स्मृतीबनातून –वेदनेची शांत(कथा)
वेदनेची शांत
कार्यालयीन कामाच्या निमित्तानं गेला आठवडाभर निखिल गोव्यात होता. सागरी खानपान आणि कामानिमित्त अनायसे घडणारं पर्यटन यामुळे कामाचा ताण फारसा न जाणवताच वेळ कसा निघून गेला हे कळलच नाही. शेवटच्या दिवशी मात्र त्यानं सर्वांसोबत रात्री उशिराची बस घेण्याऐवजी पाटो बस स्थानकावरून संध्याकाळी पाच वाजताची कदंब रोडवेजची बस पकडली. नव्वदच्या दशकात या प्रवासाला आताच्या तुलनेत दुप्पट वेळ लागत असे. नशिबाने फरशी गर्दी नव्हती त्याला समोरची खिडकीची सीट मिळाली. बाहेर हळूहळू अंधारायला लागलं होतं. हवेत छान सुखद गारवा होता. रस्त्याची स्थितीही बरी होती. रात्री दहाच्या सुमारास रस्त्या लगतच्याच पण काहीशा शांत धाब्यावर प्रवाशांच्या जेवणासाठी बस थांबवली. ढाबा बऱ्यापैकी टापटीप आणि स्वच्छ होता. “पात्राव, एक दाल फ्राय दोन रोटी आणि स्टीम रईस, जरा लवकर" अशी स्टँडर्ड(ठराविक) ऑर्डर निखिलनी दिली. रात्रीचे दहा वाजून गेले होते. धाब्यावर फारसा गोंगाट नव्हता फक्त गल्ल्यावर एक ट्रान्झिस्टर रेडिओ होता आणि त्यावर जुन्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम छायागीत सुरू होता. जेवण आटोपून निखिल बसच्या दिशेने निघत असतानाच, तलत मेहमूदच्या नर्म मुलायम, मखमली आवाजात “हमसे आया न गया, तुमसे पुकारा न गया... ” सरू झालं. तलतचे कातर हळवे सूर कानावर येताच निखिल थबकला. त्याच्या मनात सुरू झालेली चलबिचल त्याच्याकडे पाहणाऱ्याला सहज जाणवली असती...त्याची नजर सहज वर आकाशाकडे गेली. त्या निरभ्र आकाशात चंद्र नव्हता. त्यामुळे त्या काळोख्या रात्री इवल्या इवल्या टीमटीमणाऱ्या चांदण्यांचा प्रकाश अधिकच रुपेरी दिसत होता.
‘फासला प्यार में दोनों से मिटाया न गया’
गाण्याच्या पुढच्या ओळी ऐकत ऐकतच निखिल बस कडे परतला. बस निघाली. ढाबा मागे राहिला. गाण्याचे सूरही विरले. पण निखिलचं मन त्या गाण्यातच घुटमळत होतं. प्रवास पुढे सुरू झाला तो मात्र पांच सहा वर्ष मागे गेला. नोकरीच्या शोधार्थ फिरती सुरू असताना, अशाच कुठल्याशा प्रवासात त्याला ती भेटली होती. सर्दी आणि शिंकांनी बेजार अवस्थेत. सतत नाक पुसून नकाचा शेंडा लाल झालेली. प्रवासात band-aid, काही इमर्जनसी (emargancy) औषधं ठेवण्याची त्याला सवय होती. “काही औषध देऊ का मिस...?” “निर्मयी”... नाक पुसत पुसत तिने त्याच प्रश्नार्थक वाक्य लगेच पूर्ण केलं. त्यामुळे तिच्याशी संवाद साधतानाचा त्याच्यावरचा ताण थोडा कमी झाला. “मी काही डॉक्टर नाही. पण तुमच्या त्रासावर आराम पडेल अशी गोळी आहे माझ्याकडे. घेणार?” आणि उत्तर येण्याआधीच त्यानं पाकिटातली गोळी आणि पाण्याची बाटली तिच्या पुढे धरली. सर्दीनं बेजार झालेल्या तिनं आढेवेढे न घेता त्याला धन्यवाद देत लगेच औषध घेतलं. औषधामुळे ती थोडी गुंगीत गेली. थोडा वेळ गेला असेल ड्रायव्हरने त्याची गुंगी जावी म्हणून चहासाठी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरी वर थांबवली. निखिलही खाली उतरला होता. तेवढ्यात त्याची नजर निर्मयी कडे गेली. बस थांबल्यामुळे आणि बाहेरून येणाऱ्या थंड हवेमुळे ती झोपेतून जागी झाली आणि पिशवीत काहीतरी शोधत होती. निखिल चहा आणि उपलब्ध बिस्किटाचा पुडा घेऊन बस मधे चढला. दोन कागदी कप एकात एक घालून आणलेला चहा आणि बिस्किटाचा पुडा तिच्या समोर धरला. सामान्यतः ती भर रात्री अशा अवेळी चहा घेत नसे. पण सर्दीमुळे, निघताना काहीच खाल्लं नसल्यानं खरंतर तिला थोडी भुकेची भावना झालीच होती. तसंच काही न विचारताच तिच्यासाठी समजून चहा बिस्किटे आणण्याच्या निखिलच्या या अनपेक्षित कृतीमुळे ती मनोमन सुखावली. जराही संकोच न करता तिनं तो आलं घातलेला गरमागरम चहा आणि बिस्किटं खाल्ली. आता तिला चांगलाच आराम पडला होता. झोपही येत नव्हती. सुरवातीचं अवघडलेपणही कमी झालं त्यामुळे रात्रभर गप्पा मारत पुढचा प्रवास झाला. निखिलच्या मनात तलत गात होता...
‘वो घड़ी याद है जब तुमसे मुलाक़ात हुई
एक इशारा हुआ, दो हाथ बढ़े, बात हुईदेखते देखते दिन ढल गया, और रात हुई
वो समाँ आज तलक दिल से भुलाया न गया’
सगळं काही स्वप्नवत सुरू होतं. निखिलला लवकरच चांगली सरकारी नोकरी मिळाली. निर्मयीही एमबीए पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत रुजू झाली होती. निखिलचं निर्मयीवर मनापासून प्रेम होतं. तिच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणं ही त्याची सवय झाली होती. पण काळाच्या ओघात निर्मयीच्या कॉर्पोरेट जगतातल्या नव्या मित्रपरिवाराचा तिच्यावर प्रभाव पडू लागला. निखिलचा साधेपणा आणि त्याचं काळजी घेणं वगैरे कौतुकास्पद नसून एकप्रकारे पुरुषी अहंकार आणि वर्चस्व गाजवण्याचा प्रकार आहे असं तिच्या मनात भरवणाऱ्या 'सल्लागारांचं' कोंडाळं तिच्या भोवती गर्दी करून होतं. निर्मयी हुशार असली तरी प्रचंड हट्टी आणि बरीच अहंकारी होती. “निर्मयी तुझं आयुष्य तुझ्या मनासारखं जगण्यास तू स्वतंत्र आहेस. हा निखिल सतत तुझी काळजी घेण्याच्या नावाखाली तुला कंट्रोल तर करत नाही ना?" दिखाऊ हितचिंतकांच्या अशा सततच्या कानभरणीनं निर्मयीच्या मनात अविश्वासाचं बीज रोवलं.
करिअरमध्ये पुढे जात असताना तिच्यामध्ये नकळत एक प्रकारचा अहंकार बळावू लागला. निखिलनी प्रेमानी काळजीपूर्वक, तिच्या हिताचा विचार करून दिलेले सल्ले निर्मयीला तिच्या स्वांतत्र्यातला हस्तक्षेप वाटू लागले. त्यातच एका संध्याकाळी निर्मयीच्या करिअरशी संबंधित एका मोठ्या निर्णयावर निखिलनं तिला जरा विचार करून पाऊल उचलण्याचा प्रेमानं दिलेला सल्ला धुडकावून लावताना तिने सर्व मर्यादा ओलांडत "माझं भलं कशात आहे हे मला ठरवता येतं, तू मला शिकवायची गरज नाही" अशा शब्दात त्याचा अपमान केला. सल्लागारांच्या विचारांचा तिच्यावर इतका पगडा होता की तिला निखिलच्या त्या काळजी मागे फक्त तिचा अपमान दिसला. तरीही निखिलनं शांत रहाणं पसंत केलं, पण निर्मयीचा अहंकार अगदी शिखरावर स्वर झाला होता. तिनं माघार घेणं तर सोडाच पण अगदी नातं तोडण्या पर्यंत ताणून धरलं.
"निखिल, तू माझ्यावर मालकी हक्क गाजवू नकोस! माझं भलं कशात आहे हे ठरवायला मी सक्षम आहे. तुझ्या उपदेशाची मला गरज नाही. तुझ्या स्वभावामुळे मला गुदमरल्या सारखं होतंय!" निर्मयीनं राईचा पहाड केला. तीचा तो आवेश आणि तिचे ते शब्द निखिलच्या अगदी जिव्हारी लागले.
तरी देखील निखिलने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, "निर्मयी, मी फक्त तुझ्या काळजीपोटी तुला विचारपूर्वक निर्णय घ्यायला सांगितलं. तुझ्यावर कुठलाही मालकी हक्क गाजवण्याच्या जराही हेतू नाही..."
पण अहंकाराचा विळखा इतका घट्ट होता की ती ओरडली, "मला नकोय तुझी ही काळजी! आपण इथेच थांबलेलं बरं. आपल्यात आता काहीही उरलेलं नाही!"
केवळ वृथा अहंकार आणि लोकांच्या सांगण्यावरून अविचारी निर्मयीनं एक हळुवार, सुंदर नातं एका क्षणात तोडून टाकलं. निखिलनं तिचा निर्णय शांतपणे स्वीकारला. त्याने तिच्यावर कधीच स्वतःचं प्रेम लादलं नव्हतं, त्यामुळे कितीही वाईट वाटलं तरी तो शांतपणे तिच्या आयुष्यातून बाजूला झाला. तलत मनातल्या मनात समजावत होता...
‘क्या ख़बर थी कि मिले हैं तो बिछड़ने के लिए
क़िस्मतें अपनी बनाई हैं बिगड़ने के लिए
प्यार का बाग़ बसाया था उजड़ने के लिए
इस तरह उजड़ा कि फिर हमसे बसाया न गया ’
त्या प्रवासाला सहा वर्षं उलटून गेली होती. या काळात निखिलनं स्वतःला सावरलं होतं. पण आठवणींच्या हळव्या कोपऱ्यात मनात निर्मयीनं व्यापलेली ती जागा अजूनही तशीच होती—थोड्या वेदनेसह... त्या रात्रीच्या प्रवासात विरह भावना अधिक ठसठशीत करणाऱ्या बागेश्रीच्या स्वरात तलतचे सूर निखिलला अधिकच आर्त जाणवले होते...
‘याद रह जाती है और वक़्त गुज़र जाता है
फूल खिलता है मगर खिल के बिखर जाता है
सब चले जाते हैं, कब दर्द-ए-जिगर जाता है?
दाग़ जो तूने दिया, दिल से मिटाया न गया’
ना कोणती तक्रार, ना कोणता राग. बस महामार्गावरून पुढे धावत होती. खिडकीबाहेर आकाशात धूसर होत जाणाऱ्या त्या चांदण प्रकाशात, कुठल्या तक्रारी शिवाय कुणावरही रोष न बाळगता, निखिल मनात उसळलेल्या त्या जुन्या आठवणींना पुन्हा एकवार शांतपणे निरोप देत होता.
नितीन सप्रे
220920261715

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा