स्मृतीबनातून – प्रसन्न बिलावल
प्रसन्न बिलावल
सकाळी लवकर जाग आली होती. तशी ती बरेचदा येते. अशी लवकर येणारी जाग कधी कधी पदरी काहीतरी दान टाकून जाते. सकाळी दारावर येणारा डोक्यात मोरपिस खोवलेला वासुदेव म्हणतो न दान पावलं, यावेळीही नेमकं तसच झालं.
मी राहत असलेल्या परिसरात आजुबाजूला उद्यानं, मंदिरं, शाळा आहेत. खरंतर त्या दिवशी स्वातंत्र्यदिनाची सुटी होती. पण ध्वज वंदनासाठी प्रभात फेरीला जायचं असल्यानं रोजची पहाट फेरी सायं फेरीत बदलण्याचा निर्णय घेतला. तयार होत असताना ‘ओम् जय जगदीश हरे' ही विशेषतः हिंदी भाषकात लोकप्रिय असलेली आरती कानावर आली. ती तशी रोजच कानी पडते मात्र त्या दिवशी सकाळच्या त्या प्रसन्न भारलेल्या वातावरणात त्या आरतीचे सूर मनापर्यंत झिरपले आणि तिथेच राहिले. तयार होऊन प्रभात फेरीला गेलो, ध्वजारोहण केलं. आपलं राष्ट्रगीत 'जन गण मन अधिनायक जय हे’ सुरेल गायलं गेलं. लग्न समारंभात मंगलाष्टकं, पूजाविधी नंतर आरती आणि इतर कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरेल ऐकायला मिळणं ही एक पर्वणीच असते. त्या दिवशी यातल्या दोन गोष्टी छान जुळून आल्या होत्या. अल्पोपहार करत असताना नुकत्याच झालेल्या राष्ट्रगीताचे स्वर आणि सकाळी ऐकलेल्या आरतीचे स्वर यांची मनात सरमिसळ होऊन काहीतरी सारखेपण जाणवू लागलं. शेजारीच बसलेल्या गायक वृंदातल्या मुख्य गायिकेला मी ते सांगितल्यावर ती म्हणाली, “बरोबरच आहे. या दोन्ही रचना बिलावल रागावर आधारित आहेत. सारखेपणा जाणवणारच.”
राजा विक्रमादित्यच्या मानगुटीवर बसणाऱ्या वेताळा सारखे तिचे हे शब्द माझ्या मानगुटीवर अलगद बसले. राजा स्वयंभू असावा. आता माहीत नाही, पण मी चांदोबा नियमित वाचत होतो तोपर्यंत तरी प्रत्येकवेळी त्याला उत्तर सापडत असे. इथे प्रश्नही माझेच होते आणि उत्तरही मलाच शोधायची होती. मीच विक्रम आणि मीच वेताळ अशी काहीशी स्थिती झाली. बरं संगीतात बरीच रुची असली तरी शास्त्राशी तितकी सलगी नसल्यामुळे मला मात्र बरीच शोधाशोध करावी लागली. ‘जिसका कोई नहीं उसका तो खुद है यारों’ या ऐवजी आजच्या नव्या परिवेशात या ओळीत किंचित बदल करून ‘उसका तो गूगल है यारों’ असं म्हणता येऊ शकतं. पुढचे दोन तीन दिवस सुरू असलेली ही गुगल शोधयात्रा मात्र खरोखरीच आनंदयात्रा ठरली. या यात्रेतील सर्व सहप्रवाशांचा मी ऋणी आहे. लेखाची लय बिघडवेल केवळ म्हणून प्रत्येकाचा वेगळा उल्लेख न करता मिळालेला प्रसाद आपणा सर्वांनाच देतो.
विसाव्या शतकातील चाळीसच्या दशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या प्रत्येक भारतीयांनी, मग तो, ती वा ते गायक असो वा नसो किंवा त्यांना गाण्याची आवड असो वा नसो, आयुष्यात कधी ना कधी शास्त्रीय संगीतावर आधारित एक तरी रचना गायलेली असतेच असं आता आपण निःशंक म्हणू शकतो. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या सकाळच्या वेळी गायल्या जाणाऱ्या भूपाळी ललित, तोडी या रागांप्रमाणेच बिलावल हा एक महत्त्वाचा राग आहे. यात सर्व शुद्ध स्वर असल्यामुळे हा राग शिकायला सोपा आणि ऐकायला अत्यंत प्रसन्न, उल्हासित आणि सकारात्मक ऊर्जा देणारा वाटतो. कदाचित म्हणूनच जय जगदीश हरे ही आरती किंवा आपल्या देशाचं राष्ट्रगीत ‘जन गण मन’ हे याच रागावर आधारलेलं असावं.
आता बिलावल हा शब्द निरनिराळ्या संदर्भात बरेचदा आपल्या कानावर येतो. पण या शब्दाचा नेमका अर्थ आपल्यापैकी अनेकांना, निदान मला तरी ठाऊक नव्हता. तो शोधण्याचा प्रयत्न केला असता हिंदी, उर्दू भाषांमध्ये किंवा त्यांच्या प्रभाव असलेल्या भाषांमध्ये प्रेयसी, पत्नी किंवा अगदी पत्नी असा तो आढळला. पण असं जर असेल तर बिलावल हे पुरुषाचं नाव कसं असू शकतं? हा प्रश्न पडतो. मराठीत मात्र मुख्यत्वे तो रागदारी संगीतातच प्रचलित आहे. तेव्हा सध्यातरी त्याच्याकडे सांगितिक अंगानेच बघूया.
खरंतर एखादा राग म्हणजे केवळ स्वरवाक्य किंवा स्वराकृती नसावा. त्याहून काही अधिक असतं. म्हणूनच विभिन्न राग वेगवेगळ्या वेळी गायले जातात. बिलावलचंही तसच आहे. हा राग उजाडलेल्या दिवसाचं, प्रसन्नतेचं, नव्या आशेचं सुरेल रूप आहे. 'दिल है छोटासा छोटीसी आशा' मणि रत्नम यांच्या ‘रोज़ा’ चित्रपटतातल्या या गाण्यासाठी ए.आर. रहमान यानी म्हणूनच तर बिलावलची निवड केली नसेल? अर्थात पी. के. मिश्रा यांचे सार्थक शब्द, मधुचं मुसमुसलेलं सौंदर्य, अवखळ स्वच्छंदी अभिनय, गायिका मिनमिनीचा सुकोमल स्वर, उगवतीची वेळ आणि निसर्ग असे सगळे उत्तम साथीदार असल्यानं प्रसन्नतेचा मुक्त पखरण झाली. ‘छू कर मेरे मन को किया तूने जो इशारा’ म्हणत रसिकांनी बिलावल मधल्या या दोन्ही तरल रचनांचं स्वागतही केलं. ‘जाने कितने दिनो के बाद गली में आज चाँद निकला’,‘ये शाम मस्तानी मदहोश किए जा’,‘ उड़े जब जब जुल्फे तेरी’, ‘जट यमला पगला दीवाना’, आणि मदन मोहन यांच्या ‘लग जा गले के फिर यही हंसी रात हो न हो’ या चिरंजीवी रचनेला शुद्ध बिलावल स्पर्श आहे. ‘एक प्यार का नगम है मौजों की रवानी है जिंदगी और कुछ नहीं तेरी मेरी कहानी है’ या सारख्या जीवन विषयक तत्वज्ञान मांडणाऱ्या गीतालाही बिलावलचा आधार मिळाला आहे.
‘इचक दाना पिचक दाना’, ‘नानी तेरी मोरनी को मोर ले गए’, ‘लकड़ी की काठी, काठी का घोड़ा’ ही लहानग्यांना आवडणारी गीतं अथवा ‘मेरी हॅड अ लिट्ल लॅम्प’ किंवा ‘ट्विंकल ट्विंकल लिट्ल स्टार’ ही इंग्रजी बडबडगीतंही पाश्चात्य संगीतातील मेजर स्केल म्हणजेच आपल्या बिलावलशी साधर्म्य राखणारी आहेत.
गुलजार लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट परिचय(1972) आठवतोय. संजीव कुमार, जया बच्चन, जितेंद्र यांच्या भूमिका असलेला? त्यात एक गाणं आहे. शिक्षक(जितेंद्र) मोठी बहीण(जया बच्चन)आणि लहान भावंडं सहलीला जातात तेव्हा गायलं जाणारं. या गाण्याच्या मुखड्यात गुलजार यांनी राग बिलावलचे स्वर आहेत...‘ ‘सा’‘रे’ के ‘सा’‘रे’ ‘गा’‘मा’ को लेकर गाते चले ‘पा’‘पा’ नही है ‘धा’‘नी’सी दिदी, दिदी के साथ है ‘सा’‘रे’
पुढच्या अंतऱ्यात त्यांनी रागाची सरगम सहज पेरली आहे. पंचम म्हणजेच आर.डी. बर्मन यांची संगीत रचनाही गुलजार यांच्या गीत लेखना इतकीच सृजनात्मक आहे.
या रागात सर्व स्वर लागतात आणि ते शुद्ध आहेत. सकाळच्या वातावरणात या रागाचा प्रभाव अधिकच जाणवतो. बिलावलची स्वरावली भक्ती, सकारात्मकता, शांतता अशी भाव निर्मिती करत असते. सकाळची वेळ भक्तिरसाच्या अभिव्यक्तीची असल्यानं ‘जय जगदीश हरे’ प्रमाणेच ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’, ‘कोन कहता है भगवान आते नहीं’, ‘शिर्डीवाले साईबाबा आया हुं तेरे दरपे’ तसंच गुरु ग्रंथासाहेब मधल्या ‘एक ओंकार सत् नाम’ सह बऱ्याच रचना या रागातच बांधल्या आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ या प्रसिद्ध संगीत नाटकातलं सुपरिचित पद ‘दिन गेले भजनाविण सारे’ हे देखील याच रागावर आधारित आहे आहे.
असा हा बिलावल! सकारात्मक, उल्हासपूर्ण आणि आशादायी. या शोधयात्रे दरम्यान त्यांच्याशी थोडा परिचय झाला. पण आणखी एक गोष्ट लक्षात आली की त्याच्याशी फारशी ओळख नसताना देखील तो आपल्या सुरावटीनं आपली मनं रिझवीत होताच. आपल्या नकळत आपल्या मनात गुणगुणत होता. तेव्हा एक लक्षात आलं, संगीत सरितेत स्वच्छंद विहार करण्यासाठी, स्वरात चिंब भिजताना, संगीताचा निखळ आनंद घेण्यासाठी शास्त्र परिचय ही काही पूर्वअट नसते. स्वरांच विश्व असं निस्पृह आहे. ओळख असो वा नसो दृष्टादृष्ट झाली, भेट घडली तर मंद मधुर स्मित मिळणारच.
नितीन सप्रे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा