स्मृतीबनातून – भीमपलास शोधयात्रा
भीमपलास शोधयात्रा
मागे एकदा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भादव्यात प्रथमच कोकण प्रांती जाणं झालं. गणेशोत्सवाचा उत्तरार्ध सुरू होता. सकाळी रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असतानाच ‘सुजन कसा मन चोरी’ कानावर आलं. हे ‘फुलवान शेज संवारो’ या भूप रागातल्या चीजेवर आधारित आहे असं फार पूर्वी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या एका कार्यक्रमात या चीजे सकट ऐकलं होतं. एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मांडवात हे ध्वनिमुद्रित नाट्यगीत वाजत होतं. आवाज परिचित नव्हता पण छान तालासुरात तो नव्यादमाचा गायक रसपूर्ण गात होता. मला हे थोडं अनपेक्षीत होतं. गाडीत सामान वगैरे ठेवून हॉटेलसाठी निघालो तरी ते स्वर पूर्ण विरून जाऊन ऐकू येईनासे होईपर्यंत कुणाशीच काही बोललो नाही. हे अपघातनं घडलं असावं असा समज करून घेत मी कार्यक्रमाला जाण्यासाठी तयारी केली. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. दुपारी राहत्या हॉटेलात किंचित विसावलो. दुपारचं जेवण विशेष स्नेहपूर्वक घेतल्यानं थोडी निळांकी आली. डोळे उघडले ते ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’, ‘बगळ्यांची माळ फुले’ अशी सगळी दर्जेदार काव्यगुणाची लाडकी गाणी आणि नंतर तर कहर म्हणजे अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरात भीमपलासीतली; रागाची ओळख अर्थातच पाठांतरीत, द्रुत बंदिश ‘जा जा रे अपने मंदिरवा’ कानावर आल्यामुळेच. गाणं कुठे सुरू आहे हे पाहण्यासाठी खिडकी उघडली तर खाली मुख्य रस्त्यावरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ध्वनिक्षेपकावर ते सुरू होतं. तोंड धुऊन, विशेषतः अश्विनी ताईंच्या आवाजातली भावपूर्ण उच्चारण आणि मध्य तालगती मुळे मला विशेष आवडणारी ही बंदिश ऐकत ऐकत चहा घेतला. एव्हाना मी तर अगदी सद्गदित झालो होतो. हे सगळं नक्कीच काही अपघातानं किंवा योगायोगानं घडत नसणार. सकाळीही तो अपघात नव्हता हे आता लक्षात आलं. तर हा निश्चितच संस्कृतिक प्रभाव होता. कोकणात अजूनही इतर भागांच्या तुलनेत निसर्गा बरोबरच संस्कृतीही राखली गेली आहे म्हणायचं. एकूण दिवस छान गेला आणि जाता जाता ऐकलेल्या भीमपलासीतल्या सुरांनी विचार आणि लेखनाला विषय देऊन गेला.
पूर्वीप्रमाणे हल्ली माझं गाणं आवडणं हे तसं मोघम राहिलेलं नाही. एखादं गाणं कानाला गोड लागलं की त्याचे शब्द, गीतकार, संगीतकार, एखाद्या रागावर ते आधारित आहे का? असा सगळा धांडोळा घेण्याच्या प्रयत्नात मी असतो. अशी ही सर्वांगीण शोधयात्रा हमखास अलिबाबाच्या गुहेत घेऊन जाते. स्वरशब्दांचा हा खजिना अक्षय, अमर्यादित आहे. कुणीही कितीही लुटला तरी तो संपत नाही.
मुळात भीमपलासी हा जोड राग आहे. राग भीम आणि राग पलासी अशा दोन रागांतून निर्माण झाला आणि इतका छान रुजला की मूळ दोन्ही रागांची ‘विलोपले मधु मिलनात या’ अशी अवस्था झाली. शांत, कल्पनाविश्वात घेऊन जाणारा, काहीशी हुरहुर लावणारा हा राग. दूर असलेल्या प्रियकराच्या विरहामुळे होणाऱ्या व्याकुळतेचे प्रतिबिंब दर्शवतो. असं या रागातल्या भावनेचं वर्णन पंडित रविशंकर यांनी केलं आहे. शृंगार' रसाशी (प्रेमभावनेशी) जवळीक साधणाऱ्या या रागात एक सौम्य आणि गोड अशी 'स्वीकृतीची भावना' तसंच संध्याकाळ बाबत उत्सुकताही दिसून येते.
शास्त्रानुसार दुपारची उन्हं उतरू लागल्या पासून तर पूर्ण संध्याकाळ अवतरण्या आधीचा जो काळ असतो तो या रागाचा गायन समय आहे. म्हणजेच गाई–गुरं, पशु–पक्षी घरट्याकडे परतण्या आधीचा काळ; गोधुलि प्रहर, संध्येची वाट पाहणारा काळ. या रागाचा संबंध थेट मुरलीधराशी लावला जातो. गोकुळात असताना कृष्ण गाईंना चरायला घेऊन जात असे. नंतर गोपाळां समवेत खेळून संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळी रानात विखुरलेलं गोधन परत एकत्रित करण्यासाठी तो हाकारे देण्या ऐवजी बासरीवर याच रागाचे सूर वाजवित असे. कृष्णाच्याच गायी त्या, ते स्वर ऐकून परतही येत असत.
थेट गोकुळा पासून सुरू झालेल्या या शोधयात्रेचं पुढच स्थानक अपरिहार्यपणे होतं, ते म्हणजे बॉलीवूड मायानगरी. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या जुन्या काळातल्या गुलाम मोहम्मद (मजनू /1953) यांच्या सह अगदी अलीकडच्या शाश्वत सचदेव(धुरंदर), अशा बहुतेक सर्व संगीतकारांना या रागानी मोहिनी घातली आहे. ‘नैनों में बदरा छाए’, ‘यह जिंदगी उसी की है’, ‘खिलते हैं गुल यहां’, ’दिल के तुकडे तुकडे करके’, ‘दिल मे तुझे बिठाकर’, ‘एरी मै तो प्रेम दिवानी’, ‘आप की नजरो ने समझा’, ‘मेरे नैना सावन भादो’, ‘तेरे बिना जिया जाये ना’, ‘राधा कैसे न जले’, ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’, ‘आंधी बन के आया हूं’ अशी या रागावर आधारित कितीतरी गाणी प्रवासा दरम्यान ऐकून झाली. तरी बरं अन्य प्रादेशिक चित्रपटांच्या दुनियेत न डोकावताच पुढे निघालो नाहीतर ही यादी एखाद्या सुकेशिनीच्या लांबसडक वेणी सारखी आणखी कितीतरी लांबलचक झाली असती.
सांगितिक सैर करायची म्हटली की मराठी चित्र संगीत, भाव संगीत, भक्ती संगीताच्या विश्वात रीतसर फेरफटका मारणं ही अपरिहार्य बाब आहे. वेशी वरच अगदी अचानक गाठ पडली ती कवी अनिलांच्या ‘आज अचानक गाठ पडे’शी. पुढे तळ्याकाठी गेल्यावर ‘ऐका तळ्यात होती बदके पिले सुरेख’शी भेट झाली. मग ‘अमृतहुनी गोड नाम तुझे’ म्हणत म्हणत ‘सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे’ असं गिरवित ‘इंद्रायणी काठी’ पोहोचलो आणि दैवयोग म्हणजे काय? हे ऐकताना ‘काटा रुते कुणाला मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे’ हे समजताच हृदयात कळ गेली. तरीही ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ म्हणत तिथून स्वतःला आवरतं घेतलं. या सर्व आनंदवनभुवनी भीमपलासीचे स्वर काना वाटे मनात सखोल झिरपत होते.
प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यावर अगदी अनवट वळण लागलं. काय गौडबंगाल झालं, बंगाल प्रांतात कसे पोहोचलो ते कळलंच नाही. अगदी अनोळखी ‘बिपुल तरंग रे’ हळुवार तरंगत समोर आलं. काही वेळानं जाणवलं की शब्द वाटले तितके अपरिचित नव्हते. प्रवास अचानक लांबल्यामुळे क्षुधा शांती गरजेची झाली होती. मग काय, खात असताना बोलू नये असं जरी लहानपणीच शिकलो असलो तरी, रसगुल्ला तोंडांत असतानाच ते शब्द म्हणून बघितले आणि ओळख पटू लागली. रविंद्र संगीताच्या रसगुल्याच्या पाकातही भीमपलासचीच साखरपेरणी झाली होती हे लगेच जाणवलं. आता कोणताही प्रवास कितीही मधुर, सुंदर, आनंददायी असला तरी कुठल्यातरी टप्प्यावर पूर्णविराम घ्यावाच लागतो नाही का?
नितीन सप्रे
100920261700
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा