किराणा 'प्रभा'वळीत बहरलेला मोगरा उपोद्घात सततच्या आजारपणानं शिक्षकी पेशातल्या इंदिराबाईंना ग्रासलं होतं. काहीसा दिलासा मिळावा म्हणून कुणीतरी बाईंना संवादिनी(पेटी) शिकण्याचा संगीतोपचार सुचवला. त्यांनी तो अंमलात ही आणला पण जीव फार काळ रमु शकला नाही. लवकरच तो बंद पडला. आता नुकत्याच नेमलेल्या गायन मास्तरांची शिकवणी इतक्या लगेच बंद कशी करायची? म्हणून स्वतःही शिक्षक असलेल्या आबासाहेबांनी पत्नी ऐवजी आठ वर्ष वयाच्या आपल्या कन्येला शिकवणी द्यायला त्यांना सांगितलं. तसं बघता ही एक अतीसामान्य घटना पण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वासाठी हा सुवर्णकांचन योग ठरला. कारण या घटनेमुळे, पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय घरात, पूर्वापार चालत न आलेला संगीताचा संस्कार असा काही रुजला, बहरला, डवरला की त्याच्या वर्णनासाठी थेट माऊलींच्या शब्दांनाच शरण जावं लागेल…"इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलु गेला गगनावेरी"(गगना पर्यंत) मोगरा फुलला...मोगरा फुलला...पांढऱ्या शुभ्र दळदार मोगाऱ्याच्या फुलांचा सुगंध ज्याप्रमाणे आसमंत सुवासिक, पवित्र करून टाकतो तद्वतच भविष्यात या छोट्या मुलीच्या प्रभेनं संगीताचं ...