हे भजन मानवी मनाला संसाराच्या नश्वरतेची जाणीव करून देत, शाश्वत अशा ईश्वरी तत्त्वाकडे घेऊन जातं. यात कारुण्य आहे, पण नैराश्य नाही; मृत्यूची चर्चा आहे, पण भीतीचा लवलेशही नाही. यात आहे केवळ आणि केवळ... भगवंताच्या चरणी लीन होण्याचा अलौकिक आनंद!


ऐका – पंडित जितेंद्र अभिषेकी


ऐका – अनुप जलोटा


नितीन सप्रे 

090620261755






























टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती