स्मृतीबनातून–गीतसंमोहिनी
गीतसंमोहिनी
आकाशवाणीची जाहिरात प्रसारण सेवा म्हणजेच आपण सर्वांना सुपरिचित असलेली ‘विविध भारती’! सकाळी-सकाळी कानावर पडणारे शास्त्रीय संगीतावर आधारित 'संगीत सरिता', जुन्या आठवणींना उजाळा देणारे 'भूले बिसरे गीत', तर रात्रीच्या शांत वातावरणात मनाचा ठाव घेणारे 'छायागीत' किंवा 'बेला के फूल'... हे कार्यक्रम म्हणजे केवळ रेडिओ शो नव्हते, तर रसिकांसाठी सुश्राव्य चित्रसंगीताची एक आत्मीय सुरुचीपूर्ण मेजवानी असायची. 'भूले बिसरे गीत' या कार्यक्रमाने काळाच्या पडद्याआड गेलेली दुर्मिळ, जुनी पण अजरामर गाणी तर ऐकवलीच; त्याबरोबरच गायक, संगीतकार आणि गीतकारांच्या रंजक आठवणी सांगून श्रोत्यांचं ज्ञानरंजनही केलं. मला आठवतं की यापैकी एका कार्यक्रमातून माझ्या जन्मा आधीच्या एका नितांत सुंदर गाण्याशी माझी पहिलीच भेट घडली होती. ते गाणं आहे एकोणीसशे साठ साली प्रदर्शित झालेल्या अनुराधा या चित्रपटातील...
नंतर आकाशवाणीच्या सेवेत असताना या गाण्याची अधून मधून भेट होत होती. पण बरेचदा आपण गाणी फार वरवर ऐकतो. मग त्यांचा सविस्तर परिचय मात्र होत नाही. मराठीत आपण ढोबळमानानं 'ऐकणे' हा एकच शब्द वापरतो. परंतु, इंग्रजीत या छटा अधिक स्पष्ट आहेत—वरवर ऐकणे म्हणजे ‘to hear’ आणि मनापासून, कान देऊन ऐकणे म्हणजे ‘to listen’. त्यामुळे जेव्हा या गाण्याचं केवळ 'hearing' न करता 'listening' केलं, म्हणजे वरवर न ऐकता अवधानपूर्वक ऐकलं तेव्हा या रचनेचं खरं सौंदर्य उलगडलं आणि मग ते मर्मबंधातली ठेव होऊन गेलं.
हे गाणे म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी आणि शास्त्रीय संगीत विश्वातील तीन महामेरूंनी घडवलेला शब्द, स्वर आणि सूरांचा तीन पदरी राणीहारच जणू. हे गीत आकारलं आहे, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या सर्वोत्तम गीतकारांपैकी एक म्हणजे शैलेंद्र यांच्या लेखणीतून! शब्दकारीची जादू त्यांना उपजत अवगत असावी. आपल्या साध्या सोज्वळ पण मनभावी शब्दांनी, ते नायिकेच्या मनातील उत्कट विरह आणि व्याकुळता निमिषात उभी करतात.
‘हाय रे वो दिन क्यों ना आये
जा जा के ऋतु जा जा के ऋतु लौटाये’
निसर्गात ऋतू येतात, जातात आणि पुन्हा परततात; मग माझ्या आयुष्यातील ते सोनेरी, रम्य दिवस का परत येत नाहीत? हा साधा पण खोल प्रश्न विचारताना ते ऋतूंचे अत्यंत ऋजु रूपक वापरतात. मुखडाच इतका लाघवी असल्यावर गीताचं आकर्षण वाटलं नाही तरच नवल. तरी देखील तेवढ्यावरच समाधान मानायला न लावता शेवटच्या कडव्यात एका शब्दाची केवळ एक वेलांटी बदलून दोन भिन्न अर्थी शब्द त्यांनी इतके चपखल योजले आहेत की शब्दकारी वर प्रेम करणारे लट्टू होणारच!
‘सुनि मेरी बीना संगीत बिनासपनो की माला मुरझाये’
हुकुमी एक्या प्रमाणे शैलेंद्र शब्दांचा हा असा खेळ लीलया साधत. सहज आठवलं म्हणून आणखी एक उदाहरण देतो. चित्रपट श्री420 मध्ये ‘दम भर जो उधर मुंह फेरे’(नर्गिस) आणि ‘दम भर जो इधर मुंह फेरे’(राजकपूर) असा एका शब्दातील पहिल्या एका अक्षरात फरक करून स्त्री पुरुषांच्या प्रेमाच्या अभिव्यक्तितील फरक शैलेंद्र यांनी किती छान मांडला आहे पहा!
शास्त्रीय संगीतातल्या दिग्गजांचा, विशेषतः वादक, चित्रपट संगीत दिग्दर्शन करताना पाहायला मिळतात. त्यात पंडित रविशंकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा(शिव हरी), उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा प्रमुख समावेश आहे.
आता अशी शब्दस्वरूपा गीतरचना असल्यावर सामान्य संगीतकाराच्या प्रतिभेलाही बहर येणारच. इथे तर संगीत दिग्दर्शन नामवंत सितारीये पंडित रविशंकर यांचं आहे. या गीताची रचना त्यांनीच प्रचलित केलेल्या जनसंमोहिनी रागावर आधारलेली आहे. असं म्हणतात की या रागात बांधलं गेलेलं त्यांच्या कालखंडातलं हे पहिलंच हिंदी चित्रपट गीत आहे.
शब्द आणि स्वरांचा जमून आलेला सुरेल मेळ, लतादीदींचा सूर म्हणजे पंडित रविशंकर यांच्या ‘जनसंमोहिनी’ रागातील या रचनेला लाभलेली जणू संजीवनीच आहे. अर्थपूर्ण गायन, शब्दोच्चार, ठहराव आणि विराम(pauses) सुद्धा असे काही गायले गेले आहेत की आपणा समोर नायिकेच्या अंतरंगातील दुःखाचा झरझरीत आलेखच सादर होतो. ‘मनबाती जले...बुझ जाये’ तसंच ‘सपनो की माला...मुरझाये’ या ओळी गाताना जले आणि माला या शब्दां नंतर घेतलेला अल्पविराम नायिकेच्या आयुष्यात उरलेली पोकळी किती नेमकेपणानी दृश्यमान करतो बघा! त्यातून एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती मिळते. त्यांच्या छोट्या-छोट्या हरकती आणि ताना जनसंमोहिनी रागाचं सौंदर्य द्विगुणित करतात. लताजींच्या सर्वोत्तम गाण्यांच्या यादीत या गीताला स्थान आहे. पंडित रविशंकर यांनी हे गाणं ज्या प्रकारे संगीतबद्ध केलं आहे, त्यावरून चित्रपट संगीताची शैली त्यांना किती उत्तम अवगत होती, हे जाणवतं. लताजींच्या आवाजाचा त्यांनी अतिशय प्रभावी उपयोग करून घेतला. असा सर्व बाज जमलेला असतानाच पडद्यावर गाणं साकारणाऱ्या नायिका लीला नायडू(त्यांनी अभिनय केलेल्या मोजक्या चित्रपटांपैकी हा एक आहे) यांचा स्वरशब्दांशी नातं सांगणारा घरंदाज रुपाभिनय म्हणजे जणू काही अधरा खालचा तीळचं. या गीताला चिरयौवनाचा आशीर्वाद लाभला आहे. हे गीत सत्तरीत प्रवेशणार आहे हे खरं असूनही विश्वास ठेववत नाही. एकूणच पंडित रविशंकरांची रचनासिद्धता, शैलेंद्र यांची काव्यप्रतिभा आणि लता मंगेशकरांचा अमृतात न्हालेला स्वर—या तिन्हीच्या अतृतीयेतून (अद्वैतातून च्या धर्तीवर) जन्मलेले हे गाणं म्हणूनच कालमर्यादा ओलांडून आजही रसिकांची मनं संमोहित करण्यात यशस्वी आहे.
नितीन सप्रे
17092026

Khup abhyaspurna likhan keles mitra. Baki sarv varvar vichar kartat pan tu sakhol ritine barkave mandtos. Keep the excellent work going.
उत्तर द्याहटवा